पानिपतची कहाणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2021
Total Views |


Panipat_1  H x
 
 
 
 
दि. १४ जानेवारी, १७६१ रोजी पानिपत येथे अहमदशहा अब्दाली आणि सदाशिवराव भाऊ यांच्यात भीषण रणसंग्राम झाला. या एका लढाईने भारताचा इतिहासच बदलला गेला. २६० वर्षे झाली त्या घटनेला, पण मराठी माणूस तो प्रलय अजूनही विसरु शकलेला नाही. बदलापूरचे ज्येष्ठ कादंबरीकार, नाटककार अनंत शंकर ओगले यांनी त्या महासंग्रमाचे केलेले हे संस्मरण म्हणजे ‘पानिपतची कहाणी!’
 
श्रीमंत मातोश्रीसाहेब गोपिकाबाई आज शनिवारवाड्यातल्या ‘हजारी’ कारंजासमोर फिरता-फिरता आलेल्या होत्या. खरेतर हे कारंजे म्हणजे एक चमत्कारच होता. याच्यासारखे कारंजे हिंदुस्थानात दुसरे नव्हते. एकाचवेळी शेकडोसे तुषार उडताना पाहण्याची मौज काही वेगळीच होती. त्यांच्या महालातल्या मोकळ्या खिडकीतून प्रतिदिनी त्यांना या जत्रोत्सवाचे दर्शन होत होतेच, पण जवळून पाहण्याचा आनंद काही वेगळाच होता. या कारंज्याच्या चारही कोपऱ्यांवर उंच-उंच वाढलेली डुलणारी झाडे, सायंकालीन वाऱ्याबरोबर डुलत होती. आता बाईसाहेब सतत विचारांतच गढलेल्या असत. दोन वर्षांपूर्वी घडलेल्या पानिपतने होत्याचे नव्हते झाले होते. एका तडाख्यात वंशातले चार-चार पुरुष कालवश झाले होते. बाईसाहेबांचे वय तरी तसे काय मोठे होते? चाळीशी जेमतेम, पण जबाबदारी, मोठेपणाचे ओझे. इतक्या लवकर जबाबदारी पडल्याने त्या अकाली प्रौढ झाल्या होत्या. सारीच लहान. पार्वतीबाई लहान, सगुणाबाई व्रतस्थ, देवधर्माधीन. रमा लहान अन् गंगाही लहान. विश्वासरावांची पत्नी पण लहान, जेमतेम अकरा वर्षांची. सवत म्हणून आलेली पैठणकर ११ वर्षांची राधाबाई लहान. माधवराव १६ वर्षांचे, तर नारायणराव त्याहून लहान. बाईसाहेबांचे डोळे बघता बघता आसवांनी भरुन गेले. त्या आपल्या महालाकडे निघाल्या. त्यांच्यासवे त्यांच्या दासी-बटकी लगबगीने चालू लागल्या. माधवरावांचा, भाऊंचा, दादांचा वाडा पार करुन गौरीमहाल, गोशाळा, कारंज्यांचा हौद पार करुन त्या त्यांच्या जुन्या आरसे महालात आल्या. वाटेत त्यांना काहीतरी आठवले. त्या आपल्या दासीला म्हणाल्या की, “जने, मी एक विसरले! आता माधवच्या महाली जा आणि त्यास त्वरित बोलवून घे!” “जी बाईसाहेब!” म्हणून जनी निघून गेली.
 
बाईसाहेब महालाच्या पायऱ्या वर चढून हात-पाय धुवून आपल्या झोपाळ्यावर विसावल्या! दिवस, महिने, वर्षे उलटत होती, पण पानिपत काही त्यांच्या डोळ्यांसमोरून जात नव्हते, निघत नव्हते. या एका लढाईने सारे जगच बदलून गेले होते. सुखाचा शेवट होऊन दुःखपर्व मागे उरले होते.
 
इतक्यात दासीने येऊन सांगितले, “बाईसाहेब, रावसाहेब आले आहेत.”
 
काही क्षणातच माधवराव मातोश्रींच्यासमोर प्रविष्ट झाले. उंचेपुरे, धिप्पाड, देखणे माधवरावसाहेब समोर येऊन त्यांनी मातेला वंदन केले. ते म्हणाले, “मातोश्रींनी लगबगीने बोलविले? काही खास?”
 
मातोश्री हसल्या आणि म्हणाल्या, “खास काहीच नाही माधवा.”
 
माधवराव म्हणाले, “मातोश्री, आम्ही सांगू का काय विशेष आहे ते?” “पानिपत! हो ना?”
 
चार शब्दांच्या उच्चारणाने बाईसाहेबांचे डोळे पुन्हा भरले. त्या म्हणाल्या, “काय करू रे बाबा माधवा? पानिपत! पानिपत! पेशव्यांची गेली पत!”
 
माधवरावसाहेब म्हणाले, “आईसाहेब, तुम्ही म्हणता तशी माहिती असलेला एक माणूस आम्ही शोधलेला आहे. पुण्याहून पानिपतपर्यंत आणि पानिपतवरून शनिवारवाड्यापर्यंत परत आलेला मनुष्य! उद्या त्याला आपल्यासमोर उभा करतो. सारी कहाणी सांगेल आपल्याला तो.”
 
“कोण माणूस आहे हा?” गोपिकाबाईसाहेबांनी विचारले.
 
“चिटणीसांकडील आहे. गोविंदरावांचा पुतण्या आहे हा!”
 
“ठीक आहे. सकाळच्या प्रहरी पाठव त्याला.”
 
दुसऱ्या दिवशी अंगात शुभ्र बाराबंदी, डोई लाल रंगाचा रूमाल, टोकदार नजर, मधाळ स्मितहास्य अन् साठीला आलेली उमर. गोपिकाबाईसाहेबांच्या समोर येताच त्याने त्यांना दंडवत घातला आणि म्हणाला, “दंडवताचा स्वीकार व्हावा, मातोश्रीसाहेब!”
 
गोपिकाबाईसाहेब म्हणाल्या, “आपण पानिपती गेला होतात ना? आपण वयाने वडील. कै. पेशवे सरकारही आपणास काका म्हणतील इतकी आपली उमर. माधवरावसाहेबांनी आपणांस कामाची कल्पना दिली आहे. मोडी, फारसी, संस्कृतमधील जे आधार, माहिती, कागदपत्रांची जुळवाजुळव करून आमच्यासाठी एखादी पानिपत युद्धाची बखर लिहून द्या.”
 
तो गृहस्थ म्हणाला, “बाईसाहेब, आपली आज्ञा एकदम मान्य, पण त्यास दीड-दोन मास तरी खास लागतील. चालेल ना?”
 
“अवश्य. ही कामगिरी आपण आपल्या सवडीनुसार पार पाडा. जी काही सरकारी मदत लागेल, ती घेऊन आपण हे काम पूर्ण करा. पण, सध्या ढोबळ माहिती आपण आम्हास द्यावी.”
 
“जी बाईसाहेब, आपली आज्ञा प्रमाण!”
 
“माझं नावं रघुनाथ यादव चित्रे. बाळाजी आवजी चिटणीसांच्या परंपरेतले कुळ माझे. मी कोल्हापूरकर छत्रपतींच्या सेवेत काल व्यतित केला. त्यांच्या निधनानंतर पुण्यात चिटणीसांच्या संपर्कात काम करू लागलो. मी पानिपतावर गेलो होतो. शेवटी जेव्हा विश्वासरावांचा हत्ती सोडून गिलचे त्यांच्या छावणीकडे निघाले, तेव्हा ‘जरीपटका’ गुंडाळला जात होता. तेथपर्यंत मी तिथेच होतो. या दुःखदायी पर्वाचा आरंभ असा झाला होता.
 
अटक नदी पार करून अहमदशहा अब्दाली दिल्लीकडे निघाल्याचे वृत्त येताच, मराठे बादशाही रक्षणासाठी तिकडे निघाले. आपल्या आणि श्रीमंत नानासाहेबांच्या योजनेबरहुकूम भाऊसाहेब विश्वासरावसाहेबांसहित उत्तरेला निघाले.
 
 
फाल्गुन वद्य ११ शिवालिखिताचा मुहूर्त, सायंकाळची वेळ (१५ मार्च, १७६०) मराठी सैन्याने ४० सरदार आणि तलवारी तोफा, भाले, तीरकमान, परशु इत्यादी शस्त्रे घेऊन, तंबू, राहुट्या, बिचव्यांचे ओझे घेऊन ४० हजारांची फौज हत्ती, घोडे, मेणे, पालख्यांसहित जरीपटका (पताका) फडकावित निघाली. नाशिकची गोदा पार करून मराठे पुढच्या प्रवासाला निघाले. भाऊसाहेब, विश्वासराव, समशेरबहाद्दरराव संगे पार्वतीबाईसाहेब, लक्ष्मीबाईसाहेब, मेहेंदळे मामी, नाना फडणवीस, मातोश्री कुटुंबासमवेत निघाले.
 
यांच्या संगे हजारोंचा जमाव होता. बाजारवाले, दुकानवाले, बैरागी, भिस्ती, पाणके, हुजरे, खिदमतगार, वाजंत्री, कामाठी, आचारी, गोंधळी, गोसावी, भटभिक्षुक, शास्त्री, कारकून, ज्योतिषी इतका मोठा जमाव! त्यांचे रूपांतर बघता बघता तीन लाखांत झाले. यात स्त्रियाही मोठ्या संख्येने सामील झाल्या होत्या.
 
इतका मोठा संग्राम होताना राजपुतान्यातले, बुंदेलखंडातले, कित्येक राजे तटस्थ राहिले होते. अहमदशहास बोलविण्यात पुढाकार होता नजीबखान रोहिला, दिल्लीची बादशाहीण मलिमाजमानी, सुजातदौला यांचा. आपला मुलुख सोडल्यानंतर पाच महिन्यांत दिल्लीचा लाल किल्ला मराठ्यांनी ताब्यात घेतला. कित्येक शतकांनंतर लाल किल्ल्यावर हिंदूंचा ध्वज फडकवला. दिल्ली ताब्यात घेतल्यावर भाऊसाहेबांनी प्रथम तख्तावर बादशहाची योजना केली. वजीर गाजिउद्दिनाने एका वर्षापूर्वीच बादशहा आलमगिराचा शिरच्छेद केला होता. त्याचा मुलगा आपल्या लहान मुलास घेऊन पाटणा येथे पळाला होता. त्याचा मुलगा अलीगोहर यास दिल्लीत बोलावून श्रीमंतांनी ‘वलीहद’ केले म्हणजे सिंहासनावर बसवले. जाटांचा सरदार महाराज वजेंद्रबहद्दूर सूरजमल जाट होता आणि तो मराठ्यांना अनुकूल होता. तरुण, उंचपुरा, धाडसी अशा या जाटाची नजर दिल्लीच्या कारभारावर होती. ‘गाजिउद्दिनास वजीर करा, मला दिल्ली द्या!’ असे त्याचे मागणे होते. भाऊसाहेबांना हे माहिती होते की, दिल्ली आणि जाट यात मराठे आले म्हणून तो मराठ्यांच्या बाजूने झुकला.
 
अहमदशहा मराठ्यांच्याऐवजी मध्ये आला असता, तर अयोध्येच्या सुजासारखाच हा सुरजमलही त्याच्या गोटात गेला असता! भाऊसाहेबांनी आपल्या तसेच बादशहाच्या विश्वासातला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारोशंकर राजेबहादूर या मराठी माणसास वजिरी दिली. तीर्थाटनास आलेल्या लोकांस्तव मथुरा-वृंदावनासही मराठे जाऊन आले. इतक्या मोठ्या मराठी जमावाला खर्चाची चणचण, बादशाही खजिना रिकामा पडलेला. मग भाऊसाहेबांनी दिल्लीच्या मोगली तख्ताच्या छताची चांदी काढली आणि रुपये पाडले. जाट नाराज झाला. तो भाऊंनी त्याचे म्हणणे ऐकले नाही म्हणून नव्हे; तर खरी गोष्ट अशी होती की, अयोध्येच्या नवाबास सुरजमल जाटास त्याने पत्राने विचारले होते की, “मी कोणास मिळावे? मराठ्यांना की अब्दालीस?” नवाबाने कळविले की, “परत आपल्या मुलुखात परत जा!” त्याप्रमाणे एके रात्री तो पळूनही गेला. पण, हेही सत्य आहे की, पुढे आपत्काळात त्याने मराठ्यांची मदतच गेली. दिल्लीपासून ४० कोसावरचा कुंजपुराही मराठ्यांनी ताब्यात घेतला. दत्ताजी शिंदे यांच्या हत्येचा सूड कुतुबशहाला ठार मारून घेतला गेला. नेमकी येथेच चूक झाली. ताबडतोब दिल्लीला परत जायला हवे होते. ते झाले नाही. अब्दालीला यमुनेने रस्ता दिला. तो पलीकडे गेला आणि दिल्ली व मराठे यात अब्दाली आला. मराठ्यांची रसद बंद झाली. यातच आश्विन वद्य नवमी, शके १६८२. स्वसंरक्षणासाठी छावणीभोवती मराठ्यांनी खंदक खणले. मराठे अडकून पडले. विश्वास होता तो हा की, इब्राहिमखान गारद्याच्या जड आराब्यासमोर यावयास अफगाण धजावणार नाहीत.
 
 
जंबुरी तोफा
 
मराठ्यांच्या २०० जड तोफा जबरदस्त असलेल्या उंटांवरून धावणाऱ्या अब्दालीच्या ३०० ‘जंबुरी तोफा’ त्यांची हालचाल सहज होऊ शकत होती. प्रत्यक्ष लढणारी अशी मराठ्यांची फौज ७० हजारांपर्यंत होती, तर अब्दालीचे ७५ हजार लढाऊ लोक होते. पण, प्रत्यक्ष लढाई दोघांनाही नको होती. पेशव्यांच्या अखबारनवीस गणेश पंडित शुजाकडे जात येत होता, तर शुजाचा खास मराठी वकील काशिराज पंडित मराठी छावणीत ये-जा करीत होता! “नर्मदेपलीकडे जा,” असे म्हणणारा अब्दाली शेवटी अटकेपर्यंत मराठ्यांचा हक्क मानावयास तयार झाला होता.
 
पण त्यास परत जाताना किमान एक कोटी रुपये हवे होते. मराठ्यांची रसद, दाणापाणी, वैरण बंद होती. भुकेलेले मराठे लढाईस तयार झाले. खंदकपार होण्यासाठी सज्ज झाले. शुभ्रवर्णी गजावर मराठ्यांचा जरीपटका, श्यामसुंदर हत्तीवर भाऊसाहेब गजानन वक्षावर विश्वासराव सज्ज झाले.
 
‘हरहर महादेव हरहर महादेव’ घोषणा सुरू झाल्या. त्वेषाने मराठी फौज पुढे सरकू लागली. तोफखाना मागे राहिला. तीनही आघाड्या उघड्या पडल्या. पहिल्या त्वेषात अब्दालीच्या फौजेला पार मागे रेटले मराठ्यांनी. ‘हरहर महादेव! हरहर महादेव’ याला उत्तर मिळत होते ‘दीन दीन अल्ला हो अकबर, या अल्ला... या खुदा...या रहिमान.’ वारुळातून मुंग्या ज्या त्वरेने बाहेर पडतात, त्याचप्रमाणे खंदकातून मराठे बाहेर पडत होते. नको ती गोष्ट इथे घडली. तोफखाना उघडा पडला. शिस्त मोडली. आपलेच लोक आपल्या तोफांसमोर उभे राहिले.
 
मराठ्यांची फौज मुसलमानांवर तुटून तर पडली. विठ्ठल शिवदेव, यशवंतराव पवार, दमाजी गायकवाड, जनकोणी शिंदे, तुकोजी शिंदे, समशेरबहाद्दूर साहेब, अंताजी माणकेश्वर या साऱ्यांनीच पराक्रमाची शर्थ केली. पण, भुकेल्या मराठ्यांना आजचा दिवस अनुकूल नव्हता. निर्भयपणे, उत्साहाने, विश्वास भरदिवसा उजेडात छातीत गोळा लागला. खेळ संपला. दोघेही श्रीमंत आधी हत्तीवर अंबारीत होते, पण सेना विखुरते आहे, हे पाहून ते घोड्यावर आले. विश्वासरावास गोळा लागला. या वार्तेनेच समतोलच बिघडून गेला. भाऊस्वामींनी हत्तीवर विश्वासरावांचा मृतदेह बसवून ठेवला होता, पण लढणाऱ्या मराठ्यांच्या नजरा आता सारख्या त्या अंबारीकडेच वळत होत्या.
 
रिसाला, पायदळ यांच्यात फारसा फरक नव्हता. पण, अब्दालीकडे १०० तोफा जास्त होत्या, तसेच मराठ्यांची रसद तुटलेली होती. अब्दालीची याबाबतीत सुस्थिती होती. खुद्द कोवळा विश्वासराव त्वेषाने लढतच होता, पण भाऊसाहेबांनी जनकोजीने पराक्रमाची शर्थ केली. वार करता करता स्वामी थकून गेले. “हाणा-मारा-तोडा-काटा” असे ओरडताना तोंडाला रखरख लागली. गळा वाळला. कोरडा पडला. आवाज उमटेना. हुंकार देऊन मानेने इशारा करु लागले. साक्षात ब्रह्मांड कोसळले तरी धीर सोडला नाही. घोड्यावरुन लढताना पायाला जबर जखम झाली, तेव्हा खाली उतरले आणि गर्दीत मिसळून गेले. उजेड संपत आला. विश्वासरावांचा हत्ती अफगाण शिपायांनी ओढत ओढत आपल्या छावणीकडे नेण्यास प्रारंभ केला. जरीपटकाच्या भोवती जे १००-१५० उरलेले-दमलेले मराठे होते, त्यांनी काठीवरच जरीपटका गुंडाळला आणि त्यांनी सर्वांच्या बरोबर पळायला सुरुवात केली. मीसुद्धा भेदरुन पळू लागलो. बाईसाहेब, त्या गर्दीत मीसुद्धा सामील झालो आणि १०० दिवसांच्या जीवघेण्या प्रवासानंतर पुण्याला आलो. मारामारी, काटछाट, तोडातोडी इतकी मोठी मी पाहिली. माणसांचा प्राण जाताना, त्यांच्या वेदना बघताना माझ्या डोळ्यातले अश्रूच नाहीसे झाले. मातोश्रीसाहेब रात्र-रात्र मला झोप लागत नाही. किती माणसे मरताना मी पाहिली. अशी ही पानिपतची कहाणी...”
- अनंत ओगले
@@AUTHORINFO_V1@@