मणिपूर धूमसतंय; वणव्यामुळे हजारो एकर वनसंपत्तीचे नुकसान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jan-2021
Total Views |
wildlife _1  H


तीन दिवसांपूर्वी लागला वणवा 

मुंबई - गेल्या तीन दिवसांपासून मणिपूर आणि नागालॅण्डच्या सीमेवरील झुको डोंगररागांना वणवा लागला आहे. ही आग आटोक्यात येत नसल्याने मणिपूरचे मुख्यमंत्री एन.बीरेन सिंग यांनी 'राष्ट्रीय आपत्ती निवारण दला'सोबतच (एनडीआरएफ) गृहमंत्रालयाची मदत मागितली आहे. या वणव्यामध्ये हजारो एकरच्या वनसंपत्तीचे नुकसान झाल्याचे समजतंय. 
 
 
३० डिसेंबर रोजी झुको डोंगररागांमध्ये लागलेल्या वणव्याने आता रौद्र रुप धारण केले आहे. हा वणवा आता पसरला असून मणिपूरमधील माऊंट इसो या सर्वोच्च शिखरापर्यंत या आगीची धग पोहोचली आहे. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेल्याची शक्यता निर्माण झाली आहे. काल मणिपूरचे मुख्यमंत्री एन.बीरेन सिंग यांनी वणव्याची हवाई पाहणी केली. अग्निशामन दलाच्या जवानांकडून ही आग आटोक्यात येत नसल्याने राज्य सरकराने सैन्य दल आणि निमलष्करी दलाकडे सहाय्यता देण्याची विनंती केली आहे. वणव्याचे वाढलेले स्वरुप पाहता मुख्यमंत्री सिंग यांनी आज सकाळी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोन वरुन चर्चा केली. यावेळी शहा यांनी गृहमंत्रालयाकडून आवश्यक ती मदत देण्याचे आश्वासन त्यांना दिले. 
 
 
स्थानिक वन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग नागालॅण्डच्या सीमेवर लागली असावी. नागालॅण्ड सीमेजवळ राहणाऱ्या ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २८ डिसेंबरला ही आग नागलॅण्डजवळ लागली. त्यानंतर ३० डिसेंबर रोजी ती मणिपूरच्या सीमावर्ती भागात पोहोचली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि ती मणिपूरच्या दिशेने पसरण्यापासून रोखण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह १३० ग्रामस्थांचे पथक पाठविण्यात आले. १४ किलोमीटरचे अंतर कापून हे पथक आग लागलेल्या परिसरात पोहोचले. मात्र, जोरदार वाऱ्यांमुळे त्यांना आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. हा परिसर जंगलाने व्यापलेला असून अनेक वन्यजीवांचे आश्रयस्थान आहे. २०१८ साली सुद्धा नागालँडच्या ग्रामस्थांनी मणिपूरहून आलेल्या १५ ट्रेकर्सना ताब्यात घेतले होते. या ट्रेकर्समुळे खोऱ्यामध्ये आग लागल्याचा आरोपी ग्रामस्थांनी केला होता. हा आरोप ट्रेकर्सनी फेटाळला. त्यानंतर दोन्ही राज्यांच्या हस्तक्षेपानंतर ट्रेकर्सना सोडण्यात आले.
@@AUTHORINFO_V1@@