‘कलम ३७०’ संपुष्टात आल्याचा मोठा फायदा! : मनोज नरवणे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2021   
Total Views |

Manoj Narvane_1 &nbs
 
 

दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या विशेष मुलाखतीत लष्करप्रमुखांची माहिती

जगातील एक सामर्थ्यवान सैन्यदल म्हणजे भारतीय लष्कर. जगातील सर्वात उंच युद्धभूमी सियाचीन ते राजस्थानचे रण आणि जम्मू-काश्मीर ते अरुणाचल प्रदेश, अशा सर्व आघाड्यांवर भारतीय लष्कर अहोरात्र कार्यरत असते. केवळ सीमांचे रक्षण नव्हे, तर नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्तींमध्येही भारतीय लष्कर नेहमीच सज्ज असते. अशा या सामर्थ्यवान भारतीय लष्कराचे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्यासोबत ‘दै. मुंबई तरुण भारत’चे विशेष प्रतिनिधी पार्थ कपोले यांनी साधलेला हा विशेष संवाद!
 
 
 
लष्करप्रमुख म्हणून आपला एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे, या एका वर्षाकडे आपण कसे पाहता?
 
माझ्या या वर्षभराच्या कार्यकाळात दोन मुख्य घटना घडल्या. पहिली म्हणजे कोरोना संसर्ग आणि पूर्व लडाखमध्ये ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’सोबत (पीएलए-चिनी सैन्य) झालेले ‘कन्फ्रन्टेशन.’ मात्र, या दोन्ही आव्हानांचा सामना भारतीय लष्कराने अगदी समर्थपणे केला.कोरोना महासाथीमध्ये केंद्र सरकारला भारतीय लष्कराने सर्वतोपरी मदत केली. आम्ही स्वत:ला तर वाचवलेच, मात्र सर्वसामान्य जनतेसाठी लष्कराने रुग्णालये, विलगीकरण केंद्र उघडले. सुरुवातीला परदेशातून येणारे भारतीय नागरिक हे सर्वप्रथम आमच्या मानेसर, जयपूर, जोधपूर येथील वैद्यकीय केंद्रांमध्ये आले. सुरूवातीला तर लोकांना या संसर्गाविषयी कोणतीही कल्पना नव्हती, काय काय काळजी घ्यायची आहे, याविषयी लोक अनभिज्ञ होते. मात्र, भारतीय लष्कराने योद्ध्याप्रमाणे भूमिका बजाविली. कोरोना संसर्गाची स्थिती हाताळत असतानाच पूर्व लडाखमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली. तेथेही भारतीय लष्कराने अतिशय समर्थपणे कार्यवाही आणि कारवाई केली. त्यामुळे आता पूर्व लडाखमध्ये स्थिती ही सर्वसामान्य झाली आहे. या स्थितीमध्ये बदल करण्यासाठी जे काही प्रयत्न झाले, ते भारतीय लष्कराने समर्थपणे उधळून लावले. त्यामुळे भारतीय लष्कराचे सामर्थ्य या दोन्ही घटनांमध्ये सिद्ध झाले आहे.
 
जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशांतील सद्यस्थितीविषयी तुमचे काय मूल्यमापन आहे? काश्मिरी जनतेला तुम्ही कोणता संदेश द्याल?
 
अगोदर जम्मू-काश्मीर आणि लडाख हे एक राज्य होते. मात्र, ‘कलम ३७०’ संपुष्टात आल्यानंतर लडाख आणि जम्मू-काश्मीर हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश तयार झाले. लडाखमध्ये हिंसाचार अथवा संघर्षाची स्थिती यापूर्वीही कधीच नव्हती. त्यामुळे लडाखमधील स्थिती पूर्वी होती तशीच आजही कायम आहे. मात्र, जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाची स्थिती खूपच सुधारली आहे. ‘खूप सुधारली’ हे फक्त समाधानासाठी मी म्हणत नाही. मात्र, तथ्य आणि आकडेवारीतूनही ते सिद्ध होत आहे. पूर्वी जवळपास दररोज दगडफेकीच्या घटना घडायच्या, त्या आता कमी झाल्या आहेत. दहशतवाद्यांच्या कारवाया म्हणजे ग्रेनेड हल्ले, ‘सीआरपीएफ’च्या ताफ्यांवर हल्ले, गोळीबार या घटना आता खूपच कमी झाल्या आहेत. त्यामुळे ‘कलम ३७०’ संपुष्टात आणण्याचा लाभ नक्कीच झाला आहे.
 
ईशान्य भारतातील स्थिती भारतीय लष्कर कशाप्रकारे हाताळत आहे?
 
ईशान्य भारतातील स्थिती फार पूर्वी वाईट होती. मात्र, भारतीय सैन्याने ज्या मोहिमा पार पाडल्या, सरकारनेही नवनव्या योजनांसाठी पुढाकार घेतला, त्यामुळे त्याचे सकारात्मक परिणाम तिथे झाले. पूर्वी ईशान्य भारतातील सातही राज्यांमध्ये- ‘सप्तभगिनी’ ज्याला आम्ही म्हणतो, त्या प्रत्येक राज्यात कोणत्या ना कोणत्या प्रकारची अशांतता होती. त्यापैकी आता अरुणाचल प्रदेशातील तीन जिल्हे वगळता उर्वरित राज्ये शांत आहेत, नागालँडमध्ये तर शस्त्रसंधीच आहे. मणिपूरमध्ये आता एक-दोन छोटे गट उरले आहेत. मिझोराम आणि मेघालयमध्ये पूर्ण शांतता आहे. आसाममध्येही ‘उल्फा’चे छोटे काही गट थोड्याफार प्रमाणात उपद्रव करण्याचा प्रयत्न करतात, पुन्हा आपले अस्तित्व पक्के करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, राज्यात तशी शांतता आहे. मात्र, भारतीय सैन्य ईशान्य भारतात समर्थपणे आपले काम करीत आहे, त्यामुळे कोणालाही डोके वर काढण्याची संधीच मिळत नाही. मध्यंतरीच्या काळात लष्कराने पुढाकार घेऊन सैन्य, सुरक्षा दले, केंद्र सरकार, राज्य सरकार यांनी मिळून जो दबाव निर्माण केला, त्यामुळे दोन मुख्य उपद्रवी गटांना वेसण घातली गेली आहे. मुख्य म्हणजे आसाममध्ये ‘उल्फा’चे नेतृत्व करणाऱ्या राजखोवाने शरणागती पत्करली. म्यानमारमध्ये राहून नागालँडमध्ये कारवाया करणाऱ्या खापलांग गटाचा कमांडर, त्यांचा क्रमांक दोनचा नेता आणि त्यांच्यासोबत ५० लोकांनीही शरणागती पत्करली. त्यामुळे ईशान्य भारतातील चार ते पाच जिल्हे वगळता प्रदेश पूर्ण शांत आहे. महत्त्वाचे म्हणजे जसजशी परिस्थिती सर्वसामान्य होते, तसतसे भारतीय सैन्यही त्या प्रदेशातून बाहेर पडते आणि मुख्य शत्रू म्हणजे बाह्य शत्रूंचा बिमोड करण्याकडे आम्ही अधिक लक्ष देतो.
 
यंदाच्या वर्षी १९७१ च्या युद्धाचा सुवर्णमहोत्सव साजरा करत आहोत. त्याचे नेमके स्वरूप आणि वैशिष्ट्य काय आहे?
 
‘स्वर्णिम विजय दिवस’ या नावाने १९७१ च्या युद्धाचा सुवर्णमहोत्सव साजरा केला जात आहे. देशभरात वर्षभर विविध कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत. त्याची सुरूवात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतील ‘राष्ट्रीय समर स्मारका’त झाली. तेथे ‘स्वर्णिम विजय मशाल’ प्रज्वलित करण्यात आली आणि चार मशाली देशाच्या चारही दिशांना पाठविण्यात आल्या आहेत. या मशाली १६ डिसेंबर रोजी दिल्लीत परत येतील. दुसरा कार्यक्रम म्हणजे १९७१ च्या शौर्यपदक विजेते जे आहेत, त्यांची भेट हे मशालधारी जवान घेतील. त्यांच्या गावातली माती आपल्या सोबत आणतील आणि त्या मातीचा वापर करून राष्ट्रीय समर स्मारकात एखादे शिल्प उभारले जाईल, त्या मातीमध्ये वृक्षारोपण केले जाईल. जेणेकरून देशभरातील जनतेच्या भावनांचे एक सुरेख स्मारक उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याशिवाय लष्करी साहसी कार्यक्रम, लष्करी साहित्य संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रमही केले जाणार आहेत.
 
भारतीय लष्करामध्ये महिला अधिकाऱ्यांचा सहभाग आणि भूमिका याकडे तुम्ही कसे पाहता?
 
भारतीय लष्करात सुरुवातील महिला अधिकारी केवळ ‘वैद्यकीय कोअर’मध्ये कार्यरत होत्या. त्यानंतर ‘अॅडव्होकेट जनरल कोअर’मध्येही त्यांचा सहभाग सुरू झाला. त्यानंतर मग इंजिनिअर, सिग्नल, एव्हीएशन, ईएमई आदी आठ क्षेत्रेही त्यांच्यासाठी खुली केली. सुरूवातील त्यांना सैन्यात ‘पर्मनंट कमिशन’ देण्यात येत नसे, पण गेल्या वर्षीच त्यांना ‘पर्मनंट कमिशन’ देण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. त्यासाठी जून- जुलैमध्ये ‘पर्मनंट कमिशन’साठीचे सिलेक्शन बोर्ड कार्यरत झाले आणि ६१५ महिला अधिकाऱ्यांना आता ‘पर्मनंट कमिशन’ मिळाले आहे. त्यामुळे आता त्यांना सैन्यातील उच्च पदे (हायर रँक) मिळण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे. कारण, पूर्वी ‘शॉर्ट सर्व्हिस कमिशन’ असल्याने त्यांना मेजर किंवा लेफ्टनंट कर्नल या पदांपर्यंत जाता येत असे. मात्र, आता कर्नल आणि पुढील वरिष्ठ पदांवरही महिला अधिकारी काम करू शकणार आहेत. अधिकारीस्तरावर तर महिलांसाठी बदल केले आहेतच. मात्र, ‘कोअर ऑफ मिलिटरी पोलीस’ यामध्येही जवानांच्या स्तरावर महिलांचा सहभाग खुला करण्यात आला आहे. त्यासाठीचे प्रशिक्षण घेणारी पहिली तुकडी येत्या काही महिन्यांतच पदवीधर होणार आहे. त्यांचा समावेश ‘कोअर ऑफ मिलिटरी पोलीस’मध्ये केला जाईल. सध्या महिलांवर होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे, सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. आमचेही कुटुंब आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत बोलताना आम्हाला ते जाणवले. कारण, पुरुषांना अशा काही विषयांची चौकशी करताना थोडा त्रास व्हायचा. मात्र, आता ‘कोअर ऑफ मिलिटरी पोलीस’मध्ये महिला अधिकाऱ्यांच्या सहभागामुळे अशा चौकशा करताना लाभ होणार आहे. अशाप्रकारे भारतीय लष्करात आम्ही महिलांचा सहभाग वाढवत आहोत.
‘नेक्स्ट ऑफ किन ऑफ फिजिकल कॅज्युल्टी’ आणि ‘बॅटलफिल्ड कॅज्युल्टी’ याविषयी भारतीय लष्कराचे काय धोरण आहे?
 
आता आमचे काम असे आहे की ‘कॅज्युल्टी’ होणारच. सीमेवर तोफगोळ्यांचा मारा, गोळीबार होतच असतो. त्यामुळे त्याच्यासाठी आम्ही खूप चांगली ‘एसओपी’ तयार केली आहे. त्यामध्ये सैनिक, अधिकारी यांना ‘कॅज्युल्टी’ झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांची कशी काळजी घ्यायची, हे अगदी चांगल्या प्रकारे नमूद केले आहे. आम्ही केवळ आर्थिक मदत करून थांबत नाहीत तर पुढेही आयुष्यभर त्यांची काळजी घेतो. त्यासाठीची आर्थिक तरतूद नुकतीच वाढविण्यात आली आहे, सरकारदेखील विविध योजना आखत आहे. युद्धात जखमी अथवा हुतात्मा झालेल्यांच्या कुटुंबीयांना नोकरीमध्ये, शिक्षणात विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. भारतीय सैन्य सतत त्यांची काळजी घेत असते. त्यांच्या गावात (शहरी आणि ग्रामीण) दरवर्षी आमची एक तुकडी जाते, त्यांची चौकशी केली जाते. निवृत्तीवेतन अथवा अन्य काही अडचणी असतील तर त्याची चौकशी केली जाते. मुला-बाळांच्या लग्नासाठी आम्ही मदत करतो. एकुणच एका मोठ्या कुटुंबाप्रमाणे भारतीय लष्कर काम करते आणि प्रत्येकाची काळजी घेते.
‘कोअर ऑफ मिलिटरी पोलीस’सेवेसाठी महिलांचा मोठा प्रतिसाद
 
लष्करी सेवेत येऊ इच्छिणाऱ्या मुलींना मी हाच संदेश देईन की आम्ही अतिशय चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे या संधीचा लाभ मुलींनी जरूर घ्यावा. ‘कोअर ऑफ मिलिटरी पोलीस’मध्ये एकूण १७०० उमेदवार घेण्यात येणार असून दरवर्षी १०० उमेदवारांची भरती केली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या १०० जागांसाठी तब्बल ५० ते ६० हजार महिला उमेदवारांनी अर्ज केले आहेत.
 
पुण्यात येऊन अगदी ‘रिफ्रेश’ होतो
पुण्यात आल्यावर मला खूप बरे वाटते. त्यामुळे पुण्यात कधी येता येईल, हे मी नेहमीच बघत असतो. अर्थात, आता मी ज्या पदावर आहे, ज्या जबाबदाऱ्या आहेत, त्यामुळे वेळ असा मिळत नाही. मात्र, मी जेव्हाही पुण्यात येतो तेव्हा सर्वांना भेटतो, म्हणजे माझ्या वर्गमित्रांना भेटतो. माझे वडील आणि बहीण पुण्यातच असतात, त्यांना मी भेटतो. या सर्वांना भेटून खूप बरे वाटते. मुख्य म्हणजे ‘बॅटरी’ही ‘चार्ज’ होते आणि अगदी ‘रिफ्रेश’ होऊन पुन्हा कामाला सुरूवात होते!
 
लष्करप्रमुखांचा काश्मिरी जनतेला संदेश
 
काश्मिरी जनतेलादेखील आता ‘कलम ३७०’ संपुष्टात आणणे हे योग्यच होते, हे पटले आहे. त्यामुळे आता हळूहळू काश्मिरी जनता निर्भयपणे ‘कलम ३७०’ संपुष्टात आणण्याचे समर्थन करायला लागली आहे. काश्मिरी तरुणही आता मुख्य प्रवाहात येत आहेत. त्यांच्यावर दहशतवाद्यांचा असलेला दबाव आता कमी-कमी होत चालला आहे. त्यामुळे काश्मिरी तरुण आता मोकळा श्वास घेत आहेत. क्रिकेट संघ, फुटबॉल संघ, अभियनक्षेत्र, साहित्यक्षेत्र, स्टार्ट अप या व अशा सर्व क्षेत्रांत ते त्यांच्या क्षमता सिद्ध करत आहेत. त्यामुळे काश्मिरी जनतेने विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्यास प्राधान्य द्यावे, असेच मी म्हणेन.
 
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात बांगलादेशी सैन्याचाही सहभाग
 
१९७१च्या युद्धामध्ये बांगलादेशालाही स्वातंत्र्य मिळाले होते. त्यामध्ये भारतीय सैन्याच्या पूर्व कमांडची भूमिका अतिशय निर्णायक आणि महत्त्वाची होती. त्यांनीच बांगलादेश आघाडीवर युद्ध लढले होते. त्यामुळे पूर्व कमांडही विविध कार्यक्रम आयोजित करणार आहे. त्यात ‘मुक्तीवाहिनी’चे योद्धेही सहभागी होतील. भारत आणि बांगलादेशही संयुक्तपणे कार्यक्रम करणार आहे. विशेष म्हणजे यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये बांगलादेशाच्या सैन्यदलांची एक तुकडीही सहभागी होणार आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@