सोशल मीडिया आणि माहिती गोपनीयता धोरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2021
Total Views |

Social_1  H x W
 
 
‘व्हॉट्स अ‍ॅप’च्या नवीन अटी आणि गोपनीयता धोरणामुळे जगभरातील कोट्यवधी ‘व्हॉट्स अ‍ॅप’ वापरकर्ते हे अ‍ॅप वापरावे अथवा नाही, यासंबंधी द्विधा मन:स्थितीत आहेत. त्यानिमित्ताने ‘व्हॉट्स अ‍ॅप’चे हे धोरण नेमके आहे तरी काय आणि वापरकर्त्यांनी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे, याविषयी मार्गदर्शन करणारा हा लेख...
 
 
 
तंत्रप्रणालींच्या संयोगांमुळे विशेषतः चित्र, ध्वनी आणि माहितीच्या एकत्रित वापरामुळे एकात्मिक माहिती, संवाद आणि करमणुकीचे एक वेगळेच दालन उघडले आहे. इंटरनेट ही चैनीची बाब नसून, एक अत्यावश्यक घटक बनत चालली आहे. आजचं युग पूर्णपणे डिजिटल झालंय. १९९०च्या दशकापासून इंटरनेट आणि सन २००० नंतर सोशल मीडिया व स्मार्टफोनचा प्रचंड प्रसार झाल्यामुळे, बातम्या पसरवणे फारच सोपे झाले. स्मार्टफोनमधील सोशल संवादमाध्यमे, टीव्ही/वृत्तपत्रे इ. पेक्षा सहज प्राप्त होणारी, कमी खर्चाची आणि हाताळायला सोपी असल्याने जगभरातील अधिकाधिक स्मार्टफोनधारक बातम्या मिळविण्यासाठी त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत. ‘घरोघरी मातीच्या चुली’ या म्हणीची जागा घरोघरी स्मार्टफोन व सोशल मीडियाने घेतली आहे.
आपली मुले जेव्हा म्हणतात की, मित्राबरोबर गप्पा मारत होतो, याचा अर्थ पूर्वी कट्टा, पटांगणं, अशा अर्थाने अध्यारूढ असे. आताच्या पिढीत गप्पा या चाट, ऑनलाईन, व्हॉट्स अ‍ॅप अशा असतात. लोकांचे मोठ्या संख्येने इंटरनेटवरील अनेक सोशल साईटवरून ‘एक अस्तित्व’ तयार झाले आहे. इंटरनेटवरील सोशल मीडिया हे जगभरातील नागरिकांच्या आयुष्यातील व समाजातील एक महत्त्वपूर्ण माध्यम बनले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करून अनेकांना लोकांपर्यंत आपले विचार, मते, माहिती पोहोचविण्याचा एक नवा मार्ग पुढे आला आहे. मोबाईल फोन आणि इंटरनेट ही तशी म्हटली तर फार प्रभावी साधने आहेत. त्यांच्यातील छुपे सामर्थ्य ओळखून त्याचा डोळसपणे उपयोग केला, तर बरीच कामे सहजपणे होतात, खर्च आणि वेळ वाचतो आणि वापरकर्त्याच्या ज्ञानातही भर पडते. इंटरनेटवरील सोशल मीडिया हा जगभरातील नागरिकांच्या आयुष्यातील व समाजातील एक महत्त्वपूर्ण माध्यम बनले आहे. ‘सोशल नेटवर्किंग’ हा इंटरनेटच्या महाजालातील परवलीचा शब्द आहे. सोशल मीडियावर असणं आताच्या काळाची अनिवार्य गरज झाली आहे. तिथं नसणं काळाबरोबर नसल्याचं लक्षण मानलं जातं. सोशल मीडियामुळे अनेक लोकांशी संपर्क ठेवता येतो. यात वेळ, स्थान या गोष्टी आड येत नाहीत. कारण, हे माध्यम जागतिक आहे. पण, या ओळखींचा प्रत्यक्ष आयुष्यात उपयोग होतो की नाही, हे सांगणे कठीण आहे. अनेक वेळा फेसबुकवरील मित्र प्रत्यक्ष भेटल्यावर ओळखही देत नाहीत. त्यामुळे या नातेसंबंधांना किती महत्त्व द्यायचे, हे वापरकर्त्याने ठरवले पाहिजे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांना लोकांपर्यंत आपले विचार, मते, माहिती पोहोचविण्याचा एक नवा मार्ग पुढे आला आहे. आपले दैनंदिन आयुष्य सोशल मीडियावर प्रकाशित करणे, हा काहींचा छंद झाला आहे. अनेकांना यात व्यसनाधीन बनवायचे काम त्यामुळे होत आहे. मानसोपचारतज्ज्ञांनी सोशल मीडिया ट्रिटमेंट सेंटर्स सुरू केली, तर आश्चर्य वाटायला नको.
वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारांत आपल्याला घरबसल्या जगाची ओळख करून देणारी संवादमाध्यमे म्हणजे फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम असे थोडक्यात म्हणता येईल. शाळा-कॉलेजनंतर जगभर विखुरलेले मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक पुन्हा भेटवणारे आणि उद्योग-व्यवसायाच्या नवनवीन (व कधीकधी अनपेक्षितदेखील) संधी मिळवून देणारे हे संवादमंचसुद्धा त्रासदायक ठरू शकतात. पण, बरेचदा त्यात चूक आपलीच असते. कारण, आपल्या आयुष्यातील खासगी आणि सार्वजनिक बाबींदरम्यान असलेली अदृश्य सीमारेषा आपण इथे नकळत ओलांडतो.
एक काळ असा होता की, एका गावाहून दुसर्‍या गावाला महत्त्वाचा निरोप पाठवायला तार हे वेगवान साधन होतं. पत्र पाठवणं, हे आधुनिक समजलं जायचं. मग फोन आले. या संभाषण पद्धतीमध्ये गोपनीयता होती. पोस्टमनकाका आपले पत्र कधीही वाचत नसत किंवा टेलिफोन एक्सचेन्ज आपले संभाषण ऐकत नसे. पण, सोशल मीडिया टूल्सबाबत असे नसते. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला ‘डॉटकॉम’ कंपन्या उदयास आल्या व डिजिटल अर्थव्यवस्थेचा उदय झाला. एक वेबसाईट उघडायची, तिचे मार्केटिंग करायचे, वापरकर्ते मिळवायचे, विशिष्ट टप्प्यानंतर बॅनर जाहिराती मिळवायच्या व नंतर वापरकर्त्यांची माहिती जाहिरातदारांना व टेलिकॉलर्सना विकायची, ही या व्यवसायाची नवीन पद्धत सुरू झाली. वापरकर्ता यासाठी काहीही आर्थिक झळ सोसत नसल्याने त्याची माहिती जर इतरांना विकली तर बिघडले कुठे, हे सर्रास ठसवले जाऊ लागले. अनेकांना हे माहीत नसते की, गुगल सर्च ही सुद्धा एक आर्थिक बाब आहे. जर थोडे पैसे खर्च केले की एखादी व्यक्ती, संस्था, उद्योग गुगल सर्चमध्ये अव्वल क्रमांकावर येतो. या व्यवहाराला ‘सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन’ असे गोंडस नाव आहे. हे सर्व एका मर्यादेपर्यंत ठीक होते. पण, यामुळेच काही मोजक्या माहितीचा साथ असणार्‍या कंपन्या बलाढ्य बनल्या असून, त्यांच्याकडे कोट्यवधी व्यक्तींची गोपनीय व खासगी माहिती एकवटली आहे. या कंपन्या खूप मोठ्या झाल्या की, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे अवघड होते. प्रगत देशात याचमुळे फेसबुक-ट्विटरवर अनेक खटले चालू आहेत.
एखाद्या सोशल नेटवर्कसेवेचा पाया म्हणजे एखाद्या व्यक्तीने त्या सोशल नेटवर्किंग संकेतस्थळावर तयार केलेले ‘प्रोफाईल’ अर्थात माहितीचा साठा. पूर्वी मध्यपूर्वेतील देशांना त्यांची संपत्ती म्हणजे तेलाचा साठा असे म्हटले जायचे. आता त्याचे रूपांतर माहितीच्या साठ्यात झाले आहे आणि इथंच गोपनीयता, नीतिमत्ता, नैतिकता हे प्रश्न निर्माण होतात. सोशल मीडियावर तुम्ही खर्च केलेल्या मिनिटा-मिनिटांचाही हिशोब ठेवला जातो. कदाचित तुम्हाला कल्पना नसेल, पण कोणत्या मिनिटाला सोशल मीडियावर काय घडले, काय घडते, याचा डेटा साठवला जातो, त्याचा अभ्यास केला जातो. जेव्हा आपण नवीन खाते तयार करतो, तेव्हा ‘व्हॉट्स अ‍ॅप’ आपल्याकडून विविध माहिती मिळवते : डिव्हाईस आयडी, यूजर आयडी, डिव्हाईस डेटा, शॉपिंग हिस्ट्री, फोन नंबर, ई-मेल पत्ता, प्रॉडक्ट इंटरॅक्शन, परफॉर्मन्स डेटा, पेमेंट इन्फो, कस्टमर सपोर्ट, अन्य डायग्नॉस्टिक डेटा, अन्य यूझर कंटेंट, कॅश डेटा. आजघडीला तर ४० कोटी ‘व्हॉट्स अ‍ॅप’ युझर्स भारतात आहेत. ‘व्हाट्स अ‍ॅप’ने गोपनीयता धोरण बदलले. ८ फेब्रुवारीची तारीख दिली व सर्व वापरकर्त्यांना ते अनिवार्य केले. पण, त्यात आता वाढता विरोध लक्षात घेता, ‘व्हॉट्स अ‍ॅप’ने बदलही जाहीर केले आहेत. पण, नेमके काय आहे, ‘व्हॉट्स अ‍ॅप’चे नवे धोरण, ते समजून घेतले पाहिजे. आधी ‘व्हॉट्स अ‍ॅप’ने जाहीर केल्याप्रमाणे, ८ फेब्रुवारीपासून वापरकर्ते जो कंटेट अपलोड, सबमिट, स्टोअर, सेंड वा रिसिव्ह करतात, कंपनी त्याचा वापर कधीही, कुठेही करून तो डेटा रिप्रोड्यूस, डिस्प्ले वा डिस्ट्रिब्युट करू शकेल.
 
चिंतेचं कारण...
प्रायव्हसी कंपनीकडे शेअर करावी लागेल, म्हणजे ‘व्हॉट्स अ‍ॅप’ तुमच्या संपूर्ण डेटावर लक्ष ठेवणार आहे. वापरकर्त्याने केलेला खर्च, आयपी अड्रेस, लोकेशन, स्टेटस, कंटेंट, कॉल यांसारख्या सर्व डेटाचा एक्सेस कंपनीला करता येईल. या संकेतस्थळांवरील सदस्याला आपल्या माहितीची काही प्रमाणात गुप्तता राखता येते. मात्र, यावर मर्यादा आहेत. उदा.- फेसबुकवर एखादे अ‍ॅप्लिकेशन वापरायच्या आधी एक सूचना येते. त्या सूचनेनुसार त्या सदस्याची माहिती व फोटो वापरण्याची परवानगी फेसबुकला दिली जाते. मात्र, ही माहिती कशासाठी वापरणार, याची कल्पना सदस्याला नसते. त्याचप्रमाणे फेसबुकवर एखाद्या सदस्याने जरी आपल्या फोटोंविषयी गुप्तता पाळली असेल, तरी त्या सदस्याचे नाव फेसबुकवर शोधले असता काही फोटो दिसतात. हे फोटो मुख्यत्वे त्या सदस्याच्या मित्रमंडळींनी प्रकाशित करून त्यात सदस्याला ‘टॅग’ केलेले असते. त्यामुळे ‘गोपनीयता’ ही सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांविषयीची मुख्य चिंता आहे.
 
 
 
सेवेच्या नवीन अटी आणि गोपनीयता धोरणाप्रमाणे ‘व्हॉट्स अ‍ॅप’ वापरकर्त्यांसाठी फेसबुकसह माहिती सामायिक करणे अनिवार्य करते. फेसबुकचे वापरकर्ते वाढविणे, हे त्यांचे सरळ व्यापारी उद्दिष्ट आहे. सध्या ‘व्हॉट्स अ‍ॅप’ने प्रकाशित केलेले नवे गोपनीयता धोरण व त्यामुळे उठलेले वादंग व नंतर सारवासारव करत ‘व्हॉट्स अ‍ॅप’ने केलेले स्पष्टीकरण हे सर्व वरवरचे प्रश्न आहेत. खरा मुद्दा आहे तो आपण या उद्योगांना नको ती माहिती देतोच का? हा आहे.
या सर्व प्रकरणात कळीचा मुद्दा हा आहे की, माहितीचा मालक कोण आहे? वापरकर्ता का सोशल मीडिया सॉफ्टवेअर विकासक? सोशल मीडियामुळे अनेक लोकांशी संपर्क ठेवता येतो. यात वेळ, स्थान या गोष्टी आड येत नाहीत. कारण, हे माध्यम जागतिक आहे. पण, या ओळखींचा प्रत्यक्ष आयुष्यात उपयोग होतो की नाही, हे सांगणे कठीण आहे. अनेक वेळा फेसबुकवरील मित्र प्रत्यक्ष भेटल्यावर ओळखही देत नाहीत. त्यामुळे या नातेसंबंधांना किती महत्त्व द्यायचे, हे वापरकर्त्याने ठरवले पाहिजे. या सर्वाचा अर्थ स्पष्ट आहे. आपण आपले जीवन व अर्थव्यवहार सोशल मीडियावर प्रकाशित करण्याचा मूर्खपणा करू नका. यामुळे या माध्यमांवर आपण कुठली माहिती ठेवतो यावर वापरकर्त्यांनी थोडे सजग झाले पाहिजे. शाळा-कॉलेजनंतर जगभर विखुरलेले मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक पुन्हा भेटवणारे आणि उद्योग-व्यवसायाच्या नवनवीन (व कधीकधी अनपेक्षितदेखील) संधी मिळवून देणारे हे संवादमंचसुद्धा त्रासदायक ठरू शकतात. पण, बरेचदा त्यात चूक आपलीच असते. कारण, आपल्या आयुष्यातील खासगी आणि सार्वजनिक बाबींदरम्यान असलेली अदृश्य सीमारेषा आपण इथे नकळत ओलांडतो. सोशल मीडियावरील आपल्या अस्तित्वाचे आणि त्यांमार्फत आपण मांडत असलेल्या आपल्या प्रतिमेचे योग्य व्यवस्थापन करीत राहणे अत्यावश्यक असते.
कुठलीही गोष्ट मर्यादित प्रमाणात मूल्य देते. सोशल मीडियाचे पण असेच आहे. जर गरज असेल तरच ते वापरा. मानव हा समाजशील प्राणी आहे. जात, धर्म, प्रांत, देश यांच्या सीमा ओलांडून मैत्रीचे बंध जोडले जातात, विचारांचे पूल बांधले जातात आणि हे केवळ या सोशल मीडियामुळेच शक्य होत आहे, हे कोणीही नाकारू शकणार नाही. पण, त्याचा संयमित, नियंत्रित आणि व्यापक सामाजिक हित डोळ्यांसमोर ठेवून वापर केला जाणे, ही खूप आवश्यक बाब आहे आणि ती केवळ स्वयंशिस्तीच्या माध्यमातूनच शक्य आहे. हे एक कठीण काम एकविसाव्या शतकात जन्मलेल्या पिढीला करावे लागणार आहे. प्रत्येक माध्यमाची क्षमता अन् उपयोगिता वेगवेगळी आहे, हे समजून घेऊन सोशल मीडिया वापरकर्त्यांनी संतुलित मानसिकता ठेवावी हेच श्रेयस्कर!
- डॉ. दीपक शिकारपूर
(लेखक उद्योजक व संगणक साक्षरता प्रसारक आहेत.)
@@AUTHORINFO_V1@@