ऐकावे, पाहावे, करावे ते भद्रची!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Sep-2020
Total Views |


3 Monkey rules_1 &nb

 


 

आम्ही कानांनी चांगले व योग्य तेच ऐकावे आणि डोळ्यांनीदेखील पवित्र व सुंदर तेच पाहावे. वाईट ऐकायचे नाही वा पाहावयाचे पण नाही! थोडक्यात, ‘बुरा मत सुनो, बुरा मत देखो!’ हा आशय. 

 
भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा: भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा:।
स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनुभिर्व्यशेमहि देवहितं यदायु:॥

 

(ऋग्वेद- १.८९.८,यजु.-२५.३१,साम.-९.३.६) 

 

 

अन्वयार्थ

 

(देवा:) हे देवा किंवा जगातील दिव्य तत्त्वांनो, आम्ही (कर्णेभि:) कानांनी (भद्रं) भद्र ,चांगले तेच (शृणुयाम) ऐकावे. (यजत्रा:) उपासना करण्योग्य देवांनो, आम्ही (अक्षभि:) या डोळ्यांनी (भद्रं) पवित्र व उत्तम तेच (पश्येम) पाहावे, दर्शन घ्यावे. (स्थिरै:अंगै:) आम्ही आमच्या दृढ अंगांनी, अवयवांनी (तनुभि:) बलशाली शरीरांनी (तुष्टुवांस:) नेहमीच तुझे स्तुतिगान, भक्ती, उपासना करीत (यत्) जे कांही (देवहितम्) देवाकडून मिळालेले हितकारक आयुष्य आहे, त्यास (व्यशेमहि) मिळविण्यास समर्थ ठरू!

 
विवेचन

 


या जगात मानव हाच सर्वश्रेष्ठ प्राणी आहे. इतर प्राणी हे ‘भोगयोनीज’ मानले जातात, तर मानव हा मात्र ‘कर्मभोगयोनीज’ म्हणजे ‘उभययोनी’ मानला जातो. यासाठी तो मुख्यत्वेे परमेश्वराकडून मिळालेल्या ‘बुद्धी’ या साधनाचा उपयोग करतो. बुद्धीच्या योगाने तो शरीर व इंद्रियांचा योग्य तो वापर करतो आणि आपले जीवन सफल करतो. वरील मंत्रात आम्ही नेहमी इंद्रिय व शरीराद्वारे शुद्ध व पवित्र व्यवहार करावा, अशी प्रार्थना केली आहे. यातील आशय फारच सोपा व सुगम असा आहे. तसा हा मंत्र सर्वांना सुपरिचितच आहे. कारण, धार्मिक किंवा वैदिक संस्कारांप्रसंगी व नैमित्तिक कर्मकांडप्रसंगी हा मंत्र आशीर्वादाच्या रुपाने उच्चारला जातो. संस्कृतातील बरेच शब्द हे मराठीसह अन्य भाषांमध्ये तत्सम व तद्भव या शब्दांच्या रूपाने प्रकट झाले आहेत. या मंत्रातील बहुतांश शब्द हे तत्सम आढळतात. म्हणूनच सदरील मंत्राचा आशय जाणणे फारच सोयीस्कर ठरते.

 
इथे कान व डोळे या दोन इंद्रियांचा उल्लेख आढळतो. आम्ही कानांनी चांगले व योग्य तेच ऐकावे आणि डोळ्यांनीदेखील पवित्र व सुंदर तेच पाहावे. वाईट ऐकायचे नाही वा पाहावयाचे पण नाही! थोडक्यात, ‘बुरा मत सुनो, बुरा मत देखो!’ हा आशय. खरेतर या दोन इंद्रियांच्या माध्यमांनीच आमच्या जीवनाचे चांगले किंवा वाईट घडते. सर्वच इंद्रिये ही संवेदनशील मानली जातात, पण यांपैकी कान हे इंद्रिय थोडे अधिकच. कारण, कधी कधी आम्ही इतर कामे करतानाही ऐकतदेखील राहतो. एकाच वेळी दोनपेक्षा जास्त कामे करण्याचे हे विशेष ज्ञानेंद्रिय! उदाहरणार्थ - रेडिओवरील कार्यक्रम ऐकता ऐकता किंवा वाहन चालवत असता गाण्यांचे श्रवण! पण असे असले तरी कानांची एकाग्रता असणे महत्त्वाचेच आहे. म्हणूनच प्रार्थनेत म्हटले आहे - भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा:। हे ईश्वरा, आम्ही या कानांनी भद्र तेच श्रवण करावे. अभद्र कदापि नको! आपण जे काही कानांनी ऐकतो, त्याद्वारे विचारांची प्रक्रिया सुरू होते. शब्द व वाक्य ऐकून माणूस विचार करायला लागतो. म्हणूनच ऐकणे ही प्रक्रिया बोलण्याशी फारच निगडित आहे. ज्यांना ऐकता येत नाही, त्यांना बोलता पण येत नाही. शब्दच न ऐकल्याने ते व्यक्त तरी कसे करता येतील?
 
मग त्यांना डोळे आणि हातांच्या माध्यमाने किंवा इशार्‍याने सगळे काही करावे लागते. बधिरता आली की मूकत्वपण आलेच! यासाठी नेहमी पवित्र तेच ऐकण्यासाठी कानाचा उपयोग व्हावयास हवा. आपल्या ऐतिहासिक वेदवाङ्मयाला ‘श्रुती’ असे म्हटले जाते. पूर्वीच्या काळी प्रक्रिया नव्हती. ऋषिमुनी, ध्यानी व योगी महात्त्मे ईश्वराच्या सान्निध्यात राहून जे काही पवित्र चिंतन करायचे व त्या चिंतनातून जे ज्ञान प्रादुर्भूत व्हायचे, ते मुखांनी प्रकट होत असे. हेच ज्ञान शिष्यांना ऐकविले जाई. सर्व शिष्य अतिशय तन्मयतेने एकाग्र होऊन आपल्या आचार्यांचे विचार ऐकत आणि लगेच ते मुखोद्गत करीत असत. याच प्रक्रियेतून श्रुतीपरंपरा सुरू झाली आणि म्हणून कान हे ज्ञानग्रहणाचे अतिशय मूलभूत इंद्रिय आहे. या कानांद्वारे आपण नेहमीच पवित्र, सत्य व उत्तम असेच ज्ञान ऐकत राहिले पाहिजे. यासाठीच आचार्य भर्तृहरीने अतिशय सार्थक शब्दांत म्हटले आहे, ‘श्रुतेनैव न तु कुंडलेन...!’ कान हे शास्त्रवचन ऐकल्याने शोभून दिसतात, ते कुंडले धारण केल्याने कदापि नव्हे! यासाठीच तर जे काही ऐकावयाचे आहे, ते सर्व काही चांगलेच ऐकावे! वाईट कदापि नव्हे. कारण, कानांचे सर्वोत्तम व खुलून दिसणारे आभूषण हे शास्त्रच आहे - ‘श्रोत्रस्य भूूषणं शास्त्रम्।’ पुढे म्हटले आहे - भद्रं पश्येम अक्षभि:। आमच्या डोळ्यांनी पवित्र तेच पाहावे, अपवित्र कदापि नको! या सृष्टीतील दृश्य जग हे नवनवे ज्ञान प्रदान करणारे आहे. जगातील सूक्ष्म व स्थूल तत्त्वांना पाहूनच वैज्ञानिक व तज्ज्ञ असे विद्वान भौतिक पदार्थांचे शोध लावतात, तर निसर्गातील परिवर्तनशील तत्त्वांना पाहूनच ऋषिमुनी व योगीजन आध्यात्मिक क्षेत्रातील चिरंतन दार्शनिक तत्त्वांचा शोध घेतात. विशेष म्हणजे, डोळ्यांच्या माध्यमांनीच आम्ही ज्ञानग्रंथांचे अध्ययन करतो. आम्हाला पुस्तकांच्या वाचनाचा छंद जडतो. या चर्मचक्षूंद्वारे ज्ञानचक्षू उघडले जातात. श्रेष्ठ ग्रंथांच्या वाचनाने माणसाची बुद्धी प्रगल्भ होते. म्हणूनच डोळे हे समग्र विश्वातील ज्ञानाचे आधारभूत घटक आहेत. आधुनिक काळातही याच डोळ्यांच्या माध्यमाने मानव मोठ्या प्रमाणात प्रगतीचे शिखर गाठतो आहे. असे असले तरी डोळ्यांचा दुरुपयोग हा आज मोठ्या प्रमाणात विनाशासाठी कारणीभूत ठरत आहे. माणसाची दृष्टी बिघडली की सृष्टी ही बिघडते, असे आपण म्हणतो. म्हणून डोळ्यांना सतत पवित्र व शुद्ध असेच दृश्य दाखवावे. शेवटी या मंत्रात आम्ही सुदृढ अवयवांनी व बलशाली शरीरांच्या माध्यमाने भगवंताची स्तुती करीत उत्तम आयुष्य मिळवावे, अशी प्रार्थना करण्यात आली आहे. खरेतर शरीर हे माणसाचे मोठे घटक आहे. शरीराच्या माध्यमाने जीवनाच्या धर्म, अर्थ, काम व मोक्ष चार पुरुषार्थांच्या प्राप्तीचे उद्दिष्ट साधले जाते. म्हणूनच कविकुलगुरू कालिदासानेदेखील म्हटले आहे - ‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्!’ कारण, बलवान शरीर हेच उन्नतीचे व प्रगतीचे लक्षण मानले जाते. रोगी माणसाचे बलहीन शरीर काहीच साध्य करू शकत नाही. यासाठी बलोपासना करीत आपल्या या सुदृढ शरीराच्या माध्यमाने सत्कर्म करीत १०० वर्षे जगण्याचा प्रयत्न करावा.
 
 
‘स्थिरै: अंगैै: तनुभि: देेशहितं आयु: व्यशेमहि।’ भगवंंताने आम्हांस किमान १०० वर्षे जगण्याचा आदेश दिला आहे - जीवेत शरदः शतम्! या कालमर्यादेअगोदर मृत्यु्मुखी पडायचे नाही. त्यासाठीच तर शरीराचे रक्षण करावयाचे आहे. योग्य आहार-विहार, आचार-विचार आणि नियमांचे पालन याद्वारे शरीराला नानाविध रोगांपासून दूर ठेवणे हे माणसाचे आद्यकर्तव्य आहे. त्याचबरोबर योगसाधनेच्या माध्यमाने इंद्रियांना विषयांपासून दूर ठेवत आत्मिक व मानसिक वाढीसाठी प्रयत्न करणे आवश्यक असते. जेणेकरून हे शरीर अंतर्बाह्य सशक्त व बलशाली होईल आणि आपली शत आयुष्याची जीवनयात्रा अतिशय सफल व समृद्ध ठरेल. दुर्दैवाने आजचा मानव या दृष्टीने फारच मागे आहे. भारतीय आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचा इतका महान वारसा असताना, पाश्चात्य कुविचारांना बळी पडत आम्ही या पवित्र मानवी देहाची विटंबना करीत आहोत. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब मानवी जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी न करता, आम्ही केवळ ऐहिक सुखाच्या मागे धावत सुटलो आहोत. सध्याची तरुण पिढी तर कान, डोळे, इतर इंद्रिये व शरीराच्या माध्यमाने मोबाईल, इंटरनेट यांसारख्या आधुनिक संसाधनांचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग करीत आहे. परिणामी, आज केवळ देशातच नव्हे, तर सार्‍या विश्वात खून, बलात्कार, भ्रष्टाचार व अनाचार यांसारख्या घटना घडत आहेत. यामुळे व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र व सारे विश्व चिंताग्रस्त बनले आहे. म्हणूनच मंत्रातील पवित्र आशय हा जगातील प्रत्येक मानवास मंगलमय जीवन व्यतीत करण्यासाठी नित्यनूतन प्रेरणा व प्रोत्साहन देणारा ठरणारा आहे.
 

 

 

- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य

 

 

@@AUTHORINFO_V1@@