बलुचींचे उघूरांसारखे ‘ब्रेनवॉशिंग’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Sep-2020   
Total Views |


Pakistan_1  H x




आजवर चाललेले हे अत्याचारच जणू अधिक संघटितपणे करण्यासाठी आणि बलुचींच्या मनात पाकिस्तानप्रती राष्ट्रभावना विकसित करण्यासाठी या शिबिरांचा पाकिस्तानने घाट घातलेला दिसतो. त्यामुळे स्वत:ला पाकिस्तानी न मानणार्‍या बलुचींनी त्यांची संस्कृती, ओळख, रितीरिवाज मातीत गाडून पाकिस्तानी मुस्लीम म्हणूनच जगावे, यासाठी हा सगळा आटापिटा.


 

पाकिस्तान आणि चीनच्या मैत्रीची कवने नव्याने काय सांगणे... जे चीन सांगेल, जसं सांगेल, तशाच पद्धतीने हल्ली पाकिस्तानचा एकूणच कारभार त्यांचे पंतप्रधान इमरान खान हाकताना दिसतात. काही दिवसांपूर्वी तर पाकिस्तान हा चीनवर सर्वस्वी अवलंबून असल्याची जाहीर कबुलीच इमरान खान यांनी देऊन, पाकच्या परावलंबित्वावर एकप्रकारे जणू शिक्कामोर्तबच केले. पाकिस्तामधील चिनी नागरिकांनी कायदेभंग केला, मुलींना जबरदस्ती पळवून नेऊन त्यांच्याशी बळजबरी विवाह केला, मुसलमानांना कामाच्या वेळी नमाझ पढू दिली नाही तरी पाकिस्तान सरकार, पोलीस किंवा तेथील सैन्य याविरोधात तोंडातून ‘ब्र’ही काढत नाहीत. कारण, केवळ आर्थिकदृष्ट्याच नव्हे, तर राजकीय पातळीवरही पाकिस्तान चीनच्या ताटाखालचे एक मांजर म्हणूनच वावरताना दिसतो. मग ते पाकचे अंतर्गत राजकारण असो वा परराष्ट्र धोरण, चीनशिवाय पाकिस्तानचे पानही हलत नाही. उरलीसुरली पाकिस्तानची अब्रूही इमरान खान आल्यापासून चीनच्या वेशीवर टांगली गेली. तेव्हा, पाकिस्तान चीनच्या इतका आहारी गेला आहे की, भविष्यात एक वेळ अशी येऊ शकते, जेव्हा पाकिस्तान ही चीनची एक वसाहतमात्र होऊन जाईल. कारण, स्वातंत्र्याकडून पुन्हा पारतंत्र्याकडे या सर्वार्थाने फसलेल्या राष्ट्राचा प्रवास कधीच सुरु झाला आहे. तसेच, चीनच्या प्रभावाखाली आपण देशाची केवळ जमीन आणि संसाधनेच नाही, तर एकूणच संस्कृती नष्ट करण्याच्या मार्गावर आहोत, हे पाकिस्तानने पुन्हा एकदा त्यांच्या एका कृतीतून दाखवून दिले आहे.


 
चीनच्या पश्चिमेकडील शिनझियांग प्रांतातील उघूर मुसलमानांवरील अत्याचाराच्या करुणकथा जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचल्या. जवळपास एक कोटींवर लोकसंख्या असणार्‍या या उघूर मुसलमानांना व्यक्तिमत्त्व विकास आणि व्यावसायिक प्रशिक्षणाच्या नावाखाली इस्लामपासून कायमचे परावृत्त करण्यासाठी शिबिरांमध्ये कैदेत ठेवले गेले. दाढी वाढवण्यावरील बंदीपासून ते मशिदी तोडून त्यांचे रुपांतर सार्वजनिक शौचालयांमध्ये करुन ‘इस्लाम खतरें मे’ टाकण्यात आला. मानवाधिकारांचे अक्षरश: धिंडवडे काढले गेले. पण, तरीही चीनवर अद्याप आंतरराष्ट्रीय पातळीवर कुठलीही कारवाई झालेली नाही. तेव्हा, चीनचे हेच शिबिरांचे मॉडेल पाकिस्तान सरकार बलुचिस्तानातही राबवित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्वतंत्र बलुचिस्तानसाठी कित्येक बलुची संघटनांनी पाकला सळो की पळो करुन सोडले आहे. त्यातच पाकिस्तानी सैन्याकडून बलुची पुरुषांच्या कत्तलीपासून त्यांच्या बायकांवर बलात्कारासारखे अनन्वित अत्याचार केले जातात. तेव्हा, आजवर चाललेले हे अत्याचारच जणू अधिक संघटितपणे करण्यासाठी आणि बलुचींच्या मनात पाकिस्तानप्रती राष्ट्रभावना विकसित करण्यासाठी या शिबिरांचा पाकिस्तानने घाट घातलेला दिसतो. त्यामुळे स्वत:ला पाकिस्तानी न मानणार्‍या बलुचींनी त्यांची संस्कृती, ओळख, रितीरिवाज मातीत गाडून पाकिस्तानी मुस्लीम म्हणूनच जगावे, यासाठी हा सगळा आटापिटा. त्यासाठी मुल्ला-मौलवींच्या माध्यमातून या शिबिरांत बलुचींचे मानसिक, सामाजिक आणि सांस्कृतिक ‘ब्रेनवॉशिंग’ केले जाते. अशी शिबिरे पाकिस्तानमध्ये सुरु करण्यामागची संकल्पना ही इमरान खान यांचे निकटवर्तीय आणि ‘सीपेक’ची जबाबदारी असलेले असीम बाजवा यांची. तेच बाजवा, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले. परंतु, तरीही त्यांचा राजीनामा इमरान खान यांनी स्वीकारला नाही. आता या बाजवांची चीनशी असणारी जवळीक पाहता, ‘सीपेक’चा बलुचिस्तानातून मार्ग सुकर करण्यासाठी, चीननेच बलुची आवाज दाबण्यासाठी अशाप्रकारची शिबिरे चालवण्याची कुरापती कल्पना पाकला दिली असेल, तर अजिबात नवल नाही. पण, असे कितीही प्रयत्न केले तरी ते यशस्वी होण्याची शक्यता तशी धुसरच. कारण, चीन उघूर मुसलमानांना निधर्मी करण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो. पण, हे बलुची धर्माने मुसलमानच आहेत, पण स्वत:ला ते कदापि पाकिस्तानी मानत नाहीत. त्यामुळे त्यांचे मनपरिवर्तन करणे सोपे नाही. दुसरी बाब म्हणजे, चीनमध्ये कम्युनिस्ट शासनांतर्गत माध्यमांची, मानवाधिकार कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी केल्याने हे विषय कधीच चर्चेत येत नाही. पण, अजून पाकिस्तानात तरी तेवढी वाईट स्थिती नाही. त्यामुळे बलुचींसाठी असली शिबिरे चालवून ते पाकिस्तानी होतील, ही अपेक्षाच बाळगणे मुळात मूर्खपणाचे. कारण, स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षांहून अधिक काळ लोटला. त्यामुळे आता वेळ आली आहे बलुचींच्या स्वतंत्र राष्ट्रउभारणीची. पाकमुक्त बलुचिस्तानची!

 
@@AUTHORINFO_V1@@