सावध मनुजा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jan-2021
Total Views |

2020_1  H x W:




पाहता पाहता २०२० वर्ष कधी आणि कसे सरले, हे कोणाला कळलेही नाही. कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करताना तारीख लिहितेवेळी सनावळीच्या ठिकाणी केवळ '२०’ असे लिहू नका, पूर्णतः '२०२०’ असे लिहा, अशा सूचना वर्ष सुरू होण्यापूर्वी अनेकदा करण्यात येत होत्या; अन्यथा केवळ '२०’ लिहिले, तर त्याच्या मागे-पुढे कोणतेही वर्ष लिहून गैरफायदा घेतला जाऊ शकतो, आपली फसवणूकही होऊ शकते, यासाठी त्या सूचना होत्या. त्या सूचना काल-परवाच देण्यात आल्या होत्या, असे वाटावे इतके हे वर्ष लवकर संपले, असे आजही वाटते. आपण आनंदात होतो म्हणून वर्ष लवकर संपले असे नाही, तर कोरोनामुळे उद्याचा दिवस कसा असेल या विंवचनेतच हे वर्ष सरले. कोरोना प्रतिबंधासाठी २२ मार्चला पुकारलेल्या 'जनता कर्फ्यू’पासून 'लॉकडाऊन’ सुरू झाला आणि सुमारे तीन महिने चालला. त्यामध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली होती. पण, ७ जूनला पहिला 'अनलॉक’ जाहीर झाला आणि देशवासीयांना काही प्रमाणात हायसे वाटले. तोपर्यंत उदरनिर्वाहाच्या विवंचनेत दिवस कसा जायचा हेच लक्षात येत नव्हते. दि. ८ जूनपासून सर्वसामान्यांसाठी 'बेस्ट’ बसवाहतूक सुरू झाली आणि १५ जूनला अत्यावश्यक सेवेसाठी रेल्वे वाहतूक सुरू झाली. तोपर्यंत मिळालेली शिथिलता ही त्या-त्या विभागापुरतीच होती. त्यानंतर मात्र टप्प्याटप्प्याने 'अनलॉक’ जाहीर होत गेले आणि मुंबईसह महाराष्ट्र पूर्वपदावर येत गेला. मात्र, 'लॉकडाऊन’चे तीन महिने वगळले तर ८ जूनपासून आजही सर्वसामान्यांचे दिवस पळापळीतच जात आहेत. त्यांना लोकलमध्ये प्रवेश नाही. 'बेस्ट’ बसेस अपुर्‍या असल्याने प्रवेश मिळविण्यासाठीच काही तास खर्ची पडतात. या पळापळीतच २०२० वर्ष संपले. २०२१ उजाडतानाच मागे वळून पाहता 'धकाधकीत वर्ष कधी संपले कळलेच नाही’असे उद्गार अनेकांच्या तोंडून बाहेर पडले. आता नव्या वर्षात तरी साधारण दिवस येतील, असे वाटत असताना ब्रिटनमध्ये आलेल्या 'सार्स-सीओव्ही-२’ या दुसर्‍या प्रकारच्या घातक विषाणूच्या कोरोनाने भारतात शिरकाव केल्याची भीती वर्तविण्यात येत आहे, त्यामुळे नवीन वर्षातही सावधानता हवीच!
 
 
 
 

सुसरबाई तुझी पाठ मऊ!

 
 
 
'शब्द’ ही फार मोठी निर्मिती आहे आणि तीच माणसाची फार मोठी शक्ती आहे. याच एका शस्त्राने माणसे जग जिंकू शकतात. मात्र, त्याचा वापर कसा करायचा यावर ते अवलंबून आहे, याची प्रचिती बुधवार, दि. ३० डिसेंबर, २०२० रोजी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत आली. कोरोनाकाळात मोठा भ्रष्टाचार झाला आहे, असे सत्ताधारी शिवसेनेसह प्रत्येक पक्षाच्या नगरसेवकांचे म्हणणे आहे. प्रशासनाने तपशीलवार माहिती दिली नाही म्हणून यापूर्वीचे 'कोविड’ खर्चाचे १२५ प्रस्ताव परत पाठविण्यात आले आहेत. तरीही पालिका प्रशासनाला पुढील तीन महिन्यांसाठी अजून ४०० कोटी रुपये खर्च करण्यासाठी स्थायी समितीची परवानगी हवी आहे. त्यावरून मोठा वादंग झाला. सत्ताधारी पक्ष शिवसेनेसह भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी या पक्षांच्या नगरसेवकांनी प्रशासनावर टीकेची झोड उठविली. स्थायी समिती अध्यक्षांनी यावर आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेल्या अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांना निवेदन करण्यास सांगितले आणि त्यांनी आपल्या वक्तृत्वाने अध्यक्षांचे मतपरिवर्तन केले. जागतिक महामारी ठरलेल्या कोरोना संकटाशी तोंड देताना कशी आणि किती तयारी करावी लागेल, हे मोजून-मापून ठरवता येत नाही. मात्र, जय्यत तयारी ठेवावी लागते हे निश्चित. तशी पालिकेने जय्यत तयारी ठेवली, त्यासाठी खर्चही अपेक्षेपेक्षा अधिक झाला. त्यामुळे नगरसेवकांचे आरोप अगदीच निराधार नाहीत. 'तुमच्या जागी मी असतो, तर याच्याहून अधिक गंभीर आरोप केले असते,’ असे म्हणत त्यांनी नगरसेवकांच्या अभ्यासपूर्ण भाषणाचीही स्तुती केली. मात्र, झालेला खर्च मंजूर करावा आणि पुढील खर्चासाठी ४०० कोटींची तरतूदही मंजूर करावी, अशी त्यांनी विनंती केली. जयस्वाल यांच्या अभ्यासपूर्ण आणि खात्रीशीर निवेदनापुढे सत्ताधार्‍यांचे मतपरिवर्तन झाले आणि बहुमताच्या जोरावर तीन महिने रखडलेले प्रशासनाचे खर्चाचे आणि तरतुदीचे प्रस्ताव मंजूर केले. हे केवळ जयस्वाल यांच्या अभ्यासपूर्ण आणि 'सुसरबाई तुझी पाठ मऊ’ अशा गोंजारणार्‍या भाषाशैलीमुळेच शक्य झाले. विनम्रता आणि भाषेचा योग्य वापर यामुळेच तीन महिने गाजणारा 'कोविड’काळातील खर्चाचा प्रश्न भाषेच्या अस्त्रामुळे निकालात निघाला.


- अरविंद सुर्वे 

@@AUTHORINFO_V1@@