बिनबुडाचे विचारवंत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2021
Total Views |
arundhati ray_1 &nbs
 
 
अरुंधती रॉय या कोणी समाजसेवक वा वनवासी, शेतकर्‍यांसाठी झटणार्‍या कार्यकर्त्या नाहीत, तर नक्षलवादाच्या मार्गाने चालत देशातील संविधानिक व्यवस्थेपुढे आव्हान उभे करणार्‍या, ती व्यवस्था उलथून टाकण्यासाठी जोर लावणार्‍या, हिंसाचाराला प्रोत्साहन देणार्‍या व लोकशाहीचा खून करण्यासाठी तत्पर असलेल्या अराजकतावादीच असल्याचे स्पष्ट होते.
 
 
देशाच्या अंतर्गत सुरक्षेपुढे दहशतवादापेक्षाही नक्षलवादाचा धोका सर्वात मोठा असल्याचे विधान माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एकेकाळी केले होते. तथापि, बाथरूममध्ये रेनकोट घालून स्नान करण्याच्या कौशल्यामुळे काँग्रेस आणि संपुआने त्यांचे नक्षलवादाशी संबंधित विधान कितपत गांभीर्याने घेतले, ते सर्वांसमोर आहेच. २००४ ते २०१४ या दहा वर्षांच्या केंद्रीय सत्ताकाळात आणि ठिकठिकाणच्या राज्य सरकारांत, तसेच अजूनही काँग्रेस पक्षाचा व काँग्रेस नेत्यांचा ओढा नक्षलवाद संपविण्याच्या नव्हे, तर ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याच्या दिशेनेेच असल्याचे दिसून येते. परिणामी, देशात नक्षलवादाचा सुळसुळाट कायम राहिला आणि त्याचे समर्थन करणार्‍या तथाकथित बुद्धिजीवी, बुद्धिमंतांचा अर्थात शहरी नक्षलवाद्यांचा कळपही तयार झाला. त्यातल्याच एक नक्षलवादी, माओवादी व दहशतवाद्यांबद्दल कळवळा दाटून येणार्‍या, शहरात राहणार्‍या वादग्रस्त बुद्धिमंत लेखिका अरुंधती रॉय या होय.
 
 
जंगली किंवा शहरी नक्षलवादी आणि डाव्या विचारवंतांचा देशाच्या संविधानावर वा लोकशाहीवर विश्वास नसतोच व त्याचा दाखला वेळोवेळी मिळालेला आहे. त्यांचा विश्वास केवळ शस्त्र आणि शस्त्रास्त्रांच्या बळावर हिंसाचार करत दहशत माजवण्यावरच असतो. आपले म्हणणे गळी उतरविण्यासाठी ही मंडळी वनवासींची दिशाभूल करून सरकारविरोधात शस्त्र उचलण्यासाठी भडकवत असतात. अरुंधती रॉय तर पहिल्यापासूनच या कामात निष्णात आणि त्यांनी आपले असले कौशल्य वेळोवेळी दाखवूनही दिले आहे.
 
 
असाच प्रकार अरुंधती रॉय यांनी गेल्याच आठवड्यात पुन्हा एकदा केला आणि वनवासींनंतर त्यांच्यासारख्या लोकांचा डोळा यापुढे शेतकर्‍यांवर असल्याचे स्पष्ट झाले. बहादूरगढ येथील भारतीय किसान युनियनच्या धरणे प्रदर्शनात सहभागी होत अरुंधती रॉय यांनी सभेला संबोधित केले व शेतकर्‍यांना नक्षलवाद्यांच्याच मार्गावर चालण्याची चिथावणी दिली. त्या म्हणाल्या की, “मी इथे आतापेक्षाही लवकर येणार होते. पण, माझ्या येण्याने तुमचे दहशतवादी, नक्षलवादी, माओवादी वा तुकडे तुकडे गँग, खान मार्केट गँग, असे नामकरण केले गेले असते. तथापि, मी येण्याआधीच त्यांनी तुमचे नामकरण (नक्षलवादी, खलिस्तानी वगैरे) करून टाकले.”
 
 
दरम्यान, नक्षलवादी आणि दहशतवाद्यांना ‘हाती बंदुका घेतलेले गांधी’ ठरवणार्‍या अरुंधती रॉय यांनी इथे आणखीही बरीच विधाने केली, जी शेतकर्‍यांना माओवादाकडेच नेणारी आहेत. “शेतकर्‍यांनी ‘ती’ वास्तविकता प्रत्यक्षात आणली जी माझ्यासारखे लोक गेल्या २० वर्षांपासून लिहित आहेत. सरकार शेतकर्‍यांबरोबर जे काही करत आहे व करू इच्छिते ते अगदी तसेच आहे, जे ‘बस्तरमध्ये लढणार्‍यां’बरोबर केले. बस्तरमधील लढवय्ये ‘लढाई’ लढत आहेत. कारण, सरकारने वनवासींकडून जल, जंगल, जमीन हिसकावून घेतले व बड्या उद्योगपतींना दिले.
 
 
आज सरकार शेतकर्‍यांबरोबरही तोच खेळ खेळत आहे. प्रत्येक निवडणुकीआधी राजकीय मंडळी तुमच्या साथीने उभी राहतात, तुमच्याकडे मते मागतात आणि निवडणुका संपल्या की अंबानी, अदानी, पतंजली व बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या बाजूने कृती करतात. माध्यमांवरही त्यांचेच वर्चस्व आहे, तिथेही तुमचा आवाज कोणीच ऐकणार नाही, दाखवणार नाही.” रॉय यांच्या या विधानात बारकाईने पाहिल्यास शेतकर्‍यांना नक्षलवादाकडे वळवत सरकार, उद्योगपती व माध्यमांविरोधात भडकावण्याचा संपूर्ण मसाला असल्याचे स्पष्ट होते. कसे?
 
दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या तथाकथित शेतकर्‍यांच्या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारण्याचा इशारा देण्यापासून ते खलिस्तानी झेंडा फडकाविण्यापर्यंत सर्वच प्रकार झाले. तसेच कृषी कायद्याविषयीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाऊनही २०२४च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत आंदोलन करण्याची आमची तयारी असल्याची धमकीही तथाकथित किसान नेत्यांनी दिली. इथेच याचा, आम्ही अराजक माजविण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत, फक्त कोणीतरी ठिणगी टाकण्याचा अवकाश असल्याचा साधा सोपा अर्थ होतो. अरुंधती रॉय यांनी हेच तर म्हटले, गेल्या २० वर्षांपासून आम्ही जे लिहित होतो, ते आता कुठे जमिनीस्तरावर उतरल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
 
म्हणजे अरुंधती रॉय बुद्धिजीवी, बुद्धिमंत, विचारवंत व लेखिकेच्या मुखवट्याआड काय लिहित होत्या, कसली तयारी करत होत्या, कशासाठी करत होत्या, हे त्यांनी स्वतःच्याच तोंडाने कबूल केले व ते प्रत्यक्षात घडत असल्याचे पाहून त्याचे कौतुकही केले. यावरूनच अरुंधती रॉय या कोणी समाजसेवक वा वनवासी, शेतकर्‍यांसाठी झटणार्‍या कार्यकर्त्या नाहीत, तर नक्षलवादाच्या मार्गाने चालत देशातील संविधानिक व्यवस्थेपुढे आव्हान उभे करणार्‍या, ती व्यवस्था उलथून टाकण्यासाठी जोर लावणार्‍या, हिंसाचाराला प्रोत्साहन देणार्‍या व लोकशाहीचा खून करण्यासाठी तत्पर असलेल्या अराजकतावादीच असल्याचे स्पष्ट होते.
 
अरुंधती रॉय यांचा प्रयत्न निदर्शने करणार्‍या तथाकथित शेतकर्‍यांना आपले म्हणणे मान्य करवून घेण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यासाठी तयार करण्याचा आहे. तसेच बस्तरच्या नक्षलवाद्यांचा, त्यांच्या हक्क-अधिकारांसाठीच्या लढ्याचा उल्लेख करत तुम्हीही त्यांच्याचप्रमाणे हाती शस्त्र घेऊन हिंसाचारी कृती करा, असे अरुंधती रॉय यांचे म्हणणे आहे. सोबतच शेतकर्‍यांनी सरकारचा विरोध करावाच; पण ‘बेरोजगार बुद्धिजीवीं’च्या म्हणण्याप्रमाणे राज्याविरोधात शस्त्र उचलणार्‍या, पोलिसांची, सामान्यांची हत्या करणार्‍या नक्षलवाद्यांचाही त्यांनी बचाव करावा, असे अरुंधती रॉय यांना अपेक्षित आहे.
 
 
अरुंधती रॉय यांच्यासारखे बिनबुडाचे विचारवंत आपल्या शब्दांच्या जाळ्याने व उद्योगपतींची भीती घालून शेतकर्‍यांतही आपले स्थान कसे निर्माण करू पाहतात, हे यावरून दिसून येते. तथापि, त्यांच्यासाठी वनवासी वा शेतकरी केवळ प्यादे असतात व त्यांच्या माध्यमातून आपला अजेंडा लागू करण्याचीच या मंडळींची इच्छा असते. मात्र, याची प्रेरणा आणि रसद दुसरीकडूनच कुठूनतरी मिळत असते, चीन, पाकिस्तान किंवा अजून कोणाकडून तरी! कारण भारतातील कायदा-व्यवस्थेला चूड लागली, इथे अशांतता नांदली की सीमेपलीकडच्यांचे निहितार्थ साधले जातात, म्हणूनच अशा बुद्धिजीवी, विचारवंतांचे बुरखे फाडून त्यांचा खरा चेहरा समोर आणण्याचे काम सातत्याने केलेच पाहिजे.





@@AUTHORINFO_V1@@