शिवसेना कोणापुढे लोळतेय?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Sep-2020
Total Views |


Kangana_1  H x
 


मुंबई-महाराष्ट्राची कैवारी असती तर शिवसेनेने १०६ मराठीजनांच्या रक्ताचा सडा शिंपणार्‍या काँग्रेससोबत जाण्याची बेइमानी की हरामखोरी, कधी केलीच नसती. पण, सत्तेसाठी काँग्रेसच्या गळ्यात गळे घालत तिने तोंड काळे केले. त्यामुळे कंगनाला पाठिंबा देणार्‍यांची नावे डांबराने लिहिण्याआधी शिवसेनेने आपणही कोणापुढे, का आणि कोणासोबत लोळतोय, हे पाहावे.



“राजकीय अजेंडे पुढे नेण्यासाठी देशद्रोही पत्रकार, सुपारीबाज कलावंताच्या राज्यद्रोहास पाठिंबा देणे हीसुद्धा हरामखोरीच आहे. महाराष्ट्रातील बेइमानांच्या पाठीशी जे उभे राहत आहेत, त्यांना १०६ हुतात्म्यांचे तळतळाट लागतीलच. पण, राज्याची ११ कोटी जनताही माफ करणार नाही. ‘मुंबाई’ मातेचा अवमान करणार्‍यांची नावे महाराष्ट्राच्या इतिहासात डांबराने लिहिली जातील. बेइमान लेकाचे!” अशा शब्दांत शिवसेनेने ‘सामना’ या आपल्या मुखपत्रातून पत्रकार अर्णब गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना राणावतचे समर्थन करणार्‍यांवर टीका केली. मात्र, गोस्वामी किंवा राणावत आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणार्‍यांवर टीका करताना आपण कोणाच्या गळ्यात गळे घालून तोंड काळे केले, याचे भान शिवसेनेला नसावे. भाषाधारित राज्य पुनर्रचनेवेळी मुंबईसह महाराष्ट्र व्हावा, ही समस्त मराठीजनांची मागणी होती. मात्र, त्याला काँग्रेसने सातत्याने विरोध केला. काँग्रेसविरोधातच महाराष्ट्रवासीयांनी संघर्ष केला आणि मुजोर काँग्रेसी राज्यकर्त्यांच्याच गोळ्यांनी मराठी मातीतील १०६ लढवय्ये हुतात्मा झाले. मुंबईसह महाराष्ट्र मिळूनही मराठीजनांना न्याय्य हक्कापासून डावलले जात असल्याचे पाहूनच पुढे बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली. आज मात्र, वाघाची मांजर झालेली शिवसेना १०६ मराठीजनांच्या रक्ताचा सडा शिंपणार्‍या काँग्रेससोबत हातमिळवणी करून सत्तेचे लोणी मटकावत इतरांना ‘महाराष्ट्रद्रोही’ ठरवते. शिवसेनेच्या महाराष्ट्रप्रेमाची हीच का ती व्याख्या, हा प्रश्न उपस्थित होतो आणि त्याचे उत्तर निःसंशय ‘होय’ असेच द्यावे लागते. कारण, तसे नसते तर स्वतःला ‘मराठीजनांचे कैवारी’ म्हणवून घेणार्‍या शिवसेनेने १०६ महाराष्ट्रवासीयांचा जीव घेणार्‍या काँग्रेससोबत जाण्याची बेइमानी की हरामखोरी, कधी केलीच नसती. पण, ‘आपण दोघे भाऊ भाऊ, सत्तेचा वाटा मिळून खाऊ’च्या थराला जात शिवसेनेने काँग्रेससमोरच लोटांगण घातले नि मुख्यमंत्र्याची खुर्ची पटकावली. त्यामुळे अर्णब गोस्वामी किंवा कंगना राणावतला पाठिंबा देणार्‍यांची नावे डांबराने लिहिण्याआधी शिवसेनेने जरा आपणही कोणापुढे, का आणि कोणासोबत लोळतोय, हे पाहावे. तेव्हा १०६ हुतात्म्यांचा तळतळाट आपल्याच मागे लागल्याचे शिवसेनेला नक्कीच दिसेल.


मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हटल्यामुळे मुंबादेवीचा अपमान झाल्याचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रावर नशेच्या पिचकार्‍या टाकणार्‍या व्यक्तीला केंद्र सरकार विशेष सुरक्षेची पालखी देत आहे. इथपासून ते मुंबईस कंगाल करून एक दिवस ती महाराष्ट्रापासून तोडायचे कारस्थान केंद्रातील सत्ताधारी करत असल्याचे तारेही शिवसेनेने तोडले. देशावर काँग्रेसचा एकछत्री अंमल होता, त्यावेळी महागाई, कुपोषण, बेरोजगारी वा कोणत्याही मुद्द्यावर विरोधकांनी प्रश्न विचारले की, यामागे परकीय शक्तीचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जाई. जेणेकरून जनतेचे आपल्याच मूलभूत समस्यांवरून लक्ष हटावे आणि कारभारातला ढिसाळपणा ‘जैसे थे’ चालू राहावा. आज शिवसेनादेखील तेच करत असून मुंबई-महाराष्ट्रात कोरोना रोखण्यात, विदर्भातील पूर परिस्थितीवर तत्काळ नियंत्रण मिळवण्यात, शेतकर्‍यांच्या बांधाबांधावर खते-बी-बियाणे पोहोचवण्यात आलेल्या अपयशावर पांघरूण घालण्यासाठीच शिवसेनेला मुंबादेवीचा-शिवरायांचा अपमान आणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आठवला. पण, संजय राऊतांनी कोरोनाप्रसार सुरू होताच ‘देवांनी मैदान सोडले,’ असे म्हटले होते, त्याने मुंबादेवीचा, हिंदुत्वाचा, महाराष्ट्राच्या नि देशाच्या संस्कृतीचा सन्मान झाला होता की अपमान, याचे उत्तर शिवसेनेने द्यावे. अर्थात, काळ्या समुद्रालाही स्वतःच्या नावाची लाज वाटेल इतक्या मुंबई-महाराष्ट्रद्रोही कारवाया केलेल्या असल्या तरी शिवसेनेला आपण सोवळ्यातच असल्याचे वाटणार. आदेश म्हटले की, विवेकाचा त्याग करून फक्त बरळण्यात पटाईत असलेले शिवसैनिकही आपल्याच मालकाची पालखी वाहणार, भले ती बेइमानीची का असेना. पण, शिवसेनेने मुंबईत मराठीजनांसाठी काय केले, हा प्रश्न कोणी विचारला तर नक्कीच त्याचे उत्तर काहीही नाही, हेच असेल. सुरुवातीला मराठी, मराठी करणारी शिवसेना अखिल भारतीय स्तरावर जाण्यासाठी धडपडू लागली आणि तिने हिंदुत्वाची शाल पांघरली. मात्र, तोपर्यंत ज्यांच्या जीवावर आपला राजकारणाचा डोलारा उभा राहिला, त्या मराठीजनांना शिवसेनेनेच सावत्रपणाची वागणूक दिली नि नंतर मूळ मुंबईत राहणार्‍या मराठीजनांना पार विरार-वसई, कल्याण-डोंबिवली, पनवेलची वाट धरावी लागली किंवा शिवसेनेमुळे त्यांची वाट लागली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ती शिवसेना आज कोणत्या मराठी माणसांचे आणि महाराष्ट्राचे नाव घेते? ज्यांना तुमच्या धोरणांमुळे-राजकारणामुळे मुंबई सोडून परागंदा व्हावे लागले त्यांचे? बेशरमपणा यालाच म्हणतात आणि शिवसेनेचे नाव त्याला समानार्थी म्हणून घ्यायला कोणाचीही हरकत नसावी.


दरम्यान, कंगना राणावतच्या विशेष सुरक्षा व्यवस्थेवर टीका करताना शिवसेनेने आपण पाळलेल्या झोंबी सैनिकांकडेही लक्ष द्यावे. झोंबी सैनिकांनी कंगना राणावतला थोबाड फोडण्याची, चपलांनी मारहाण करण्याची धमकी देत आपली औकात दाखवली नसती, तर तिला ‘वाय +’ सुरक्षा देण्याची वेळच आली नसती. अशीच पात्रता शिवसेनेच्या ताब्यातील मुंबई महापालिकेनेही दाखवली नि कंगना राणावतच्या जुहूतील कार्यालयावर हातोडा चालवला. मात्र, ‘मातोश्री’जवळच्या बेहरामपाड्यापासून ते मुंबईत ठिकठिकाणी उभारलेल्या झोपड्यांना हात लावायची हिंमत शिवसेनाशासित महापालिकेने कधी दाखवली नाही. इतकेच काय ‘मुख्यमंत्री आमचाच’ अशा फुशारक्या मारणार्‍यांना अनधिकृत बांधकामाचा एवढाच तिटकारा असेल तर प्रतापगडाच्या पायथ्याला असलेली अफझल खानाची कबर उखडून टाकावी. जेणेकरून मराठी, हिंदुत्व आणि शिवरायांसाठी तुम्ही काहीतरी केल्याचे दिसेल तरी! पण नाहीच, इथे मतपेटीसाठी की लांगुलचालनासाठी शिवसेना शेपूट घालते आणि वर मराठीचा, हिंदुत्वाचा जपही करते. तसेच, कंगनाचे कार्यालय अनधिकृत असेल तर नक्कीच कारवाई व्हावी. पण, मग इतके दिवस महापालिकेतील सत्ताधारी झोपले होते का? म्हणूनच, हा सगळा प्रकार फक्त सुडाने केल्याचे समजते आणि त्यामुळेच सर्वसामान्यांकडून शिवसेनेची छी-थू होताना दिसते. असाच उद्योग काही वर्षांपूर्वी शिवसेनेने आर.जे मलिष्काबाबतही केला होता आणि तेव्हाही जनतेने शिवसेनेला लाखोल्याच वाहिल्या होत्या. पण, यावरून शिवसेनेला जाग येईल, असे नाही. कारण, सत्तेचा माज असाच असतो. विरोधी बोलणार्‍यांना कधी बंगल्यावर नेऊन मारले जाते, तर कधी बंगलाच तोडला जातो. पण, यातूनच शिवसेनेसारख्या लोकशाही बुडवण्याची सुपारी घेतलेल्या, दहशतवाद्यांच्या फाशीला विरोध करणार्‍यांना मुंबईचा पालकमंत्री करणार्‍या सत्ताधीशांच्या पापाचा घडा भरत जातो नि एक दिवस जनता त्याचा मतदानाच्या माध्यमातून कडेलोट केल्याशिवाय राहत नाही.

 
 
@@AUTHORINFO_V1@@