प्रकाशन व्यवसायातील ‘ज्ञानयज्ञ’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jan-2021
Total Views |

Nilesh Gaikwad_1 &nb
 
 
 
कष्ट, जय-पराजय, आर्थिक पाठबळाचा अभाव अशा खडतर परिस्थितीवर मात करुन यशोशिखर गाठणारे साहित्याचे निस्सीम भक्त आणि प्रकाशन विश्वाला नवा आयाम देणारे निलेश वसंत गायकवाड यांच्याविषयी...
१५ वर्षांपूर्वी एका तरुणाने साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्रात उच्च ध्येय गाठण्याचं स्वप्न पाहिलं. आवडणाऱ्या विषयात झोकून देऊन जगायचं, त्यासाठी कितीही कष्ट उपसावे लागले तरी बेहत्तर, हे मनाशी पक्क ठरवलं आणि सुरू झाला स्वप्नपूर्तीचा प्रवास. प्रकाशक निलेश गायकवाड यांच्या या प्रवासाला १५ वर्षे पूर्ण झाली.
माणसं जोडणं, जोडलेली माणसं टिकवणं, मैत्रभाव, संघटन कौशल्य हा त्यांचा स्वभावधर्म. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून सामान्य ते असामान्य व्यक्तीचा लाभलेला सहवास, उपजत दूरदृष्टी, दैनिक ‘तरुण भारत’मधील व्यवस्थापनाचा अनुभव ही शिदोरी घेऊन स्वतःचा प्रकाशनाचा व्यवसाय सुरू करायचा हे त्यांनी पक्क केलं. केवळ अर्थार्जनाचे माध्यम यादृष्टीने त्यांनी प्रकाशन व्यवसायाचा कधी विचारच केला नाही. मराठी भाषा आणि तिच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपण उभे राहिले पाहिजे, हीच एकमेव तळमळ. त्यांच्या या तळमळीला, अंतरीच्या ध्येयाला अखेर वाट सापडली आणि ‘व्यास क्रिएशन्स’चा जन्म झाला. ‘नवनिर्मितीचा वसा घेतलेली युवा प्रकाशन संस्था’ असं म्हणत ध्येयाचा एकेक टप्पा गाठला. ‘व्यास’ या आद्य गुरूंचे नाव वापरून त्याला साजेसा ज्ञान संचयाचा, वितरणाचा आणि प्रकाशनाचा प्रारंभ झाला. ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत नेर्लेकर यांच्यासारखे गुरुतुल्य आधारस्तंभ म्हणून लाभले आणि ही वाट आणखी सोपी झाली.
‘वंदे मातरम्’, ‘स्वदेशी जागर’ या विशेषांकापासून सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात काही मोजकीच; पण चिरंतन लक्षात राहणारी पुस्तके प्रकाशित केली. लेखक, वाचक आणि ‘व्यास क्रिएशन्स’ हे नातं फुलत गेलं. पुढे वैविध्यपूर्ण प्रकाशनांची यशस्वी मालिका सुरू झाली. महाराष्ट्राच्या गौरवशाली साहित्य परंपरेला जपण्याच्या प्रयत्नात आपला खारीचा वाटा असावा, या भावनेनं १५ वर्षांपूर्वी वाचकांचे प्रबोधन आणि मनोरंजन करावं, या हेतूनं ‘व्यास क्रिएशन्स’नं नवनवीन उपक्रमात पाऊल टाकलं. १५ वर्षांत जे मैलाचे दगड पार केलेत, त्याबद्दल नेहमीच कौतुक झालं. स्वदेशीचा जागर केला, मराठ्यांची शौर्यगाथा गायली, ‘वाचू आनंदे’ म्हणत, बालकुमारांना पुस्तकांच्या ‘ज्ञान आनंदा’च्या अनोख्या विश्वाची ओळख करून दिली. पुस्तकांचे ‘आदान-प्रदान’ केले. जे-जे पाहून मन उद्विग्न झाले, तेथे तेथे सामाजिक जाणिवेतून ‘व्यास’ पोहोचली. ‘आरोग्य जपा’ असा नारा गाजवत ‘आरोग्यम्’ घराघरांत पोहोचले. ‘आरोग्यम्’ मासिक आणि ‘व्यास क्रिएशन्स’ हे नाते वाचकांनी स्वीकारलं. दिवाळी अंकांची परंपरा ‘प्रतिभा’ दीपोत्सवानं जपली. चैत्र महिन्यात वसंताच्या आगमनाबरोबर ‘चैत्रपालवी’ शब्दोत्सवाची गुढी उभारली. ‘ज्येष्ठ विश्व’ मासिकाला वाचकांनी उचलून धरलं. पुस्तके, विशेषांक पुरस्कारांचे मानकरीही ठरले. आजवर ४५० हून अधिक पुस्तकांचा नजराणा बहाल केला. ‘मात अंधारावर’ करीत प्रकाशनांची सरिता दारोदारी पोहोचविली. स्वा. सावरकरांचे विचाररूपी ‘यज्ञकुंड’ धगधगते ठेवले. ‘अनादी अनंत सावरकर’ म्हणजे व्यासचे श्रद्धास्थान. एकाच पुस्तकाच्या १२५ आवृत्त्या आणि १७५ ठिकाणी प्रकाशनांचा इतिहास घडविला. विशेषांकांच्या मांदियाळीत विचारांची गाथा वर्णिली. ‘विवाह’, ‘लावण्यवती’, ‘तेजस्विनी’, या अंकातून स्त्रीच्या जगण्याचं भान जपलं. तसेच ‘ज्येष्ठ महोत्सव’ हा ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात आनंदाच्या क्षणांची पखरण करणारा सन्मान सोहळादेखील गेली १५ वर्षे साजरा होतो. हा प्रवास अक्षरश: मंतरलेला आहे. या प्रवासातलं एक तेजस्वी पर्व म्हणजे ‘व्यास क्रिएशन्स ग्रुप ऑफ कंपनीज.’ आता पंखांनी झेप घेतली आहे. याअंतर्गत ‘व्यास क्रिएशन्स’, ‘व्यास पब्लिकेशन हाऊस’, ‘व्यास महिला मंच राज्ञी’, ‘व्यास क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ या शाखा बहरत आहेत. दापोली येथील ‘फॅमिली कट्टा’ आणि गुहागर येथील ‘सांजराई’, इगतपुरी येथील भव्यदिव्य गृहप्रकल्पाच्या माध्यमातून ‘रिअल इस्टेट’ या क्षेत्रातही निलेश गायकवाड यांनी पदार्पण केले आहे.
आगामी वाटचालीसाठी दिशादर्शक पावले टाकण्यास निलेश आणि संस्था सज्ज झाली आहे. स्वातंत्र्यवीरांचे विचार आजही मोलाचे आहेत याची जाणीव करून देण्यासाठी स्वातंत्र्यवीरांचे साहित्य घराघरांत पोहोचविण्याचा पुन्हा एकदा चंग बांधला आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य शृंखला’ असा अभिनव उपक्रम सुरू करून खुद्द स्वातंत्र्यवीरांची पुस्तके, त्यांच्यावर आजपर्यंत प्रकाशित झालेले निवडक साहित्य आणि सावरकर यांच्या विचारांना नवा आयाम देणारी नवी पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचवणं याचा जणू ध्यास घेतला आहे. यासाठी नियोजनबद्ध सुसूत्रता आखली आहे. याही उपक्रमाला घवघवीत यश येईल यात शंका नाही. याचबरोबर कुमार किशोर गटातील मुलांसाठी संस्कारक्षम आणि माहितीपूर्ण असा १०० पुस्तकांचा संच प्रकाशनाच्या वाटेवर आहे. विविध विषयांवरील दर्जेदार पुस्तके लवकरच वाचकांच्या भेटीस येत आहेत.
समाजभान जपत अक्षरांची सोबत करत, ‘व्यास क्रिएशन्स’चा परीघ विस्तारतो आहे. कल्पकतेला कवेत घेत वास्तवाला भिडत, वाचक, रसिकांच्या प्रेमात न्हालेली, कला, साहित्य संस्कृतीचा संगम ठरणारी जिव्हाळ्याची ही संस्था आणि त्याचे सर्वेसर्वा निलेश गायकवाड यांच्या भावी वाटचालीस दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!!
 
 
- दीपक शेलार
@@AUTHORINFO_V1@@