श्रद्धया इदं श्राद्धम्!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Sep-2020
Total Views |


Pitrupaksh_1  H


पितृपक्ष म्हटल्याबरोबर मनात आपसूकच श्रद्धाभाव जागृत होतो. दिवंगत पूर्वजांचे श्रद्धाभावाने स्मरण आणि पूजन म्हणजे ‘पितृपक्ष’ अथवा ‘महालय’ होय. ज्योतिषशात्रानुसार जेव्हा सूर्याचा प्रवेश कन्या राशीत होतो तेव्हा पितृपक्ष असतो.


 
कन्यागते सवितरि पितरौ यान्ति वै सुतान,
अमावस्या दिने प्राप्ते गृहद्वारं समाश्रिता:
श्रद्धाभावे स्वभवनं शापं दत्वा ब्रजन्ति ते॥


 
अर्थात, यावेळी सर्व दिवंगत पूर्वज आपले पुत्र आणि आणि पौत्र म्हणजेच वंशजांच्या द्वारावर येतात, तेव्हा त्यांना फूल, फळ आणि जलाद्वारे तर्पण दिले पाहिजे. व्यक्ती आपल्या कर्मानुसार गती प्राप्त करते - उर्ध्वगती, अधोगती आणि स्थिरगती. ज्या कुळात आम्ही जन्म घेतला, त्या कुळातील पूर्वजांचे स्मरण करणे हे आमचे कर्तव्य आहे. पुराणात पितृपक्षात केल्या जाणार्‍या श्राद्धकर्माचे वर्णन केले गेले आहे. पितृपक्षात श्राद्धाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ब्रह्मपुराणानुसार जो प्राणी शाक आदी माध्यमातून आपल्या पितरांचे श्राद्ध तर्पण करतो, त्याच्या संपूर्ण कुळाची वृद्धी होते. श्राद्धाच्या माध्यमातून पितरांच्या तृप्तीकरिता भोजन, जल आदी पोहोचविले जाते. हे सर्व पिंडांच्या माध्यमातून पितरांना अर्पित केले जाते. कूर्म पुराणानुसार जो व्यक्ती पूर्ण श्रद्धाभावाने श्राद्ध करतो, त्यास संसारचक्रातून मुक्ती मिळते. गरुडपुराणातही श्राद्धाचे महत्त्व दिले असून पितृपूजन केल्यावर दिवंगत आत्मे आपल्या वंशजांकरिता यश, कीर्ती, बल, वैभव आणि धनप्राप्तीचा वर देतात, अशी कथा आहे. मार्कंडेय पुराण म्हणते की, जे पितर श्राद्धपूजनाने तृप्त होतात, ते आपल्या वंशजांना समस्त सुख, राज्य आणि मोक्ष प्रदान करण्यासाठी आशीर्वाद देतात. श्राद्धकर्माची व्याख्या रामायण आणि महाभारत या दोन्ही महाकाव्यात मिळते. असे म्हणतात, ‘श्रद्धया इदं श्राद्धम्।’
 


भाद्रपद पौर्णिमेपासून पितृचक्र ऊर्ध्वगामी होत जाते. या महालयात अथवा पितृपंधरवाड्यात पितर आपला भाग घेऊन पितृलोकाकडे प्रयाण करतात. पितृपक्षात पितृप्राणाची स्थिती चंद्राच्या ऊर्ध्व प्रदेशात होते म्हणूनच हे पितर पृथ्वीलोकात येतात. यामुळेच पितृपक्षातील तर्पणाचे महत्त्व आहे.


अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहम्।
पितृणामर्यमा चास्मि यमः संयमतामहम्॥


गीतेनुसार भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, “हे धनंजय, संसारातील विभिन्न नागातील शेषनाग आणि जलचरातील वरुण, पितरांतील अर्यमा आणि नियमन करण्यार्‍यामधील मी यमराज आहे.”


एकैकस्य तिलैर्मिश्रांस्त्रींस्त्रीन् दद्याज्जलाज्जलीन्।
यावज्जीवकृतं पापं तत्क्षणादेव नश्यति।


अर्थात, जी व्यक्ती आपल्या पितरांना तीळमिश्रित तीन ओंजळी उदक अर्पण करते, ती त्यादिवशीपर्यंत केलेल्या समस्त पापांतून मुक्त होते. महाभारत युद्ध समाप्तीनंतर दानशूर कर्ण मृत्यूनंतर स्वर्गात पोहोचतात, अशी कथा आहे. तिथे त्यांना भोजनात सोने, चांदी, दागिने जेवायला वाढले जाते. तेव्हा कर्ण इंद्राला याचे कारण विचारतात. इंद्र म्हणतात, “हे दानशूर कर्ण, आपण आयुष्यभर सोने, चांदी दान केले, पण पूर्वजांच्या नावावर कधीही भोजनदान केले नाही.” तेव्हा कर्ण म्हणतात, “मला माझ्या पूर्वजांचे ज्ञान नव्हते म्हणून मी असे करू शकलो नाही.” तेव्हा इंद्राने कर्णाला पृथ्वीवर जाऊन सोळा दिवस भोजनदान करण्याचा आणि पूर्वजांना तर्पण करण्याचा सल्ला दिला. अशाप्रकारे दानशूर कर्ण पितृऋणातून मुक्त झाले.


वाल्मिकी रामायणात श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांचा महाराज दशरथ यांचे पिंडदान करण्याचा एक प्रसंग आला आहे. वनवासात असताना श्रीराम हे माता सीता आणि लक्ष्मणासह दशरथांचे श्राद्ध करण्यासाठी गयाधाम येथे पोहोचले. श्राद्धकर्मासाठी सामुग्री आणायला श्रीराम आणि लक्ष्मण यांना वनात उशीर झाला आणि इकडे पिंडदानाची वेळ येऊन ठेपली तेव्हा सीतामाईने फल्गु नदीच्या तीरावर वटवृक्ष, केतकीची फुले, फल्गु नदी आणि गोमाता यांना साक्षी मानून वाळूचे पिंड बनवून दशरथांना पिंडदान केले. अशा प्रकारे फल्गु नदीच्या किनारी वाळूचे पिंड करून श्राद्धकर्म आजही केले जाते.
 

ज्यांना पुनर्जन्म प्राप्त झाला नाही, असे आमचे पूर्वज अथवा जे अतृप्त आहेत, आसक्त भावात लिप्त आहेत, त्यांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी तर्पण आवश्यक आहे. हिंदू धर्मातील पितृपक्ष आपापल्या पूर्वजांच्याबाबत कृतज्ञता जपण्याचा शुभकाळ आहे. आजच्या आधुनिक युगात ग्रंथभेट, वस्त्रभेट, रक्तदान, वृक्षारोपण अशी जोड श्राद्धकर्माला दिली जाते ते सर्वथा योग्यच असले तरी श्राद्ध आणि तर्पण मुळीच टाळू नये. पितृपक्षातील या स्मरणकाळात आपणही पितरांचे श्रद्धापूर्वक पूजन करूया! श्रद्धया इदं श्राद्धम्!
 

- डॉ. भालचंद्र हरदास

@@AUTHORINFO_V1@@