‘ऑफिस बॉय’ ते लखपती क्रिकेटर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Sep-2020
Total Views |


Rinku Singh_1  



एकेकाळी विविध कार्यालयांमध्ये ‘ऑफिस बॉय’ म्हणून काम करत ‘लखपती क्रिकेटर’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या रिंकू सिंह याच्या आयुष्याविषयी...



इंडियन प्रिमीअर लीग (आयपीएल) या स्पर्धेला येत्या १९ सप्टेंबरपासून सुरुवात होत असल्याने जगभरातील तमाम क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जगातील सर्व लीगस्पर्धांमध्ये सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा मानल्या जाणार्‍या या आयपीएल स्पर्धेमध्ये अनेक खेळाडूंना आपले कौशल्य आजमावण्याची संधी मिळणार आहे. या आयपीएल स्पर्धेत कौशल्य दाखवल्यानंतर आतापर्यंत अनेक खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसाठी दरवाजे खुले झाले असून अनेकांनी याद्वारे आपले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होण्याचे स्वप्नही पूर्ण केले आहे. या स्पर्धेत खेळण्यासाठी लिलावामध्ये संघांकडून बोली लावण्यात आल्यानंतर अनेक खेळाडूंचे नशीब पालटते. अनेक खेळाडू काही क्षणांतच लखपती आणि करोडपती बनत असल्याचा इतिहास या स्पर्धेचा आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न पूर्णत्वास झाले नाही तरी आयपीएल स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी अनेक खेळाडू प्रयत्नशील असतात. रणजी क्रिकेट स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करून आयपीएल या जगप्रसिद्ध स्पर्धेमध्ये कौशल्य दाखविण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. क्रिकेटवेडा देश म्हणवल्या जाणार्‍या या भारतात असे अनेक खेळाडू आहेत की, जे केवळ आयपीएलमध्ये खेळण्याच्या संधीची प्रतीक्षा करत आहेत. शेकडो खेळाडू संधीच्या प्रतीक्षेत असल्याने यांपैकी अनेक खेळाडूंची स्वप्ने ही स्वप्नेच बनून राहतात. मात्र, ज्या खेळाडूंचे हे स्वप्न पूर्ण होते, ते सर्वत्र जगात प्रसिद्ध होतात. उत्तरप्रदेशचा खेळाडू रिंकू सिंह हा त्यांपैकीच एक म्हटले तर वावगे ठरणार नाही. रिंकू सिंह याची आयपीएल २०२० या स्पर्धेत खेळण्यासाठी कोलकाता नाईट राईडर्स या संघाकडून निवड झाली आणि त्याचे नशीबच पालटले. एकेकाळी विविध कार्यालयांत ‘ऑफिस बॉय’ म्हणून कार्यरत असणारा हा रिंकू आयपीएलमधील लिलावानंतर लखपती झाला होता. घरी अठराविश्वे दारिद्य्र असणार्‍या रिंकू सिंहवर आयपीएल स्पर्धेत तब्बल ८० लाखांची बोली लागल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला.


 
रिंकू सिंह मूळचा उत्तर प्रदेशमधील खेळाडू. उत्तर प्रदेशमधील अलिगढमध्ये २२ फेब्रुवारी १९९७ साली त्याचा जन्म झाला. रिंकूला दोन भाऊ आणि दोन बहिणी. असे पाच भावंडांचे मिळून कुटुंब असणार्‍या या रिंकूच्या घरची आर्थिक परिस्थितीही तशी बेताचीच. त्यामुळे शिकून नोकरी करण्याशिवाय रिंकूसह त्याच्या इतर भावंडांपुढे कुठला दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता. यासाठी कुटुंबीयही याच प्रयत्नांत होते. मात्र, लहानपणापासूनच विविध खेळांची आवड असणार्‍या या रिंकूचे अभ्यासात फारसे लक्ष लागले नाही. अभ्यासापेक्षा खेळामध्येच रुची ठेवणार्‍या रिंकूला आपले मॅट्रीकचे शिक्षणही पूर्ण करता आले नाही. नववीत नापास झाल्यानंतर रिंकूने शिक्षण सोडून दिले. शिक्षण सोडून दिल्यानंतर मिळेल ते काम करण्याचा निर्णय त्याने घेतला. मात्र, असे झाले तरी आपला क्रिकेटचा सराव सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला. पण, घरातली बेताची आर्थिक परिस्थिती पाहता, रिंकूला काही दिवस क्रिकेटकडे दुर्लक्ष करत विविध ठिकाणी काम करावे लागले. रिंकूच्या मोठ्या भावाने त्याला एका कार्यालयात झाडू मारण्याचे काम मिळवून दिले. काही दिवस त्याने येथे कामही केले. पण, रिंकूचे यात मन लागले नाही. त्यानंतर त्याने दिल्लीकडे कूच केली. येथेही काम करता करता त्याने पुन्हा नव्याने क्रिकेटचा सराव करण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही महिन्यांनी रिंकू दिल्लीत एका क्रिकेट मालिकेत खेळला, ज्यात त्याला ‘मालिकावीरा’चा पुरस्कार म्हणून एक मोटारसायकल मिळाली. उत्तर प्रदेशात सिलिंडर पोहोचवण्याचे काम करणार्‍या आपल्या वडिलांना रिंकूने ही मोटारसायकल दिली. यादरम्यान रिंकूने स्थानिक क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी केली. २०१४ साली ‘अ’ श्रेणीच्या सामन्यांमध्ये रिंकूने उत्तर प्रदेशाकडून खेळायला सुरुवात केली. विदर्भाविरुद्धच्या सामन्यात त्याने पदार्पण केले. यानंतर पुढच्या वर्षी रिंकूला उत्तर प्रदेशच्या रणजी संघातही स्थान मिळाले. या स्पर्धेतही रिंकूने उत्तम कामगिरी करत आपली छाप पाडली. यादरम्यान क्रिकेटमधून मिळणार्‍या पैशांवर रिंकूचे घर चालायला लागले होते. २०१८ साली रिंकूच्या आयुष्यात अखेरीस तो क्षण आलाच. कोलकाता नाईट रायडर्सने रिंकूवर ८० लाखांची बोली लावत त्याला आपल्या संघात स्थान दिले. रिंकूची मूळ किंमत ही २० लाख होती. परंतु, स्थानिक स्पर्धेतील कामगिरी लक्षात घेता रिंकूला संघात घेण्यासाठी चढाओढ सुरु होती. ज्यात कोलकाता नाईट रायडर्सने ८० लाख मोजत रिंकूला आपल्या संघात घेतले. याच पैशांमधून रिंकूने आपल्या कुटुंबावर असलेलं कर्ज फेडून टाकत, आपला मोठा भाऊ आणि बहिणीच्या लग्नाला आर्थिक मदत केली. रिंकूचा एक भाऊ हा रिक्षा चालवतो, तर एक भाऊ हा कोचिंग सेंटरमध्ये नोकरी करतो. स्थानिक क्रिकेटमध्ये रिंकू फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातो. प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ६०च्या सरासरीने धावा रिंकूने केल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या हंगामात रिंकू आयपीएलकडून कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
 

- रामचंद्र नाईक

 
 

@@AUTHORINFO_V1@@