परमार्थसाधना!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Sep-2020
Total Views |


Samrth Ramdas Swamy_1&nbs



आत्मज्ञानी नि:स्पृह असो अथवा विज्ञानवादी शास्त्रज्ञ असो, त्याला सतत अभ्यास, कष्ट आणि प्रयत्न करावेच लागतात. समर्थांनी परमार्थ साधनेतही यांना महत्त्व दिले आहे, हे विशेष आहे. प्रयत्न अभ्यास न करणार्‍या आळशी माणसाला कधीही परमार्थ साधन करता येणार नाही.

 

हिंदू संस्कृती मानवाच्या उद्धारासाठी केवळ धर्माच्या वा पंथाचा विचार न करता, समस्त मानवजातीचा विचार करते. या जगात अनेक तर्‍हेची असंख्य माणसे आहेत. त्यातील प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, त्याची शारीरिक रचना, प्रकृती वेगळी असते. एका व्यक्तीच्या अंगठ्यावरील रेषा जशाच्या तशा जगातील कुठल्याही दुसर्‍या व्यक्तीच्या अंगठ्यावर आढळत नाहीत. त्यामुळे गुन्हेअन्वेषणात हे ठसे उपयोगी पडतात, हे सर्वांना ठावूक आहे. प्रत्येक व्यक्ती भिन्न असली, तरी आध्यात्मिकदृष्ट्या या सर्व माणसांना चार गटांमध्ये समाविष्ट करता येते. ते म्हणजे बद्ध, मुमुक्षू, साधक आणि सिद्ध. याव्यतिरिक्त, गटांमध्ये न बसणारा वेगळा प्रकार असू शकत नाही. प्रत्येक व्यक्तींची व्यावहारिक, प्रापंचिक आवड-नावड वेगवेगळी असते. आपल्या आवडीचे असेल, त्याचा अनुभव माणसाला आनंद देतो आणि नावडीचे असेल त्याचा त्याला कंटाळा येतो. अध्यात्मविषयाची व त्याच्या अभ्यासाची आवड असणारे थोडे असतात. सर्वसाधारणपणे लोक अध्यात्माचा कंटाळाच करतात. कारण, अध्यात्म हा बुद्धीचा, तत्त्वज्ञानाचा व विवेक साधनेचा विषय आहे. मुमुक्षू स्थितीत माणसाला पूर्वायुष्यातील गर्वाचा, अवगुणांची आठवण होऊन त्याला त्याचा पश्चाताप होतो. गर्विष्ठपणातून किंवा अवगुण आचरणातून काहीही हाती लागले नाही, याची त्याला जाणीव होते. देहबुद्धीतून निर्माण झालेले द्वेष, मत्सर, क्रोध लालसा, लोभ सूडाची भावना, कामविकार यात अडकत गेल्याने दु:ख वाट्याला आले याचा तो विचार करु लागतो. सामान्य माणसाच्या मनात ‘मी देह आहे’ ही भावना पक्की असते, याला अध्यात्मशास्त्राच्या भाषेत ‘देहबुद्धी’ असे म्हणतात. या देहबुद्धीमुळे मन दृश्यवस्तूंपासून मिळणार्‍या देहसुखाच्या कल्पनेत रममाण होते. देहबुद्धीत अडकलेला जीव वासनातृप्तीसाठी धडपडत असतो. मुमुक्षूस्थितीतून साधक दशेकडे जाताना साधकाला आपल्या जन्मजन्मांतरीच्या सवयी आवडी-नावडी सोडून अध्यात्म उन्नतीला अनुकूल अशा नवीन आवडीनावडी व सवयी यांचा प्रयत्नपूर्वक स्वीकार करावा लागतो. जुन्या आवडीनावडी व सवयी यांच्याशी त्याला लढावे लागते. देहबुद्धीत वावरणारा जीव देह सुखासाठी धडपडत असतो. वासना त्याला स्वस्थ बसू देत नाहीत. या सार्‍यांतून मनाने बाहेर पडल्याशिवाय परमार्थातील विवेक विचार यांचा अनुभव घेता येत नाही. माणसाला सहजासहजी देहबुद्धीतून बाहेर पडता येत नाही हे खरे आहे. तथापि, {ववेकाच्या साहाय्याने सार काय आणि असार काय, हे तो समजू शकतो. मन देहसुखाच्या बाबतीत त्रयस्थपणे विचार करु शकते. तेव्हा माणसाच्या मनाची खात्री पटते की, देहसुखाच्या बरोबर अप्रत्यक्ष परिणाम म्हणून दु:ख व नैराश्यही येते. त्यांचाही अनुभव घ्यावा लागतो. देहातून प्राप्त होणारे सुख अर्थात इंद्रियजन्य सुख ही देहाची अवस्था असते. शांतपणे विचार केल्यावर साधकाच्या लक्षात येते की, देहसुख खरे समाधान देऊ शकत नाही. ती सुखाची झलक असते. त्याने तृप्ती होत नाही. हे लक्षात आल्यावर साधकाचे मन वैराग्याचा विचार करु लागते. परिणामत: साधकाच्या मनात भगवंताविषयी प्रेम उत्पन्न होऊ लागते. तसे झाल्यावर दृश्य जगतात बाह्यात्कारे इतरांप्रमाणे वागून मनाने त्यापासून अलिप्त राहून जीवनाचाआनंद मिळवण्याची कला साधकाला जमू लागते. तरीही बद्ध अवस्थेतील देहसुखाच्या काही आठवणींमागे रेंगाळत असतात. इंद्रियसुखाच्या या आठवणी सहजासहजी सुटत नाहीत.
 
 
साधकाच्या मनात सारासार जाणण्याचा विचार आल्यावर त्याच्या ठिकाणी वैराग्याचा उदय होतो. खरे समाधान अनुभवण्यासाठी त्याला देहसुख कल्पना मनातून सोडून द्यावी लागते. काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, मोह इत्यादी विकारांवर ताबा मिळवून ते सोडून द्यावे लागतात. भगवंतानी भगवद्गीतेत सांगितले आहेच की, या विकारांनी ज्यांचा ताबा घेतला आहे, अशी माणसे माझा अतिशय द्वेष करतात. भगवंत पुढे सांगतात की, काम, क्रोध, लोभ हे विकार नरकपुरीचे दरवाजे आहेत. तेव्हा त्यांना सोडून दिले पाहिजे.


त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मन:
काम: क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्ययं त्यजेत्॥ (भ.गी.१६.२१)


भगवंताच्या मते, काम, क्रोध व लोभ ही आयुष्याचा नाश करणारी नरकाची तीन द्वारे आहेत. नरकाकडे नेणार्‍या या तीन दरवाजांकडे फिरकता कामा नये. पूर्वापार चालत आलेल्या, गर्व वाढवणार्‍या अनेक सवयी साधकाला सोडून द्याव्या लागतात. समाजात मिळणारा मानसन्मान, प्रतिष्ठा, आपले वैभव हे प्रत्यक्षात सोडता येत नाहीत. त्यांपासून पळून जाता येत नाही. पण, त्यांचा मनातून त्याग करावा लागतो. साधक त्यांचा मानसिक त्याग करतो. तसेच, नातेवाईकांकडून मिळणारा मान-प्रतिष्ठा, कुटुंबातील आपले महत्त्व हे सारे मनातून काढून टाकावे लागते. यांचा मनावर किंचितही परिणाम झाला नाही की, साधक अभिमानरहित होतो. त्याचप्रमाणे कुळाभिमान व लोकलाज याही त्याला सोडून द्याव्या लागतात. आपण अमुक कुळात जन्मलो याचा वृथाभिमान धरुन ठेवण्यात काही अर्थ नसतो. आपण स्वीकारलेली साधना पद्धत अवलंबिलेला भक्तिप्रकार हे सारे पाहून आपण इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करतोय, त्याने लोक आपल्याला हसतील, आपली टिंगल टवाळी करतील, ही लोकलाज सोडून द्यावी लागते. वैराग्याच्या जोरावर साधक कुळाभिमान, लोकलाज यांना जिंकून परमार्थमार्गात प्रगती करतो. स्वामी म्हणतात-


कुलाभिमानासि सांडिले। लोकलाजेस लाजविले।
परमार्थास माजविले। विरक्तिबळे॥


समाजातील आपली प्रतिष्ठा, मानसन्मान, थोरपणा, भौतिक वैभव, आपली होत असलेली वाहक हे सारे मनातून काढून टाकावे लागते. अर्थातच साधना करू लागल्यावर साधक या गोष्टींना जास्त महत्त्व देत नाही. याशिवाय साधक भेदाभेद, गर्व आणि संशय यांनाही हाणून पाडतो. एखाद्या मल्लाप्रमाणे साधकाला त्यांच्याशी कुस्ती करून त्यांना पाडून जिंकावे लागते.


भेदाचा मडघा मोडिला। अहंकार सोडून पाडिला।
पाईं धरून आपटिला। संदेह शत्रू॥


मनातील भेदभावाचे घरच मोडून टाकल्याने, भेद कल्पनेला साधकाच्या मनात राहायला जागाच मिळत नाही. गर्व व संशय या शत्रूंना आपटून ठार केल्याने साधक गर्वरहित व संशयरहित होऊन जीवन जगतो. सामान्य माणसाला कुलाभिमान मानसन्मान, प्रतिष्ठा, वैभव, अहंकार या भावना सुखावतात. त्यांना माणूस सोडून देत नाही. त्यांच्या स्मृती तो मनात आठवत असतो, तर काही आठवणी माणसाला नको असतात. आपले लोकातील अथवा नातेवाईकांतील अपमानाचे प्रसंग आपली हेटाळणी, अवहेलना, या स्मृती माणसाला दुःख देत असतात. अनेक अप्रिय घटना, आपल्याकडे हेतुपुरस्पर झालेले दुर्लक्ष, मानहानी यांच्या आठवणींनी चित्तविक्षेप होतो. या चित्तव्यग्र गोष्टींनी आपल्या एकाग्रतेचा भंग होतो. म्हणून साधकाला दुश्चित्त करणारे मानापमानही सोडून द्यावे लागतात. साधकाला सतत अभ्यास कष्ट आणि प्रयत्न करावे लागतात. त्यानेच साधक निस्पृर होतो. आत्मज्ञानी नि:स्पृह असो अथवा विज्ञानवादी शास्त्रज्ञ असो, त्याला सतत अभ्यास, कष्ट आणि प्रयत्न करावेच लागतात. समर्थांनी परमार्थ साधनेतही यांना महत्त्व दिले आहे, हे विशेष आहे. प्रयत्न अभ्यास न करणार्‍या आळशी माणसाला कधीही परमार्थ साधन करता येणार नाही. आळसाने आयुष्याचा नाश होतो.


दुश्चीतपणासवें आळस। आळसे निद्राविळास।
निद्राविळसें केवळ नास। आयुष्याचा॥(दा. ८.६.३५)


अभ्यासाने देह तसेच दृश्यविश्व बाजूला सारून सूक्ष्म आत्मस्वरुपाशी स्थिर होण्यासाठी ज्या पद्धतीने मार्गक्रमणा करावी लागते, त्याला ‘परमार्थसाधना’ असे म्हणतात. ही ‘परमार्थसाधना’ साधकाला करावीच लागते.
 

- सुरेश जाखडी

 

@@AUTHORINFO_V1@@