तेव्हा कुठे होते तुमचे हिंदुत्व ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Sep-2020
Total Views |

sanjay raut_1  



वृत्तवाहिनीच्या कॅमेर्‍यासमोर एखाद्या मुलीला ‘हरामखोर’ म्हणण्यापर्यंत मजल मारणार्‍या संजय राऊत यांची शब्दांतला अर्थ समजून घेण्याइतकी बौद्धिक पात्रता असेल, असे वाटत नाही. मानसिक संतुलन ढासळल्याने कोणाला शिव्या देणे किंवा अर्थाचा अनर्थ करण्याचे प्रकार होत असतात आणि तेच आता संजय राऊत यांच्यासारख्याने ‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’बाबतही केल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.



‘अपयशाचे खापर देवावर फोडणे हा तर हिंदुत्वाचा अपमान,’ अशा शब्दांत शिवसेना खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी आम्हीच खरे हिंदुत्ववादी असे सांगण्याचा प्रयत्न केला. त्याला कारण ठरले ते केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत वापरलेला ‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ वाक्प्रचार. गेल्या सहा महिन्यांपासून कोरोना आणि ‘लॉकडाऊन’मुळे भारतासह जगभरातील सर्वच व्यवहार ठप्प पडले. केवळ अत्यावश्यक सेवासुविधा सुरुवातीच्या काळात सुरु होत्या आणि नंतरही अनलॉकच्या टप्प्यांत थोड्या थोड्या प्रमाणात निर्बंध शिथीलीकरण करण्यात आले. मात्र, कोरोनाच्या भीषण आपत्तीमुळे जागतिक पटलावरील आर्थिक महासत्तांसह प्रत्येक देशाला आर्थिक फटका बसला. भारतालाही त्याची झळ बसली, नाही असे नाही. कारण, कोरोनाचे संकटच गंभीर आणि हाताशी कोणतेही ठोस वैद्यकीय उत्तर नसलेले होते. त्यामुळे नियमित काळातील व्यवहार थांबवून नागरिकांचे जीव वाचवण्याला प्राधान्य देण्यात आले. तेव्हा त्याचा जो व्हायचा तो परिणाम झाला, पण कोरोनाची आपत्ती व्यक्तीनिर्मित वा सरकारनिर्मित नव्हती आणि नाही. ती अचानक उद्भवलेली आणि अनियंत्रित समस्या होती आणि अशा घडामोडींनाच इंग्रजीमध्ये ‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ मानले जाते. अर्थात त्याचा शब्दशः संबंध कोणत्याही देवाशी किंवा धर्माशी नसतो, तर ‘ज्याची निर्मिती माणसाने केली नाही,’ याच्याशी आहे. पण वृत्तवाहिनीच्या कॅमेर्‍यासमोर एखाद्या मुलीला ‘हरामखोर’ म्हणण्यापर्यंत मजल मारणार्‍या संजय राऊत यांची हा अर्थ समजून घेण्याइतकी बौद्धिक पात्रता असेल, असे वाटत नाही. मानसिक संतुलन ढासळल्याने कोणाला शिव्या देणे किंवा अर्थाचा अनर्थ करण्याचे प्रकार होत असतात आणि तेच आता संजय राऊत यांच्यासारख्याने ‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’बाबतही केल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.




शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने आमचे हिंदुत्व अमुक, आमचे हिंदुत्व तमुक नाही, असे म्हणत आले. मात्र, मुख्यमंत्रीपदाचा मुकूट आपल्याच डोईवर असावा म्हणून त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या सच्च्या शिवसैनिकाच्या हृदयातल्या हिंदुत्वाला पायदळी तुडवत हिंदुत्वविरोधी सोनिया गांधी आणि शरद पवारांसमोर मोठ्या अभिमानाने कुर्निसात केला. तेव्हाही आणि त्यानंतरही गेल्या नऊ महिन्यांत उद्धव ठाकरेंनी आपले हिंदुत्व म्हणजे नेमके काय, हे १० जनपथसमोर हात जोडून आणि ‘सिल्व्हर ओक’च्या इशार्‍यावर माना डोलवून दाखवून दिले. संजय राऊत तर उद्धव ठाकरेंच्याही एक पाऊल पुढचा अवतार, म्हणजे ‘आधीच मर्कट, तशांतही मद्य प्याला, झाला तशांतही वृश्चिकदंश त्याला झाली तयास तद्नंतर भूतबाधा, चेष्टा वदूं मग किती कपिच्या अगाधा, अशी यांची अवस्था!’ सत्तेचे मद्य, सत्तेचा दंश, सत्तेची बाधा अशा सगळ्याच प्रकारामुळे संजय राऊत आता हिंदुत्वाचा सन्मान राखणारे कोण अवमान करणारे कोण, याची प्रमाणपत्रे वाटत सुटले. मात्र, हिंदूंना दहशतवादी ठरवण्यासाठी आटापिटा करणार्‍या सोनिया गांधी, शरद पवार आणि त्यांच्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी सूत जुळवताना उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत यांना हिंदुत्वाचा सन्मान आठवला नाही. तेव्हा हिंदुत्वाचा अपमान झाला तरी चालेल, पण आपल्या बुडाखाली मुख्यमंत्र्याची खुर्ची असलीच पाहिजे, यावरुन त्यांची घालमेल सुरु होती. संजय राऊत तर हिंदुत्वाचे नाव ऐकले की अंगाचा तीळपापड होणार्‍या गांधी आणि पवारांकडे सत्तेचे सोन्याचे ताट मिळावे म्हणून इकडून-तिकडे आणि तिकडून इकडे हेलपाटे मारत होते. सत्तेवर आल्यानंतरही पालघरमध्ये हिंदू साधूंचे हत्याकांड घडले, त्याच्या तपासातही राज्य सरकारने घोळ घालून ठेवला, करिश्मा भोसले प्रकरणातही मशिदींवरील भोंगे तत्काळ हटवण्याऐवजी शेपुट घातली, स्वातंत्र्यवीर सावरकरांवर काँग्रेसकडून अश्लाघ्य टीका केली गेली, तेव्हाही उद्धव ठाकरे किंवा संजय राऊतांनी मिठाची गुळणी धरली. अर्थात यामुळे शिवसेनेच्या तथाकथित हिंदुत्वाचा सन्मान वाढलाच असेल नाही?



हिंदुत्वाशी देव-देवस्कीचा संबंध नाही, असेही संजय राऊत म्हणाले. असे असेल तर मग उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेदेखील श्रद्धा म्हणून नव्हे तर कार्यबाहुल्यामुळे आलेल्या ताणावर उतारा म्हणूनच पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मन रमवायला गेले असतील. तसेच मुख्यमंत्र्यांनी कोरोनामुक्तीसाठी विठ्ठलाला घातलेले साकडे हादेखील शुद्ध बनवेगिराचाच प्रकार म्हणावा लागेल. म्हणजेच शिवसेना पक्षप्रमुख, युवराज आणि प्रवक्ते या सर्वांनाच भावनिक राजकारण करुन सत्ता मिळवण्यासाठी हिंदुत्वाचा वापर करायचा होता आणि ती मिळाली की, हिंदुत्वाला वार्‍यावर सोडायचे होते, हे स्पष्टपणे दिसते. ‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ किंवा आम्हीच काय ते हिंदुत्ववादी, असे म्हणत संजय राऊत यांनी चीनने लडाखमध्ये केलेल्या आगळीकीलाही देवाची करणी ठरवून टाकले. लष्कराची गरज काय आणि अशाच प्रकारे वाट्टेल ते बरळण्याचा उद्योग राऊतांनी रविवारच्या रोखठोकमध्ये केला. मात्र, भारतीय लष्कराने लडाखच्या गलवान खोर्‍यात आणि आताच्या पँगाँग त्सो परिसरातही चिन्यांची मस्ती चांगलीच जिरवली. गलवानमध्ये ४० पेक्षा जास्त चिन्यांना यमसदनी धाडले तर पँगाँग त्सोमध्येही त्यांना आसमान दाखवले. ते ‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ नाही, तर ‘अ‍ॅक्ट ऑफ मॅन’ आहे, म्हणूनच. पण हे संजय राऊतांना समजू शकणार नाही, कारण बोलण्याच्या किंवा लिहिण्याच्या ओघात वडाची साल पिंपळाला लावण्यात ते वाकबगार आहेत किंवा याच निकषावर ते राज्यसभेचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक आहेत. दरम्यान, शिवसेनेचे खरे दुखणे जीएसटीमुळे न मिळालेला पैसा हे आहे. आपण सत्तेत कशासाठी आलो, याची जाणीव शिवसेनेसह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला चांगल्याप्रकारे आहे. नुकताच ८० कोटींच्या तांदळाच्या भ्रष्टाचाराचा एक प्रकार उघडकीस आला आणि त्यावरुन या सरकारची मानसिकता व्यवस्थित समजते. जीएसटीच्या पैशाचाही असाच काही सदुपयोग त्यांना करायचा असेल आणि म्हणूनच हा सगळा थयथयाट सुरु असेल. कारण सरकारमध्ये सामील झालेल्यांचे वर्तमान आणि भविष्य बकाणा भरण्याचेच आहे.

@@AUTHORINFO_V1@@