मुंबई महानगरपालिकेत ‘शिवसेने’ला ‘वंदे मातरम्’चेही वावडे ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2021
Total Views |
bmc_1  H x W: 0


‘वंदे मातरम्’ समूहगानाचा निर्णय सभागृहात चार वेळा दुर्लक्षित

मुंबई: “राज्यामध्ये भिन्न विचारांच्या पक्षांशी आघाडी केल्यानंतर शिवसेनेचे हिंदुत्व तकलादू झाले आहे. त्याचबरोबर ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या समूहगानाच्या निर्णयाबाबतही शिवसेना संभ्रमित असल्याने त्याबाबत मागील तीन वर्षांत निर्णय होऊ शकला नाही, त्यामुळे शिवसेनेला ‘वंदे मातरम्’चे वावडे आहे का,” असा प्रश्न भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी गुरुवार दि. १४ जानेवारी रोजी विचारला.

‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताचे समूहगान महापालिकेच्या हद्दीतील सर्व अनुदानित शाळा आणि पालिकेच्या सर्व वैधानिक समित्यांमध्ये केले जावे, असा ठराव भाजप नगरसेवक संदीप पटेल यांनी १० ऑगस्ट २०१७ रोजी मांडला होता. या ठरावावर आयुक्तांच्या सकारात्मक अभिप्रायावर अंतिम निर्णय घेण्यासाठी आयुक्तांनी हा प्रस्ताव महापालिकेस जानेवारी २०२० च्या कार्यक्रमपत्रिकेवर सादर केला. परंतु, महापौरांनी सदर विषय तहकूब केला. हा तहकूब विषय पुन्हा महापालिकेच्या सप्टेंबर २०२० च्या कार्यक्रमपत्रिकेवर समाविष्ट करण्यात आला. सदर विषयास भाजप नगरसेवक संदीप पटेल यांनी २३ ऑक्टोबर २०२०, २२ डिसेंबर २०२०, ५ जानेवारी २०२१ रोजी अग्रक्रम मागितला असता, महापौरांनी अग्रक्रम देण्याचे हेतुपुरस्सर टाळले. ‘वंदे मातरम्’ गीतगायनाच्या पत्रिकेवरील विषयास महापौरांनी एकदा तहकूब आणि तीन वेळा बगल दिली आहे. या आधी तीन वेळा अग्रक्रम मागूनही महापौरांनी त्याकडे दुर्लक्ष करत सभा गुंडाळली आहे.

 
देशाचे जबाबदार नागरिक म्हणून भावी पिढीच्या मनात देशप्रेमाची ज्योत सदैव तेवत राहावी, यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळा आणि मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व अनुदानित शाळांमध्ये आठवड्यातून दोनदा ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताचे समूहगान करण्यात यावे, याबाबतची ठरावाची सूचना मांडण्यात आली होती. मात्र, सत्ताधार्‍यांकडून हा विषय वारंवार तहकूब करण्यात येत आहे. ‘वंदे मातरम्’ला सातत्याने विरोध करणार्‍या महाविकास आघाडीतील काही सहभागी पक्षांना सांभाळण्यासाठी सत्ताधार्‍यांनी हिंदुत्वापासून फारकत घेणारी भूमिका घेतली आहे. 
 
 
 
याबाबत अभिप्राय देताना आयुक्त यांनी महानगरपालिकेच्या शाळेत ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत दररोज शाळा सुटताना गायले जाते, असे म्हटले आहे. मात्र, या अभिप्रायात अनुदानित शाळांमध्ये ‘वंदे मातरम्’ म्हटले जात असल्याचा स्पष्ट उल्लेख नाही, तसेच महानगरपालिका सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताचे समूहगान केले जाते. त्याच धर्तीवर महानगरपालिकेच्या सर्व वैधानिक समित्या, प्रभाग आणि विशेष समित्यांचे कामकाज सुरू होण्यापूर्वी ‘वंदे मातरम्’चे समूहगान घेतले जावे, अशा आशयाची ठरावाची सूचना आहे. त्यावर आयुक्तांनी सकारात्मक अभिप्राय दिलेले आहेत. अंतिम निर्णय महापालिकेस घ्यायचा आहे. याबाबत तातडीने महानगरपालिकेने निर्णय घ्यावा. “शिवसेनेने १८ जानेवारीला होणार्‍या महापालिका सभेत हा विषय चर्चेस आणला नाही, तर याबाबत भाजपच्या वतीने प्रखर आंदोलन केले जाईल,” असा इशारा भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिला.
 
 
@@AUTHORINFO_V1@@