धनंजय मुंडे, खुर्ची सोडा...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2021   
Total Views |
Dhananjay Munde_1 &n
 
 
 
धनंजय मुंडे राजीनामा देणार की, शरद पवार त्यांचा राजीनामा घेणार, यावर गुरुवारी दिवसभर चर्चा रंगलेली असतानाच, कृष्णा हेगडे नामक माजी आमदाराने पोलिसांमध्ये तक्रार केली की, रेणू शर्मा ही ‘हनी ट्रॅप’ आहे. खरे तर कृष्णा हेगडे यांना आताच ही महिला ‘हनी ट्रॅप’ आहे असे का वाटावे? याचाच अर्थ पाणी कुठे तरी मुरते आहे, हे नक्की!
 
 
“मी, राजीनामा दिलेला नाही,” असे धनंजय मुंडे म्हणतात, तर त्यांचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणतात की, “धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर असून पक्षाने तातडीने निर्णय घ्यायला हवा.” मध्येच कृष्णा हेगडे यांनीही रेणू शर्माबाबत तक्रार केली आहे. पण, ही तक्रार आताच का? हा प्रश्न मनात येतोच. खरे तर रेणू शर्मा या महिलेबद्दलही हेच मत आहे की, दशकापूर्वीचे प्रकरण तिने आताच का काढावे?
 
 
“धनंजय मुंडे यांच्या दुसर्‍या कथित पत्नीची बहीण आहोत आणि धनंजय मुंडे यांनी सिनेसृष्टीत गायिका म्हणून काम मिळवून देतो, असे सांगत बलात्कार केला,” असेही रेणू शर्मा म्हणते. काही लोकांचे म्हणणे की, रेणूला माहिती होते की धनंजय यांना पहिली पत्नी आहे. तसेच दुसरी पत्नीही आहे. मग तिने का धनंजय यांच्याशी संबंध ठेवावेत? तर काही लोक म्हणतात की, धनंजय हे मंत्री आहेत म्हणून त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी त्यांना ‘ब्लॅकमेल’ केले जात आहे. काही महाभागांचे म्हणणे की, मुंडे हे मागासवर्गीय असून त्यांची प्रगती पाहावली जात नाही म्हणून त्यांच्याविरुद्ध प्रस्थापितांनी कुंभाड रचले आहे.
 
 
कदाचित, रेणू शर्मा या महिलेचे आरोप खोटेही असू शकतात. पण, करुणा शर्माचे काय? रेणू शर्माच्या मते, करुणा शर्मा यांच्यासोबत धनंजय यांचा विवाह झाला आहे. ‘संविधान बचावो’ वगैरे म्हणत धनंजय मुंडे नेहमी आघाडीवर असतात. मग याच संविधानाने महिलांना आणि पत्नीला काय हक्क-अधिकार दिले, हे मुंडे यांना माहिती नाही का? ‘द्विभार्या प्रतिबंधक कायद्या’न्वये बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय स्त्रीला किती सुरक्षा दिली आहे. पण, धनंजय यांनी संविधानाची चक्क हेटाळणी केली. निवडणूक पत्र भरताना त्यांनी आपल्या आणि करुणा शर्मा यांच्या मुलांचा उल्लेख केला का? केला नसेल तर हा गुन्हाच आहे.
 
 
पण, छे, छे धनजंय मुंडे यांनी तर सांगितले की, आरोप करणारी रेणू शर्मा ही करुणा शर्माची बहीण असून, गेली १८ वर्षे ते आणि करुणा ‘रिलेशनशीप’मध्ये आहेत. त्यांना दोन मुलेही आहेत. त्यांचा सगळा खर्च धनंजय करतात. त्या मुलांना वडील म्हणून त्यांनी नावही दिले आहे. तसेच त्यांची ही करतूत त्यांच्या कुटुंबीयांना माहिती असून सगळ्यांनी त्यांच्या या संबंधाचा स्वीकारदेखील केला आहे. धनंजय मुंडे यांचे म्हणणे ऐकून मला त्या तमाम महिला आठवल्या, ज्यांना जबरदस्तीने किंवा नाइलाजाने एका विवाहित माणसाशी शारीरिक संबंध ठेवावा लागतो.
 
 
तो पुरुष त्या स्त्रीचा हवा तसा वापर करतो. मात्र, तिला कधीही घरच्या महिलेचा दर्जा देत नाही. तिचे जगणे दबलेले आणि कमालीचे त्रासदायकच असते. हे ‘जावे त्यांच्या वंशी’. चोरून किंवा ज्या नात्याचा उल्लेख उजळमाथ्याने कुठेही करता येत नाही, त्या नात्यातल्या मुलांना, त्यांच्या आईला काय भोगावे लागते, हे धनंजय मुंडेसारख्या माणसाला माहिती आहे का?
 
 
तसेच, धनंजय यांनी सांगितल्याप्रमाणे धनंजय आणि करुणा हे प्रेमसंबंधात असतील, तर मग इतक्या वर्षांनंतर करुणा त्यांच्या विरोधात का गेली असेल? धनंजय यांच्या प्रेमसंबंधातल्या स्त्रीपेक्षाही ती त्यांच्या मुलांची आई आहे. जर धनंजय यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी मुलांना आणि करुणाला सर्वकाही दिले, तर मग करुणा आता विरोधात का? या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय यांच्या पहिल्या पत्नीचे काय? धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री या तर अत्यंत सुस्वभावी. इतकेच नव्हे, तर पतीवर जीव ओवाळून टाकणार्‍या स्त्री आहेत.
 
 
धनंजय मुंडे यांच्या प्रचारामध्ये राजश्री यांचे कष्ट कोण विसरेल? तर अशा सर्वगुणसंपन्न पत्नीला काय वाटेल, याचा विचार न करता धनंजय म्हणे करुणा यांच्या प्रेमात पडले. आता आश्चर्य असेही वाटते की, राजश्री यांची काय मजबुरी होती की, त्यांना धनंजय यांचे प्रेमसंबंध स्वीकार करावे लागले? खरे तर हे त्रिकालाबाधित सत्य आहे की, कोणत्याही पत्नीला आणि प्रेयसीलाही आपल्या पतीने किंवा प्रियकराने दुसर्‍या कुणाशी संबंध ठेवू नये, असेच वाटत असते. करुणा शर्माबाबत धनंजय यांच्या पत्नीला म्हणे माहिती होते. पण, ‘आवडणे’ आणि ‘नाइलाजाने स्वीकारणे’ यात खूप फरक असतो.
 
दुसरे असे की, परळी काही फार मोठे विस्तारलेले नाही. परळीत काही झाले, तर सगळ्या परळीत क्षणात कळते. धनंजय यांच्याबाबतही सगळ्यांनाच माहिती होते. मग समाजभान म्हणून कुणालाही काहीच वाटले नाही? एकवेळ असे समजू की, धनंजय यांना करुणाबद्दल प्रेम होते, तर त्या प्रेमाला समाजमान्यता देण्याचा प्रयत्न त्यांनी का केला नाही? की, समाजात विवाहित पुरुष म्हणून सगळे मानसन्मान मिळवून दुसरीकडे एका स्त्रिला मजेसाठी उपभोगायची ही वृत्ती? ही वृत्ती बाळगणारी व्यक्ती कोण? तर महाविकास आघाडीचे समाजकल्याणमंत्री. हे महिलांना न्याय देणार? हे पीडितांना न्याय देणार?
 
 
या सगळ्या प्रकरणात २०१९ सालचे धनंजय मुंडे यांचे ‘ते’ कुप्रसिद्ध भाषण आठवते. त्यात त्यांनी आक्षेपार्ह हातवारे करत स्वतःच्याच बहिणीबद्दल, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल अश्लील आणि अस्वीकार्ह उद्गार काढले होते. पंकजा मुंडे यांच्या चारित्र्याबद्दल आडून-आडून प्रश्न उपस्थित केला होता. धनंजय यांना हा अधिकार कुणी दिला होता? रेणू शर्मा यांचे म्हणणे जर खरे असेल, तर धनंजय त्याचवेळी रेणू शर्मावर अत्याचार करत होते. आता प्रश्न असाही उपस्थित होतो की, धनंजय यांच्या म्हणण्याप्रमाणे सगळ्यांना करुणा शर्माबद्दल माहिती होते, तर मग पंकजा मुंडेबाबत वाटेल ते बरळत असताना कुणीही धनंजय यांना का म्हणाले नाही की, ‘तू तुझे बघ!’ जर सगळ्या घरातल्यांना पण हे प्रकरण माहिती होते, तर मग पंकजा यांनाही माहिती हवे. पण, पंकजा यांनी यावर भाष्य केले नाही.
 
 
का? पुरुषाने वाटेल ते केलेे, तर तो त्याचा पुरुषार्थ असतो, हे अजूनही समाजात कुठेतरी धगधगत आहे का? आता कृष्णा हेगडेंच्या म्हणण्यानुसार रेणू शर्मा ही ‘हनी ट्रॅप’ असेल.. पण, धनंजय मुंडे काय किंवा कृष्णा हेगडे काय, हे बालक नाहीत. कृष्णा यांचे म्हणणे खरे मानले तर मुद्दा येतो की, धनंजय यांच्या मते धनंजय यांनी करुणा यांच्या कुटुंबाला स्थिरता मिळवून दिली. मग आपल्या प्रेयसीची बहीण, मुलांची मावशी असे काही उद्योग करते हे पाहून धनंजय मुंडे यांच्यासारखा परळीकर गप्प बसला नसता. त्याचप्रताणे कृष्णा हेगडे नेमके आताच तक्रार करायला बाहेर का आले? इतकी वर्ष गप्प का बसले? सामान्य जनता भोळी आहे. पण, वेडी नक्कीच नाही!
 
 
असो, धनंजय मुंडे यांच्या फेसबुक वॉलवर गेलात, तर तिथे धनंजय मुंडे यांनी प्रेमसंबंध स्वीकार केले, याबद्दल त्यांना ‘योद्धा’, ‘शूर’ वगैरे उपाधी देणारे शेकडो मेसेज आहेत, तसेच काही राजकीय नेत्यांनीही धनंजय मुंडे यांच्या कृत्याचे समर्थन केले आहे. सगळ्यात मोठे म्हणजे हिंदू संस्कृतीत स्त्रियांवर अत्याचार म्हणणारे काही डावे विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्तेही धनंजय यांना समर्थन देत आहेत.
 
 
काही लोक तर म्हणतात की, ‘प्यार किया तो डरना क्या?’ पण, प्रेमात समोरच्या व्यक्तीला मानसन्मान, सामाजिक आदर वगैरे देण्याचीही पद्धत असते. आपली आवड म्हणून समोरच्या स्त्रीचा वापर करायचा; पण तिला समाजमान्यता द्यायची नाही, हे काही प्रेम असू शकत नाही. हे तर त्या प्रेमसंबंधातील स्त्रीशी केलेले कपट आहे (धनंजय मुंडे प्रकरणाबाबत काही समाज कार्यकर्त्या महिलांशी बोलले तर त्यांचे हे म्हणणे आहे). कधीकधी पडद्यामागचे वास्तव काही औरच असते. ज्यांनी स्त्रीजीवन जवळून पाहिले आहे ना? त्यांना यात काय असेल याचा अंदाज येऊ शकतो.
 
दुसरीकडे विद्या चव्हाण म्हणा किंवा रूपाली चाकणकर या आता गप्प का? रेणू खोटे बोलते की खरे, याबद्दल माहिती काढावी, असे यांना वाटले नाही. तसेच याबाबतीत करुणा शर्मा किंवा राजश्री मुंडे यांचे मत काय आहे, हे विचारावेसे यांना वाटले नाही. आता या गप्प का? हेच आरोप जर भाजपमधील साध्या कार्यकर्त्याबाबत असते तर यांनी काय केले असते? यांचेच समविचारी कारण नसताना देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीबद्दल नाही नाही ते बोलले. पण, तेव्हाही या सगळ्या जणी मूग गिळून गप्प बसल्या होत्या.
 
पण, आज समाज या सगळ्या महिल्या नेत्यांकडून जाणू इच्छितो की, सत्य काय आहे? पण, या कुणीही बोलायला तयार नाहीत. या महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी मेहबूब शेख याच्या घाणेरड्या कृत्याबद्दलही असेच तोंडाला कुलूप लावले. तूर्तास समाजभान असलेल्या तमाम लोकांचे म्हणणे आहे की, रेणू शर्मा चारित्र्यहीन असून, तिचे असलेच ब्लॅकमेलिंगचे धंदे आहेत. याबाबत अचानक अनेक पुरावे पुढे येतील. करुणा शर्मा आणि रेणू शर्मासारख्या अनेक जणी आहेत. त्या आपल्यावर होणार्‍या अत्याचाराबद्दल बोलायला पुढे का येत नाहीत?
 
याची मीमांसा करणारा घटनाक्रम आता समाजाला पाहायला मिळेल. पण, सत्याला अंत नसतो, सत्य बाहेर येईलच! काळच ठरवेल की, खरे काय, खोटे काय? पण, संविधानाची चाड असेल आणि समाजमूल्यांचे भान असेल, तर कुणी मागण्यापूर्वीच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा. अर्थात, ते ज्या पक्षात आहेत तिथे असली काही नैतिक मूल्ये बाळगत राजीनामा द्यायची पद्धत नाही. पण, समाजाला आणि महाराष्ट्राला खाली पाहायला लागू नये, यासाठी तरी धनंजय मुंडे, खुर्ची सोडा...





@@AUTHORINFO_V1@@