राम जन जन में ; राम मन मन में...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2021
Total Views |

Shri Ram_1  H x
 
 
अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या भव्यदिव्य मंदिराच्या निर्मितीसाठीचे निधी संकलन अभियान दि. १५ जानेवारी ते २७ फेब्रुवारीपर्यंत ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’तर्फे देशभरातील गावखेड्यांपासून शहरांपर्यंत राबविण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने या व्यापक अभियानाचे स्वरुप आणि महाराष्ट्रातील प्रांतवार नियोजनाची माहिती देणारा हा लेख...
 
एखाद्या राष्ट्राची सत्ता गेली, तर पुरुषार्थाने ती परत मिळविता येते, एखाद्या राष्ट्राची भूमी गेली, तर पराक्रमाने ती पुन्हा प्राप्त करता येते, धन-संपत्ती नष्ट झाली, तर परिश्रमाने ती निर्माण करता येते. पण, जर एखाद्या राष्ट्राचे स्वत्त्व, अस्मिता, स्वाभिमान संपला, तर कोणताही पुरुषार्थ, कोणताही पराक्रम तो परत आणू शकत नाही, म्हणूनच आपल्या वीरपुरुषांनी, साधू-संतांनी अत्यंत कठीण परिस्थितीतही अनेक संकटांशी झुंजत राष्ट्राचे स्वत्त्व, स्वाभिमान जागविण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे. याच राष्ट्रीय अस्मितेच्या पुनःप्रतिष्ठापनेचे प्रतीक म्हणजे श्रीराम जन्मभूमीचा संघर्ष.
 
 
 
स्वातंत्र्यापूर्वी जवळ-जवळ १२०० वर्षे आक्रमकांच्या टोळधाडी लाटांप्रमाणे हिंदुस्थानच्या भूमीवर धडकत होत्या. या आक्रमकांनी केवळ संपत्तीची लूट केली नाही, तर या देशाचा स्वाभिमान ठेचून काढण्यासाठी आपल्या मठ-मंदिरांचा विध्वंस केला. आमच्या माता-भगिनींची अब्रू लुटली, तलवारीच्या बळावर लक्षावधींचे धर्मांतर करण्यात आले. अशाच प्रकारचे आक्रमण १५२८ मध्ये अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी स्थानी झाले होते. त्या ठिकाणचे मंदिर पाडून गुलामीचे चिन्ह असलेला बाबरी ढाँचा उभा राहिला होता. तो अपमानाचा कलंक पुसून स्वाभिमानाची पुनःप्रतिष्ठापना करण्यासाठी सुमारे पाच शतके चाललेला श्रीराम मंदिराचा संघर्ष अखेर यशस्वी झाला. दि. ९ नोव्हेंबर, २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने ‘सब भूमी रामलाल की’ असा ऐतिहासिक निर्णय दिला. त्यानुसार श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची स्थापना होऊन पुढे दि. ५ ऑगस्ट, २०२० रोजी माननीय पंतप्रधानांच्या हस्ते मंदिर उभारणी कार्याचा श्रीगणेशा झाला. या महान कार्यासाठी देशातील प्रत्येक व्यक्तीला योगदान देता यावे, यासाठी मकरसंक्रांतीपासून माघ पौर्णिमेपर्यंत, म्हणजेच १५ जानेवारी ते २७ फेब्रुवारी, २०२१ पर्यंत ‘निधी समर्पण अभियान’ राबविण्यात येत आहे. देशभरातील ११ कोटी कुटुंबे आणि चार लाख गावांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प यानिमित्ताने करण्यात आला आहे. पावती पुस्तके तसेच दहा, १०० आणि एक हजार रुपयांच्या कुपन्सच्या माध्यमातून निधी संकलन करण्यात येईल. यासोबत ऑनलाईन निधी समर्पणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. संकलित निधी स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदाच्या देशभरातील सर्व शाखांमध्ये श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या खात्यात भरणा करण्याची व्यवस्था आहे. विश्व हिंदू परिषदेच्या दृष्टीने शासकीय महाराष्ट्रात चार प्रांत येतात. कोकण प्रांत, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा मिळून झालेला देवगिरी प्रांत, विदर्भ प्रांत आणि पश्चिम महाराष्ट्र प्रांत. या प्रत्येक प्रांतात अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने काम झाले आहे. सदर नियोजनाचा प्रांतशः तपशील देत आहे.
 
कोकण प्रांत
 
पालघरपासून गोव्यापर्यंत संपन्न समुद्रकिनारा लाभलेला हा प्रदेश संघरचनेत ‘कोकण प्रांत’ म्हणून ओळखला जातो. या प्रांतात संघटनात्मक दृष्टीने ११ विभाग, ३० जिल्हे, २९१ प्रखंड (प्रखंड याचा अर्थ एक ते दीड लाख लोकवस्तीचा भूभाग) आणि २३३० खंड/वस्त्या (१० ते १५ हजार लोकसंख्या) येतात. कोकण प्रांतातील ११ विभागांपैकी सहा विभाग शहरी आहेत, तर पाच विभाग ग्रामीण आहेत. शहरी विभागातील प्रत्येक खंडात (वस्तीत) आणि ग्रामीण विभागातील प्रत्येक गावात पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. प्रांतातील एकूण ७५ लाख कुटुंबांपैकी ६० लाख कुटुंबांपर्यंत संपर्क करून मंदिर उभारणीत त्यांचे योगदान घेतले जाईल. यासाठी संपर्क करणाऱ्या कार्यकर्त्यांचे जाळे उभे करण्यात आले आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये प्रांतस्तरावर समन्वय बैठका झाल्या. डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात जिल्हा पातळीवर कार्यकर्ता बैठकाही संपन्न झाल्या आणि तद्नंतरच्या पंधरवड्यात प्रखंड स्तरावर बैठका होऊन अभियानप्रमुख, निधीप्रमुख, कार्यालयप्रमुख आदींच्या नियुक्त्या करण्यात आल्या. जानेवारी २०२१च्या पहिल्या दहा दिवसांत ‘खंड’ अर्थात व्यक्तिशः बैठका घेऊन वस्तीतील संपर्कांची साखळी तयार झाली. ११ जानेवारी ते १४ जानेवारी, २०२१ या काळात जिल्हा, प्रखंड स्तरावर अभियान कार्यालयांची उद्घाटने संपन्न झाली. या अभियानात एकूण २० हजार पुरुष आणि ३,५०० महिला कार्यकर्त्यांचा सहभाग राहणार आहे. कोकण प्रांतात जो ग्रामीण पट्टा आहे, त्यात ७३ तालुक्यांतील एकूण ७,३६८ गावे येतात. त्यापैकी ६,५०० गावांपर्यंत पोहोचणार आहोत. छोट्या धनसंग्रहासोबतच मोठी धनराशी देणाऱ्या व्यक्तीशी संपर्क करणाऱ्या जिल्ह्यात ३० समित्या करण्यात आल्या आहेत. प्रत्येक घरात माहितीपत्रक आणि स्टीकर देण्यात येणार आहे. सुप्रसिद्ध संत पूज्य अवधेशानंदगिरी महाराज, पूज्य सत्यमित्रगिरी महाराज, महमंडलेश्वर विश्वेश्वरानंद महाराज, जैन मुनी नयपद्मसागर महाराज, भन्ते राहुल बोधीजी आदींचा विविध सेवावस्त्यांमध्ये प्रवास होणार आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. हे ओळखून उद्योग, कला, साहित्य, क्रीडा आदी क्षेत्रातील व्यक्तींना भेटून मंदिर निर्माण निधी संकलन कार्यात सहयोग घेणार आहोत. साध्वी ऋतंभरादेवी यांचा विलेपार्ले येथील नेहरूनगर झोपडपट्टी वस्तीत प्रवास होणार आहे. प्रचार-प्रसाराच्या दृष्टीने संपूर्ण कोकण प्रांतात ४०० होर्डिंग्ज, ६०० बॅनर्स तसेच समाजमाध्यमांवर छोट्या व्हिडिओजच्या माध्यमातून लोकांना या अभियानाशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
 
विदर्भ प्रांत
 
‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले’ असा संदेश देणाऱ्या संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पूनित झालेली भूमी म्हणजे आपला विदर्भ प्रांत. या प्रांतात आठ विभाग, ३० जिल्हे, १७९ प्रखंड आणि १,८४० वस्त्या येतात. प्रांतातील हिंदू कुटुंबांची संख्या ४० लाख असून, त्यापैकी १३ लाख कुटुंबे वनवासी क्षेत्रात आहेत. या सगळ्या कुटुंबांशी संपर्क करण्यात येणार आहे. शहरी व ग्रामीण क्षेत्र मिळून बनलेल्या विदर्भात २२,५०० गावांमध्ये/पाड्यांवर अभियानासाठी संपर्क होणार आहे. प्रांत, जिल्हे, प्रखंड आणि वस्ती/गावपातळीवर समन्वय बैठका संपन्न झाल्या आहेत. त्या-त्या पातळीवर अभियानप्रमुख, कार्यालयप्रमुख आणि निधीप्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. विदर्भातील अभियानात एकूण २७,५०० कार्यकर्त्यांचा सहभाग राहील. या अभियानाच्या यशस्वितेसाठी डिसेंबर २०१९ मध्ये विविध संप्रदाय, ज्ञाती संस्था यांना एकत्र करून त्यांच्या सदभाव बैठकांचे आयोजन करण्यात आले. या बैठकांमध्ये पू. जितेंद्रनाथ महाराज, बंजारा समाजाचे संत पू. बाबूसिंग महाराज, पू. गोविंददेव गिरी महाराजांचा गीता परिवार आदींचा विशेष सहभाग होता.
 
देवगिरी प्रांत
 
‘संतांची भूमी’ म्हणून ओळखला जाणारा आपला देवगिरी प्रांत. तुळजाभवानी मातेचे मंदिर, श्रीक्षेत्र पैठण, नांदेडचा प्रसिद्ध गुरुद्वारा अशी महत्त्वाची तीर्थस्थाने या प्रांतात येतात. कवयित्री बहिणाबाई, नरसी नामदेव, मुक्ताई माउली यांच्या नावानेही या क्षेत्राची ओळख आहे. या प्रांतात चार विभाग, १५ जिल्हे, १४६ प्रखंड आणि १,२५० वस्त्या येतात. प्रांतातील सर्वच्या सर्व ३० लाख हिंदू कुटुंबांपर्यंत संपर्क करण्याची योजना बनविण्यात आली आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांसोबत मोठ्या संख्येने संत, कीर्तनकार, प्रवचनकार या अभियानात सहभागी होत आहेत. गत महिन्यात सर्वच्या सर्व १५ जिल्ह्यांमध्ये संत संमेलने घेण्यात आली. त्या सर्व संमेलनांमध्ये २,५०० संतांचा सहभाग होता. प्रत्येक संत दहा गावांमध्ये प्रवास करून मेळावे घेण्याची योजना केली आहे. त्या ठिकाणी रामखिचडीचे आयोजन करून उपस्थितांना निधी समर्पणाचे आवाहन करण्यात येणार आहे. केवळ संतांच्या प्रयत्नातून २० लाख लोकांशी संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आहे. प.पू. भास्करगिरीजी महाराज, महामंडलेश्वर जनार्दनहरी महाराज, भिल्ल-बंजारा समाजाचे संत पू. आनंद चैतन्य महाराज, डॉ. शिवलिंग शिवाचार्य विरुपाक्ष स्वामी, पू. अच्युत महाराज दत्तापूरकर आणि नांदेडचे ग्रथी मा. खडकसिंहजी आदींच्या नेतृत्वात संपूर्ण संतसमाज या अभियानात उतरला आहे. याशिवाय मातृशक्तीचा सहभागही लक्षणीय राहणार आहे. ५,३०० ठिकाणी तीळगूळ समारंभाचे आयोजन करण्यात येणार असून, त्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक भगिनीने सीतेचे वाण म्हणून राममंदिरासाठी निधी अर्पण करायचा आहे. विशेष निधी संकलन करण्यासाठी जिल्ह्यात टोळी करण्यात आली आहे.
 
पश्चिम महाराष्ट्र प्रांत
 
‘देवस्थानांची भूमी’ म्हणून ओळख असलेला हा प्रांत. विश्व कल्याणाचे पसायदान मागणाऱ्या संत ज्ञानेश्वर माउली आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पूनित झालेला हा भाग आहे. या प्रांतात सहा विभाग, २० जिल्हे, २०८ प्रखंड आणि १,५५२ वस्त्या आहेत. २२ हजार कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रांतातील ४० लाख कुटुंबांचा सहभाग मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. प्रत्येक संपर्क केलेल्या घरी माहितीपत्रक आणि श्रीरामजन्मभूमी मंदिराचे चित्र असलेले स्टीकर देण्यात येतील. प. महाराष्ट्रात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने वनवासी भागात ५९० एकल विद्यालये चालविली जातात. त्या माध्यमातून सर्व वनवासी वस्त्यांमध्ये संपर्क करण्याची योजना आहे. माननीय बाबासाहेब पुरंदरे, पू. भास्करगिरी महाराज, पू. शांतिनाथ महाराज, पू. फरशीवाले बाबा आदींचा आशीर्वाद या अभियानाला लाभला आहे. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या माध्यमातून अयोध्येत उभारणी होत असलेल्या भव्य श्रीराम मंदिराचे कार्य गतिमान झाले आहे. या मंदिराच्या माध्यमातून संपूर्ण भारत देश, जवळपासचे आशियाई देश, यानंतर एक संपूर्ण जगातील रामभक्तांचा संपर्क, समन्वय, सहयोग आणि समरसतेचे एक केंद्र उभे राहील. त्यामुळे अयोध्येतील राम मंदिर ही जगाची सांस्कृतिक राजधानी बनेल. या संपर्क माध्यमातून निधी संकलन तर होईलच; पण त्याबरोबर प्रत्येक माणसाच्या मनातील देवत्व जागृत होऊन त्या सज्जन शक्तीच्या संघटित सामर्थ्यावर राष्ट्र मंदिर निर्माणाचा मार्ग सुकर होईल, यात तिळमात्र शंका नाही.
 
- मोहन सालेकर
(लेखक विहिंप कोकण प्रांताचे सहमंत्री आहेत.)
@@AUTHORINFO_V1@@