खंबीर मनाची साथ...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Sep-2020
Total Views |
Shubhangi_1  H



आपण ठाम आणि खंबीर व्हायचे ठरविले तर ते शक्य आहे का? अगदी शक्य आहे. खंबीर राहण्यामध्ये आपल्याला अशा अनेक गोष्टींचा लाभ होतो की, ज्यामुळे आपण आपल्या आयुष्याच्या पथावर अनेक लोकांबरोबर चालत असताना, आपल्या मनाला जे खरोखर वाटते, ते बोलू शकू. आपल्या आयुष्याला संपन्न करण्यासाठी लागणार्‍या कृती करू शकू.


आपल्याकडे पुरेपूर संपत्ती असली, मानमरातब असले तरी आपण किती चांगली माणसे आहोत, हे सगळ्यांना पटवण्याची आपल्याला कायम गरज असते. अर्थात, खरंच चांगलं असणं आणि आपण चांगलं दाखविण्याची धडपड करणं यात जमिनास्मानाचा फरक आहे. जॉर्ज बर्नाड शॉ यांनी म्हटले आहे की, तुम्ही ज्याच्यावर खूप प्रेम करता अशा प्रियजनांसाठी तुम्ही स्वत:चा बळी देता, तेव्हा शेवटी ज्यांच्यासाठी तुम्ही स्वार्थत्याग केला आहे, त्याच्याच द्वेष करता. तरीही अशी खूप सुंदर माणसं या जगात आहेत की, ती प्रामाणिक आहेत, दयाळू आहेत आणि दुसर्‍यांना मदत करण्यासाठी सिद्ध आहेत. वर सुंदर माणसांचं सौंदर्य सखोल आहे, गहन आहे. त्याची मती आणि कृती दोन्हीही शुद्ध आहेत, अशा सुंदर लोकांमधील खंबीरपणाही तितकाच दुर्बोध आहे. प्रसंगी लोकांच्या भल्यासाठी वाईटपणा घेण्याची क्षमता या मंडळींमध्ये दिसून येते. स्वत:चा फायदा साधण्यासाठी नसलेला चांगुलपणा सिद्ध करण्याच्या भानगडीत ही मंडळी सर्वसाधारणपणे पडताना दिसत नाहीत, तरीही आपल्या तत्त्वांशी प्रामाणिक राहून आपले अस्तित्व टिकवणे ही साधारण गोष्ट नाही. बर्‍याच लोकांचा यात फुकाचा बळी जातो.


आपण ठाम आणि खंबीर व्हायचे ठरविले तर ते शक्य आहे का? अगदी शक्य आहे. खंबीर राहण्यामध्ये आपल्याला अशा अनेक गोष्टींचा लाभ होतो की, ज्यामुळे आपण आपल्या आयुष्याच्या पथावर अनेक लोकांबरोबर चालत असताना, आपल्या मनाला जे खरोखर वाटते, ते बोलू शकू. आपल्या आयुष्याला संपन्न करण्यासाठी लागणार्‍या कृती करू शकू. शिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जे आपल्याला टाळायचे आहे, जे आपल्याला पटत नाही ते आपण विनादिक्कत टाळू शकू. यामुळे आपणच नाही, तर ही पृथ्वीही संपन्न होऊ शकते. मनाचा निश्चितपणा आणि खंबीरपणे आपल्याला खर्‍या अर्थाने उत्तम व्यक्तित्त्व देतो. तिथे मुळात आपल्या विचारांनी आणि कृतीने आपण समाधानी असतो. लोकांना फसवून, हिरावून घेऊन, चलाखी करुन, कुटिल नीतीचा वापर करुन आपण कसे चांगले आहोत, हे दर्शविणारी माणसे कमी समाधानी नसतात. त्यांचा स्वत:ला सिद्ध करत राहण्याचा खेळ काही संपता संपत नाही.


खंबीर असणे आणि आक्रमक असणे यातील फरक समजून घेणेही महत्त्वाचे आहे. आक्रमक लोक चांगल्या लोकांच्या मानगुटीवर बसून पुढे जातात. त्यांच्या प्रत्येक चालीत दुर्योधनासारखे ‘सर्वकाही मलाच’ अशीच वृत्ती असते. त्यासाठी मार्गात येणार्‍या प्रत्येकाला ते तुडवायलाही पुढे-मागे बघणार नाहीत. स्वत:ला वर्चस्वाच्या शिडीवर प्रस्थापित करण्यासाठी ही आक्रमक मंडळी काहीही करतील. आपण त्यांना ‘अभद्र माणसं’ म्हणू ओळखतो, पण त्यांना आपण कसे त्या राजाच्या मुकुटाला हस्तगत करायचे, हे चांगलेच माहीत असते. अशा परिस्थितीत खंबीरपणा खूप निर्णायक ठरतो. खंबीर माणसे अशा प्रकारच्या आक्रमक मंडळींना आपला डोक्यावर बसू तर देत नाहीतच, पण स्वत:ही न्याय्य बाजूने ठामपणे उभी राहतात. खंबीर अस्तित्व हे माणसाला स्वत:ची अस्मिता आणि मान सावरायला वेळ देतेच, शिवाय आपल्या हक्कासाठी उभे राहण्याची कुवत देते. असा हा खंबीरपणा हे तुमच्या सचोटीचे द्योतक आहे.


खंबीर कसे व्हावे, हे आपल्याला आपल्या आयुष्याला अनुभवांतूनच समजू शकते, पण तरीही काही गोष्टी आपण स्वत:चे सखोल अवलोकन केल्यास आपल्याला खंबीरपणा शिकता येतील. पहिली गोष्ट आपल्याला समजून घेतली पाहिजे, ती म्हणजे, आपण महत्त्वाच्या क्षणी जेव्हा आपल्या निर्णयाने आपल्या आणि इतरांच्या आयुष्यात निर्णायक बदल घडवणार असतो, त्यावेळी आपण निष्क्रिय वागतो का? दुसर्‍यांना विरोध केल्यास आपले काही नुकसान होईल, या विचाराने तोंड बंद ठेवतो का? किंवा भविष्यात एखाद्या व्यक्तीकडून आपला फायदा होण्याची शक्यता असल्याने त्या व्यक्तीला खूश ठेवण्यासाठी आपण तोंडच उघडत नाही. या गोष्टी जाणून घेतल्यास आपल्याला व्यवस्थित आत्मनिरीक्षण करता येईल. यावेळी आपण खंबीर असल्याने आपली विश्वासार्हता किती मौलिक आहे, हे व्यक्तीला पटले, तरच तिची खंबीरतेकडे जायची ताकद वाढू शकते नाहीतर केवळ आपला स्वार्थ साधून आपला फायदा कसा साधायचा, एवढाच व्यवहार काही व्यक्तींना जमतो. अर्थात, काही व्यक्तींना आयुष्यातील भूतकाळाच्या अनुभवामुळे वा परिस्थितीमुळे कुठलाही धोका न पत्करता जेवढा व्यावहारिक शहाणपणा करणे शक्य असते, तितका त्या करत जातात. काहीजण आपल्या अधिकाराचा किंवा दर्जाचा वापर करुन इतरांवर दबाव आणत जे काही प्राप्त करायचे ते प्राप्त करतात. अशा व्यक्तींच्या सान्निध्यात येणार्‍या व्यक्तींना खंबीरपणामुळे आत्मिक शक्ती मिळते. त्यांचा आत्मविश्वास वाढतो. आपल्याला ज्या गोष्टी मनापासून नाही करायच्या आहेत, त्या माणसाने निर्णय घेताना स्वतःच्या मनाशी योग्य संवाद साधणे खूप गरजेचे आहे. बाहेरच्या व्यक्तीशी तात्त्विक द्वंद्व एकदाच होईल, पण एकदा का चुकीचा निर्णय घेतला, तर आपल्याच अंतर्मनाशी सतत द्वंद्व होते. जर आपण इतर व्यक्तींना आपली योग्यता ठरविण्याची संधी दिली, तर आपण त्यांना आपल्या अस्तित्वाची व्याख्याही करायची संधी देतो. किंबहुना, आपल्यावर त्यांनी पूर्ण नियंत्रण करावयाची संधी आपण त्यांना देतो. जेव्हा आपण इतरांच्या वैचारिकतेचे आणि प्रवृत्तीचे गुलाम बनतो, तेव्हा आपण आपल्या अस्सल अस्तित्वालाच विसरतो. आपण स्वतःशीच प्रामाणिक नसतो. एक सुप्रसिद्ध वचन आहे की, Be who you are and say what you feel, because those who mind don't matter and those who matter don't mind.



- शुभांगी पारकर




@@AUTHORINFO_V1@@