अन्न हे पूर्ण ब्रह्म (भाग-१०) : रुचकर खिचडी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Sep-2020
Total Views |
khichadi_1  H x





बरेचदा पथ्य सांगते वेळी काय खाऊ नये, याचीच यादी मोठी दिसते. मग रुग्णांचा साहजिकच पुढचा प्रश्न असतो, ‘खाऊ तरी काय?’ याचे कारण असे आहे की, आधुनिकतेच्या युगात आपले ते सोडून इतर गोष्टींच्या मागे धावतो. पण, भारतीय पाककृतींमध्ये इतकी वैविध्यता अन्य कोणत्याही देशात/खंडात सापडणार नाही आणि पथ्यातील पाककृतींचा शरीरावर हितकर परिणाम तर होतोच, पण त्याचबरोबर ते रुचकर आणि करण्यास सोप्या अशाही आहेत. अशीच एक पाककृती आज इथे आपण सविस्तररित्या पाहूयात.



‘पथ्यामध्ये काय खाऊ?’ असे विचारले, तर बहुतांशी आजारांमध्ये उपयोगी असते, ती म्हणजे भातापासून आणि डाळीपासून बनवलेली खिचडी. भारताच्या बहुतेक सर्व प्रांतांमध्ये भाताचा हा प्रकार केला जातो. यातील डाळ वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी वापरली जाते (तूर, मसूर, मूग, उडीद इ.) खिचडीला आयुर्वेदात ‘कृशरा’ या शास्त्रीय नावाने संबोधले आहे. ‘कृशरे’चा वापर हा केवळ आहारीय नसून, विशिष्ट पंचकर्मातही (जसे पिण्डस्वेद) ‘कृशरे’चा एक प्रकार वापरला जातो. पिण्डस्वेदात ‘कृशरा’ वापरताना डाळींऐवजी अख्खी धान्यं वापरली जातात. तसेच पंचकर्मातील प्रधान कर्म (वमन-विरेचन-बस्ती इ.) झाल्यानंतर संसर्जन क्रम पाळावा लागतो. असे केल्याने शरीरातील पाचकाग्नी उत्तम होऊन शरीराचे भरणपोषण उत्तमरित्या होऊ शकते. या संसगर्जन क्रमामध्ये आधी द्रवान्न, मग मऊसर भात/पेज मग मऊ खिचडी व नंतर घनाहार द्यायची पद्धत आहे.


जेव्हा व्यक्ती रुग्णावस्थेत असते किंवा शारीरिक बल कमी झाल्याने दुर्बल होते, तेव्हा पचण्यास हलकी आणि पोषक म्हणून ‘कृशरा’ (खिचडी) उपयोगी ठरते.


‘कृशरे’ मध्ये तांदूळ व डाळीचे २:१ हे प्रमाण वापरावे. ‘कृशरा’ ही दोन पद्धतीने करता येते. कृत आणि अकृत. कृत म्हणजे फोडणी देऊन बनविलेले पदार्थ आणि अकृत म्हणजे फोडणी न देता केलेले पदार्थ. अग्निबल कमी असताना पचनशक्तीसुधारण्यासाठी ‘कृत कृशरा’ (म्हणजेच फोडणी दिलेली खिचडी) खायला द्यावी.


सामान्य कृती

मुगाची सोलीत डाळ १ भाग, तांदूळ २ भाग, स्वच्छ धुवून घ्यावेत. तुपाची किंवा तेलाची फोडणी द्यावी. फोडणीसाठी तुपात मोहरी, हळद, हिंग व जिर्‍याचा वापर करावा. धुतलेले तांदूळ व धान्य तुपावर आधी थोडे परतून घ्यावे. मग चवीनुसार तिखट, मीठ, मसाला घालावा व दुप्पट पाणी घालून शिजवावे. खिचडी गरमागरम खावी ती अधिक रुचकर लागते. यात चवीनुसार थोडे बदल केले तरी हरकत नाही. लसूण, आलं, धणे, जिरे, दालचिनी, खोबरं, लवंग इ.घातल्यास त्याचा स्वादही बदलतो. तसेच वेगवेगळ्या भाज्याही घालून खिचडी शिजवता येते. दक्षिण भारतात ‘बिसीबेळी भात’ जो केला जातो, तो ‘कृशरे’चाच विकसित प्रकार आहे. यात तांदळामध्ये मसाला, तुरीची डाळ, गाजर, घेवडा, मटार इ.भाज्या घातल्या जातात.


खिचडी आबालवृद्ध अशा सर्वांनाच पथ्यकर आहे. ती खाल्ल्याने तृप्ती मिळते, पोट भरल्याचे समाधान होते. चवीला उत्तम व शरीरातील सप्त धातूंचे वर्धन करण्यास खिचडी उपयुक्त असते. पण, खिचडी कधीही दुधाबरोबर खाऊ नये. हे एक प्रकारचे विरुद्धान्न आहे, जे खाल्ल्यास शरीरात विविध त्रास उद्भवू शकतात. या सर्वसामान्य खिचडीचे काही विविध प्रकारही आयुर्वेदाने नमूद केले आहेत. त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात.

घटकद्रव्य : साठेसाळी तांदूळ (तांदूळ जो शेतात ६० दिवसांत तयार होतो, त्याला ‘साठेसाळी’ म्हणतात.) हे ८ भाग घ्यावे. १२ भाग मुगाची डाळ (सामान्यतः ‘कृशरे’मध्ये तांदळाचे प्रमाण धान्यापेक्षा दुप्पट असते. पण, या प्रकारात डाळीचे प्रमाण जास्त आहे.) हळद आणि केशरादी सुगंधी द्रव्य.


कृती : साठेसाळी तांदूळ व मुगाची डाळ, स्वच्छ धुवून घ्यावी. त्यात हळद व सुगंधी द्रव्ये (वेलची, लवंग, दालचिनी इ.) घालून, पाळी घालून शिजवावे. या प्रकारच्या ‘कुशरे’ला फोडणी देऊ नये. खायला देताना तूप घालून खावी. ही ‘कृशरा’ बुद्धिवर्धक आहे. पचायला जड व बल देणारी आहे. वातनाशक आहे. पण, पितकर व कफकर आहे. मूत्राचे प्रमाण कमी करणारी आहे. तेव्हा अशा प्रकारची ‘कृशरा’ १२ महिने न खाता हेमंत व शरद ऋतूत खावी. विशेष हितकर ठरते.




कृशरा यवागू

घटक - तांदूळ, तीळ, उडीद, तांदूळ १ भाग, उडीद - पाव भाग, तीळ - पाव भाग, या प्रकारच्या कृशरेत पाण्याचे प्रमाण अधिक आहे. (पहिल्या प्रकारात दुप्पट पाणी घातले जाते. कृशरा यवागू प्रकारच्या खिचडीत सहापट पाणी घालायचे असते. फोडणी देऊन ही खिचडी खावी. अशा खिचडीचा वापर प्रवाहिकेत (IBS) विशेषत्वाने सांगितलेला आहे. जेव्हा मलप्रवृत्ती फेसाळ, चिकट, वेदनायुक्त असते आणि कुंथून शौचास होते, तेव्हा कृशरा यवागू अधिक उपयोगी ठरते. तसेच कानाच्या पाळीच्या विकारांमध्ये ही गुणकारी असते. मलप्रवृत्ती बांधून होण्यासही मदत होते. याच बरोबर पुष्टदायक, शुक्रवर्धक बलदायक, पचायला जड, कफवर्धक, पित्तवर्धक, वातनाशक आहे.


‘कृशरे’चा अजून एक प्रकार आहे. यात तांदूळ, तीळ व मुगाची डाळ वापरुन खिचडी केली जाते. या मध्ये तांदूळ, तीळ व मूग डाळ समप्रमाणात घेऊन खिचडी तयार करावी, याला फोडणी देऊन व न देता अशा दोन्ही प्रकारे बनविता येते. ही खिचडी आबालवृद्धांना व क्षीण झालेल्या व्यक्तींमध्ये तत्काळ स्नेह (पोषण) पोहोचविण्याचे कार्य करते.


याच प्रकारे कुळीथाचाही वापर करून खिचडी बनविता येते. ही खिचडी कृमींवर उपयोगी आहे. तसेच श्वसनाचा त्रास होत असल्यासही उपयोगी आहे. चवीला थोडी तुरट, पचायला हलकी, तृप्तीकर, अग्नी (पचनशक्ती) सुधरविणारी, कफ व वातनाशक आहे.

उडीद व तांदळापासून बनविलेली ‘कृशरा’ ही पौष्टिक आहे. उडीद व तांदूळ धुवून घेऊन तूप व हळदीवर परतून घ्यावे. आवश्यकतेनुसार पाणी घालून शिजवून घ्यावे. आलं-हिंग-सैंधव घालून पुन्हा एक वाफ द्यावी. ही खिचडी पचायला जड, वृष्य (शुक्रधातूचे कार्य सुधारणारी) कफकर, पुष्टीकर व पित्तनामक आहे.

अजून ही काही प्रकार पथ्यानुसार बदलून करावेत. मग वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच करावे.

(क्रमशः)




- वैद्य कीर्ती देव



@@AUTHORINFO_V1@@