अपेक्षा करणारा बापडा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jan-2021   
Total Views |

1111 _1  H x W:

 


जिलबीना फाफडा उद्धव ठाकरे आपडा वा ! वा ! काय यमक जुळले आहे. ‘फाफडा’ आणि ‘आपडा.’ पण सोशल मीडियावर काही नतद्रष्ट लोक फाफडा, आपडा, वाकडा, आपटा असे काही बाही बरळत आहेत. त्यांना काय माहिती की, हे काही नवे नाही. बरं, नवे जरी नसले तरी या जिलेबी फाफड्याची गरज आहे. मागे असेच ‘मी मुंबईकर’ नावाचं काहीतरी काढलं होतं. त्यात म्हणे मुंबईतल्या उत्तर भारतीयांना आपलेसे करायचे होते. पण खासगीत! नव्हे नव्हे सार्वजनिक ठिकाणी! त्यांचा उद्धार ‘भैय्ये’ म्हणूनच करताना हेच पहिले पुढे. तर असो. आता मोर्चा वळवलाय तो जिलेबी आणि फाफड्याकडे. पण लोक म्हणतात की, तुम्हाला तर आता शिरखुर्मा आणि बिर्याणी आवडायला लागली आहे. बरं, एकवेळ शिरखुर्मा-बिर्याणी जाऊ द्या. पण पास्ता पण आवडायला लागला ना! इटलीचा ‘फेमस’ खाद्यपदार्थ. दिल्लीचे राजकुमार तर आज्जीच्या घरी हेच खात असतील. त्या पास्त्याचेही नाव घेतले नाही. आता जिलेबी आणि फाफडा? मागे वडापावची चलती केलेली. त्यामुळे इतर राज्यातील लोकांना वाटते की, महाराष्ट्रीय त्यातही मुंबई-पुण्याचे लोक वडापावशिवाय काही खातच नाहीत, तर इतका वडापाव ‘फेमस’ झाला. आता त्याला बाजूला सारत एकदम जिलेबी-फाफडा. बिचारा वडापाव बापडा. आता काही दिवसांनी ‘इडली-डोसा वडक्कम आम्हीच फक्त भक्कम’ असे काही ऐकायला नाही मिळाले म्हणजे झाले. पण काही लोक म्हणतात की, कृपया फाफडा आणि जिलेबीच्या पुढे ‘शिव’ लावू नका. अशी अपेक्षा करणार्‍या लोकांना वडापावच्या पुढेही ‘शिव’ लावलेले आवडत नाही. काहीही असो पण खवय्ये मात्र खुश आहेत. कारण, आता जिलेबी-फाफड्याच्या टपर्‍याही रस्तोरस्ती लागण्याची शक्यता आहे. पण मुद्दा हा आहे की, जिलेबी आणि फाफडा वगैरेंची नावं घेऊन खरेच गुजराती बांधव कुणाचे पाईक होणार आइेत का? असे काहीबाही बोलून लोकांना भुलवायचे दिवस गेले. आपण सारे भारतीय आहोत. ‘हा मराठी’, ‘हा गुजराती’ वगैरे भेद कशासाठी? अर्थात सत्तेच्या अंध राजकारणात आकंठ बुडालेल्यांना याच्याशी काय देणे घेणे? तूर्त या त्यांच्याकडून स्वार्थरहित भूमिकेची अपेक्षा करणारा बापडा!

पाखरे हरवली!

 
भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या ‘न्यूबॉर्न केअर युनिट’ला आग लागली. शॉर्टसर्किट झाले आणि एक ते तीन महिने वयाची कोवळी निष्पाप बालके आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. कोवळा जीव नुकतेच जगात आलेले. आग म्हणजे काय त्याबद्दल माहिती नाही. एखाद्या सैतानाला अलगद सावज सापडावे, तशी ही बालके आगीच्या आगडोंबात सापडली, होरपळली आणि त्यातच त्यांचा अंत झाला. त्यांना झालेल्या मरणयातनांचा विचारही करवत नाही. काय चूक होती त्यांची? लाखो स्वप्नं घेऊन जन्माला आलेली निष्पाप बाळं वारली. फुलण्याआधी कळ्या कोमेजल्या. त्यांची काय चूक? ही आग लागलीच कशी? शॉर्टसर्किट झालेच कसे? त्यावेळी कोण कोण इस्पितळात कामाला होते याबाबत आता वाद-चर्चा रंगतील. पण त्या बालकांच्या जाण्याने ज्या मातापित्यांच्या आयुष्याचा ‘कॅनव्हस’ रंगहिन झाला. त्या माता-पित्यांना कोण आणि कसे धीर देणार? आपले जवळचे कोणी भयंकर वेदनेच्या कल्लोळात अपघाताने मृत्युमुखी पडले, तर ते विसरणे केवळ अशक्यप्राय असते. बालके ज्या विभागात होती तिथे म्हणे या बालकांवर उपचार होत होते. अर्थात, आपल्या बाळाने बरे व्हावे म्हणूनच पालकांनी बालकांना या इस्पितळात भरती केले असेल. पण बाळ बरे होऊन नव्हे तर मृत होऊन बाहेर आले. हा धक्का असहनीय आहे. याचा दोष कुणाला द्यावा? ‘अ‍ॅडजेस्ट’ करू म्हणत आपल्या जबाबदार्‍या टाळणार्‍या संबंधित यंत्रणेचा की सरकारने दिलेल्या सोयीसुविधांचे ‘ऑडिट’ न करणार्‍या जनतेचा. आता राज्य महाविकास आघाडीचे आहे. सत्ता सांभाळण्यासाठी या आघाडीने जेवढा द्राविडी-प्राणायाम चालवला आहे, तेवढाच जर जनतेचा जीव वाचवण्यासाठी केला असता तर... पण बोलून तरी काय फायदा. ते कोवळे जीव परत येणार नाहीत आणि महाविकास आघाडी सरकारही सत्ताबचाव कोषातून बाहेर येणार नाही. चालू दे, त्यांचा एक कलमी कार्यक्रम. या बालकांच्या मृत्यूबाबत सोशल मीडियावर मेसेज होता की ‘हरवली पाखरे.’ पण ही पाखरे हरवली नाहीत तर यांचा संबंधित यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे खून झाला आहे. सत्ता येईल-जाईल पण सत्तेवर असताना घडणार्‍या या घटनांना जबाबदार कोण?



@@AUTHORINFO_V1@@