रोमियो स्पाईज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jan-2021
Total Views |
news  _1  H x W
 
 
 
सामान्यपणे हेरगिरी करताना आपल्या शत्रुराष्ट्राची गुपिते चोरणे किंवा शत्रुराष्ट्रात जाऊन एखादी छुपी कामगिरी पार पडणे, अशी कामे करावी लागतात. पण, आपल्याच देशातल्या दुसर्‍या गटाबाबतीत असं करावं लागलं तर?
 
 
दुसर्‍या महायुद्धानंतर जर्मनीचे दोन तुकडे केले गेले. ‘जर्मनी डेमोक्रॅटिक रिपब्लिक’ म्हणजे पूर्व जर्मनीमध्ये रशियाच्या साहाय्याने मार्क्सवादी-समाजवादी सरकार स्थापन झाले, तर ‘फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी’ किंवा पश्चिम जर्मनीमध्ये संसदीय लोकशाही असणारे भांडवलशाही सरकार अस्तित्वात आले. साहजिकच, दोन पूर्ण विरोधी विचारसरणीची सरकारे एकमेकाला लागून राज्यकारभार करू लागली म्हटल्यावर अंतर्गत तीव्र स्पर्धा आणि अविश्वास असणे अपरिहार्य होते.
 
 
१९५२ मध्ये मार्क्स वोल्फ नावाचा एक हुशार ऑफिसर पूर्व जर्मनीच्या Ministry for State Security
(MinisteriumfrStaatssicherheit) किंवा ‘स्टासी’ (stassi) म्हणून प्रसिद्ध असणार्‍या खात्याच्या ‘फॉरेन इंटेलिजन्स डिव्हिजन’मध्ये दाखल झाला आणि त्याने पश्चिम जर्मनीत घुसून माहिती मिळविण्याचा एक नवा मार्ग शोधून काढला.
 
 
 
दुसर्‍या महायुद्धाच्या अखेरीस, जर्मनीतली कित्येक तरुण आणि अगदी किशोरवयीन मुलेदेखील मोठ्या प्रमाणावर मारली गेली. कित्येक जण बेपत्ता किंवा युद्धकैदी झाले. यामुळे अगदी तरुण वयात तिथल्या कित्येक स्त्रिया एकाकी झाल्या होत्या. घर चालविण्यासाठी घराबाहेर पडून काम करणे त्यांच्यासाठी अत्यावश्यक झाले होते, तसेच तरुण पुरुषांअभावी, सरकारी कार्यालयांमधली कित्येक महत्त्वाची पदे स्त्रियांना सांभाळावी लागत होती.
 
 
 
 
मार्क्स वोल्फने ही गोष्ट हेरली आणि त्याने ‘स्टासी’च्या अंतर्गतच एक छोटा विभाग सुरू केला आणि अतिशय देखण्या, रुबाबदार, तडफदार, चाणाक्ष तरुणांची भरती करणे सुरू केले. जर्मनीतल्या सरकारी, व्यापारी किंवा आर्थिक क्षेत्रांत महत्त्वाच्या पदांवर असणार्‍या स्त्रियांना हेरून त्यांना आवश्यक मदत करत, त्यांचा एकाकीपणा दूर करण्याच्या आमिषाने त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याकरवी माहिती मिळवत राहाणे, अशा स्वरूपाचे त्यांचे काम असे. आपल्या 'Without Face' या पुस्तकात त्याने म्हटलं आहे की, अशा सुमारे चार हजार हेरांचे जाळे निर्माण केले होते. हेच हेर ‘रोमियो स्पाईज’ म्हणून प्रसिद्ध आहेत.
 
 
 
‘रोमियो स्पाय’ म्हणून भरती होण्यासाठी अत्यंत कठीण अशा चाचण्या पार कराव्या लागत असत. देखणं आणि रुबाबदार व्यक्तिमत्त्व हा तर महत्त्वाचा भाग होताच, त्याशिवाय अतिशय चतुरपणा, जुने शिष्टाचार आणि रीती-भाती यांची उत्तम माहिती आणि सवय, हेर होण्यासाठी अंगी असावी लागणारी अन्य लक्षणे या सगळ्या कसोट्यांवर उतरणार्‍या 25 ते 35 वर्षे या वयोगटातल्या तरुणांची निवड केली जाई आणि त्याला आवश्यक ते प्रशिक्षण देऊन, त्याची खोटी ओळख निर्माण करून त्याला विशिष्ट कामगिरीवर पाठवले जाई. त्यानंतर दिलेलं काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने योग्य माहिती देऊ शकेल, अशी स्त्री-जिच्यासाठी ‘ज्युलिएट’ अशी संज्ञा वापरली जाई. शोधून तिला आपल्या जाळ्यात फसवून माहिती मिळवणे, असे या कामाचे साधारण स्वरूप असे.
 
 
गेर्हार्ड बाईअर
 
 
गेर्हार्ड हा असाच एक रोमियो आपल्या कामगिरीसाठी पश्चिम जर्मनीमध्ये (BSD) आला आणि जवळजवळ 20 वर्षे तो पश्चिम जर्मनीत राहून तिथला ‘इंटेलिजन्स ऑफिसर’ असल्याची बतावणी करत होता. मात्र, त्याच्या भावनिक आणि तात्त्विक निष्ठा पूर्व जर्मनीशी होत्या. त्याला सगळ्यात जास्त माहिती एका आर्मी ऑफिसरच्या मुलीमार्फत मिळाली. तिला भेटण्यासाठी योजलेल्या उपायांपैकी नोकरीची खोटी जाहिरात देण्याची युक्ती सफल झाली.
 
 
 
पेपरमधली नोकरीची जाहिरात बघून ती तिथे आल्यावर अर्थातच तिची आणि तिच्या आर्मी पार्श्वभूमीची खात्री करून घेतली गेली. वारंवार भेटून गेर्हार्ड अखेर तिला आपल्या प्रेमात पाडण्यात यशस्वी झाला. त्यानंतर आपली ‘पश्चिम जर्मनीचा ऑफिसर’ अशीच ओळख तिला देत आणि देशप्रेमाचा दाखला देत, ब्रुसेल्समध्ये एका युरोपियन कम्युनिटीमध्ये नोकरी स्वीकारण्यास सांगितले. तिनेही ते मान्य करून तिथे टायपिस्टची नोकरी स्वीकारली. तिथे काम करत असताना तिला अनेक महत्त्वाची कागदपत्रे हाताळता आली, त्यावर नजर ठेवता आली.
 
 
 
तिथल्या कित्येक कागदपत्रांचे फोटो किंवा झेरॉक्स काढून तिने आपल्या प्रियकराला म्हणजेच गेर्हार्डला दिल्या, त्यायोगे अतिशय महत्त्वाच्या अशा कित्येक गोष्टी समजू शकल्या. पुढे गेर्हार्डने खरोखर आपल्या सर्वात उपयोगी अशा ‘सोर्स’शी लग्न करायचे ठरवले आणि ते शेवटपर्यंत एकत्र राहिले. जरी त्याच्या ‘सोर्स’ने त्याला माफ केले, तरी गेर्हार्डला त्याच्या हेरगिरीसाठी दोन वर्षांची शिक्षा भोगावी लागली. ती भोगून सुटून आल्यावर त्याने कॉम्प्युटर सिक्युरिटी कंपनी सुरू केली. आपल्या आयुष्यातल्या ‘पर्वाबद्दल’ गेर्हार्डने कधीही अपराधी वाटून घेतले नाही. जर्मनीच्या इतिहासातील त्या काळाची ती गरज होती, असे त्याचे स्पष्ट म्हणणे होते. गेर्हार्ड आणि त्याची प्रेयसी नंतर आयुष्यभर एकत्र राहिले. पण, सगळ्याच जणी इतक्या सुदैवी ठरल्या नव्हत्या...
 
 

गॅब्रिएलाक्लीम - फ्रँक दिएत्झल
 
बॉनमधली एक उन्हाळी संध्याकाळ होती. ती तिच्या एका मित्राची वाट बघत र्‍हाईन नदीच्या काठावर बसलेली होती. अचानक एक अतिशय रुबाबदार, देखणा आणि आकर्षक पुरुष तिने पाहिला.. असा जोडीदार मला आयुष्यभरासाठी मिळाला तर? एकटेपणाला कंटाळलेली ती विचार करत असतानाच, तो तिच्याच दिशेने येत असलेला तिने पाहिला आणि तिची धडधड वाढली.
 
 
 
‘त्याने तिच्याजवळ येऊन तिला म्हटले, “तू ज्याची वाट पाहत आहेस, तो आजारी असल्यामुळे तुला भेटायला येऊ शकणार नाही, म्हणूनच त्याने मला पाठवले आहे, तर त्याच्याऐवजी माझ्याबरोबर जेवायला तुला आवडेल का?” अशी सुरू झाली गॅब्रिएला आणि फ्रँक दिएत्झलची ‘प्रेमकहाणी’! नंतर गॅब्रिएला त्याविषयी बोलताना म्हणाली होती की, “त्याक्षणी तिथून खूप खूप लांब पळून जावं, अशी विचित्र भावना माझ्या मनात निर्माण झाली. पण, मी त्याच्याबरोबर गेले...”
 
 
 
३२ वर्षांची गॅब्रिएला त्यावेळी अमेरिकन दूतावासात भाषांतरकार आणि दुभाषी म्हणून काम करत होती. कित्येक महत्त्वाची कागदपत्रे हाताळण्याची संधी तिला सहज मिळत असणार होती. ही गोष्ट लक्षात घेऊन एकाकी असणार्‍या गॅब्रिएलाला प्रेमात पाडून माहिती मिळविण्यासाठी दिएत्झलला पाठवले गेले. “आपण एका जागतिक संशोधन केंद्रामध्ये भौतिक शास्त्रज्ञ म्हणून, जागतिक शांततेसाठी काम करतो,” असे त्याने तिला सांगितले. बाकी कोणतीही स्पष्ट माहिती न देऊनसुद्धा तिने त्याच्यावर विश्वास ठेवला. वरच्या पहिल्या भेटीनंतर पुढल्या तीनच महिन्यांत त्यांनी वाङ्निश्चय केला. त्यानंतर ते जवळजवळ सात वर्षे ‘रिलेशनशिप’मध्ये होते.
 
 
 
या कालावधीमध्ये तिची आणि दिएत्झलची भेट केवळ महिन्यातून एकदाच होत असे. यादरम्यान, अमेरिकन दूतावासात डिफेन्स को-ऑपरेशनचे महत्त्वाचे कागद बघून त्यांची झेरॉक्स किंवा फोटो काढून घेत असे आणि जवळजवळ प्रत्येक भेटीत ती त्याला ते फोटो किंवा झेरॉक्स देत असे. वास्तविक, ‘स्टासी’ हेरांपासून सावध राहा, अशा सूचना वारंवार सर्व स्त्री-कर्मचार्‍यांना सतत दिल्या जात होत्या. पण, गॅब्रिएलाने त्याकडे लक्ष दिले नाही. इतकेच नव्हे, तर दिएत्झल आपण दिलेल्या फोटो आणि झेरॉक्सचं काय करतो, हे विचारण्याची तसदीही तिने घेतली नाही.
 
 
 
तिला सतत त्याला गमावण्याची भीती वाटत राहिली आणि त्यापायी कोणताही उलट प्रश्न किंवा चौकशी करायला ती घाबरत राहिली. त्यांनी एकत्र घालवलेल्या क्षणांसाठीच ती सतत जगत राहिली, अशी सात वर्षे लग्नासाठी वाट पाहात घालवल्यावर ती कंटाळली आणि तिने दिएत्झलशी असलेले आपले संबंध संपवून १९८४ मध्ये अन्य कोणाशीतरी लग्न केले आणि १९९१ मध्ये तिला हेरगिरीचा आरोप ठेवून अटक केली गेली आणि तिच्यावर खटला चालवला गेला. त्यावेळी दिएत्झल पूर्व जर्मनीचा हेर असल्याचे तिला कळले. तिच्याकडून मिळालेली सर्व कागदपत्रे इतकेच नव्हे, तर तिने त्याला लिहिलेली प्रेमपत्रेदेखील दिएत्झलने आपल्या ऑफिसला दिल्याचे तिला कळले आणि तिला प्रचंड धक्का बसला.
 
 
 
“मी, पूर्व जर्मनी आणि रशियाचा आत्यंतिक तिरस्कार करत असे आणि दिएत्झलला ते माहीत होते. कदाचित, त्यांच्यासाठी मी माहिती मिळवण्याचं फक्त एक यंत्र होते, माझ्या भावना, प्रेम यांची त्यांच्यालेखी काहीही किंमत नव्हती. एखाद्या खेळण्याप्रमाणे मला फक्त खेळवलं आणि वापरलं गेलं,” अशा शब्दांत तिने तिच्या भावना व्यक्त केल्या. या गोष्टीसाठी तिला दोषी ठरवून निलंबित केले गेले आणि दंड सुनावला गेला आणि त्याच कृत्यासाठी दिएत्झलला मात्र पूर्व जर्मनीत पदक देऊन गौरवले गेले होते! नंतरचे सगळे आयुष्य तिने नेदरलँड्समध्ये भटक्या कुत्र्यांची काळजी घेत, विविध कलाकुसरीच्या वस्तू करत घालवले.
 
 
 
पश्चिम जर्मनीतल्या अशा एकूण ४० स्त्रियांना त्या काळी हेरगिरीचा आरोप ठेवून अटक केली गेली. ‘रोमियो स्पाईज’ची संकल्पना अपेक्षेपेक्षा अधिक यशस्वी ठरली. अतिशय बारकाईने अभ्यास करून, एक-एक योजना आखणारे आणि अतिशय पक्का गृहपाठ करून यात उतरणारे ‘रोमियो स्पाईज’ अचानक पकडले जाऊ लागले. योजना आखण्यात कोणतीही चूक नसताना, कोणतीही फितुरी न होताही असं घडलं, याचं कारण अतिशय शुल्लक होतं- केस!
 
 
 
पूर्व जर्मनीतले तरुण बारीक हेअरकट करत असत, याउलट पश्चिम जर्मनीतले तरुण लांब केस वाढवत असत. या एका शुल्लक कारणामुळे पूर्व जर्मनीतून आलेले तरुण ओळखून त्यांच्यावर नजर ठेवणे सोपे जाऊ लागले. एकंदरीत, जर्मनीच्या इतिहासातल्या एका अतिशय तल्लख, अपूर्व आणि चतुर योजनेचा गळा शेवटी ‘केसां’नी कापला!


 
- मैत्रेयी जोशी
@@AUTHORINFO_V1@@