अटल बोगदा : लडाखच्या विकासाचे प्रवेशद्वार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Sep-2020   
Total Views |

 


Atal Tunnel_1  

 

 


काश्मीरमधील अटल बोगद्याच्या प्रकल्पाची सर्व स्थापत्त्य कामे पूर्ण झाली आहेत. रोहतांग खिंडीखालून काम पूर्ण झालेल्या अटल बोगद्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याच महिन्यात प्रस्तावित आहे. तेव्हा, कसा आहे हा जगातील सर्वात उंचावर स्थित बोगदा, ते जाणून घेऊया...

 

 


अटल बोगदा हा जगातील सर्वात उंच ठिकाणी (तीन हजार मी. हून जास्त उंचीवर) असून त्याची लांबी नऊ किमी आहे. मनाली ते लाहॉल आणि हिमाचल प्रदेशातील स्पिटी व्हॅली या जोड रस्त्यांवरील या बोगद्यामुळे ४६ किमीचं अंतर कमी होणार आहे. मुख्य म्हणजे, हा रस्ता १२ महिने प्रवासाच्या सोयीचा बनेल, थंडीमध्ये सहा महिने बंद पडणार नाही.

 
अटल बोगद्याची वैशिष्ट्ये

 

 


 
हा बोगदा ९.०२ किमी लांब, १०.५ मी. रुंद व ५.५२ मी. उंच असा असेल. या बोगद्याचे काम मे २०२० मध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. परंतु, कोरोनाच्या संकटामुळे हे काम तीन-चार महिने विलंबाने झाले. हा बोगदा म्हणजे हिमाचल प्रदेश व लडाखमधील हद्दीच्या प्रदेशातील लाहॉल व स्पिटी व्हॅलीत राहणार्‍या लोकांसाठी फार उपयुक्त ठरणार आहे. मनाली व लेह रस्त्यावरील ४६ किमी अंतर कमी होणार आहे. हा रोहतांग खिंडीतला पर्यायी मार्ग ठरणार आहे. त्यामुळे पाच तासांचा प्रवास हा अवघ्या काही तासांवर येणार आहे.

,५०० कोटी रुपये खर्चाच्या या बोगद्यातील काही सोयीसुविधा व आपत्कालीन व्यवस्थेवर एक नजर टाकूया. बोगद्यामध्ये प्रत्येक १५० मी. अंतरावर टेलिफोनची व्यवस्था आहे. प्रत्येक ६० मी. वर फायर हायड्रेंट ठेवले आहेत, तर ५०० मी. वर आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग आहेत. २५० मी. वर कुठल्याही बिघाडाकरिता वा दुरुस्तीकरिता ध्वनिक्षेपणाची व्यवस्था व सीसीटीव्ही कॅमेराचीही व्यवस्था बोगद्यात करण्यात आली आहे. या बोगद्याला प्रकाशदर्शन ऑटोअ‍ॅडजस्टमेंटनी नैसर्गिक स्थितीनुसार बनण्याची व्यवस्था केली असून त्यामुळे ऊर्जेमध्येही बचत होणार आहे. या बोगद्यातून वाहनांना ताशी ८० किमी वेगाने प्रवास करता येईल. दिवसाकाठी १५०० ट्रक व तीन हजार गाड्या जातील, एवढी या बोगद्याची क्षमता आहे. तसेच या भागात थंडीत बर्फ पडत असल्यामुळे, मनालीच्या बाजूला बर्फ हटविण्याची व्यवस्थाही तैनात करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी मनाली-लेह मार्गाकरिता आणखी तीन पर्यायी बोगद्यांची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यामध्ये,

 

 


. बारालाचा खिंडीखालून १६ हजार, ०४० फूट उंचीवर १३.२ किमी लांबीचा बोगदा.
. लाचुंग खिंडीखालून १६ हजार, ८०० फूट उंचीवरून १४.७८ किमी लांबीचा बोगदा.
. तगलांग खिंडीखालून १७ हजार, ४८० फूट उंचीवरून ७.३२ किमी लांबीचा बोगदा.

 

 


हा बोगदा खणण्याकरिता इंजिनिअर्सनी दगडांना भोके पाडणे व स्फोट घडविणे (drill and blast technique) या ऑस्ट्रियन पद्धतीच्या बोगद्याचे तंत्रज्ञान वापरले.

या प्रकल्पाचा विचार पक्का झाला. १९९८ साली तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळातच ३ जून, २००० साली या रोहतांग बोगदा प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती. या प्रकल्पाचे काम ‘डिफेन्स रोड कन्स्ट्रक्शन एजन्सी’, ‘बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन’ (BRO) यांच्याकडे ६ मे, २००२ ला देण्यात आले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी २८ जून, २०१० साली या प्रकल्पाच्या पायाभरणी केली.
‘फिझिबिलीटी’ अभ्यास ‘जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’कडून करून घेतला गेला आणि भौगोलिक अभ्यास जून २००४ मध्ये झाला. संरचना व मार्गदर्शन तत्त्वे ‘ऑस्ट्रियन फर्म स्मेक इंटरनॅशनल’ने ठरवली. तांत्रिक बाजूंकरिता या प्रकल्पाला २००३ मध्ये, तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून २००५ मध्ये मान्यता मिळाली. पुढे २००७ मध्ये निविदा मागविल्या गेल्या व त्या उघडल्या २००८ मध्ये आणि काम दिले गेले ते सप्टेंबर २००९ मध्ये. ‘स्ट्राबॅग एजी अफकॉन जॉईंट व्हेन्चर कंपनी’ला. प्रकल्प पूर्ण करण्याकरिता अनेक अडचणींना तोंड देता देता तीन-चार वर्षे अशीच फुकट गेली. त्यातील एक मुख्य अडचण ५८७ मीटर लांब सेरी नाला. त्यामुळे अनेक महिने नव्हे, तर वर्षभर या बोगद्याचे काम खोळंबले होते. बोगद्याच्या छतावरून १४० लीटर प्रतिसेकंद पाणी वाहत होते. ते बंद करण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागले. बोगद्याची कामे झाल्यावर पाण्याच्या गळतीने बराच विलंब झाला व ‘वॉटरप्रूफिंग’ योग्य रितीने करण्यात एक वर्ष गेले. तसेच दगड फोडण्याच्या कामांतही फार विलंब झाला. बोगद्याच्या दक्षिणेला सिस्ट, मिग्माईट्स, फायलाईटचे दगड व उत्तरेला घडीचे ग्नाईस बायोटाईट सिस्ट, जे ठिसूळ व निसर्गत: डक्टाईल होते. त्यातच पुढे ‘कोविड-१९’ मुळे हा या प्रकल्पाला अधिक विलंब झाला.
अटल बोगद्याच्या कामासाठी एकूण तीन हजार कंत्राटी मजूर कार्यरत होते व ७५० नेहमीचे इंजिनिअर्स व टेक्निशिअन्सची टीम पूर्णवेळ सज्ज होती. अशा या बोगद्याचे काम फार कठीण असे होते, पण बांधकामा दरम्यान एकाही कामगाराला इजा झाली नाही वा कुणाचाही मृत्यू झाला नाही. तसेच कोरोना काळातही कोणालाही कोरोनाची बाधाही झाली नाही.
 
पर्यटकांना आकर्षित करेल अटल बोगदा

 

 


 
लाहॉल-स्पिटीचे उपआयुक्त कमलकांत सरोच म्हणतात, हा नवीन बोगदा लडाखप्रमाणे पर्यटकांना लाभदायक ठरणार आहे. ते म्हणतात, “मी हिमालयाचे दर्शन भूतानपर्यंत घेतले आहे, पण इथले पर्वत फार सुंदर असे आहेत. येथे बर्फाच्या नद्या वाहत असतात.” राज्य पर्यटन खात्याच्या माहितीप्रमाणे, येथे २०१८ मध्ये १.३३ लाख अधिक पर्यटक आले होते. त्यापैकी १३ हजार, ७६४ परदेशी होते. हिमाचल प्रदेशात एकूण १.६४ कोटी पर्यटक २०१८ साली आले होते. परंतु, लाहॉल, स्पिटी वा कुलू-मनाली भागात त्यामानाने कमी पर्यटक पाहायला मिळाले. पण, अटल बोगदा खुला झाल्यानंतर पर्यटकांची संख्या नक्कीच वाढेल. इतके दिवस या लेह वा मनाली मार्गावर पर्यटकांचा लाहॉल हा एक मोठा स्पॉट होता. तेथे हॉटेल्स व कॅम्प साईट्स आहेत. रोहतांग खिंडीमुळे या महामार्गावर अनेक वेळा वाहतूककोंडी होते. पण, या नवीन बोगद्यामुळे पर्यटकांचा लेहचा प्रवास सुखासुखी होऊ शकेल. अन्न व पुरवठा अधिकारी बिरेंदर सिंघ म्हणतात, “३०० मे.टन गहू, २२० मे.टन तांदूळ, ४५ मे. टन डाळी, ३० मे. टन साखर आणि १५ मे. टन मीठ एवढ्या पदार्थांचे ३१ मार्चपर्यंत लागणार म्हणून त्यांचे नियोजन करावे लागते. थंडीकरिता केरोसिनचा राखीव साठा ६० ते ७० किलोलीटर ठेवावे लागते. या सगळ्या अडचणी कित्येक वर्षे सुरू होत्या, पण सप्टेंबरला या बोगद्याचे उद्घाटन झाल्यावर पुढील थंडीमध्ये या मार्गावर या अडचणी कमी होतात का, ते तपासले जाईल.
 
स्थानिक वस्ती कशी आहे?

 

 


 
या भागातील वस्तीला सहा महिने कडाक्याच्या थंडीत जीवन जगावे लागते. १४ हजार चौ.मी. वस्तीच्या भागामध्ये ३१ हजार, ५०० आदिवासी लोक राहतात. या भागात कुठलीही हिरवी वनस्पती दिसत नाही. फक्त गवत व थोडी झुडपे दिसतात. शेतीकरिता बटाटा, वाटाणा, कॉलीफ्लॉवर, ब्रोकोली, बर्फातील लेट्युस (सॅलॅड), आताच्या तापमानवाढीमुळे सफरचंदही पिकवता येतात. थंडीमुळे कमी तापमानात वीजपुरवठा, पाणीपुरवठा व इतर सेवा थंड पडतात. बीएसएनएल फोनची सेवाही बंद पडते. लाहॉलमध्ये २०-२५ व स्पिटीमध्ये ३-जी, ४-जी मोबाईल टॉवर आहेत. पण, इंटरनेटचा वेग अगदी कमी होतो व ती अनियमित सेवा सुरु असते. तसेच थंडीत लोकांचे आजारी पडण्याचे प्रमाणही वाढते. किलाँगला सिव्हिल हॉस्पिटल आहे, पण तेथे डॉक्टरांची कमतरता आहे. तेथे जिल्ह्यात एक प्रादेशिक हॉस्पिटल आहे, १७ प्राथमिक आरोग्य केंद्र, तीन कम्युनिटी हेल्थ सेंटर्स आणि ३७ सबसेंटर्स आहेत. त्यामुळे अशा अपुर्‍या वैद्यकीय सेवांचा या भागाला फटका बसतो. पण, या अटल बोगद्यामुळे आता या विभागातील सर्वांगीण विकासाचे एकूणच चित्र पालटणार आहे.
 
बोगद्याचे सामरिक महत्त्व

 

 


अटल बोगदा प्रकल्प पूर्ण करणे हे ‘बीआरओ’साठीही मोठे आव्हानत्मक काम होते. हे काम संपल्यावर या बोगद्यासकटच्या भारत-चीन हद्दीपर्यंत अनेक किमींचे महामार्ग जाळे फार उपयुक्त ठरणार आहे. सध्या लडाखच्या पूर्वेकडे भारत-चीन तणाव शीगेला असताना, हा रोहतांग बोगदा प्रकल्प फार महत्त्वाचा ठरणार आहे. या बोगद्यामुळे सुरक्षा बल, त्यांचे साहित्य लडाखच्या हद्दीपर्यंत कमी वेळात पोहोचू शकेल. तेव्हा, असा हा अटल बोगदा सर्वार्थाने लडाखच्या विकासाचे प्रवेशद्वार ठरणार आहे, हे निश्चित.

 

 
 
@@AUTHORINFO_V1@@