राम मंदिर जगाची सांस्कृतिक राजधानी बनेल!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jan-2021
Total Views |

ayodhya rammandir_1 


- रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांचे प्रतिपादन

- निधी संकलनास मकरसंक्रांतीपासून प्रारंभ; ११ कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प


पुणे :
“श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्यावतीने अयोध्येत उभारणी होत असलेल्या भव्य श्रीराम मंदिराचे कार्य आता गतिमान झाले आहे. या मंदिराच्या माध्यमातून संपूर्ण भारत देश व त्यानंतर जवळपासचे आशियाई देश, त्यानंतर संपूर्ण जगातील रामभक्तांच्या संपर्क, समन्वय, सहयोग आणि समरसतेचे एक केंद्र उभे राहील. त्यामुळे अयोध्येतील राम मंदिर ही जगाची सांस्कृतिक राजधानी बनेल,” असे प्रतिपादन रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी केले.
पुणे येथील भावे हायस्कूलच्या प्राचार्य प्र. ल. गावडे सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिराकरिता निधी संकलनासाठी येत्या मकर संक्रांतीपासून माघ पौर्णिमेपर्यंत म्हणजेच, दि. १५ जानेवारी ते २७ फेब्रुवारी, २०२१ पर्यंत ‘निधी समर्पण अभियान’ राबवण्यात येणार असून या माध्यमातून देशातील सुमारे चार लाख गावे व ११ कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प करण्यात आला असल्याची माहिती गोविंददेवगिरी यांनी दिली. सदर पत्रकार परिषदेस विश्व हिंदू परिषदेचे मुंबई क्षेत्र मंत्री शंकर गायकर, रा. स्व. संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, प्रांत अभियान प्रमुख संजय मुदराळे, प्रांत अभियान सहप्रमुख मिलिंद देशपांडे, पुणे महानगर अभियान सहप्रमुख महेश पोहनेरकर आदी उपस्थित होते.


गोविंददेवगिरी म्हणाले की, “सुमारे पाच शतके चाललेला रामभक्तांचा संघर्ष यशस्वी होऊन दि. ९ नोव्हेंबर, २०१९ रोजी सर्वोच्चन्यायालयाच्या निर्णयानुसार केंद्र सरकारने श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची स्थापना केली व पुढे दि. ५ ऑगस्ट, २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीरामजन्मभूमीच्या जागी भूमिपूजन व शिलापूजन करून मंदिरउभारणी कार्याचा श्रीगणेशा केला. एकूण तीन ते साडेतीन वर्षांत हे कार्य पूर्ण होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, मंदिर बांधकामाच्या अनुषंगानेच अयोध्या नगरीचे विकास कार्यदेखील सुरू झाले असल्याचे त्यांनी संगितले. या महान कार्यासाठी देशातील सामन्यातील सामान्य अशा प्रत्येक व्यक्तीला आपले योगदान देता यावे, यासाठी निधी संकलन अभियान राबवण्यात येणार आहे. या माध्यमातून देशातील चार लाख गावे आणि 11 कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प करण्यात आला आहे. पावती पुस्तके तसेच एक हजार, शंभर व दहा रुपयांच्या माध्यमांतून हे अभियान राबवण्यात येईल,” अशी माहिती गोविंददेवगिरी यांनी दिली. लाखो हुतात्म्यांनी या धर्मकार्यात बलिदान दिले. त्यांच्या महान त्यागाचे श्रद्धापूर्वक स्मरण करून आपण सर्वांनी अधिकाधिक अर्थदानाचे पवित्र कर्तव्य पार पाडावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


हे तर अजेय राष्ट्र मंदिराच्या उभारणीचे कार्य !


स्वामी गोविंददेवगिरी यावेळी म्हणाले की, “प्रत्येक जाती, संप्रदाय, मत, पंथ, क्षेत्र, भाषा, प्रदेशातील भाविकांशी या अभियानातून संपर्क होईल. अरुणाचल, नागालँडपासून ते अंदमान-निकोबार, कच्छ रण, देशातील पर्वतीय क्षेत्र व वनांचलातील व्यक्तींपर्यंत यातून संपर्क होईल. काश्मीर ते कन्याकुमारी आणि सोमनाथ ते अरुणाचलपर्यंत सर्व प्रकारच्या सेतुबंधंनांनी राम मंदिर उभे राहील. हे केवळ मंदिर निर्माणाचे कार्य नसून अजेय राष्ट्र मंदिराच्या उभारणीचे कार्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


महाराष्ट्रात २.५ कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट


विश्व हिंदू परिषदेचे मुंबई क्षेत्र महामंत्री शंकर गायकर यांनी महाराष्ट्रातील अभियानाची माहिती दिली. “संपूर्ण महाराष्ट्रात ४५ हजार गावातील २.५ कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून या कार्यातपाच हजार संत आणि अडीच लाख रामभक्त कार्यकर्ते अभियानाचे लक्ष्य गाठण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे ते म्हणाले. पंथ, प्रांत, भाषा, पक्ष आदी सर्व भेद विसरून सर्व रामभक्त एकदिलाने रामकार्यात सक्रिय झाले आहे,” असे प्रतिपादन गायकर यांनी यावेळी केले.


असे असेल भव्य राम मंदिर !
या राम मंदिर उभारणी प्रकल्पाबाबत माहिती देताना गोविंददेवगिरी म्हणाले की, “प्रस्तावित निर्माणाधिन मंदिर तीन मजल्यांचे असेल, प्रत्येक मजल्याची उंची २० फूट असेल. मंदिराची एकूण उंची ही १६१ फूट असेल, लांबी ३६० फूट, तर रुंदी २३५ फूट असेल. तीन मजल्यांचे मिळून १६० स्तंभ असतील. प्रत्यक्ष मंदिर हे २.७ एकर जागेवर उभे राहील. याचे संपूर्ण बांधकाम हे केवळ दगडांनी होणार असून सिमेंट व लोखंडाचा वापर यामध्ये होणार नाही. तसेच, मंदिराच्या बाहेर सुमारे १०८ एकर जागेवर यज्ञशाळा, सत्संग भवन, संग्रहालय, संशोधन केंद्र, प्रदर्शन, अतिथी भवन आदी सोयी-सुविधा असतील. या मंदिर बांधकामाचे वास्तुकार ‘मे. चंद्रकांत सोमपुरा’, बांधकामकर्ता ‘मे. लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो’ तसेच व्यवस्थापन सल्लागार म्हणून ‘मे. टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स’ काम पाहणार आहेत.
@@AUTHORINFO_V1@@