प्रताप सरनाईक यांना ईडीचा मोठा दणका

    10-Jan-2021
Total Views |
sarnaik  _1  H




भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून पोलखोल -
 गुरुवली येथील ७८ एकर जमिनीवर ताबा

 
 
टिटवाळा : शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार प्रताप सरनाईक यांची गुरुवली येथे ७८ एकर जमीन सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) ताब्यात घेतल्याचा खळबळजनक दावा भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी रविवारी, दि. १० जानेवारी रोजी केला.
 
 
बहुचर्चित ‘एनएसईएल’ घोटाळ्याप्रकरणी ईडीने कारवाई करण्यासा सुरुवात केली आहे. त्यामुळेच गुरवली येथील प्रताप सरनाईक यांच्या नावाचा सातबारा असलेली ७४.२७ एकर जमिनीवर ईडीने कारवाई करत ताबा घेतल्याचे त्यांनी रविवारी प्रसारमाध्यमांना सांगितले. मंडल अधिकारी यांनी जागेवर जाऊन नोटीस लावल्याचा दावाही त्यांनी केला असून सोमय्या यांनी रविवारी स्वतः या जागेवर जाऊन पाहणी केली.
 
 
यावेळी ते म्हणाले की, “आमदार प्रताप सरनाईक व मोहीत अग्रवाल यांनी एन एस ई एल, कंपनी साठी दोनशे कोटी रुपये कर्ज घेतले होते. त्यातील १०० कोटी रुपये कल्याण तालुक्यातील गुरुवली येथील ७८ एकर जागा खरेदीत गुंतवले, याबाबत कंपनीच्या नावाने कोटी रुपये फसवणूक केली आल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर याबाबत मी तक्रार दाखल केली होती.
 
 
ईडीने या संपूर्ण प्रकाराची चौकशी केली व अखेर १०० कोटी रुपये भरण्यासाठी सांगितले होते. ते न भरल्याने गुरुवली येथील ७८ एकर जमीन ताब्यात घेत त्याबाबत नोटीस लावली आहे. तर यावेळी ठाकरे सरकारचे एकामागून एक घोटाळे बाहेर पडत असल्याने घाबरलेल्या ठाकरे सरकारने विरोधकांवर दबाव आणण्यासाठी विरोधकांची सुरक्षा काढून घेतली,” असा आरोप सोमय्या यांनी केला.
 
 
ते म्हणाले, “यापूर्वी देखील त्यांच्या विरोधात आवाज उठवणार्‍या पत्रकारांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना कारागृहामध्ये टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र भाजपचा कोणताही कार्यकर्ता ठाकरे सरकारला भीत नाही.आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उजवा हात समजला जाणार्‍या प्रताप सरनाईक यांचा तिसरा घोटाळा समोर आला आहे. त्यांची ७८.२७ एकरची जमीन ईडीने जप्त केली आहे.
 
 
सरनाईक यांनी जवळपास २५० कोटी रूपयांची अफरातफर केली आहे. त्याची चौकशी करण्यासाठी मी ईडीकडे तक्रार केली होती. त्यानुसार ईडीने कारवाई करत ही गुरवली येथील जमीन ताब्यात घेतली आहे. आज ईडीच्या परवानगीने मी आज येथे आलो आहे” असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी सोमय्या यांच्यासोबत माजी आमदार नरेंद्र पवार, भाजपचे ठाणे जिल्हा ग्रामीण संपर्क प्रमुख राजाभाऊ पातकर, मोहना टिटवाळा मंडळाचे अध्यक्ष शक्तिवान भोईर, आदि उपस्थित होते. महापालिका निवडणुकीत ठाकरे सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.
 
 
 
टिटवाळा येथील भेटीसाठी मुंबईहून निघत असताना सोमय्या यांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. टिटवाळा येथे त्यांची गाडी खोळंबून राहिल्याने अखेर स्वत: सोमय्या गाडीतून उतरत त्यांनी वाहतूक कोंडी दूर केली. ठाकरे सरकार रस्ता रुंदीकरणाचे नाटक करीत असून या सरकारच्या राज्यात राज्याच्या प्रगतीची गती ही थांबली आहे, तेव्हा सुजाण नागरिक येणार्‍या महापालिका निवडणुकीत या नौटंकी ठाकरे सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही,” असेही ते यावेळी सांगायला विसरले नाही.