सामाजिक आरोग्य आणि कोरोना प्रतिबंध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2021
Total Views |

corona _1  H x
 
 
‘कोविड-१९’ महामारीने जगभर थैमान घातले होते. शास्त्रज्ञांना या आजारावर लस शोधण्यात यश आले आहे. ‘कोव्हिशिल्ड’ व ‘कोवॅक्सिन’ या दोन लसींनी ‘फेज वन’, ‘फेज टू’ आणि ‘फेज थ्री’ या चाचण्या पार केल्या आहेत व त्यांना भारत सरकारने आपत्कालीन लसीकरणासाठी मान्यता दिली आहे.
 
 
आजाराचा प्रतिबंध हा उपचारापेक्षा श्रेष्ठ, हे वैद्यकशास्त्राचे महत्त्वाचे तत्त्व आहे. साथीच्या आजाराच्या प्रतिबंधाच्या तीन पायर्‍या असतात. पहिल्या पायरीत आरोग्यदायी वातावरणाची निर्मिती आणि आजारापासून संरक्षण हे दोन महत्त्वाचे बिंदू आहेत. या दोन्ही बिंदूंवर सरकार आपल्यापरीने काम करत आहे. परंतु, त्यात संपूर्ण समाजाचा सहभाग असेल तर त्याची परिणामकारता आणखी वाढू शकेल. खासकरुन पालक, शिक्षक, विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, समाजसेवक यांनी जर एकत्रितपणे साथीच्या आजाराच्या प्रतिबंधासाठी काम केले, तर साथीचा आजार प्रभावीपणे आटोक्यात येऊ शकतो.
 
 
 
आरोग्यदायी वातारण निर्मिती
 
या पहिल्या आरोग्यबिंदूमध्ये सार्वजनिक आरोग्य शिक्षणास फार महत्त्व आहे. शिक्षक, डॉक्टर, लेखक, लोकप्रतिनिधी आणि समाजसेवक यांचा या कामासाठी भरपूर उपयोग होऊ शकतो. प्राथमिक वर्गात शिक्षकांकडून दिलेल्या सूचनांमुळे आवडीने पाळतात. रोज अंघोळ करणे, त्वचेची, केसांची व नखांची निगा राखणे, पाणी उकळून पिणे, शिळे अन्न न खाणे, बाहेरचे पदार्थ खाणे सहसा टाळणे, आहारामध्ये दूध, फळे व पालेभाज्या यांचा समावेश असावा, या सूचना शिक्षकांकडून आल्यास मुले आवडीने त्यांचे पालन करतात. नियमित व्यायाम व योगाचे महत्त्व याबद्दल माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी मार्गदर्शन केल्यास ते जास्त प्रभावी ठरते. अनेक शाळांमध्ये सामूहिक सूर्यनमस्कार हा व्यायामप्रकार प्रभावीपणे राबविला जातो. या गोष्टी जरी पाळल्या तरी त्याने आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यास मदत होईल.
भारतात ग्रामपंचायत ते महानगरपालिका या सर्व निवडणुका अटीतटीने लढविल्या जातात. निवडून येणार्‍या लोक प्रतिनिधींची भूमिका आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. स्वच्छ पाण्याचा नियमित पुरवठा, सांडपाण्याचा व्यवस्थित निचरा, घाण, केरकचर्‍याची व्यवस्थित विल्हेवाट, अनधिकृत बांधकामांना प्रतिबंध, कीटकनाशकांची नियमित फवारणी इत्यादी कामे लोक प्रतिनिधींच्या देखरेखीखाली प्रभावीपणे होऊ शकतात. या सर्वांनी आरोग्यदायी वातारणाची निर्मिती होऊ शकते. शासकीय कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांची इच्छाशक्ती चांगली असेल व भ्रष्टाचार अत्यल्प असेल तर आरोग्यदायी वातावरणनिर्मिती आणखी चांगली होऊ शकते.

स्वच्छता अभियान
२०१४ पासून स्वच्छता अभियान राबविण्यास सुरुवात झाली. जनजागृतीसाठी त्याचा चांगला उपयोग झाला. रस्त्यावर कचरा टाकणे व रस्त्यावर थुंकणे कमी झाले. घराभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे व सार्वजनिक आरोग्याचे नियम पाळण्याची मानसिकता सामान्य नागरिकांत दिसू लागली. मुंबई परिसरातील कचर्‍याच्या कुंड्या नाहीशा होऊन त्याभोवती अस्ताव्यस्त असणारा कचरा नाहीसा झाला. असे असले तरी सामान्य नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणार्‍या महानगरपालिकेच्या कचर्‍यामध्ये, तेथील कर्मचारी आजही पानाची पिचकारी मारताना दिसतात. तेथील स्वच्छतागृहे आजही अतिशय गलिच्छ असतात. भ्रष्ट पालिका कर्मचार्‍यांना सार्वजनिक आरोग्याचे नियम उशिरा अंगवळणी पडतात हेच खरे! ‘कोविड १९’शी लढा देताना फक्त लस उपयोगी नाही तर आरोग्यदायी वातावरणदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे.

आजारापासून संरक्षण
लसीकरण : हा आधुनिक वैद्यकशास्त्रातील क्रांतिकारक शोध आहे. लसीकरणाचे जनक एडवर्ड जेन्नर यांनी १७९६ साली ‘देवी’च्या आजाराच्या लसीचा शोध लावला. ही लस एवढी परिणामकारक होती की, त्यामुळे ‘देवी’च्या आजाराचे निर्मूलन झाले. ९ डिसेंबर, १९७९ नंतर जगभरात एकही ‘देवी’चा रुग्ण नोंदवला गेला नाही. आज क्षयरोग, पोलिओ, धर्नुवात, रेबीज, डांग्या खोकला, घटसर्प, गोवर, गालगुंड, रुबेला, कावीळ ए आणि बी, टायफाईड, कॉलरा, मेंदूज्वर, न्यूमोनिया, रोटा व्हायरस, सरव्हायकल कॅन्सर इत्यादी रोगांवर लस उपलब्ध आहेत. यातील बराचशा लसी या वयाच्या एक वर्षाच्या आत दिल्या जातात. असे असले तरी प्रौढांनीही काही लसी घेणे हितावह असते. कोविडची लस घ्यावी की न घ्यावी? ती मोफत मिळणार का? तिचे दुष्परिणाम काय आहेत? नाही घेतली तर काय होईल? काही झाल्यास जबाबदारी कोणाची ? इत्यादी अनेक प्रश्नांवर सोशल मीडियावर चर्चा झडत असते. यामुळे अफवा पसरविणार्‍या लोकांचे फावते. सरकारतर्फेकुठलेही चांगले काम सुरु झाले की त्याला विरोधासाठी विरोध करणारा एक खास कंपू आपल्या देशात तयार झाला आहे. अफवा पसरविणे हा त्यांचा धंदा झाला आहे. ‘कोविड-१९’ संबंधी कुठलाही व्हॉट्सअ‍ॅप मेसेज ‘फॉरवर्ड’ करताना त्याच्या सत्यतेची पडताळणी करणे आवश्यक आहे. चुकीची माहिती देशात पसरविण्यात भागीदार होऊ नका. अनेक महिने ‘लॉकडाऊन’ व ‘कोविड-१९’ आजाराच्या भीतीदायक वातावरणात घालवल्यावर आता लस उपलब्ध झाली आहे. तेव्हा जास्त वाद न घालता ही लस सर्वांनी घ्यावी, असे माझे प्रांजळ वैयक्तिक मत आहे.

मुलांमध्ये ‘कोविड-१९’चे लसीकरण
सुदैवाने ‘कोविड-१९’ चा आजार मुलांमध्ये कमी प्रमाणात आढळला आणि त्यात मृत्युदरदेखील कमी होता. मुलांच्या ‘कोविड-१९’च्या लसीकरणाचा निर्णय आपल्या फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्याने घ्यावा. माझ्या मताप्रमाणे लहान मुलांना ‘कोविड-१९’ ही लस काही महिन्यांनंतर देण्यात यावी. आरोग्य सेवक, वरिष्ठ नागरिक अशा समूहाचे लसीकरण पूर्ण झाल्यावर मुलांच्या लसीकरणाचा विचार केला जावा.
‘लॉकडाऊन’च्या काळात व त्यानंतरही डॉक्टरांच्या कमी उपलब्धीमुळे अनेक मुलांचे नेहमीचे लसीकरण राहून गेले आहे ते त्यांनी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आधी पूर्ण करावे. सरकारी दवाखान्यांमध्ये सध्या ‘त्रिगुणी’ (ट्रिपल) च्या ऐवजी ‘पंचगुणी’ (पेंटावॅक) ही लस दिली जाते. यामुळे धनुर्वात, घटसर्प आणि डांग्या खोकला या आजारांव्यतिरिक्त कावीळ आणि मेंदूज्वर या आजारांपासून संरक्षण मिळते. त्याचबरोबर सरकारी दवाखान्यात इन्जेक्टेबल पोलिओ (पोलिओचे इंजेक्शन) आणि रोटा व्हायरस लसदेखील उपलब्ध आहेत.
सरकारी आरोग्य धोरणातील हे बदल गेल्या काही वर्षांतील आहेत. यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अभिनंदन. नवीन उपलब्ध लसी या महागड्या आहेत. राष्ट्रीय पातळीवर विचार केल्यास हे सरकार प्रतिबंधात्मक उपायावर प्रचंड खर्च करीत आहे. तुमच्या आमच्यासारख्या सामान्य नागरिकांनी या उपलब्धतेचा लाभ घ्यावा व प्राथमिक लसीकरण शक्यतो सरकारी दवाखान्यात करावे. तेथे या लसी मोफत दिल्या जातात. ज्या लसी सरकारी दवाखान्यात उपलब्ध नाहीत, त्या खासगी दवाखान्यातून घ्याव्यात. सरकारी सुविधांचा जास्तीत जास्त उपयोग करण्याकडे जर सामान्य नागरिकांचा कल झाला तर ‘कोविड-१९’ च्या महामारीचा समाजाला झालेला तो सर्वात मोठा फायदा असेल.
‘कोविड-१९’ची लस दिल्यावर इंजेक्शन दिलेल्या जागेवर दुखणे, थोडी सूज येणे, किंचित ताप येणे यासारखी लक्षण दिसू शकतात. त्यासाठी आपल्या डॉक्टरांचा किंवा आपल्याला लस दिली, त्या केंद्राशी संपर्क करा, पण कृपा करुन व्हॉट्सअ‍ॅप किंवा इतर सोशल मीडियावर धाव घेऊ नका. आपण पसरविलेल्या भीतीमुळे इतरांचे ‘कोविड-१९’ लसीकरण विनाकारण थांबू शकते. ‘कोविड-१९’पासून आपण सर्व सुरक्षित तेव्हाच होऊ शकतो जेव्हा संपूर्ण समाजाचे लसीकरण पूर्ण झालेले असेल. एका व्यक्तीचे जरी लसीकरण राहिले तरी आपण सर्व असुरक्षित होऊ शकतो. एक व्यक्ती सार्‍या जगभर साथ पसरवू शकते, हे आपण गेल्या वर्षीच्या ‘कोविड-१९’ महामारीत पाहिले आहे. ‘कोविड-१९’च्या लसीच्या राष्ट्रीय कार्यक्रमास सहकार्य करणे हे प्रत्येक नागरिकांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे.
‘कोविड-१९’च्या महामारीशी लढा देताना जगभरात आठ लाख आरोग्य सेवकांना ‘कोविड-१९’ची बाधा झाली. सात हजार आरोग्य सेवकांनी मानवतेच्या कल्याणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. या सेवकांनी कर्तव्य बजावताना फक्त आपलाच जीव धोक्यात नाही टाकला तर त्यांच्याबरोबर त्यांचे कुटुंबीय, वृद्ध आई-वडील, भावंडे, सहचारी आणि मुलांचे जीवदेखील धोक्यात टाकले. त्यांच्या या कार्यासाठी समाजाने काही वेळा कृतज्ञता दाखविली, त्यांचा सत्कार केला, तर काही वेळा या आरोग्यसेवकांच्या वाट्याला समाजाच्या शिव्या-गाळ्या, मारहाण व प्राणघातक हल्ले आले. अशाही परिस्थितीत त्यांनी आपले काम चालू ठेवले, स्वत:च्या सुरक्षिततेपेक्षा त्यांनी इतरांच्या सुरक्षिततेला जास्त महत्त्व दिले. ह सर्वांच्या बलिदानाचे स्मरण करुन सर्व नागरिकांनी शिस्त पाळून ‘कोविड-१९’चे लसीकरण पार पाडावे ही अपेक्षा.

- डॉ. मिलिंद शेजवळ
९८९२९३२८०३

@@AUTHORINFO_V1@@