कोरोना योद्ध्यांसह फ्रंटलाईन वर्कर्सना दिलासा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2021
Total Views |

narendra modi_1 &nbs




लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार करणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती



नवी दिल्ली: “शनिवार दि.१६ जानेवारीपासून सुरू होणार्‍या कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, सैन्यदले, पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दले, सफाई कर्मचारी, कोरोना व्यवस्थापनात कार्यरत कर्मचारी आदींना प्राधान्य असणार आहे. या तीन कोटी ‘कोरोना योद्धे’ आणि ‘फ्रंटलाईन वर्कर्स’च्या लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार करणार आहे,” अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवार दि.११ जानेवारी रोजी दिली. देशात दि.१६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणास प्रारंभ होत आहे. जगातील सर्वांत मोठ्या लसीकरण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री-नायब राज्यपाल यांच्यासोबत ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे संवाद साधला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहदेखील उपस्थित होते.


लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी हे ‘कोरोना योद्धे’ आणि सैन्यदले, पोलीस, केंद्रीय सुरक्षा दले, होमगार्ड, कोरोना संसर्ग थोपविण्याच्या व्यवस्थेत कार्यरत असलेले आपत्ती व्यवस्थापन आणि अन्य कार्ये करणार्‍या ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ना प्राधान्य दिले जाणार आहे. कारण, गेल्या वर्षभरापासून ही मंडळी आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र जनतेची सेवा करीत आहेत. अशा सुमारे तीन कोटी लोकांच्या लसीकरणाचा खर्च राज्यांना उचलावा लागणार नसून तो खर्च केंद्र सरकार उचलणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.




लसीकरण मोहिमेसाठी तयार करण्यात आलेली ‘कोविन’ ही विशेष प्रणाली अत्यंत महत्त्वाची असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. ते म्हणाले, “ज्यांना लस द्यायची आहे त्यांची निवड आणि त्यांच्यावर लक्ष ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. आधार क्रमांकाच्या मदतीने लाभार्थ्यांची ओळख पटविली जाणार असून सोबतच लसीची दुसरी मात्रा (डोस) त्यांना ठरविलेल्या वेळेत मिळेल, या ‘कोविन’द्वारे निश्चित केले जाणार आहे. लसीची पहिली मात्रा घेतल्यानंतर लाभार्थ्यास तत्काळ एक डिजिटल प्रमाणपत्र दिले जाईल, हे प्रमाणपत्र दुसर्‍या मात्रेची आठवण करून देण्यासाठी उपयोगी पडेल. लसीच्या दोन्ही मात्रा घेऊन झाल्यानंतर अंतिम प्रमाणापत्र लाभार्थ्यास प्रदान केले जाणार आहे.



सर्व राज्यांनी लसीकरणाचा ‘रिअल टाईम डाटा’ या ‘कोविन’ प्रणालीमध्ये भरणे अत्यंत गरजेचे आहे,” असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. लसीकरणाच्या दुसर्‍या टप्प्यामध्ये वय वर्षे ५० च्या पुढील (वृद्ध) आणि ५० वर्षांच्या आतील व्याधी असलेल्यांना लस देण्यात येणार आहे. तोपर्यंत अन्य लसीदेखील प्राप्त होतील. जगातील सर्वांत मोठी लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी गेल्या काही आठवड्यांमध्ये आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झाली आहे. देशातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात लसीकरणाची रंगीत तालीमही पार पडली आहे. लसीकरण कार्यक्रम राबविण्याचा भारताला मोठा अनुभव आहे, त्या अनुभवाचा फायदा कोरोना लसीकरणातही होणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.




अफवा रोखण्याची जबाबदारी राज्यांची
लसीकरण मोहिमेदरम्यान देशातील व देशाबाहेरील काही अनिष्ट तत्त्व त्यामध्ये अडथळा आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अफवा पसरवू शकतील. कदाचित ‘कॉर्पोरेट’ जगतातील स्पर्धाही त्यात अडथळा आणू शकेल. मात्र, अशी प्रत्येक अफवा हाणून पाडण्याची राज्ये व केंद्रशासित प्रदेशांवर आहे. त्यांनी हरतर्‍हेने प्रयत्न करून देशातील नागरिकांपर्यंत योग्य तीच माहिती पोहोचेल, याची काळजी घ्यायची असल्याचेही आवाहन पंतप्रधानांनी केले.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@