ठाणे जिल्ह्यातील १४३ ग्रामपंचायतींचे भवितव्य आज मतपेटीत होणार बंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2021
Total Views |

voting_1  H x W




                                 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे आवाहन




ठाणे: ठाणे जिल्ह्यातील एप्रिल ते डिसेंबर २०२० मध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची संख्या एकूण १५८ असून या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका शुक्रवारी दि.१५ जानेवारी रोजी होत आहेत. त्यापैकी १४३ ग्रामपंचायतींमधील एकूण ९९६ मतदान केंद्रांवर १५ जानेवारी रोजी प्रत्यक्ष मतदान होत असून या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मतदारांनी आपला मतदानाचा हक्क निर्भयपणे जरूर बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या क्षेत्रात प्रशासनाने मनाई आदेश लागू केला आहे.



ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता १५ जानेवारी रोजी मतदान व १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. या कालावधीत जनजीवन सुरळीत तसेच निवडणुका योग्यपणे पार पडाव्यात, यासाठी २१ जानेवारीपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.


यात एकही वैध नामनिर्देशनपत्र प्राप्त न झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या पाच आहे. पूर्णत: बिनविरोध निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या आठ आहे. ग्रामपंचायतीच्या एकूण जागांपैकी दोन जागांसाठी वैध नामनिर्देशनपत्र अप्राप्त असल्यामुळे व उर्वरित जागा बिनविरोध झाल्यामुळे प्रत्यक्ष मतदान होणार नाही. तेव्हा, प्रत्यक्ष मतदान होणार्‍या ग्रामपंचायतींची संख्या १४३ आहे. एकूण जागांची संख्या १४७२ असून एकही वैध नामनिर्देशनपत्र प्राप्त न झालेल्यांमुळे रिक्त राहिलेल्या जागांची संख्या ५९ आहे. अर्ज माघारीच्या दिनांकानंतर एका जागेसाठी फक्त एकच वैध नामनिर्देशनपत्र आल्याने उरलेल्या बिनविरोध निवडणूक झालेल्या जागांची संख्या ४१७ आहे. त्यापैकी १४३ ग्रामपंचायतींमधील एकूण ९९६ मतदान केंद्रांवर आज प्रत्यक्ष मतदान होणार आहे.


मतदान व मतमोजणी कार्यक्षेत्रात मनाई आदेश

ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता आदर्श आचारसंहिता लागू झालेली असून १५ जानेवारी रोजी मतदान आणि १८ जानेवारी रोजी मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यामुळे, ग्रामपंचायत निवडणूक मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रावर शांतता व सुरक्षितता राखण्याच्या दृष्टीने सदर ठिकाणी मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. हे आदेश २१ जानेवारी रोजी रात्री १२ वाजेपर्यंत अथवा मतमोजणी प्रक्रिया संपुष्टात येईपर्यंत अमलात राहील. उपरोक्त मनाई आदेशाचे उल्लंघन करणार्‍या व्यक्तीवर भारतीय दंड संहितेचे कलम १८८ नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असे निर्देश पोलीस आयुक्त ठाणे शहर विवेक फणसळकर यांनी दिले आहेत.



@@AUTHORINFO_V1@@