भिकिस्तान रामभरोसेच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2021   
Total Views |

pakistan_1  H x

‘काश्मीर आणि 370 कलम’ मुद्द्यांबद्दलही पाकिस्तानची जी भूमिका होती, त्या भूमिकेला मलेशियाचे समर्थन होते. थोडक्यात, ‘इस्लामी ब्रदरहूड’च्या नावाखाली या दोन देशांचे मेतकूट जमले होते. पण, जेव्हा कर्जाची गोष्ट आली, तेव्हा पाकिस्तान आणि मलेशिया या दोन देशांचे संबंध बिघडलेच.


पाकिस्तान का भिकिस्तान, अशी सध्याची आपल्या शेजारच्या देशाची स्थिती! ‘नवरा मेला तरी चालेल; पण सवत विधवा झाली पाहिजे,’ अशा वृत्तीचा हा देश. त्यामुळे स्वत:चे नाक कापून भारताला अपशकून करण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्याचे विध्वंसक काम पाकिस्तान त्याच्या जन्मापासून करत आला आहे. आपल्याकडे एक सुप्रसिद्ध वाक्य आहे की, ‘तुझा पगार काय? तू बोलतोस काय?’ हे वाक्य पाकिस्तानबाबत तंतोतंत लागू पडते. या राष्ट्राला सदान्कदा भिकेचे डोहाळे; पण ऐट अशी दाखवणार की, भारताची बरोबरी करतो. भारताने काहीही केले की, यांचे आपले हास्यास्पद काहीही करणे सुरू असते. आताही पाकिस्तानचे विमान मलेशियामध्ये जप्त केले गेले.मलेशिया आणि पाकिस्तान यांची तशी चांगली मैत्रीच. मागे ‘सीएए’साठी भारताला आणि नरेंद्र मोदींना याच मलेशियाने विरोध केला होता. तसेच ‘इस्लामिक ब्रदरहूड मूव्हमेंट’ची व्याप्ती इस्लामिक देशांचे बंधुत्व या स्तरापर्यंत वाढावी, यासाठी पाकिस्तान आणि मलेशिया या दोन देशांचा पुढाकार होता. ‘काश्मीर आणि 370 कलम’ मुद्द्यांबद्दलही पाकिस्तानची जी भूमिका होती, त्या भूमिकेला मलेशियाचे समर्थन होते. थोडक्यात, ‘इस्लामी ब्रदरहूड’च्या नावाखाली या दोन देशांचे मेतकूट जमले होते. पण, जेव्हा कर्जाची गोष्ट आली, तेव्हा पाकिस्तान आणि मलेशिया या दोन देशांचे संबंध बिघडलेच.

त्याचे असे झाले की, पाकिस्तानने मलेशियाकडून भाड्याने विमान घेतले होते. पण, नियमाप्रमाणे पाकिस्तानने त्या विमानाचे भाडे दिले नाही, ते थकवून ठेवले. मलेशियन प्रशासनाने वारंवार पाकिस्तानला याबाबत आठवण करून दिली. पण, गद्दारी आणि कृतघ्नता रक्तात भिनलेल्या पाकिस्तानला याचे काय सोयरसूतक? दहशत आणि लुटालूट करून आजपर्यंत पाकिस्तानचे अंतर्गत राजकारण चाललेले आहे. त्यामुळे त्यांना वाटले की, मलेशिया करून करून काय करेल? विनंत्यांचे पत्र पाठवेल. कडक शब्दांत आलोचना करेल. पण, इथे तर उलटेच झाले. आपल्या वारंवार केलेल्या विनंतीला पाकिस्तान भिकिस्तान असूनही भीक घालत नाही, म्हणून मग मलेशियन प्रशासनाने वेगळीच शक्कल लढवली. आंतरराष्ट्रीय राजकारणात आणि सलोख्यात हे कृत्य सहसा केले जात नाही. मात्र, आंतरराष्ट्रीय मैत्री संबंधांना बाजूला सारत मलेशियाने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. पाकिस्तानचे विमान क्वालालंपूर-मलेशिया येथे उतरले असता, मलेशियन प्रशासनाने हे विमान त्यातील प्रवाशांसकट जप्त केले. इतकेच नव्हे, तर मलेशियन प्रशासनाने विमानातील प्रवाशांना बेदरकारपणे बाहेर काढले. पाकिस्तान आणि मलेशिया या दोन देशांच्या वाटाघाटीत या प्रवाशांची काहीही चूक नव्हती. पण, त्यांना पाकिस्तानच्या कर्जबुडवेपणाचा त्रास भोगावा लागला. असो. या घटनेमुळे जगभरात पाकिस्तानची यथेच्छ नालस्ती झाली आहे. पण, पाकिस्तान आणि लाज यांचे वैरच आहे. त्यामुळे पाकिस्तान या घटनेतून काही शिकणार नाही आणि आपले वर्तनही सुधारणार नाही, हे नक्की.


पाकिस्तानच्या मातब्बरांचे आपल्या देशाच्या विमानसेवेबद्दल काय विचार आहेत हेही पाहणे मनोरंजकच आहे. पाकिस्तानचे उड्डाणमंत्री सरवर खान यांचे म्हणणे आहे की, “पाकिस्तानमधील ४० टक्के वैमानिक खोटे आहेत. त्यांनी विमान उड्डाणासंबंधी कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नाही, तसेच देशात ८६० वैमानिक उड्डाण सेवेत कार्यरत असून, त्यापैकी २६२ वैमानिक हे प्रशिक्षित नसून त्यांनी खोटी गुणप्रतिका बनवली आहे. तसेच सोन्या-चांदीची तस्करी आणि अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये पाकिस्तान विमान सेवेचे कर्मचारी सहभागी असतात,” असेही पाकिस्तानचे उड्डाणमंत्री म्हणाले होते आणि तेही दूरदर्शनच्या खुलेआम मुलाखतीमध्ये. आता पाकिस्तानच्या जबाबदार मंत्र्यांनाच त्यांच्या विमानसेवेबद्दल इतकी चांगली माहिती आहे, तर मग इतर देशांनी त्यातही भारताने या विमानसेवेबद्दल न बोललेले बरे! तर अशी ही ‘पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स’ची सेवा. आता मलेशियाने या एअरलाईन्सचे विमान जप्त करून पाकिस्तानची नाचक्की केली आहे. यावर आाता पाकिस्तान काय भूमिका घेणार? ‘भारताविरोधात हे करू, ते करू’ म्हणणारे पाकिस्तान आता काय करणार? तसेच अंतर्गत कलहानेही पाकिस्तान फुटण्याच्या वाटेवर आहेच. म्हणतात ना, करावे तसे भरावे. पाकिस्तान आता रामभरोसेच आहे, हे नक्की!
@@AUTHORINFO_V1@@