पण, ‘त्यांच्या’ स्वप्नांचं काय?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2021   
Total Views |

Saudi Crown Prince Mohamm
 
 
यह शहर का सन्नाटा बता रहा हैं,
इंसान ने कुदरत को
नाराज बहुत किया हैं।
 
‘लॉकडाऊन’मधील कोमेजलेल्या शहरांची स्थिती नेमक्या शब्दांत व्यक्त करणार्‍या वरील ओळी... कोरोनामुळे जग एकाएकी थांबले. ‘लॉकडाऊन’मुळे घरात माणसं ‘लॉक’ झाली, तर मानवविरहित निसर्ग मात्र ‘अनलॉक’ झाला. चांगलाच बहरला. पण, वेगवान मानवी जीवनचक्राने पुन्हा गती घेतली आणि निसर्गाचा चार दिवसांचा थाट पुन्हा काळवंडला. निसर्गाची कृपा आणि अवकृपा यांच्याशी आज मानवजात चांगलीच परिचित आहे. पण, जेव्हा मुद्दा विकासाचा, मानवी स्वार्थाचा येतो, तेव्हा निसर्गाची काळजी मात्र अगदी बॅकफूटवर आपसूकच फेकली जाते. विकास आणि निसर्ग यांच्या संतुलनाने मध्यममार्गही हल्ली नवनवीन प्रयोगांती शोधले जातात. पण, त्यांची संख्याही अजूनही मर्यादितच म्हणावी लागेल. असाच एक प्रयत्न सौदी अरब या देशानेही केला असून, भविष्यातील शहरं किंवा ‘स्वप्नातलं शहर’ म्हणून हा प्रयोग आदर्श ठरू शकतो.
 
सौदी अरब म्हटलं की, दोन गोष्टी प्रामुख्याने डोळ्यासमोर येतात. एक म्हणजे इस्लाम धर्माचा केंद्रबिंदू आणि दुसरे म्हणजे कच्च्या तेलाचा सर्वात मोठा निर्यातक देश. परंतु, कोरोनापूर्वीपासूनच कच्च्या तेलाच्या गडगडलेल्या किमतींनी सौदीच्या अर्थव्यवस्थेला हादरे बसू लागले. त्यामुळे तेलाच्या पलीकडे जाऊनही अर्थव्यवस्था आणि देशाच्या सर्वांगीण विकासाच्या चिंतनाला सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्या नेतृत्वाखाली गती प्राप्त झालेली दिसते. याच अभियानांतर्गत सौदी अरबने भविष्यातील शहर ठरणार्‍या ‘नियोम’मध्ये ‘द लाईन’ ही योजना राबविण्याचे ठरविले आहे.
 
 
या योजनेचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे, या भविष्यातील शहरात ना रस्ते असतील, ना वाहनं. आता रस्तेही नाहीत, वाहनंही नाहीत मग माणसांचा प्रवास, मालाची दळणवळण होणार तर कशी, हाच प्रश्न आपल्या मनात सर्वप्रथम उद्भवतो. त्यावर उत्तर म्हणजे, या शहरात ‘अल्ट्रा हायस्पिड ट्रान्झिट सिस्टीम’ उभी केली जाईल. त्यामुळे १७० किमी विखुरलेल्या या शहरातील एका कोपर्‍यातून दुसर्‍या कोपर्‍यात पोहोचण्यासाठी फक्त २० मिनिटांचा कालावधी लागणार आहे. आहे की नाही कमाल?
 
५०० अब्ज डॉलर्सच्या जागतिक गुंतवणुकीसह हे भविष्यातलं शहर आगामी काही वर्षांत उभं करण्याचं सलमान यांचं स्वप्न आहे. या शहराची लोकसंख्या एक अब्ज इतकी असून, २०३० पर्यंत तीन लाख ८० हजार नागरिकांना नोकरी देण्याचे उद्दिष्टही निर्धारित करण्यात आले आहे. एकूणच या शहराचे लक्ष्य पर्यावरणपूरकतेवर राहणार असून शून्य रस्ते, शून्य वाहने आणि शून्य कार्बन उत्सर्जन या तत्त्वावर या संपूर्ण शहराची उभारणी केली जाईल. खरं तर या प्रकल्पाची घोषणा २०१७ सालीच झाली होती.
 
 
पण, आता ‘कोविड’नंतर सलमान यांच्या ‘ड्रिम प्रोजेक्ट’ने वेग घेतलेला दिसतो. परंतु, युवराज सलमान यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वरकरणी जरी आकर्षक वाटत असला तरी आपली ‘विकासपुरुष’ ही प्रतिमा चमकविण्यासाठीचा हा प्रयत्न तर नाही ना, अशा राजकीय चर्चांनाही उधाण आले. शिवाय कागदावर अतिशय रेखीव वाटणारा हा प्रकल्प प्रत्यक्षात साकारताना भौगोलिक आणि गुंतवणुकीसंबंधींच्या अडचणींचाही सौदीला सामना करावा लागू शकतो. या प्रकल्पात आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करण्यासाठी सलमान यांना सौदीची कट्टर इस्लामिक देशाची प्रतिमा प्रथमत: बदलावी लागेल आणि त्या दृष्टीने त्यांनी दिखाव्यासाठी का होईना पावले उचललेली दिसतात. परंतु, तेवढे निश्चितच पुरेसे नाही.
 
सौदी म्हणजे, गडगंज अरबी संपत्ती, तेलरूपी काळे सोने, आर्थिक संपन्नता असे आलिशान चित्र असले तरी ते अर्धसत्य म्हणावे लागेल. सामान्य सौदी कुटुंबीय आणि महिला आजही या देशात अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत. अल्पसंख्याकांच्या जीवालाही इथे मोल नाही. सौदीचे कडक कायदे आणि अमानवीय कृत्ये यांचा भांडाफोड करणारी ‘सौदी अरेबिया अनकव्हर्ड’ ही ‘नेटफिल्क्स’वरील डॉक्युमेंटरीही या विषयात डोकावू इच्छिणार्‍यांनी एकदा तरी जरूर पाहावी. सौदी घराण्याचा खरा चेहरा आणि दहशतवाद्यांशी त्यांचे असलेले लागेबांधे यानिमित्ताने समोर येतात. त्यामुळे सौदीने केवळ देशातील धनाढ्यांचा विचार न करता, देशातील उपाशी, गरिबी जनतेसाठी, त्यांच्या मानवाधिकारांसाठीही प्रयत्नांची-पैशांची पराकाष्ठा करावी. प्रदूषणमुक्त शहराची कल्पना उत्तमच; पण मानवाधिकारयुक्त सौदी अरब कधी आकारास येईल काय?





@@AUTHORINFO_V1@@