महाबळेश्वरच्या पर्यावरणपूरक विकासासाठी मुख्यमंत्र्यांची धाव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2021
Total Views |

mahabaleshwar _1 &nb



पर्यावरणपूरक विकासाला प्राधान्य देण्याचे आदेश 


मुंबई - महाबळेश्वरमधील पर्यटनाचा आराखडा तयार करताना कमी कालावधीतील प्रमुख कामे प्राधान्याने लगेच हाती घ्यावी, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मुख्य बाजारपेठे आणि वेण्णा लेक परिसराचा संपूर्ण कायापालट करून पर्यटकांना, स्थानिक लहान, मोठ्या व्यावसायिकांना चांगली सुविधा कशी मिळेल याबाबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. 
 
 
महाबळेश्वर भागातील पर्यटनाचा विकास करण्यासंदर्भात आज वर्षा येथील समिती कक्षात मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली. यावेळी पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय महेता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर, पंकज जोशी उपस्थित होते. सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह हे ऑनलाईन उपस्थित होते. यावेळी महाबळेश्वरच्या पर्यटन विकासासाठी तयार करण्यात आलेल्या पर्यटन मास्टर प्लॅनचे सादरीकरण करण्यात आले.
 
 
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, "महाबळेश्वरचा मास्टर पर्यटन आराखडा तयार करताना कमी कालावधी आणि दीर्घकालीन स्वरूपात करता येईल अशा कामाची वर्गवारी करावी आणि त्याची टप्पेनिहाय अंमलबजावणी करावी. असे करताना कमी कालावधीसाठी जी कामे तात्काळ हाती घेता येतील त्यावर लक्ष केंद्रित करावे. महाबळेश्वर मार्केट, रस्ता रुंदीकरण व लेक परिसर याची कामे जी तत्काळ सुरू करता येतील ती कामे पहिल्या टप्प्यात हाती घ्यावीत."
पर्यटनाला दर्जा रहावा, पर्यटकांना उत्तम सोयी सुविधा मिळाव्यात व त्या माध्यमातून पर्यटकांचा ओघ वाढावा यासाठी स्थानिकांना विश्वासात घेऊन ही कामे करावीत. विकास प्रक्रियेत त्यांना सहभागी करून घ्यावे. जे काम करू त्या कामाचे डिझाईन, काम सुरू होण्याची तारीख, संपण्याची तारीख, कामानंतर स्थळाचे बदलणारे आकर्षक स्वरूप दाखवणारे बोर्ड लावावेत. ही कामे झाल्यास पर्यटक वाढतील, पर्यायाने स्थानिकांना लाभ होईल हे त्यांना समजावून सांगावे. वन, पर्यावरण, पर्यटन विभागाने मिळून समन्वयाने महाबळेश्वर पर्यटन आराखड्याची कामे करावीत, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी दिल्या.
 
 
 
महाबळेश्वरमध्ये पोलो मैदानाची जागा वन विभागाच्या ताब्यात आहे. त्याचे सपाटीकरण करणे आवश्यक आहे, पण त्यास केंद्रीय वन संवर्धन कायद्यांतर्गत केंद्र शासनाची मान्यता घ्यावी लागते, त्यामुळे नगर पंचायतीने हा प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे पाठवावा, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. त्या मैदानाची लेव्हल केल्यास तिथे पोलो स्पर्धा आयोजित करता येतील. हे तिथे येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल.वेण्णा लेक परिसर 31 जानेवारीपर्यंत सुशोभित करावा. 
 
 
महाबळेश्वरमध्ये विविध प्रकारच्या पर्यटनाला मोठा वाव आहे. यात साहसी पर्यटन, निसर्ग पर्यटन, हेरिटेज पर्यटन, धार्मिक आणि कृषी पर्यटन यासारख्या क्षेत्राचा समावेश करता येईल. आताच्या महाबळेश्वरमध्ये पहिल्या टप्प्यात मार्केट आणि लेक परिसराचे काम हाती घ्यावे. महाबळेश्वरमध्ये 5 एमएलटी पाणी क्षमता आहे, ती 19 एमएलटीपर्यंत वाढवता येऊ शकेल, त्यामुळे तलावाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव सादर करून त्यास मंजुरी घ्यावी. मार्केटमध्ये वॉटर लेन मोकळी करावी, त्यामुळे रस्त्याची रुंदी वाढून त्यात एक समानता आणण्यास मदत होईल, अशा सूचना यावेळी दिल्या.
@@AUTHORINFO_V1@@