बेगड्यांचे हिंदुत्व!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jan-2021
Total Views |
edit _1  H x W:

महाविकास आघाडीत सत्तेला चळावल्यापासूनच खरंतर शिवसेनेने आपले हिंदुत्व खुंटीला टांगले होते. कारण, या अनैतिक आघाडीच्या ‘किमान समान कार्यक्रमा’त हिंदुत्वाला स्थान नाही की मान नाही. पण, तरीही उद्धव ठाकरेंनी खुर्चीपोटी आपली मानही ‘जाणत्यां’समोर तुकवली आणि हिंदुत्वाला केव्हाच ‘राम राम’ ठोकला. म्हणून आज जे दिसते ते सेनेचे केवळ बेगडी हिंदुत्वच!
 
एकीकडे ‘आय एम ए मॅड मॅड हिंदू’ म्हणत, हिंदुत्वाचा भगवा डौलाने खांद्यावर घेऊन जगभरातील हिंदूंचे ‘हिंदुहृदयसम्राट’ ठरलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आज दुसरीकडे ‘हिंदुत्वाचे आम्हाला कुणी सर्टिफिकेट द्यायची गरज नाही’ असे वारंवार उच्चरवाने सांगावे लागणारे त्यांचेच सुपुत्र आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. सत्ता केवळ माणसाची वाणी आणि वागणूक नाही, तर धर्म आणि संस्कारांनाही कशी भ्रष्ट करते, भस्मसात करते, त्याचेच हे उत्तम उदाहरण! कारण, कोणे एकेकाळी हिंदुत्ववादी पक्षांच्या यादीत भाजपच्या बरोबरीने आदराने नाव घेतला जाणारा पक्ष होता तो म्हणजे शिवसेना. परंतु, सत्तेच्या धुंदीत मती भ्रष्ट झाली की, नीतीही नागावते आणि गतीही हळूहळू पाठ सोडते. आज तीच गत शिवसेनेची झालेली दिसते.
 
 
काही महिन्यांपूर्वीच शिवसेनेच्या दक्षिण मुंबईतील पांडुरंग सकपाळांनी अजान स्पर्धेच्या आयोजनाचा अजब घाट घातल्यावरून शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्चचिन्ह उपस्थित झाले होते. कारण, बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीत अशाप्रकारे मुंबईतच काय, महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपर्‍यात शिवसेनेतर्फे अजान स्पर्धांची आरोळी ठोकण्याची कुणा शिवसैनिकाची साधी हिंमतही झाली नसती. किंबहुना, तसा विचारही त्यांच्या मनाला शिवला नसता. पण, काळ बदलला. नवीन पिढीने पक्षाची सूत्रे हाती घेतली. खरंतर ‘जुने जाऊ द्या मरणालागुनि जाळुनि किंवा पुरुनि टाका’ म्हणत, काँग्रेस-राष्ट्रवादीशी सत्ताशय्या करूनच हिंदुहृदयसम्राटांच्या विचारांना शिवसेनेने तत्क्षणी तिलांजली दिली.
 
 
काहींना वाटले, ही तर सत्तेसाठीची तडजोड. सेना आपल्या हिंदुत्वाच्या भगव्या रक्ताशी दगाफटका करणार नाही. पण, सत्तेची वर्षपूर्ती होता होता शिवसेनेची सत्तेची लाचारी ही परमोच्च बिंदूला पोहोचली, जिथे आज हिंदुत्वासाठी तीळमात्रही जागा नाही. त्याचाच प्रत्यय आला, तो शिवसेनेतर्फे नववर्षानिमित्त प्रकाशित करणार्‍या उर्दू दिनदर्शिकेतून. विरोध शिवसेनेने उर्दू भाषेत दिनदर्शिका प्रकाशित करण्याचा नाही. त्यांना हव्या त्या भाषेत, अगदी त्यांना न समजणार्‍याही भाषेत, मुस्लीम मतपेढीसाठी अशाप्रकारे खुश्शाल दिनदर्शिका छापाव्या. महाराष्ट्रात काय, कर्नाटकातही कानडीत छापाव्या. पण, आपल्याच पक्षाच्या दिनदर्शिकेत ज्या हिंदुत्वावर बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची पायाभरणी केली, त्या बाळासाहेबांचाच ‘हिंदुहृदयसम्राट’ असा उल्लेख पुसण्याची शिवसेनेला साधी लाजही वाटू नये; या कोतेपणाला काय म्हणावे?
 
 
‘हिंदुहृदयसम्राट’ बाळासाहेब ठाकरे हे केवळ शिवसेनेचे सर्वोच्च नेते नव्हते, तर ते समस्त हिंदुजनांच्या गळ्यातील ताईत होते. त्यांच्या एका आदेशावर हिंदू रक्त सळसळून उठायचे. बाळासाहेबांसाठी आपल्या प्राणांची बाजी लावण्यासाठी हिंदू बांधवांनी कधी क्षणभरही विचार केला नाही. पण, आज त्याच बाळासाहेबांच्या नावापुढे ‘हिंदुहृदयसम्राट’ची जागाही ‘जनाब’ने घेतली. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेही या दिनदर्शिकेत ‘जनाब’ ठरले. म्हणजे पिता, पुत्र आणि युवराज आता सलग एका माळेत! ‘हिंदुहृदयसम्राटां’चे हे ‘जनाबीकरण’ शिवसेनेच्या बदलेल्या बेगडी हिंदुत्वाचीच साक्ष देण्यासाठी पुरेसे ठरावे.
 
 
कारण, जर ही सच्ची, कडवी बाळासाहेबांची खरी शिवसेना आणि हाडाचे शिवसैनिक असते, तर अशाप्रकारे ज्या ‘हिंदुहृदयसम्राटां’नी शिवसेनेत प्राण फुंकले, त्यांच्या या महान उपाधीचा असा अवमान त्यांनी कदापि सहन केला नसता. याच दिनदर्शिकेतला आणखीन एक प्रताप म्हणजे शिवरायांच्या जयंतीचा एकेरी उल्लेख. आता ‘हिंदुहृदयसम्राट’ आणि ‘छत्रपती’ या समस्त हिंदुजनांसाठीच्या आदरशिखरांनाच दिनदर्शिकेतून बेदखल करणे, हे शिवसेनेचे कुणीकडचे हिंदुत्व? पण, आधी म्हटल्याप्रमाणे बाळासाहेबांच्या निधनानंतर ‘बाळासाहेबांची शिवसेना’ही त्याच दिवशी दुर्दैवाने संपली. आता मागे उरलाय तो फक्त बेगडी हिंदुत्वाचा बुरखा पांघरणारा ‘शिवसेना’रूपी एक सत्तालोलुप राजकीय पक्ष!
 
 
महाविकास आघाडीत सामील होताचक्षणी शिवसेनेने ‘किमान समान कार्यक्रम’ ‘कबूल हैं, कबूल हैं, कबूल हैं’ म्हणत, सत्तांधळेपणाने स्वीकारला. काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत या ‘किमान समान कार्यक्रमा’ला साहजिकच हिंदुत्वाची एलर्जी. तीच एलर्जी, त्याच रोगाने आज शिवसेनेलाही ग्रासले. कारण, शिवसेनेतील खर्‍याखुर्‍या हिंदुत्वाचा आत्मा जागृत असता, तर मशिदींवर भोंग्यांच्या मुद्द्यावरूनही ते मानखुर्दच्या करिष्मा भोसलेच्या पाठीशी समर्थपणे उभे ठाकले असते. पण, उलट त्या भोंग्यांतूनच केल्या जाणार्‍या अजानच्या स्पर्धेचा घाट शिवसेनेने घातला. एवढेच काय, तर दहशतवादी याकूब मेमनच्या फाशीसाठी दया मागणारा काँग्रेसीही आज सेनेच्या मंत्रिमंडळात मुंबईचा पालकमंत्री म्हणून मिरवतोय.
 
 
‘सीएए-एनआरसी’वरुनही हिंदूविरोधी भूमिकाच शिवसेनेने घेतली. त्याच कडीत पुढे हाजीअलीच्या विकासासाठी सरकारी तिजोरीतून ४० कोटींची तरतूद आणि राम मंदिरासाठी देणगी मात्र एक कोटींची, हीच शिवसेनेच्या हिंदुत्वाची आजची नवी परिभाषा. म्हणजे सोईस्कर हिंदुत्व! मुखी-भावी हिंदुत्वाचा सदैव कैवार आणि ध्येय-धोरणांमध्ये मात्र त्याच हिंदूंना, त्यांच्या भावनांना डावलून अल्पसंख्याकांचे लांगुलचालन करण्याचे नवे धोरणच या ‘सत्तासेने’ने स्वीकारलेले दिसते. म्हणून एकदाच काय ते शिवसेनेने ‘हिंदुत्वाचा आम्ही त्याग केला’ अशी घोषणा करावी, म्हणजे त्यांच्या या फसव्या भूमिकांवर प्रश्नचिन्हच उपस्थित होणार नाही.
 
 
आताही औरंगाबाद शहराचे ‘संभाजीनगर’ असे नामकरण करण्याबाबत गेल्या कित्येक दशकांपासून आग्रही असणार्‍या शिवसेनेची काँग्रेसच्या विरोधानंतर एकाएकी दातखीळ बसली. काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांनी “आमचा औरंगाबादच्या नामांतराला विरोध असून किमान समान कार्यक्रमात असे काहीही ठरले नाही,” असे सुनावल्यानंतर सेनेच्या गोटातून त्याविषयी कुणी चकार शब्दही काढला नाही. यावरून शिवसेनेच्या वाघाची मांजर का झाली आणि कशी झाली, हे वेगळे सांगायला नकोच. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, बाळासाहेब ठाकरेंचा विरोध सरसकट मुसलमानांना कधीही नव्हता. तेव्हाही मुस्लीम शिवसैनिक सेनेत होतेच की, बाळासाहेब म्हणायचे, “जातीयवाद हा काँग्रेसने वाढविला. आम्ही मुसलमानांच्या विरोधात कधीच नव्हतो. पण, केवळ या देशावर प्रेम करणारे मुसलमान आमचे आहेत. त्यांचं रक्षण करणं हेदेखील आमचं कर्तव्य आहे. काँग्रेसही त्यांचे रक्षण करू शकत नाही. बाबरीच्या वेळी जे मुसलमान आमच्या अंगावर आले, त्यांच्याशी आम्ही लढलोच. तेव्हा शिवसेनेच्या महिलांनी मुसलमान वस्तीला संरक्षणही दिले होते.” हे होते बाळासाहेबांचे विचार. त्यामुळे हिंदुत्व म्हणजे मुस्लीम विरोध नव्हेच. हिंदुत्व ही धार्मिक किंवा आध्यात्मिक संकल्पना नाही. हिंदुत्व ही एक ऐहिक, राजकीय व सामाजिक संकल्पना आहे. सावरकरांचे हिंदुत्ववादी विचारही आपल्याला तीच शिकवण देतात. हिंदुत्व ही जीवनशैली आहे आणि या भारतभूमीत जो जो जन्मला तो हिंदू.
 
 
॥ आसिंधु सिंधुपर्यन्ता, यस्य भारतभूमिका।
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत:॥
 
 
अर्थात, भारत ही ज्याची केवळ पितृभूमी नव्हे, तर पुण्यभूमीही आहे तो खरा हिंदू. पण, शिवसेनेचे हिंदुत्व हे संकुचित आणि अल्पसंख्याकांच्या कलेने घेणारे बेगडी हिंदुत्वच म्हणाले लागेल. त्यामुळे हिंदुत्वाशी निगडित कुठलेही प्रकरण घ्या आणि शिवसेनेची त्यावरील भूमिका तपासून पाहिल्यानंतर हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट होते की, ‘हिंदुत्व वजा बाळासाहेब ठाकरे म्हणजेच आजची शिवसेना.’ या वजाबाकीनंतर शिवसेनेत मग उरले तरी काय? तेव्हा, हिंदूंच्या न्याय्य-हक्कांसाठी लढणारी, ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी ‘शिवसेना’ नामक संघटना ही खरंतर कधीच इतिहासजमा झाली. आजची शिवसेना ही ‘सत्तासेना’ आहे. तिच्यासाठी सत्तेसमोर सर्व काही दुय्यम! मग तो बाळासाहेबांचा असा अपमान असो वा सावरकरांचा काँग्रेसने वारंवार केलेला अवमान. त्यामुळे होय उद्धवजी, हे खरंच आहे, तुम्हाला ‘असल्या’ हिंदुत्वाचे सर्टिफिकेट देण्याची मुळी कुणाची पात्रताच नाही. कारण, तुमचे हिंदुत्व मूळ उद्देशापासून केव्हाच भरकटले आहे आणि अशा भटक्या बेगडी हिंदुत्वाचे सर्टिफिकेट तर बाजारातही मिळत नसते!
@@AUTHORINFO_V1@@