कर्नल जॉर्ज ब्लेक : एक निष्ठावंत साम्यवादी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

Colonel George Blake A lo



कर्नल जॉर्ज ब्लेक परवा २६ डिसेंबर, २०२० रोजी वयाच्या ९८व्या वर्षी मॉस्कोमध्ये मरण पावला. शीतयुद्ध कालखंडाचा आणखी एक मोठा साक्षीदार नाहीसा झाला.


 
२०१२ सालची गोष्ट. कर्नल जॉर्ज ब्लेक आपला ९०वा वाढदिवस साजरा करत होता. “मी, आजही पूर्वीइतकाच निष्ठावंत मार्क्सवादी-लेनिनवादी आहे,” तो म्हणाला. “आणि मी, ब्रिटनशी फितुरी केली, असं म्हणता येणार नाही. कारण फितूर कुणाला म्हणतात? तर जो आपल्या देशाशी गद्दारी करून, परक्या देशाला मदत करतो, अशा माणसाला. मला ब्रिटन हा आपला देश आहे, असं कधी वाटलंच नाही. त्यामुळे ब्रिटनची गुपितं सोव्हिएत रशियाला पुरवणं, ही माझ्या दृष्टीने फितुरी नव्हेच मुळी.”
 
 
आणखी पाच वर्षांनी म्हणजे २०१७ साली ९५ वर्षांचा जवळपास अंध झालेला जॉर्ज ब्लेक, एका मुलाखतीत, एखाद्या तत्त्वज्ञासारखा म्हणतो, “रशियन गुप्तहेरांचा आता खरा खडतर कालखंड सुरू आहे, बेजबाबदार राजकारण्यांनी जगाला आण्विक युद्धाच्या आणि स्व-विनाशाच्या पार काठावर आणून सोडलं आहे. आता ही खरी सत् आणि असत् यांच्यामधील लढाई आहे.”
 
 
कर्नल जॉर्ज ब्लेक परवा २६ डिसेंबर, २०२० रोजी वयाच्या ९८व्या वर्षी मॉस्कोमध्ये मरण पावला. शीतयुद्ध कालखंडाचा आणखी एक मोठा साक्षीदार नाहीसा झाला. १२ डिसेंबरला जॉन ल कॅरे गेला. त्याच्याबद्दलची माहिती आपण याच स्तंभातून पूर्वीच घेतलेली आहे. जॉन ल कॅरेने हेरगिरीच्या व्यवसायाला रामराम ठोकून लेखकाचा व्यवसाय सुरू केला होता.
 
 
तो लोकशाही व्यवस्थेविरुद्ध नसला तरी सध्याच्या ब्रिटिश आणि अमेरिकन लोकशाही सरकारांवर तो सडकून टीका करायचा. जॉर्ज ब्लेक अखेरपर्यंत रशियन गुप्तहेर खात्याशी निगडित होता, असं दिसतं. वयोमानानुसार तो सेवानिवृत्त झाला होता. त्याला रीतसर निवृत्तीवेतनही मिळत होतं. पण, तरीही इतर निवृत्त हेरांप्रमाणे तो उपेक्षेच्या अंधारात गडप झालेला नव्हता. रशियन प्रचारमाध्यमं तर त्याच्या मुलाखती घेतच असत; पण ब्रिटिश आणि कॅनडियन चित्रवाहिन्यादेखील त्याच्यावर अनुबोधपट बनवत होत्या.
 
 
पाश्चिमात्य जगात, लोकशाही देशांमध्ये, लोकशाहीचे जे काही धिंडवडे निघत आहेत, ते पाहून जॉन ल कॅरे अस्वस्थ होता, संतप्त होता. पण, साम्यवाद आणि साम्यवादावर आधारलेली सोव्हिएत राज्यपद्धती साफ अपयशी ठरली, हे प्रत्यक्ष अनुभवूनही जॉर्ज ब्लेक स्वत:ला निष्ठावंत मार्क्सवादीच म्हणवत राहिला, हे आश्चर्य आहे. शतकानुशतकं चालत आलेली सरंजामशाही आणि गेल्या सात-आठशे वर्षांत हळूहळू विकसित झालेली आधुनिक लोकशाही या दोन्ही राज्यव्यवस्था अन्यायकारक आहेत. त्यावर तोड म्हणून कार्ल मार्क्सने ‘साम्यवाद’ या तत्त्वज्ञानावर आधारित राज्यपद्धती सुचवली.
 
 
ब्लादिमीर लेनिनने रशियात राज्यक्रांती करून जुनी सरंजामशाही उलथवून टाकली नि मार्क्सच्या तत्त्वज्ञानावर आधारित नवी साम्यवादी राज्यव्यवस्था सुरू केली. कामगारांचे, शेतकर्‍यांचे, कष्टकर्‍यांचे, श्रमिकांचे राज्य, ज्यात कुणी मालक नाही, कुणी सेवक नाही; सगळे समान, ही मार्क्सची मांडणी अत्यंत ‘अपिलिंग’ होती. ते तत्त्वज्ञान प्रत्यक्षात आणणारी राज्यपद्धती रशियात चालू झालेली पाहून जगभरचे बुद्धिमंत, विचारवंत, कलावंत, साहित्यिक, लेखक, कवी, नाटककार, मार्क्स आणि लेनिनच्या प्रेमातच पडले. जगभरच्या सर्व देशांमध्ये साम्यवादी पक्ष स्थापन झाले. त्यांना त्या-त्या देशांमधल्या विचारवंतांचा हिरिरीचा पाठिंबा मिळू लागला.
 
 
त्यामुळे तिथल्या साम्यवादी पक्षनेत्यांना सत्ताधारी बनण्याची स्वप्नं पडू लागली. पण, दोन दशकांच्या काळात सगळ्यांचा (म्हणजे जे खरे बुद्धिमान आणि शहाणे होते) भ्रमनिरास झाला. साम्यवादी राज्यव्यवस्था ही हुकूमशाहीपेक्षाही क्रूर, पाशवी, जुलमी आणि हिडीस आहे, हे सर्वांना कळून चुकलं. रशियन सम्राट झार हा आपला धर्मपिता आहे, असं सामान्य रशियन शेतकर्‍याला मनापासून वाटत असे आणि सगळीच प्रजा ही आपली लेकरं आहेत, असं झारलाही मनापासून वाटत असे. आता शेवटी तो राजा होता. त्याच्याविरुद्ध तुम्ही बंड पुकारलंत, तर तो कसं खपवून घेईल? पण, एकंदरीत रशियाचा अफाट विस्तार लक्षात घेता, झार प्रजेसाठी बर्‍यापैकी सार्वजनिक कामं करीत होता.
 
 
नव्या राजवटीने प्रथम स्वतःच्या रशियन प्रजेलाच चिरडून टाकलं आणि मग जगभर ते हेच करू लागेल. जरा कुठे विरोध झाला की, सोव्हिएत रणगाडे तिथे पोहोचायचे आणि विरोधकांना अक्षरशः चिरडून टाकायचे. साम्यवादी राज्यव्यवस्थेचं हे सैतानी रूप पाहून पश्चिमेतले विचारवंत सावध झाले. भारतातले विचारवंत, बुद्धिमंत, पत्रकार, लेखक, नट-नट्या हे अजूनही आपण साम्यवादी किंवा उदारमतवादी असल्याच्या टिमक्या वाजवत गावभर फिरत असतात, तो भाग वेगळा. त्याबद्दल त्यांना भरपूर मेहनताना मिळतो.
 
 
असो. तर अशी ही पाशवी सोव्हिएत रशियन राजवट कोसळली, कारण आर्थिकदृष्ट्या ती साफ डबघाईला आली होती. सामुदायिक शेती, प्रचंड मोठे कारखाने किंवा औद्योगिक प्रकल्प यांतून राज्य चालविण्यासाठी आवश्यक तो महसूल सतत मिळत राहिला पाहिजे. साम्यवादावर आधारित आर्थिक रचना तसा महसूल मिळवून देऊ शकत नाही, हे हडसून-खडसून सिद्ध झालं. संपूर्ण हयातभर साम्यवादी पक्षातच असणारे तत्कालीन सोव्हिएत राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांनीच हे सत्य जाहीरपणे सांगून सोव्हिएत साम्यवादी साम्राज्य विसर्जित केलं. सोव्हिएत रशिया संपला आणि नवा लोकशाही आधारित ‘रशियन फेडरेशन’ हा देश अस्तित्वात आला.
 
हे सगळं १९९१ सालीच घडून गेलंय आणि तरीही २०१२ साली ९० वर्षांचा अनुभवी जॉर्ज ब्लेक सांगतोय की, “मी, आजही निष्ठावंत साम्यवादी आहे.” जॉर्ज ब्लेकच्या मृत्यूवरची रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची अधिकृत प्रतिक्रियाही मोठी चिंतनीय आहे. पुतीन म्हणतात की, “कर्नल ब्लेक यांची व्यावसायिक कारकिर्द मोठी चमकदार होती. त्यांचा उत्साह, ऊर्जा आणि धैर्य प्रशंसनीय होतं. जगात लष्करीदृष्ट्या सर्व देश सारखेच शस्त्रास्त्रसंपन्न राहावेत आणि त्यातून शांंतता नांदावी, याकरिता त्यांनी केलेलं कार्य अमौलिक आहे.”
 
एवढं कोणतं अमौलिक कार्य ब्लेकने केलं? जॉर्ज ब्लेक हा मूळचा डच म्हणजे हॉलंडमधल्या रॉटरडॅम या शहरातला. १९४० साली हिटलरच्या नाझी फौजांनी हॉलंड ताब्यात घेतल्यावर काही काळ तो भूमिगत डच देशभक्तांच्या गटात सक्रिय होता. १९४३ साली वयाच्या २१व्या वर्षी तो ब्रिटनमध्ये आला. लगेच तो ब्रिटिश नौदलात भरती झाला. ब्रिटिश गुप्तहेर खातं ‘एम.आय.६’ ला इंग्रजीखेरीज अन्य भाषा जाणणारे लोक हवे असतं. ब्लेकला डच आणि जर्मन या दोन्ही भाषा उत्तम अवगत होत्या. त्यामुळे ‘एम.आय.६’ने ब्लेकला नौदलातून उचललं. १९४६ साली तो बर्लिनमध्ये होता. १९४७ साली तो पुन्हा ब्रिटनमध्ये, केंब्रिजमध्ये येऊन रशियन भाषा शिकला. १९४८ मध्ये त्याची नेमणूक कोरियन राजधानी सेऊलच्या ब्रिटिश वकिलातीत झाली.
 
 
१९५० साली कोरियात साम्यवादी विरुद्ध लोकशाहीवादी, असं यादवी युद्ध सुरू झालं. साम्यवादी गटाने ब्लेकला कैद केलं. तीन वर्षं तो त्यांच्या कैदेत होता. त्या काळात त्याने समग्र कार्ल मार्क्स वाचून काढला नि त्याच्यात एकदम मानसिक परिवर्तन झालं, तो पक्का मार्क्सवादी बनला. १९५३ साली सुटका होऊन लंडनला परतलेला जॉर्ज ब्लेक हा ‘सोव्हिएत रशियन गुप्तचर संस्था’ (केजीबी)चा स्वयंस्फूर्तीने बनलेला हस्तक होता. ‘एम.आय.६’ ला याचा पत्ताच नव्हता. त्यांनी १९५५ साली त्याला पुन्हा बर्लिनच्या वकिलातीत नेमलं आणि आता ब्लेककडून ‘केजीबी’ला प्रचंड माहिती मिळू लागली. १९६१ साली त्याचं भांडं फुटलं. पण, तोपर्यंत किमान ४० ब्रिटिश हस्तकांची माहिती ब्लेककडून ‘केजीबी’ला मिळाली होती. त्यांना अर्थातच गोळ्या घातल्या गेल्या असाव्यात.
 
१९६१ साली ब्लेकला लंडनला बोलावून, अटक करून त्याच्यावर रीतसर खटला भरण्यात आला. देशद्रेहाचा आरोप सिद्ध होऊन त्याला ४२ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. १९६६ साली ब्लेक पश्चिम लंडनमधल्या वर्मवुड कारागृहातून अत्यंत हिकमतीने पळाला आणि मॉस्कोला पोहोचला. ही घटना इतकी थरारक होती की, रहस्यचित्रपट सम्राट आल्फ्रेड हिचकॉकने त्या घटनेवर चित्रपट काढण्याची घोषणा केली होती. ‘केजीबी’ने जॉर्ज ब्लेकला ‘कर्नल’ ही गुप्तहेर खात्यातील सन्माननीय पदवी प्रदान केली.
यावरून त्याचं काम रशियन नेत्यांना किती महत्त्वपूर्ण वाटत होतं, हेच सिद्ध होतं. पुढच्या काळात इतरही ब्रिटिश किंवा अमेरिकन हेर रशियात पळून गेले. त्यांना सुरुवातीला भरपूर प्रसिद्धी दिली गेली. लोकशाही देश कसे चोर आहेत आणि आपण कसे सज्जन आहोत, हे त्यांच्या तोंडून वदवून घेतल्यावर सोव्हिएत प्रसिद्धी खात्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. मग त्यांचं रशियातलं जीवन कष्टमय झालं. जॉर्ज ब्लेक मात्र शेवटपर्यंत रुबाबात आणि प्रसिद्धीच्या वर्तुळात राहिला, यावरूनही त्यांच्या कामाचं महत्त्व सिद्ध होतं.



@@AUTHORINFO_V1@@