जो आणि जिनपिंग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jan-2021   
Total Views |

Biden and Jingping_1 
 
 
 
दि. २० जानेवारी रोजी अमेरिकेचे ४६वे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडन शपथ घेतील. सध्या त्यांची संपूर्ण टीम कशी असेल, त्यासंबंधीच्या नियुक्त्या आणि एकूणच बायडन यांच्या ध्येय-धोरणांवर चर्चा होताना दिसते. तसे होणेही म्हणा अगदी स्वाभाविक. कारण, अमेरिकेसारख्या महासत्तेच्या चाव्या आता बायडन यांच्या हाती असतील. त्यामुळे बायडन यांच्या प्रत्येक देशाबाबत, आर्थिक, परराष्ट्रीय धोरणांबाबतच्या भूमिका याकडे आता साऱ्यांचे लक्ष आहे. विशेषकरून ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या काळात अमेरिका-चीन संबंध कधी नव्हे इतके ताणले गेले. तेव्हा, ‘व्हाईट हाऊस’मध्ये बायडन यांचा गृहप्रवेश चीनसाठी शुभसूचक ठरतो की अशुभ इशारा, हे आगामी काळात स्पष्ट होईलच. पण, आजवर बायडन यांच्या मुलाखती, विधाने आणि पार्श्वभूमी लक्षात घेता, ते चीनला पूर्ण ढिलही देणार नाहीत आणि ट्रम्प यांच्याइतके दाबणारही नाहीत, असेच म्हणावे लागेल.
 
अमेरिकेचा नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष आणि त्याची ध्येय-धोरणे यावरून खरंतर जागतिक समीकरणांमध्ये चढ-उतार आपल्याला पाहायला मिळतात. आता अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचेच उदाहरण घ्या. ज्या रशियाशी शीतयुद्धापश्चातही अमेरिकेचे संबंध कायम ताणलेले राहिले, ते संबंध ट्रम्प यांच्या काळात मात्र स्थिरावले. या संबंधांमध्ये ना टोकाचे सौख्य आणि ना टोकाचे शत्रुत्व, या काळात पाहायला मिळाले. आता निश्चितच या घटनेला रशियाने ट्रम्प यांच्या २०१७ राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ढवळाढवळ केल्याची किनार होती, हा भाग अलहिदा. पण, अमेरिका-रशिया संबंध ट्रम्पकाळात ताणले गेले नाहीत. मात्र, ओबामांच्या कार्यकाळात असलेले चीनशी संबंध ट्रम्प यांच्या गेल्या चार वर्षांच्या कारकिर्दीत पार फिस्कटले. इतके की व्यापारयुद्धातून प्रारंभ झालेला संघर्ष सामरिक संघर्षाच्या उंबरठ्यापर्यंत येऊन ठेपला. चीनच्या अरेरावीला ट्रम्प यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. चिनी कंपन्यांवरील निर्बंध असो वा तिबेट-तैवानच्या बाजूने कधी नव्हे ती अमेरिकेने घेतलेली ठोस भूमिका असो, यामुळे ड्रॅगनची नांगी ठेचायचीच, या इरेने ट्रम्प पेटून उठले. चीनलाही त्यामुळे जागतिक नामुष्कीचा सामना करावा लागला, तो वेगळाच! परंतु, आता ट्रम्प यांची ‘एक्झिट’ आणि जो बायडन यांची ‘एंट्री’ ही एकट्या चीनसाठीच नव्हे, तर जागतिक राजकारणातही उलथापालथ करणारी ठरू शकते.
 
 
एक बाब प्रकर्षाने ध्यानात घ्यावी लागेल की, शीतयुद्धोत्तर काळातही अमेरिकेचे चीनशी तसे चांगले संबंध होते. चीन सोव्हिएत रशियाच्या नादी लागून आपल्या डोक्यावर बसू नये, आपल्याच गटात राहावा म्हणून अमेरिकेनेही प्रयत्नांची पराकाष्ठा केली. चिनी कंपन्या, उद्योजक यांना अमेरिकेने पायघड्या घातल्या. भविष्यात हाच चीन महासत्ता म्हणून आपल्याला आव्हान देईल, याचा अंदाज खुद्ध अमेरिकेलाही बांधता आला नाही. परिणामी, चीन जागतिक बाजारपेठा हळूहळू काबीज करत आपल्या महासत्तेच्या स्वप्नाकडे कूच करत होता आणि अमेरिकेचे बोटचेपे धोरणच यासाठी कारणीभूत ठरले होते. अमेरिका-चीनच्या या वाढत्या मैत्रीमुळेच, भारत-रशिया संबंध इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीत बहरले, हे कसे विसरून चालेल? बांगलादेश युद्धाच्या वेळीही अमेरिकेने आपली युद्धनौका भारताच्या विरोधात, पाकिस्तान-चीनच्या बाजूने समुद्रात उतरविली होती. त्यानंतर लगेचच १९७२ साली अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि चीनचे सर्वेसर्वा माओ झेडाँग यांची बीजिंग येथे झालेली भेट त्याचीच साक्ष देते.
 
 
पण, गेल्या चार दशकांत पुलाखालून भरपूर पाणी वाहून गेले. आता जो बायडन आणि शी जिनपिंग यांच्या संबंधांवर या दोन्ही देशांची मदार असेल. ट्रम्प यांनी चीनविरोधात स्वीकारलेले आक्रमक अन् आक्रस्ताळे धोरण बायडन नक्कीच स्वीकारणार नाहीत, हे निश्चित. पण, याचा अर्थ चीन सगळी कटुता गिळून अमेरिकेच्या गळ्यात गळे घालेल, असेही नाही. जाणकारांच्या मते, बायडन चीनकडे एक प्रतिस्पर्धी म्हणून बघतात आणि दोन्ही देशांमध्ये एक सकारात्मक स्पर्धेचे वातावरण राहिले पाहिजे, या मताचे ते आहेत. त्यामुळे आगामी काळात ट्रम्प यांनी ‘सळो की पळो’ करून सोडलेल्या चीनला बायडन सुखासुखी पुनरुज्जीवित करतील, अशी भाबडी आशाही बाळगणे गैर. त्यात कोरोना महामारीमुळे जागतिक रोषाचा सामना कराव्या लागणाऱ्या चीनशी बायडन एकाएकी मित्रत्वाचा हात पुढे करतील, याची शक्यताही तशी धुसरच! त्यामुळे ओबामा-क्लिंटन काळातील अधिकाऱ्यांचीच मोट बांधणारे बायडन चिनी ड्रॅगनला धाकात ठेवतात की खुली सूट देतात, हे पाहणे आता औत्सुक्याचे असेल.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@