समरस समाजाच्या वास्तवासाठी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jan-2021
Total Views |

Jalinder kamble_1 &n
 
 
 
 
ऊन-पावसाच्या आयुष्याच्या खेळात नकारात्मकतेला बाजूला सारत सकारात्मकतेचे अमृत समाजात पेरणाऱ्या जालिंदर कांबळे यांच्या जीवनाचा घेतलेला मागोवा...
 
 
पुण्याला रा. स्व. संघाची बैठक होती. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत बैठकीला मार्गदर्शन करत होते. परिचय सुरू झाला. जालिंदर कांबळे उभे राहिले म्हणाले, “नमस्कार! मी, जालिंदर कांबळे.” इतक्यात मोहनजी भागवत म्हणाले की, “मी, तुम्हाला ओळखतो.” जालिंदर यांना वाटले की, भागवतजी दुसऱ्या कुणाला तरी बोलत असतील. कारण, मोहनजी भागवत यांना समोरासमोर ते प्रथमच भेटत होते. जालिंदर म्हणाले, “नाही, आपण पहिल्यांदाच भेटत आहोत.” यावर मोहनजी भागवत अतिशय स्नेहमय स्वरात म्हणाले, “मी, तुम्हाला ओळखतो. तुमचे ‘अष्ट धर्म परिचय’ पुस्तक मी वाचले आहे. त्या पुस्तकातला संदर्भ मी कित्येकांना दिला आहे.” सरसंघचालकांनी आत्मीयतेने आपल्याबद्दल आणि पुस्तकाबद्दल बोलल्यामुळे जालिंदर भावविभोर झाले. या प्रसंगाच्या ठीक पाच वर्षांपूर्वी जालिंदर कांबळे यांनी ‘अष्ट धर्म परिचय’ पुस्तक लिहिले होते. सर्वच मान्यवरांना त्यांनी हे पुस्तक दिले होते. हे पुस्तक त्यांनी नागपूरला सरसंघचालकांनाही पाठविले होते. मात्र, हा प्रसंग जालिंदर विसरले होते. त्यानंतर पाच वर्षांनी प्रत्यक्ष सरसंघचालक स्वत: या पुस्तकाबद्दल बोलल्याने जालिंदर यांना धन्य धन्य वाटले. 
 
 
जालिंदर कांबळे कोण? तर ते आहेत भारतीय मजदूर संघाचे पुणे जिल्हा सेक्रेटरी, सर्वपंथ समादर मंचाचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी, मातंग चेतना परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र कार्यकर्ता आणि पुणे शहरातील इतरही अनेक जबाबदाऱ्या ते लीलया पार पाडत आहेत. ‘मातंग समाज’, ‘मातंग इतिहास’, ‘मंग बाली’, ‘अष्ट धर्म परिचय’, ‘स्वातंत्र्यक्रांतीचे जनक लहुजी वस्ताद’, ‘तमाशा आद्यप्रवर्तक उमाजी बाबा’, ‘साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे’, ‘क्रांतिवीर राघोजी भांगरे’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘उतारा’, ‘मढं’, ‘कासरा’ इत्यादी पुस्तकांचे यशस्वी लेखन त्यांनी केले आहे. सध्या ते ‘रहस्य रामायण’ लिहित असून सध्या १७ भाषांतील रामायणाचा ते अभ्यास करत आहेत. रामायणावर अभ्यास असलेल्या मान्यवरांशी चर्चा करत आहेत. जालिंदर यांच्या विद्वत्तेचा गौरव सर्वत्र होत आहे. जालिंदर यांच्या जीवनाचा आढावा घेतला तेव्हा कळले की, अग्नीचे चटके सहन करत सोने तावून-सुलाखून निघते. तसेच जालिंदर यांचे जगणे अनुभवाच्या अग्नीत तावून-सुलाखून निघाले आहे.
 
 
जालिंदर यांचे मूळगाव सांगली जिल्ह्यातले सावळज. जालिंदर यांचे वडील शिवाजी आणि आई शांताबाई अत्यंत पापभिरू. उभयतांना चार अपत्ये. त्यापैकी एक जालिंदर. शिवाजी मातंग समाजाचे पारंपरिक दोर वळण्याचे काम न करता-करता शेतमजुरी करीत असत. दुसऱ्यांचे रानही राखायचे काम करीत. अनेक दिवस ते घरीही येत नसत. अपार कष्ट करीत. ते पहिलवान होते. अत्यंत समाजशील आणि मदतीला तत्पर होते म्हणून गावात त्यांना मान होता. शांताबाईही घर सांभाळून शेजमजुरी करीत. घरी आर्थिक तंगी असली तरी संस्काराचे वैभव होते. जालिंदर तेव्हा खूप लहान होते. गावात एक सिद्धेश्वराचे मंदिर हेाते. लहान मित्रांमध्ये पैज लागली की, जो कुणी गाभाऱ्यात जाऊन देवाच्या पायाला हात लावून येईल, त्याला चिक्की मिळेल. जालिंदर चपळाईने उठले आणि त्यांनी मूर्तीच्या पायाला स्पर्श करून नमस्कार केला. इतक्यात मंदिरातल्या गुरवाने आरडाओरडा केला. लोकं जमा झाली. मला दोन फटके दिले. वातावरण पेटणार इतक्यात गावचे पाटील आले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. जालिंदर यांना विचारले, “तुझ्या वडिलांचे नाव काय?” मी म्हणालो, “शिवा मांग.” यावर ते म्हणाले, “बरं, तू जा आता, परत असं करू नकोस,” असे म्हणून त्यांनी शिवाजी यांचे गुण गायले. त्यावेळी छोट्या जालिंदरच्या मनात आले की, आपल्या वडिलांचे गावात नाव आहे. आपल्या वडिलांची प्रतिमा मलीन होईल, असे कोणतेही काम कधीही करायचे नाही. हाच दिवस जालिंदर यांच्या आयुष्याला वळण देणारा प्रसंग होता. पुढे हलाखीच्या परिस्थितीतच जालिंदर दहावी पास झाले. मग ते सांगलीला आयटीआय कोर्स करू लागले. तिथे प्रत्येक तिमाही परीक्षेत ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत. वार्षिक परीक्षेला मात्र ते अनुत्तीर्ण झाले. हे होणे असंभव होते. पूर्ण तपासाअंती कळले की, काही चुकीमुळे जालिंदर यांची उत्तरपत्रिका दुसऱ्याच्या नावावर तपासली गेली होती. यात आयटीआयच्या संबंधित अधिकाऱ्याने चूकही मान्य केली.
 
 
 
मात्र, ज्याच्या नावावर जालिंदर यांची उत्तरपत्रिका तपासली होती, तो मुलगा त्या उत्तरपत्रिकेच्या गुणामुळे एसटीत नोकरीला लागला होता. जालिंदर पास-नापास तपासणी करत आहेत म्हणून मग या मुलाचे आईवडील जालिंदरकडे आले आणि म्हणाले, “आमचा मुलगा कधीही पास होणार नाही. पण, उत्तरपत्रिकेच्या नावातील अदलाबदलीमुळे तो पास झाला आणि त्याला नोकरी लागली. तू पुढची तपासणी केलीस तर त्याची नोकरी जाईल,” असे म्हणत ते जालिंदर यांच्या पाया पडत रडू लागले. जालिंदर यांचे मन द्रवले. त्यांनी प्रकरणात माघार घेतली. पुन्हा आयटीआयची परीक्षा पुण्यात दिली आणि ९१ टक्के गुण मिळवत प्रथम आले. ते पुण्यातच राहू लागले. महिना १५० रुपयांवर गॅरेजमध्ये काम करू लागले. गॅरेजमध्येच राहू लागले, तेव्हा कित्येक दिवस त्यांना उपवास घडे. नुसत्या चहावर कित्येक दिवस ते राहिले. पण, हे दिवस बदलायचे हे त्यांच्या मनात होते. त्यांच्याकडे कौशल्य शिक्षण होते. त्या बळावर त्यांना सरकारी नोकरी मिळाली. आयुष्य स्थिर झाले. इथेच त्यांचा संबंध ‘भारतीय मजदूर संघ’ आणि त्यातून ‘समरसता मंचा’शी आला. त्यांनी स्वतःचे घर घेतले. ते सुंदर आणि स्वतःचे घर बघून जालिंदर यांचे वडील म्हणाले की, “आमची सारी उमर रानात गेली. तू तर शहरात घर घेतलेस. खूप मिळवलेस,” असे म्हणून शिवाजींनी आंनदाश्रू पुसले. जालिंदर म्हणतात, “तो माझ्या आयुष्यातला मोठा पुरस्कार आहे.” समाजातील गटातटाच्या भिंती दूर करून समाजाला समरस करण्याचे जालिंदर यांचे स्वप्न आहे. अथक परिश्रम करून ते स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्न करत आहेत.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@