हुश्शऽऽ.... नव्या ‘कोरोना’पासून ठाणे अलिप्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jan-2021
Total Views |

Thane_1  H x W:
 
तरीही, धोका टळलेला नसल्याने त्रिसूत्री उपाययोजना गरजेच्या
 
 
 

ठाणे (दीपक शेलार) : ठाण्यात कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळविण्यात यश आले असून मृत्युदरही घटला आहे. असे असतानाच इंग्लंड येथे प्रादुर्भाव झालेल्या ‘सार्स-सीओव्ही-२’ या नव्या कोरोनाची धास्ती सर्वत्र पसरली. मात्र, इंग्लंडहून आलेल्या २३५ जणांपैकी केवळ एकच संशयित रुग्ण आढळला असून, पुण्यातील प्रयोगशाळेतून त्याचा अहवाल आल्यावरच ‘सार्स-सीओव्ही-२’बाधित आहे की नाही, हे स्पष्ट होईल.
 
 
तेव्हा उर्वरित २३४ जण सुरक्षित असल्याने तूर्तास नव्या कोरोनापासून ठाणे अलिप्त आहे, असे मत व्यक्त करून ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी कुणीही बाधित ठाण्यात आढळला नसला तरी ठाणेकरांनी गाफील राहून चालणार नाही. सर्वच प्रकारच्या कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी मास्क, ‘सोशल डिस्टन्स’ आणि सॅनिटायझर या त्रिसूत्रीचा वापर आवश्यक असल्याचे सांगून ठाणेकरांना नूतन वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या.
 
 
“ठाण्यात कोरोना नियंत्रणात आलेला असताना दुसर्‍या लाटेची संभावना व्यक्त होत होती. त्यात इंग्लंड येथून आलेल्या २३५ नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या असून एक रुग्ण संशयित आढळला. त्याच्या चाचण्या पुणे येथे वैद्यकीय शाळेत पाठविण्यात आल्या असून, अद्याप त्याबाबतचा रिपोर्ट आलेला नाही. त्यामुळे झटपट संक्रमित होणार्‍या नव्या कोरोनापासून सध्यातरी ठाणे सुरक्षित आहे. मात्र, अजूनही धोका टळलेला नाही. ठाणेकरांनी गैरसमजात राहू नये. कोरोनाच्या उपचारासाठी ठाणे पालिकायंत्रणा सज्ज असून नूतनवर्षाचे स्वागत घरात बसूनच करा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नियमित करा, अशा त्रिसूत्री सांगितली आहे.
 
सर्वसामान्यांना लसीची प्रतीक्षाच
नवीन वर्षात कोरोनावर लस येणार असल्याने ठाणे महापालिकेच्या माध्यमातून तयारी करण्यात आली आहे. मात्र, सर्वप्रथम आरोग्य विभागाच्या व रुग्णांच्या संपर्कात येणार्‍या कर्मचार्‍यांसह ५० वयोगटातील ज्येष्ठांना लस देण्यात येणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांपर्यंत लस पोहोचण्यास वर्षभराचा कालावधी लागणार असल्याचे ठाण्याचे पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी सांगितले.
नूतनवर्षात ६ लाख ६० हजार जणांना लस
ठाणे शहरातील आरोग्यसेवक, कोरोना लढ्यातील अग्रभागी असलेली कर्मचारी आणि ५० वर्षे वयोगटावरील ज्येष्ठ नागरिक अशा सहा लाख ६० जणांच्या कोरोना लसीकरणाची तयारी ठाणे महापालिकेकडून पूर्ण करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार महापालिकेकडून आराखडा तयार करण्यात आला असून, चार महिन्यांत प्रत्येकाला दोन वेळा असे १३ लाख २० हजार लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे.
 
त्यासाठी १०० पथके आणि २० केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. पुढील आठवडाभरात या लसीकरणाच्या तयारीची रंगीत तालीम घेण्यात येईल. ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी वर्षाच्या शेवटच्या दिवशी पत्रकारांशी संवाद साधत ठाणे शहरातील परिस्थिती तसेच विकासकामांबद्दलही भूमिका मांडली. नव्या वर्षात स्वच्छता सर्वेक्षण, वाहतूक सक्षमीकरण आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात येणार आहे. मालमत्ता करवसुलीसाठी ‘अभय योजना’ सुरू करण्यात आली असून, त्याचाही लाभ नागरिकांनी घेण्याची गरज आयुक्तांनी यावेळी व्यक्त केली.
@@AUTHORINFO_V1@@