आहे मनोहर तरी, तुमच्यापेक्षा अज्ञानता बरी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2021   
Total Views |

Dr Yashwant Manohar_1&nbs
 
 
दि. १४ जानेवारी रोजी कवी यशवंत मनोहर यांना महाराष्ट्र विदर्भ साहित्य संघाचा ‘जीवनव्रती’ पुरस्कार जाहीर झाला. मात्र, कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जाऊन तिथे सरस्वतीची मूर्ती आहे म्हणून त्यांनी पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला. तसेच सरस्वतीच्या प्रतिमेबद्दल त्यांनी आक्षेपार्ह उद्गार काढले. त्यावर समाजमनाचा घेतलेला कानोसा...
 
नाव डॉ. यशवंत मनोहर; पण या माणसाची वृत्ती ‘आहे मनोहर तरी’ अशीच असावी, असे नुकत्याच घडलेल्या घटनेवरून दिसते. दि. १४ जानेवारी रोजी मनोहर यांना (वयाने मोठ्या असलेल्या माणसाला अहो-जाहो करावे, असे संस्कार आहेत. नाहीतर अरे-तुरेच करावे, असे मनात आहे) ‘महाराष्ट्र विदर्भ साहित्य संघा’चा ‘जीवनव्रती’ पुरस्कार जाहीर झाला. मात्र, कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जाऊन तिथे सरस्वतीची मूर्ती आहे म्हणून त्यांनी पुरस्कार घेण्यास नकार दिला. वर मनोहर म्हणाले म्हणे की, “त्यांच्यासारख्या प्रखर इहवादी व्यक्तीची वैचारिक भूमिका जाणून तरी आयोजक त्यांची नेहमीची प्रथा बदलतील, असे वाटले होते.” यावर आयोजकांनीही स्पष्ट सांगितले की, “तुमच्यासाठी १९२३ सालापासूनची प्रथा परंपरा आम्ही बदलणार नाही.”
 
डॉ. मनोहर यांना माहिती होते की, ‘महाराष्ट्र विदर्भ साहित्य संघा’च्या कार्यक्रमामध्ये सरस्वतीची प्रतिमा ठेवतातच. मग त्यांनी आधीच पुरस्कारासाठी संमती का दिली? समाज आणि समाजाच्या श्रद्धा यापेक्षा आपण खूप मोठे आहोत, असा डॉ. मनोहर यांचा गैरसमज आहे, असे वाटते. ‘राम-कृष्णही आले गेले,’ असे कवी भा. रा. तांबे सांगून गेलेत. त्यामुळे आपण कुणीतरी खूप मोठे आहोत, आपल्यासाठी समोरचा, त्याचे पूर्वंपार संस्कार-प्रथा बदलेल, हा गैरसमज डॉ. मनोहर यांना का व्हावा? ‘साहित्यात धर्म नको,’ असेही मनोहर म्हणाले. पण, धर्म म्हणजे काय? जो समाजाची धारणा करतो तो धर्म, हे कुणीही सांगेल. अतिबहुसंख्य भारतीयांना जर सरस्वती विद्येचे प्रतीक वाटते, तर तुम्ही सरस्वतीला अद्वातद्वा बोलून बहुसंख्याक भारतीयांचे मन दुखावणारे कोण? असो, मनोहर इतक्यावर थांबले नाहीत, तर मनोहर म्हणाले की, “सरस्वती ही महिलांना आणि शूद्रांना शिक्षणापासून वचिंत ठेवणाऱ्या शोषक मानसिकतेची प्रतीक आहे.” आता डॉ. मनोहरसारखे कुपमंडूक वृत्तीचे लोक स्वतःच्या कोषातून बाहेरच पडत नाहीत. मी जरी इतिहासाची अभ्यासक नसले, तरी गार्गी, मैत्रेयी मला माहिती आहेत. प्राचीन लेण्यांमध्येही ताम्रपटावर काहीतरी लिहिणाऱ्या स्त्रियांची शिल्पे आहेतच. आपल्या इतिहासात वाल्याकोळीचा वाल्मिकी झालाच ना? रामायणातील सीता किंवा महाभारतातील द्रौपदी या तत्कालीन समाजशिक्षणापासून वंचित होत्या, असे कुणीही म्हणू शकत नाही. जिजामाता आणि राणी लक्ष्मीबाई किंवा अहिल्यामाता या समाजशिक्षणापासून वंचित होत्या का? मधल्या काळात महिलांना शिक्षण नाकारले गेले. काही लोकांच्या मते, मुस्लीम आक्रमणामुळे महिलांवर बंधने आली आणि त्यानंतर काही धूर्तांनी महिलांना ताब्यात ठेवण्यासाठी समाजव्यवस्थेमध्ये काही विकृती निर्माण केली. त्यामुळे महिला शिक्षणाची पंरपरा खंडित झाली. क्रांतिसूर्य जोतिबा फुले आणि सावित्रीआईमुळे महिला शिक्षणाची खंडित परंपरा पुन्हा सुरू झाली. भारतीय इतिहासातील हा सुवर्णक्षण आहे. कुणीही भारतीय सावित्रीमातेचे योगदान विसरू शकत नाही. त्या होत्या म्हणून आज मीही आहे आणि लाखो महिला स्वयंसिद्धा झाल्या आहेत. मात्र, डॉ. मनोहरसारखे लोक सरस्वती आणि सावित्री हा वाद उकरून काढत सावित्रीमातेबाबतही समाजात दुमत पेरण्याचे विषारी प्रयोग करतात. माता सावित्रींच्या प्रकाशित ‘काव्य फुले’ या काव्यरचनेत त्या म्हणतात,
 
‘सरस्वतीच्या दरबारात शिक्षण घेणेस जाऊ चला
विद्यादेवीस प्रसन्न करूनि
वर मागू तिजला चला’
 
जर माता सावित्री या सरस्वतीला विद्यादेवी संबोधतात, तर डॉ. मनोहरसारखे लोक कोण म्हणावेत? दुसऱ्यांच्या व्यासपीठावर जाऊन स्वतःचे मत मांडणारे ‘आयत्या बिळाचे नागोबा’ असेच म्हणावे लागेल.
 
"मनोहरांचे जे विधान आहे त्याच्याशी सहमती दर्शविता आली, तरीही आपण लेखक आहोत, विचारवंत आहोत, त्यामुळे आपले वैयक्तिक मत सार्वजनिक व्यासपीठावर मांडण्याआधी विचार करणे आवश्यक होते. तसेच पुरस्कार स्वीकारण्याची संमती दिली असताना ऐनवेळी पुरस्कार नाकारणे, हे योग्य की अयोग्य, हे मनोहरांना आम्ही सांगावे का?"
 
- डॉ. ईश्वर नंदापुरे, साहित्यिक, अध्यक्ष, समरसता साहित्य परिषद
 
 
 
"सावित्रीबाई फुले या आदरणीय आहेत याबद्दल काही वादच नाही. पण, भारतीय परंपरेमध्ये ज्ञात इतिहासापासून सरस्वतीला विद्येची देवी म्हणून मान्यता आहे. डॉ. मनोहर यांना स्वतःच्या वैयक्तिक मतासाठी इतरांच्या, बहुजनांच्या भावना दुखविण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला."
 
- श्यामा घोणसे, वीरशैव संप्रदाय अभ्यासक, साहित्यिक
 
 
 
"सर्व समाजाला सोबत घेऊन चालायचे आहे, तर सगळ्यांच्या भावनांचा आदर करायलाच हवा. सरस्वतीमाता आणि सावित्रीमाता या दोघीही समाजाला पूज्य आहेत, त्यामुळे सगळ्या समाजाच्या भावनांचा आणि श्रद्धेचा आदर करून कुणाही विचारवंताने आणि समाजशील व्यक्तीने सर्वसमावेशक भूमिका घ्यायला हवी."
  
 
- ज्योती साठे, अध्यक्ष, दिशा-ज्योती फाऊंडेशन
 
 
"डॉ. यशवंत मनोहर विसरले की सावित्रीबाई फुले यांनी त्यांचा काव्यसंग्रह ‘काव्यफुले’ पुस्तकाच्या मुख्यपृष्ठावर भगवान शिव व पार्वतीचा फोटो आहे. खरेतर साहित्य संघाची चूक झाली की अशा ढोंगी, भोंदू कवीला ‘जीवनव्रती’ हा पुरस्कार त्यांनी जाहीर केला."
 
- शंकर कांबळे, अध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बेरोजगार सेवा सहकारी सोसायटी
@@AUTHORINFO_V1@@