रशियन स्वॅलो : लॅरिसा क्रोनबर्ग भाग-६

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2021
Total Views |

sf_1  H x W: 0
पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध याशिवाय देशांतर्गत झालेलं नागरीयुद्ध, यामुळे रशियामध्ये सतत अशांत आणि अविश्वासाचे वातावरण होते. त्यामुळे रशियाच्या हेरखात्यावर सततच कामाचा ताण होताच. ‘कॉमितेत गसूदार्स्त्वेनॉय बेझोपास्नोस्ती’ (KomitetGosudarstv ennoyBezopasnosti)’ किंवा ‘केजीबी’ (केजीबी) हे रशियाचे हेरखाते. 'Committee for State Security' असे त्याचे इंग्रजी भाषांतर आहे. बदलत्या परिस्थितीनुसार आपले काम साधून घेण्यासाठी ‘केजीबी’ने सतत नवनवे मार्ग आणि उपाय अवलंबिले. आपले काम साध्य करण्यासाठी, कोणताही विधिनिषेध न बाळगता, अगदी कोणताही मार्ग वापरणे ‘केजीबी’ने निषिद्ध मानले नाही आणि म्हणूनच रशियाचे हेरखाते अधिकाधिक सक्षम होत गेले. ‘हनी ट्रॅपिंग’ करण्यातही ‘केजीबी’ मागे नव्हतीच. ‘हनी ट्रॅपिंग’मध्ये सामील असणाऱ्या स्त्री एजंटला ‘स्वॅलो’ (swallow) आणि पुरुष एजंटला ‘राव्हन्स’ (ravens) असे म्हटले जात असे. अशीच एक ‘रेड स्पॅरो’ होती- लॅरिसा क्रोनबर्ग!
२३ मे, १९२९ या दिवशी रशियातील पान्झा या ठिकाणी लॅरिसा क्रोनबर्गचा जन्म झाला. तिचे वडील लष्करातले अधिकारी होते. त्यांच्याबरोबर नंतर ती उफा (Ufa) आणि त्यानंतर पोडोल्स्क (Podolsk) येथे राहिली. पोडोल्स्क येथे पदवी घेतल्यानंतर तिने १९४८ मध्ये ‘ऑल युनियन स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ सिनेमॅटोग्राफी’मध्ये प्रवेश घेतला. मध्येच तिने केलेल्या लग्नामुळे तिचं शिक्षण थांबलं. तिला एक मुलगाही झाला. मात्र, तो अल्पायुषी ठरला. पुढे हे लग्न फार काळ टिकलं नाही. तिचा घटस्फोट झाल्यावर तिने तिचे शिक्षण पूर्ण केले आणि १९५४ मध्ये तिला अभिनयाची पदवी मिळाली. लगेचच ‘मोसफिल्म’ नावाच्या संस्थेबरोबर ती काम करू लागली. १९५५ साली तिला ‘अ बिग फॅमिली’ या चित्रपटातील भूमिकेसाठी ‘कान्स फिल्म फेस्टिवल’मध्ये उत्कृष्ट अभिनेत्रीचा सन्मान मिळाला. दरम्यानच्या काळात तिने अन्य काही चित्रपटही केले. याच सुमारास, रशियात नेमकं काय चाललेलं होतं?
 
१९५५-५६ सालीच रशियामध्ये फ्रान्सचे राजदूत म्हणून मॉरीस देजीन यांची नियुक्ती झाली होती. देजीनही फ्रान्सच्या राजकारणातली एक अतिशय महत्त्वाची व्यक्ती होती. तत्त्वज्ञान हा विषय घेऊन बीए झालेल्या देजीन यांनी फ्रान्सच्या जर्मनीतील दूतावासात ‘प्रेस सर्व्हिस’चे मुख्य म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. १९३०-३९ या कालावधीत जर्मनीत असतानाच त्यांनी फ्रान्सच्या ‘इंटेलिजन्स सर्व्हिस’साठीदेखील काम केले. १९३९ नंतर युद्धाची घोषणा झाल्यावर ते पॅरिसला परत आले आणि त्यांच्या उत्कर्षाला सुरुवात झाली. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी संपूर्ण फ्रान्स जर्मनीच्या ताब्यात होता. नाझींच्या हातचं कळसूत्री सरकार फ्रान्समध्ये स्थापन झालं आणि पळून गेलेल्या राष्ट्रवाद्यांनी अल्जेरियामधून विस्थापित सरकार चालविण्यास सुरुवात केली. फ्रान्स पुन्हा ताब्यात घेण्यासाठी वाटाघाटी करून किंवा लढून फ्रान्स ताब्यात घेणे, असे दोन पर्याय होते, त्यावरून दोन गट पडणे स्वाभाविक होते. त्यावरून ‘फ्री फ्रान्स’ चळवळीतून देजीन यांना जरी राजीनामा द्यावा लागला होता, तरी युद्धानंतर त्यांचे या चळवळीतील योगदान लक्षात घेऊन त्यांना राजदूत म्हणून पुन्हा संधी मिळाली. अल्पावधीतच फ्रान्सचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष चार्ल्सडे गॉल यांचे विश्वासू सल्लागार झाले. सुरुवातीला ‘नाटो’मध्ये हिरीरीने सहभागी झालेल्या फ्रान्सने देजीनच्याच सांगण्यावरून आपला सहभाग अचानक कमी करून फक्त निरीक्षकाच्या भूमिकेत राहण्याचा निर्णय घेतला होता. रशियाच्या धूर्त नजरेतून ही गोष्ट सुटली नव्हतीच. आणि म्हणूनच १९५५-५६ मध्ये जेव्हा देजीन फ्रान्सचे राजदूत म्हणून रशियात आले, तेव्हा ‘केजीबी’च्या हालचालींना सुरुवात झाली. सुंदर स्त्रिया ही त्याची कमकुवत बाजू लक्षात घेऊन सुरुवातीला रशियाच्या फ्रान्समधील राजदूतांची पत्नी लॅडिया काव्हानस्काया हिची निवड झाली. मात्र, काही कारणाने तो बेत यशस्वी होऊ शकला नाही आणि मग या नाट्यामध्ये लॅरिसाचा प्रवेश झाला.
 
या नाटकामध्ये तीन मुख्य पात्रे असणार होती, पती-पत्नी और वो! यामध्ये लॅरिसा व्यतिरिक्त आणखी दोन ऑफिसर्सचा समावेश होता. मिखाईल मुसाने ’NKVD’ या रशियाच्या पोलीसदलात काम केले होते, तर ‘केजीबी’चा कर्नलश्रेणीचा ऑफिसर होता (नाव अज्ञात आहे.) हा ऑफिसर लॅरिसाच्या नवऱ्याची भूमिका करत होता आणि या नाटकाचा दिग्दर्शक होता ‘केजीबी’चा तत्कालीन लेफ्टनंट जनरल, ओल्ग ग्रीबानोव्ह! सुप्रसिद्ध रशियन कवी सर्जेई मिखाल्कोव्ह यांच्या पत्नीने नतालिया क्लोन्चोव्हास्काया हिने देजीन आणि लॅरिसा यांची ओळख करून दिली. लॅरिसाकडे समोरच्याला आकर्षून घेईल, असं संमोहक व्यक्तिमत्त्व होतं. त्याचा प्रभाव देजीनवर पडला नसता, तरच नवल आणि पुढच्या कामात लॅरिसा तरबेज होतीच.
देजीन तिच्या जाळ्यात फसला!
 
कित्येक महिने चाललेल्या आणि तोपर्यंत केवळ भावनिक असणाऱ्या या दीर्घ प्रणयाला पूर्णविराम द्यायचा दिवस निश्चित झाला. त्यावेळी देजीनची पत्नी विश्रांतीसाठी म्हणून स्वित्झर्लंड येथे आल्प्समध्ये गेलेली होती. तीच वेळ साधून एक दिवस लॅरिसा आणि देजीनला एकत्र येण्याची आणि शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याची ‘संधी’ दिली गेली. ज्या घरी ते दोघे भेटणार होते, तिथे आधीच एक ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डर बसवले गेले होते. लॅरिसा आणि देजीन एकमेकांच्या मिठीत असतानाच लॅरिसाचा ‘बिझनेस ट्रीपसाठी गेलेला’ ‘नवरा’ हा ‘आपल्या मित्रासह (ही भूमिका मुसाने वठवली)’ ‘अचानक’ परत आला आणि त्याने त्या दोघांना पाहिले. नग्नावस्थेत असणाऱ्या त्या फ्रेंच राजदूताला बिछान्यातून खेचून बाहेर काढले गेले आणि मारहाण केली गेली. मात्र, दैव बलवत्तर असल्यामुळे देजीन त्यांच्या तावडीतून सुटला. मात्र, लॅरिसाच्या नवऱ्याने कोर्टात खेचण्याची दिलेली धमकी देजीनला स्वस्थ बसू देत नव्हती. वास्तविक, त्या दिवशी संध्याकाळी देजीन आणि सोव्हिएत रशियाच्या मंत्रालयाच्या प्रमुखांचे कायदेशीर सल्लागार, काही विषयांवर चर्चा करण्यासाठी एकत्र भेटणार होते. अर्थातच, ही भेट होऊ शकली नाही, कारण ती पूर्ण संध्याकाळ देजीन आणि ‘केजीबी’ लेफ्टनंट जनरल ग्रीबानोव्ह यांनी घडलेल्या प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी घालवली. देजीनने कोणतेही आढेवेढे न घेता, आपण संकटात सापडल्याची कबुली देऊन त्यातून वाचविण्याची विनंती ग्रीबानोव्हला केली आणि देजीनने ‘केजीबी’साठी काम करावे, या अटीवर ती मंजूर केली गेली. देजीनसमोर अन्य कोणताही पर्याय नव्हताच! पुढे एकूण सहा वर्षे देजीनने ‘केजीबी’ला सहकार्य केले.
 
या मिशनमध्ये युरी क्रोतोकोव्ह नावाचा एक नाटककारही सहभागी होता. तो ‘केजीबी’चा अधिकृत एजंट म्हणूनही काम करत असे. देजीनच्या पत्नीला जाळ्यात ओढण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपविली गेली होती. मात्र, ती यशस्वी होऊ शकली नाही. १९६३ मध्ये अशाच एका हनी ट्रॅप मिशननंतर फ्रेंच मिलिटरी अ‍ॅटॅचेने आत्महत्या केल्यामुळे युरीला अतिशय पश्चात्ताप झाला आणि तो यातून बाहेर पडला. लंडनमध्ये त्याने देजीन प्रकरणावर एक नाटक बसवले, ज्यातून सगळ्यात आधी ब्रिटिश इंटेलिजन्सला या गोष्टीचा सुगावा लागला आणि नंतर त्यांच्याकडून समस्त फ्रेंच जनता आणि राष्ट्राध्यक्ष चार्ल्सडे गॉल यांना देजीनच्या या प्रकरणाबद्दल कळले. वास्तविक मॉरीस देजीन एक अत्यंत हुशार आणि तडफदार फ्रेंच राजकारणी नेता होता. त्याची कारकिर्द अतिशय दमदार होती. मात्र, त्याची अखेर अतिशय मानहानिकारक ठरली. या प्रकरणानंतर लॅरिसाने आणखी काही चित्रपट केले. मात्र, ते फारसे यशस्वी झाले नाहीत. त्यानंतर प्रसिद्ध बुद्धिबळपटू मिखाईल तालबरोबर ती राहत होती. १९६०च्या सुमारास ते वेगळे झाले आणि त्यानंतर आयुष्याच्या अखेरीपर्यंत ती एकटी राहिली.
- मैत्रेयी जोशी
@@AUTHORINFO_V1@@