मोल तुमच्या श्वासाचे हे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2021   
Total Views |

saf_1  H x W: 0
 
 
भारतीय सैन्य अहोरात्र देशाच्या सीमांचे आणि देशवासीयांचे रक्षण करण्यासाठी सज्ज असते. त्यासाठी अतिशय विषम परिस्थितींचा सामना त्यांना करावा लागतो. जगातील सर्वांत उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीनमध्येही भारतीय लष्कर तैनात असते. उणे ६० अंश तापमानामध्ये कार्यरत सैनिकांना सियाचीनमध्ये प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन कृत्रिमरीत्या पुरविणे अत्यंत गरजेचे असते. केंद्र सरकार त्यासाठी आवश्यक ते सर्व काही करीतच असते. मात्र, पुण्यातील सुमेधा आणि योगेश चिथडे या दाम्पत्याने सियाचीनमध्ये अत्याधुनिक ऑक्सिजन प्लांट उभारून दिला आहे. त्यामुळे आता तेथे ३६५ दिवस आणि २४ तास प्राणवायूची उपलब्धता झाली आहे. त्याचीच ही कहाणी...
 
 
"आपला वैयक्तिक स्वार्थ, हेवेदावे, विचारसरणी, वैयक्तिक अडचणी यांचा बाऊ न करता, अहोरात्र देशाच्या आणि देशवासीयांच्या रक्षणासाठी झटणारी भारतीय सैन्यदले ही देशाचे खरे हिरो असायलाच हवे. कारण, काहीही झाले तरी सैन्यदले कधीही संपावर जात नाहीत, ते कधीही आपल्या अडचणी समाजासमोर मांडत नाहीत, कोणाविरोधातही त्यांची कधीही तक्रार नसते. विशेष म्हणजे, जम्मू-काश्मीर, सियाचीन, राजस्थान, अरुणाचल प्रदेश अशा विभिन्न वातावरणांमध्ये ते कोणतीही तक्रार न करता आपले काम करीत असतात. त्यामुळे त्यांनी मागणी न करताही किंबहुना, ते कधी मागणी करणारच नाहीत. पण, त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी काहीतरी करणे ही देशवासीयांची जबाबदारी आहे. त्यामुळे मी आणि भारतीय वायुसेनेतून स्वेच्छानिवृत्त झालेले माझे पती, आम्ही दोघांनी १९९९ सालापासून भारतीय सैन्यासाठी, त्यांच्या कुटुंबीयांसाठी काम करायचे ठरवले.” पुण्यातल्या ‘रेणुका स्वरूप प्रशाले’त शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या सुमेधा चिथडे सांगत होत्या.
 
 
सियाचीन. हिमालयामधली जगातली सर्वांत उंच युद्धभूमी. जिकडे बघू तिकडे केवळ बर्फ आणि बर्फच. सोबतीला उणे ६० अंश तापमान, तुफानी वेगाने वाहणारे थंडगार वारे, आजूबाजूला बर्फाळ दऱ्या, अचानक सुरू होणारी बर्फवृष्टी, वादळ आणि प्राणवायूची म्हणजेच ऑक्सिजनची कमतरता. मात्र, अशी विषम परिस्थिती असलेल्या या जागेचे सामरीकदृष्ट्या खूप मोठे महत्त्व आहे. कारण एका बाजूला पाकिस्तान, तर दुसऱ्या बाजूला चीन. मात्र, सियाचीन भारताच्या ताब्यात असल्याने या दोन्ही त्रासदायक शेजाऱ्यांवर अंकुश ठेवणे भारताला शक्य आहे. सियाचीनमध्ये वर्चस्व मिळविण्यासाठी पाक आणि चीन आजही प्रयत्न करत असतात. मात्र, भारतीय सैन्याने त्यांचे एकही प्रयत्न यशस्वी होऊ दिलेले नाहीत. भारतीय सैनिक जगातील या सर्वांत उंच युद्धभूमीवर समर्थपणे उभे आहेत.
 
 
मात्र, हे वाटते तेवढे सोपे नाही. उणे ६० अंश तापमानामध्ये आजूबाजूला केवळ बर्फ असताना तेथे थांबणे हे शारीरिक आणि मानसिक कसाची परीक्षा पाहणारे असते. त्यासाठी भारतीय लष्करातील जवानांना विशेष प्रशिक्षणही दिले जाते. मात्र, येथे सज्ज राहणे हे अजिबात सोपे नाही. कारण, हे ठिकाण अतिशय उंचावर असल्याने नैसर्गिकरीत्याच प्राणवायूची कमतरता येथे आहे. त्यामुळे तेथे कार्यरत प्रत्येकाला कृत्रिमरीत्या प्राणवायू पुरविण्याशिवाय अन्य पर्यायच नाही. त्यासाठी केंद्र सरकार आवश्यक त्या उपाययोजना करतच असते. मात्र, नागरिक म्हणून ती आपलीही जबाबदारी आहे, या भावनेने पुण्यातील सुमेधा आणि योगेश चिथडे या दाम्पत्याने सियाचीनमध्ये भारतीय सैन्यासाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे शिवधनुष्य यशस्वीरीत्या पेलले.
 
 
त्याविषयी सुमेधा चिथडे यांच्यासोबत संवाद साधला असता त्या म्हणाल्या की, “साधारणपणे २०१५ साली आमची भेट ‘परमवीरचक्र’ विजेते कॅप्टन बानासिंग यांच्यासोबत झाली. कॅप्टन बानासिंग यांनी सियाचीनमधील पाकच्या ताब्यात असलेली चौकी (पोस्ट) भारताच्या ताब्यात घेण्यासाठी आणि भारताचे प्रभुत्व तेथे प्रस्थापित करण्यासाठी मोठी भूमिका बजावली होती. तेव्हा त्यांच्याकडून सियाचीनमधल्या विषम परिस्थितीविषयी जाणून घेता आले. बोलताना कॅ. बानासिंग अगदी सहज म्हणाले, “बहनजी, वहां तो साँस लेना भी मुश्कील है। क्योंकी वहा तो ऑक्सिजनही नहीं हैं।” हे त्यांचं वाक्य खरं तर प्रचंड धक्कादायक होतं. मग आम्ही दोघांनीही सियाचीन प्रदेशाचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. तेव्हा आम्हाला जाणवलं की युद्ध किंवा चकमकींपेक्षा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे येथे जास्त जीवितहानी होत असल्याचे आम्हाला लक्षात आलं. त्यानंतर मग अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे येथे अहोरात्र कृत्रिम ऑक्सिजनचा पुरवठा होणे गरजेचे आहे आणि तो तेथेच निर्माण करणे तर सर्वांत जास्त आवश्यक आहे. त्यामुळे मग तेथे ऑक्सिजन प्लांट उभारण्याची गरज आमच्या लक्षात आली.”
 
 
सियाचीनमध्ये नेमक्या कोणत्या प्रकारचा प्लांट उभारता येईल, यासाठी सुमेधा चिथडे यांचे पती - योगेश चिथडे यांनी संशोधन सुरू केले. विशेष म्हणजे, योगेश चिथडे हेदेखील भारतीय वायुसेनेमध्ये कार्यरत होते. तेथून निवृत्ती स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रथम ‘पुणे तरुण भारत’मध्ये काही काळ काम केले आणि त्यानंतर बँकेमध्ये काही काळ काम करून तेथून ते निवृत्त झाले. या सर्व प्रकल्पात योगेश चिथडे यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याचे सुमेधा चिथडे सांगतात. त्या म्हणतात की, “योगेश चिथडे यांनी ऑक्सिजन प्लांट कोणता असावा, त्याची वैशिष्ट्ये काय, तो भारतातून घ्यावा की परदेशातून मागवावा, याचा सखोल अभ्यास केला. तेव्हा आमच्या लक्षात आले की, तेथे सर्वांत अत्याधुनिक प्लांट उभारणेच गरजेचे आहे. कारण, त्याशिवाय तेथील भारतीय सैन्याची गरज भागणार नाही. अत्याधुनिक प्लांटही जर्मनीहून मागविण्याचे ठरवले. मात्र, त्यासाठी सुमारे अडीच कोटी रुपये खर्च येणार आहे. खरं तर हा आकडा ऐकून पहिल्यांदा आम्हाला प्रचंड ताण आला, कारण, मध्यमवर्गीय कुटुंबाने एवढे पैसे कधी बघितलेही नसतात. मात्र, आता हाती घेतलेले काम अर्धवट सोडायचे नाही, हे निश्चित होते.”
 
 
दागिने विकून निधी संकलनास प्रारंभ...
 
 
१९९९ सालापासून ‘एआयआरएफ - सिर्फ फाऊंडेशन’च्या माध्यमातून हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांसोबत स्वत:ला जोडून घेतले असल्याचे सुमेधा चिथडे यांनी सांगितले. त्यांच्या कुटुंबीयांसोबत सतत संपर्कात राहणे, त्यांच्या अडचणी सोडविणे, मुलामुलींच्या शिक्षणासाठी काम करणे, असे उपक्रम ते राबवितात. त्यासाठी समाजाकडून चिथडे यांना मदतही मिळतेच. त्यामुळे जनसहभागातूनतच सियाचीनमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे त्यांनी ठरवले. आपल्या घरापासूनच सुरुवात करायची म्हणून सुमेधा चिथडे यांनी त्यांचे दागिने विकण्याचा निर्णय घेतला. त्या म्हणतात, “दागिन्यांपेक्षाही मी सुरक्षित राहावे, यासाठी कार्यरत सैनिकांना प्राणवायू मिळणे हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे होते.”
 
 
त्या पुढे म्हणतात की, “त्यासोबतच मग आम्ही २०१५ पासून ‘सर्व्हिस बिफोर सेल्फ’ हा पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनसह असलेला एक कार्यक्रम आम्ही तयार केला. त्यामध्ये भारताची तिन्ही सेनादले, त्यांचा त्याग, त्यांचं शौर्य, त्यांचा पराक्रम आम्ही समाजासमोर मांडला. सोबतच सैन्यदलांमध्ये काम करण्यासाठी किती प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत, हेदेखील त्यात मी सांगितलं. कारण, देशाच्या खऱ्या हिरोंना समाजासमोर मांडण्यासाठी आपणच काम करणे गरजेचे आहे. असे राज्यभरात सुमारे १५० कार्यक्रम आम्ही केले आणि निधी संकलन केले. विशेष म्हणजे, समाजानेही आमच्यावर विश्वास ठेवून भरभरून दान दिलं.”
 
 
त्यानंतर मग जवळपास साडेतीन वर्षांनी म्हणजे ४ ऑक्टोबर, २०१९ रोजी सियाचीनमध्ये ऑक्सिजन प्लांट कार्यरत झाला. त्यावेळी नॉर्दर्न कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी उपस्थित होते. प्लांट सुरू झाल्याच्या दिवशी एका जवानाने सुमेधा चिथडे यांना जे सांगितलं ते ऐकून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं - “बहनजी, आपने तो भगवान का काम किया हैं...” यावर सुमेधा म्हणतात, “त्या जवानाची ही प्रतिक्रिया माझ्यासाठी सर्वांत अमूल्य आहे. कारण, काहीतरी केल्याचं समाधान आम्हाला त्यातून मिळालं.” या प्रकल्पाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांनी दखल घेऊन कौतुकही केलं. या ऑक्सिजन प्लांटद्वारे आज एका मिनिटाला २४० लीटर प्राणवायूचं उत्पादन होत असून तेथे कार्यरत सुमारे ३५ हजार लोकांना त्याचा लाभ होतो आहे. त्यामुळे यापुढेही भारतीय सैन्यदलांसाठी विविध प्रकल्पांवर काम सुरूच ठेवणार असल्याचे सुमेधा चिथडे अभिमानाने सांगतात. त्यांना पुढील प्रवासासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे शुभेच्छा.
 
 
@@AUTHORINFO_V1@@