मिरच्या झोंबल्या...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Sep-2020
Total Views |


Babita Phogat_1 &nbs



क्रीडा क्षेत्रातील देशातला सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारा’बाबत काही प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर भारताची महिला कुस्तीपटू बबिता फोगट हिला नेटिझन्सनी काही प्रमाणात ट्रोल केल्याचा प्रकार नुकताच घडला. क्रीडा क्षेत्रातील देशातला सर्वोच्च पुरस्कार समजला जाणारा हा पुरस्कार कोण्या प्रसिद्ध खेळाडूच्या नावाने देण्यात यावा. क्रीडा क्षेत्रातील पुरस्कारासाठी राजकीय व्यक्तींची नावे नको, अशी मागणी तिने समाजमाध्यमांमधून केली होती. वास्तविक पाहता, बबिताच्या या मागणीत काहीच गैर नाही, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मात्र, नेटिझन्सनी याबाबत मत-मतांतरे व्यक्त करताना फोगट हिला समज देण्याचा प्रयत्न केला. क्रीडा क्षेत्रातून राजकारणात प्रवेश करणार्‍या खेळाडूंनी अशी विधाने करणे शोभत नाही, अशी मते काहींनी व्यक्त केली. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव या पुरस्काराला गेल्या अनेक वर्षांपासून देण्यात आले असून या पुढे हा पुरस्कार खेळाडूंच्या नावाने देणे, हे घराणेशाही पुरस्कृतांना सहन होत नसल्यानेच बबिताच्या या मागणीला विरोध करत तिला काही जणांनी ट्रोल केले. बबिताने ट्विटवरुन या पुरस्कारांचे नाव बदलण्याची मागणी करत आपली ही मागणी योग्य की अयोग्य? याबाबत नागरिकांची मते विचारात घेतली होती. पुरस्काराचे नाव बदलण्याचा तिने कोणताही अट्टाहास धरला नव्हता. मात्र, केवळ राजीव गांधी यांचे नाव हटविण्यासाठी ती पुढाकार घेत असल्याच्या समजातून घराणेशाहीचे समर्थन करणार्‍यांनी बबिताला ट्रोल करण्यासाठी कसलीही कसर सोडली नाही. खेळाडूंनी पुरस्कारांचे राजकारण करू नये, असेही अनेकांनी म्हटले. मात्र, हेच पुरस्कार न मिळाल्याच्या रागातून ज्यावेळी भारतीय महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने थेट पंतप्रधान मोदींना ट्विटरच्या माध्यमातून सवाल केला, त्यावेळी या सर्वांनी मोठा गाजावाजा केला. पुरस्कारासाठी एखाद्या खेळाडूला थेट पंतप्रधानांना सवाल करावा लागतो. यासारखे दुर्दैव नाही, असे म्हणत केंद्र सरकारवर टीका करण्याचे तोंडसुख या सर्वांनी घेतले. परंतु, राजकीय आणि क्रीडा हे दोन स्वतंत्र क्षेत्रे आहेत, हे त्यांना कुणालाही आठवले नाही. मात्र, राजीव गांधी यांच्या नावाचा उल्लेख येताच घराणेशाहीच्या समर्थकांना लगेच मिरच्या झोंबल्या.


 
वेळ आली उत्तरे देण्याची!

 


‘हॉकी’ या भारताच्या राष्ट्रीय खेळातील ध्यानचंद यांचे अमूल्य योगदान लक्षात घेता प्रत्येक वर्षी देशात २९ ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय खेळ दिवस’ म्हणून साजरा करण्याची पद्धत आहे. या ‘राष्ट्रीय खेळ दिवस’च्या निमित्ताने वर्षभरात विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळवणार्‍या खेळाडूंचा ‘राजीव गांधी खेलरत्न’, ‘अर्जुन’ पुरस्कारा’ने सन्मान करण्यात येतो. याव्यतिरिक्त खेळाडूंची कारकिर्द घडवणार्‍या प्रशिक्षकांना ‘द्रोणाचार्य’ या विशेष पुरस्काराने गौरविण्यात येते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाच्या वतीने विविध खेळांमध्ये उत्तम कामगिरी करणार्‍या अनेक खेळाडू आणि प्रशिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र, या पुरस्कारासाठी आपली निवड न झाल्याच्या नाराजीतून काही खेळाडूंनी थेट पंतप्रधानांना सवाल केल्याने यावरून वादंग माजला. मात्र, क्रीडा मंत्रालयाच्यावतीने नियमांचे स्पष्टीकरण दिल्यानंतर या खेळाडूंच्या आरोपांतील हवाच निघाली आणि वादंग शमला. क्रीडा पुरस्कारासाठी निवड न झाल्याच्या आरोपांनंतर खेळाडू केंद्र सरकारला सवाल करत असताना विरोधकांमधील काही नेत्यांनी यावरून सत्ताधार्‍यावर निशाणा साधण्याचे सोयीस्कर हित जोपासले. मात्र, आणखीन एका महिला कुस्तीपटूने क्रीडा क्षेत्रातील पुरस्कारांमध्ये ज्यावेळी माजी पंतप्रधान आणि राजकारण्यांच्या नावांच्या समावेशाबाबत आवाज उठविल्यानंतर विरोधी पक्षातील या नेत्यांनी तितकेच सोयीस्कर मौन बाळगून गप्प बसण्यात आपली भलाई मानली. क्रीडा क्षेत्रात महत्त्वाचा आणि प्रतिष्ठेचा समजल्या जाणार्‍या खेलरत्न पुरस्कारात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावाच्या उल्लेखाबाबत फोगट हिने स्पष्टीकरण मागितल्यानंतर विरोधकांच्या गोटातून एकाही नेत्याने याबाबत उत्तर दिलेले नाही. पुरस्कारासाठी राजीव गांधी यांच्याऐवजी एखाद्या खेळाडूंच्या नावे हा पुरस्कार देणे योग्य की अयोग्य? असा सवाल समाजमाध्यमांमध्ये करत तिने नागरिकांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, यावरून स्पष्टीकरण देण्याऐवजी तथाकथित घराणेशाहीच्या समर्थकांनी राजीव गांधी यांच्या नावाबाबत आक्षेप घेतल्याच्या मुद्द्यावरून फोगट हिलाच ट्रोल केले. घराणेशाहीच्या समर्थकांकडून ट्रोलिंग करत सध्या तरी या मुद्द्यावर पांघरूण घालण्यात आले असले तरी अशा अनेक मुद्द्यांवर आता उत्तरे देण्याची वेळ आली आहे, हे मात्र विरोधकांनी विसरू नये.
 

- रामचंद्र नाईक

 
@@AUTHORINFO_V1@@