गडकिल्ल्यांचा सायकलस्वार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jan-2021
Total Views |
Sushant _1  H x




सुशांत करंदीकर यांनी सायकल घेऊन महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांचा माथा गाठत नववर्षाच्या स्वागताचा एक वेगळा पायंडा पाडला आहे. सुशांत यांच्या या ‘सह्याद्री सायकल मोहिमे’विषयी जाणून घेऊया.
 
 
सुशांत करंदीकर या अवलियाने ‘सह्याद्री सायकल मोहिमे’अंतर्गत गेल्या २० वर्षांत महाराष्ट्रातील तब्बल १०० अवघड किल्ले सर केले आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण पार्ट्यांचे आयोजन करतात. मात्र, सुशांत यांनी सायकल घेऊन महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांचा माथा गाठत नववर्षाच्या स्वागताचा एक वेगळा पायंडा पाडला आहे. सुशांत यांच्या या ‘सह्याद्री सायकल मोहिमे’विषयी जाणून घेऊया.
 
 
 
सुशांत हे कल्याणमधील टिळक चौकात राहतात. त्यांचे शालेय शिक्षण सुभेदारवाडा शाळेत झाले. भिवंडी येथील महाविद्यालयात बीएमएमपर्यंतचे शिक्षण त्यांनी घेतले. त्यांना लहानपणापासून शेती आणि निसर्गाची आवड होती. शाळेत असतानाही ते भविष्यात शेती करणार, असे सांगत. ते निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याची संधी शोधत होते. त्यातूनच त्यांच्या ट्रेकिंगला सुरूवात झाली. निसर्गाच्या सान्निध्यात राहता येऊ लागले. सायकल आधीपासूनच चालवता येत होती. ट्रेकिंगमधून त्यांना आपला छंद जोपासण्याची संधी मिळाली होती.
 
 
‘निसर्ग गिरीभ्रमण’ संस्थेच्या माध्यमातून त्यांनी १८ वर्षे समितीवर काम केले. किल्ल्यांची साफसफाई करणे, हे काम ते आवडीने करू लागले होते. संस्थेतील ३० ते ३५ जण किल्ल्यांवर जाऊन दर महिन्याच्या पहिल्या रविवारी किल्ल्याची साफसफाई करीत होते. किल्ल्याच्या साफसफाईचे काम त्यांनी तब्बल आठ ते दहा वर्षे केले. त्यानंतर दक्षिण भारत आणि त्यानंतर संपूर्ण भारत भ्रमण केले. वैयक्तिक पातळीवर मुंबई-पुणे सायकल स्पर्धेतकामशेतला तिसर्‍या क्रमांकाचे पारितोषिक मिळविले.
 
 
सुशांत यांच्या मनात किल्ल्यावर सायकल चालवली तर किती मज्जा येईल, असा विचार आला. त्यांनी १९९३ साली किल्ल्यांवर सायकल चालविण्याचा निर्धार पक्कादेखील केला. त्यांच्या या विचारानंतर सगळ्यांनी त्यांना वेड्यात काढले. १९९३ साली त्यांनी हरिश्चंद्र गडावर पहिल्यांदा सायकल नेली. करंदीकर यांनी किल्ल्यावर सायकल नेली हे पाहून त्यांच्या मित्रांनाही हा मोह आवरेनासा झाला. मित्रांच्या पालकांनी सुशांत सोबत असेल तरच जाण्याची परवानगी मिळेल, असे सांगितले.
 
 
२००१ साली त्यांनी पुन्हा मित्रांसोबत हरिश्चंद्रगड सायकल घेऊन सर केला. परदेशात ‘माऊंटन बायकिंग’ केले जाते. ही गोष्ट सुशांत ऐकून होते. सुशांत यांनी पहिल्यांदा सायकल नेली, त्यावेळी केवळ आवड म्हणून किल्ल्यांवर सायकल नेली. त्यावेळी परदेशात हा ‘इव्हेंट’ होत असे, याबद्दल फारशी माहिती नव्हती. यंदाच्या वर्षी नववर्षाचे स्वागत त्यांनी स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्‍या रायगडसह घोसाळगड, तळागड, मानगडावर केले. विशेष म्हणजे सह्याद्री सायकल मोहिमेतील हा शंभरावा किल्ला होता. यामध्ये सुशांत यांच्यासह कृष्णा नाईक, दीपाली कंपाली, दिवाकर भाटवडेकर, वरद मराठे, चिन्मयी ढवळे, मन नाईक, दैविक कंपाली यांनीदेखील सहभाग घेतला होता. या सर्वांनी तब्बल २९० किलोमीटर सायकल प्रवास करत ही चार गडकिल्ल्यांची मोहीम पूर्ण केली आहे.
 
 
गेल्या २० वर्षांत सुशांत यांच्या सोबतचे सहकारी वेगवेगळे असले तरी ते मात्र नियमाने नववर्षाचे स्वागत किल्ल्यांवर सायकलस्वारीने करीत असतात. सुशांत यांनी आतापर्यंत राजगड, पन्हाळगड, विशाळगड, कळसुबाई, नाणेघाट, लोहगड, विसापूर, तिकोना अशा अनेक किल्ल्यांवर सायकल चढाई केली आहे. त्यात सागरी किल्ल्यांचाही समावेश आहे. आतापर्यंत ४० सदस्य सुशांत यांच्यासोबत या मोहिमेत सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे त्यात पाच महिलांचा सहभाग होता. दरीत कोणी पडले तर त्यांचा जीव वाचविणे, अशी कामेही सुशांत करीत असतात. मानसिक संतुलन कायम राखणे, मानसिक संतुलन ढळू न देणे, मानसिक संतुलन विकसित कसे करावे, ‘फिल्डवर्क’ काय आहे, या गोष्टी अशा मोहिमेतून शिकायला मिळतात.
 
 
दरम्यान, सायकलला तांत्रिक समस्या येतात. दुष्काळी भागात गेल्यावर कधी कधी जेवायलाही मिळत नाही, अशा समस्यांना मोहिमेत तोंड द्यावे लागले आहे. निसर्गापेक्षा आपण मोठे नाही. एखाद्या ठिकाणी जाणे आपल्याला शक्य नाही, हे लक्षात आल्यावर माणसाने त्याठिकाणाहून मागे फिरले पाहिजे. आपण त्या समस्यांवर विचार करून मात करू शकतो. ‘सेल्फी’ काढण्याच्या नादात अनेकजण दरीच्या टोकावर जातात. अशावेळी लोकांनी भान ठेवले पाहिजे. ‘गुगल’वर रस्ता दिसतो, पण लोकांशी संवाद साधल्यावर नवीन माणसालाही वाट चालणे शक्य आहे की नाही ते समजते. त्यामुळे गावातील लोकांशी संवाद जास्तीत जास्त साधला पाहिजे. नागरिकांनी काळजी घेतली तर ट्रेकिंग कठीण नाही.
 
 
पश्चिम भारत ते पूर्व भारत चार हजार किलोमीटरचे अंतर सायकलने पार करण्याचा त्यांचा मानस आहे. ते पुढच्या जानेवारीत करणार, असे ते सांगतात. करियर म्हणून हे क्षेत्र सोपे नाही. या क्षेत्राला काही मर्यादा आहेत. त्यामुळे अनुभव असणे गरजेचे आहे. सामाजिक क्षेत्रातही याचा फायदा होतो. आता आम्हाला एखाद्या मजल्यावर मांजर अडकले असल्यासही फोन येतात. मुलांनी करियर कोणतेही निवडले तरी त्यांच्याकडे आत्मविश्वास असणे गरजेचे आहे. आयुष्य जगण्यासाठी आत्मविश्वास महत्त्वाचा आहे, असे ते म्हणाले. विदेशाप्रमाणे आपल्याकडेही ‘माऊंटन बायकिंग’चा प्रचार आणि प्रसार व्हावा, यासाठी आपण हा खटाटोप करीत असल्याचे सुशांत यांनी सांगितले.


- जान्हवी मोर्ये
@@AUTHORINFO_V1@@