नवी दिल्ली : आजपासून पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने कोरोना लसीच्या पुरवठयास सुरुवात केली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधून कोविशिल्ड लसीच्या पहिल्या बॅचचे ट्रक पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास विमानतळाच्या दिशेने रवाना झाले होते. आज सकाळी जवळपास ५.०० वजात सीरम इन्स्टिट्युटद्वारे पुण्यातून रवाना झालेली 'कोव्हिशिल्ड' लशीचे डोस कंटेनरमधून दिल्लीसाठी रवाना करण्यात आले. ही लस घेऊन 'स्पाईस जेट'चे विमान सकाळी १०.०० वाजता दिल्ली विमानतळावर दाखल झाले आहे.
आज पहाटे साडेचारच्या सुमारास सीरम इन्स्टिट्यूटमधून 'कोव्हिशील्ड'चे डोस घेऊन तीन कंटेनर बाहेर पडले. तत्पूर्वी, नारळ फोडून कंटेनरची पूजा करण्यात आली. पुणे परिमंडळ ५ च्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांना हा मान मिळाला. हार, फुले वाहून कंटेनरची पूजा करण्यात आली. पुणे विमानतळाहून दिल्लीसहीत देशातील १३ ठिकाणी या लसीचे कंटेनर पाठवण्यात आले आहेत. आज दुपारपर्यंत लसीचे कंटेनर वेगवेगळ्या शहरांत दाखल होतील. यात अहमदाबाद, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, कर्नाल, हैदराबाद, विजयवाडा, गुवाहाटी, लखनऊ, चंदीगड आणि भुवनेश्वर या शहरांचा समावेश आहे. मुंबईसाठी रस्ते मार्गाने लसीचे डोस पाठविण्यात येणार आहेत.सीरम इन्स्टिट्युटपासून वेगवेगळ्या स्थळ लशी योग्य रितीने पोहचवण्यासाठी 'कूल-एक्स कोल्ड चैन लिमिटेड'च्या ट्रकांचा वापर करण्यात आला आहे.
१६ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या लसीकरण मोहिमेसाठी केंद्राकडून 'सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया'सोबत (SII) ५.६ कोटी लशींचे डोस खरेदी करण्याचा करार करण्यात आला आहे. ११ जानेवारी रोजी 'सीरम'कडून १.१ कोटी लशीचे डोस खरेदी करण्यात आले. एप्रिल २०२१ पर्यंत आणखी ४.५ कोटी डोस खरेदी करण्यात येणार आहेत. या लशीच्या प्रत्येक डोसची किंमत २०० रुपये निर्धारित करण्यात आलीय. केंद्राकडून सीरम आणि 'भारत बायोटेक'ला कोव्हिड १९ च्या लशींचे सहा कोटींहून अधिक डोस खरेदी करण्यात येणार आहेत.