माझ्या कोविड हॉस्पिटलमधील ड्युटीचे मनोगत...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Sep-2020
Total Views |

dr kirti samudre_1 &


आज जगभरात करोडो डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी कोविड रुग्णांना जीवनदान देण्यासाठी, स्वत:च्या जीवावर बेतून रुग्णसेेवेचे ईश्वरी कर्तव्य बजावत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे नवी मुंबईच्या डॉक्टर कीर्ती समुद्र. पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयातील आपल्या कोविड ड्युटीचे त्यांनी शब्दबद्ध केलेले हे अनुभव...



अचानक त्या दिवशी पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयातून (SDH) फोन आला. माझं एका वेबिनारमधे लेक्चर सुरु होतं म्हणून ”I will call you later'' असा मेसेज टाकून कॉल कट केला. नंतर फोन केला तर त्यांनी विचारले की, “मॅडम, SDH आयसीयुत कोविड ड्युटी कराल का?” पनवेलच्या फिजिशियन्सनी कोरोना सुरु झाल्यापासून किती प्रयत्न केले होते, आपण कशा पद्धतीने मदत करू शकतो, हे बघण्यासाठी पनवेलचे आम्ही दोन डॉक्टर्स व नेरुळचे एक डॉक्टर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी रुग्णालयात जाऊन भेटलो. पण, तेथे सुद्धा आम्हाला थंड प्रतिसादच मिळाला. ‘खासगी डॉक्टर्सनी यामध्ये लक्ष घालू नये,’ हे कोरड्या शब्दात सांगण्यात आले. पण, ‘लॉकडाऊन’मध्ये सुद्धा आपापले दवाखाने बंद ठेवू नये, तापाचे रुग्ण ‘फिव्हर क्लिनिक’ला रिफर करावे, अशा व इतर अनेक सूचना सरकारने दिल्या होत्या. कोणी रुग्ण तसे ‘लॉकडाऊन’मुळे येण्यास धजावत नव्हतेच आणि स्टाफसुद्धा येण्यास कचरत होता. खरेतर आम्ही काम करायला स्वतःहून तयार असताना सुद्धा, उगाचच धाक दाखवून, नोंदणी रद्द करण्याच्या धमकीवजा सर्क्युलर्स देऊन स्थानिक यंत्रणेने दोन-तीनदा फॉर्म्स भरुन घेतले, पण पुढे काहीच केले नाही. जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली, तेव्हा मात्र यादी तयार झाली आणि आमच्यातल्या काही जणांना ईमेल्स आले - ‘लगेच ड्युटी जॉईन करा.’ वास्तविक पाहता, SDHला व्हेंटिलेटर्स अगदी सुरूवातीपासूनच येऊन पडले होते, पण आयसीयु पूर्णपणे तयार होईपर्यंत जूनचा महिना उजाडला. पनवेलच्या तरुण, तडफदार फिजिशियन्सनी अगदी सुरुवातीपासून आयसीयु उभे करण्यास मदत केली आणि ते सुरु झाल्यावर पहिल्या दिवसापासूनच फुल्ल झाले. तेव्हापासून सर्व खासगी व्यवसाय करणारे फिजिशियन्स, अ‍ॅनेस्थेशिस्ट, सुपर स्पेशालिस्ट विनामोबदला रोटेशनमध्ये तेथे काम करित आहेत.




पहिल्यांदा आमच्याच सर्व समव्यवसायिकांनी आम्हा महिला डॉक्टरांना वगळले. परंतु, नंतर लक्षात आले की, कोविडचे रुग्ण वाढतच चालले आहेत आणि डॉक्टर्स कमी आहेत. म्हणूनच कदाचित मला तो फोन आला आणि मी लगेचच कुठलेही आढेवेढे न घेता, ‘हो’ म्हटले आणि मनात काय आणि कसे करायचे, ते ठरवले. डॉक्टरांच्या कमतरतेमुळे त्यांच्यासाठी आता क्वारंटाईनचा नियम नाही. पण, मी मात्र हे आठ दिवस स्वतःला व्यवस्थित क्वारंटाईन केले. पहिली गोष्ट म्हणजे, दवाखान्यात न जाण्याचे ठरवले. घरातसुद्धा वयस्कर आईवडील आहेत, पतीराज जरी ’Young Senior Citizen' असले तरी ’Borderline hypertensive' आहेत. त्यामुळे मी स्वत: क्वारंटाईन व्हायचा निर्णय घेतला. सुदैवाने माझ्या घरी सपोर्ट सिस्टिम असल्यामुळे मला हे शक्य झाले. पण, इतर महिला डॉक्टरांना मात्र ड्युटी करून घरही सांभाळावे लागते. काहींची तर लहान मुलं पण आहेत. कोविडबद्दल वाचले तर खूप होते, पण अजूनपर्यंत कोविड रुग्णांवर उपचार करायची वेळ आली नव्हती व तशी परवानगी पण नाही आम्हाला. त्यामुळे काय व कसे करायचे असते, याबद्दल फोन करुन माहिती गोळा करायला सुरुवात केली. एव्हाना पीपीई किट घालायची सवय झाली होती. बंधनकारक नसले तरी, माझ्या बरोबर संपूर्ण स्टाफच्या कोविडपासून बचावासाठी मी सर्वांना पीपीई किट्स देऊन ते घालायची सक्तीचं केली होती. हॉस्पिटलमध्ये जाताना मनांत धाकधूक होती, पण ती ‘कोविड ड्युटी’ची नाही, तर ‘आयसीयु ड्युटी’ची होती. ३० वर्षांच्या वर काळ उलटला मला आयसीयुमध्ये काम करुन. ’Take utmost care, stay safe, काळजी घे,’ अशा सूचना ऐकत मी माझ्या ड्युटीसाठी तयार झाले.


ड्युटीचा पहिला दिवस. माझी ड्युटी ४ वाजता सुरु होणार होती, पण पहिला दिवस सर्व पूर्वतयारीला वेळ लागेल म्हणून मी सव्वा तीन वाजताच घरातून निघाले. लवकरच पोहोचले. सॅनिटाईझ करून पीपीई, डबल मास्क, डबल हातमोजे, फेस शिल्ड असं सगळं घालून जय्यत तयारीनिशी चक्क २० मिनिटं आधी आयसीयुत प्रवेश करती झाले. मी सिस्टर्सना सगळ्या रुग्णांची माहिती विचारली आणि एकेकाचे पेपर्स बघायला सुरुवात केली. कोण डॉक्टर, कोण सिस्टर, कोण मावशी हे ओळखणेच मुळी कठीण. कारण, सगळे संपूर्ण पीपीई किटमध्ये. फक्त डोळे व आवाजाने समजायचे. आमची तरी फक्त चार तासांची शिफ्ट. स्टाफ मात्र ८ तास, रात्री तर १२ तास. एकदा पीपीई किट घातले की तुम्ही पाणीही पिऊ शकत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शौचालयातही जाऊ शकत नाही. मला एकदम सिटी पॅलेस, उदयपूर येथे पाहिलेल्या महाराणा प्रताप यांच्या चिलखताची आठवण झाली. ७२ किलो वजन होते त्याचे. हे त्यांचे युद्धावर जाण्यासाठीचे पीपीई किटच तर होते. आम्ही इथे लढतोय एका अतिसूक्ष्म जिवाणूशी. राणाजींच्या चिलखताचे वजन ७२ किलो, तर आमच्या पीपीई किटचे वजन जेमतेम १०० ते २००ग्रॅम असूनही जड वाटते. तरीही सुरुवातीला अडचणीचेच वाटले. पण, मग होते सवय. जमतं काम करायला. मुंबई, दिल्ली अशा मोठ्या शहरांत सर्व कोविड केअर हॉस्पिटल्समध्ये फ्रंटलाईनला सर्व ज्युनिअर रेसिडंट डॉक्टर्स असतात. आमच्यासारखे कन्स्लटंट्स फक्त मार्गदर्शन करतात, राऊंड्स घेतात. इथे SDH आयसीयुला मात्र आम्हीच फ्रंटलाईन डॉक्टर्स! कारण, हे मेडिकल कॉलेजचे हॉस्पिटल नसल्याने रेसिडंट डॉक्टर्स कोणीच नाहीत. आठ दिवसांचे रोटेशन, सहा डॉक्टर्स. प्रत्येक जण रोज चार तास ड्युटी करणार. एकदा आयसीयुत प्रवेश केला की, चार तासांनी बाहेर पडायचे! पण, मग विचारसुद्धा आला मनात. त्या आयसीयुच्या बेडवर पडलेल्या रुग्णांची किती दयनीय स्थिती आहे? बीप....बीप....बीप....बीप...बीप सतत कानात गुंजणारा आवाज, बाजूला मोठमोठ्या पांढर्‍या मशिन्स, त्यांवर अगम्य असे रंगीबेरंगी आलेख आणि आकडे, नाकातोंडावर मास्क लावून जाडजूड पाईप्सने मशिन्सला जोडलेले, आजूबाजूला संपूर्ण पांढरे-निळे नखशिखांत आच्छादलेले वेष परिधान केलेल्या फक्त आकृती! त्या पलंगावर पडलेल्या रुग्णाला काय दिसत असेल या आकृतींमध्ये? कुणाला देवदूत वाटतील, तर काहीजणांना यमदूत तर भासत नसतील? काय बरे चालले असेल यांच्या मनांत? मरणाची भीती? आप्तस्वकीयांची आठवण? त्यांच्या भविष्याची चिंता? त्यांचे चेहरे पाहून तर तसं काहीच जाणवत नाही की त्यांच्या जाणीवाच बधिर झाल्या आहेत? गलितगात्र अवस्थेत पडले आहेत बिचारे! काय अवस्था केली आहे या ‘कोरोना’ नावाच्या अतिसूक्ष्म जिवाणूने माणसाची. त्याचा हा अनुभव!


कौतुक आहे सर्व ‘फ्रंटलाईन कोविड वॉरियर्स’चे. त्यांच्या चेहर्‍यावर मला या आठ दिवसांत भीती किंवा चिंतेचा लवलेशही दिसला नाही. या सर्व परिचारिका, निवासी कनिष्ठ डॉक्टर्स, परिचारक, मावशी, सफाई कर्मचारी फक्त ड्युटी म्हणून नाही, तर अभिमानाने व जबाबदारीने काम करित आहेत. प्रेमाने या रुग्णांना खाऊ-पिऊ घालणेसुद्धा हे लोक करतात. ही सगळी हेल्थ केअर वर्कर्सची तरुण पिढी. भविष्याचे स्वप्न पाहणारी. काहींच्या घरी त्यांचे आईवडील, छोटी मुलं आहेत. काहींची तर अजून लग्नही झालेली नाहीत. काहींची ठरली आहेत, पण ‘लॉकडाऊन’ काळात होऊ शकली नाहीत. या सर्वांचे, खरेतर आदरयुक्त कौतुक करताना हे नमूद करावेसे वाटते की, कोविडचा मृत्युदर तसा तीन टक्क्यांपेक्षा कमी असला तरी डॉक्टर्समध्ये तो खूपच जास्त आहे आणि हे प्रमाण अतिशय चिंताजनक आहे. कोविडवर अजून ठोस उपाय सापडत नाही. सरकारी यंत्रणाही हतबल आहे. जगभरात जे कोणी काही ‘ट्रायल्स’ करून प्रसिद्ध करतील, ते सगळे अहवाल इकडचे डॉक्टर्स लगेच वाचतात, शेअर करतात. रोज नवी माहिती, सतत बदलणार्‍या गाईडलाईन्स, रुग्णांचा अमर्याद ओव्हरलोड आणि सोशल मीडियावरच्या खासगी डॉक्टर्स व हॉस्पिटलबद्दलच्या अतिरंजित कथा, या सर्व गोष्टींनी आपले मनोधैर्य खचू न देता, सर्व डॉक्टर्स जमेल तसे काम करित आहेत. त्यात कुठेतरी तरूण होतकरू डॉक्टर्ससुद्धा कोरोनाला बळी पडताहेत. त्याचे दु:ख मन विदीर्ण करते.


दि. २ ऑगस्टला माझी ड्युटी संपली. काय मिळवलं या आठ दिवसांच्या ड्युटीमध्ये?हताशपणा, हतबलता? पाप-पुण्य, नशीब, देवावरचा भरवसा? दु:ख? चिंता? उदासीनता? राग? भीती? छे, उगाच केली का ही ड्युटी? मागील २० वर्षं मी ’Disease treatment' पेक्षा 'Disease prevention'चे काम करते आहे. मधुमेही लोकांना मधुमेहामुळे होणारे इतर आजार होऊ नयेत, यासाठी प्रयत्न करते. त्यामुळे ’Primary' व 'Secondary prevention'साठी काम करायला मला आवडतं.कोविडसाठी पण जनजागृती करावी, मध्यम आजाराची लक्षणे असणार्‍या रुग्णांना प्रोत्साहित करावे, त्यांना मानसिक आधार द्यावा, त्यांच्याकडून काही व्यायाम करवून घ्यावे व त्यांना सगळ्यांना बरे झालेलं पाहावं, अशी माझी कोविडसाठी काम करण्याची कल्पना.आयसीयुतले सगळे रुग्ण गुंतागुंतीचे. बोलण्याच्या किंवा ऐकण्याच्या परिस्थितीत नाहीत. नातेवाईक भेटावयास येऊ शकत नाहीत. तशात एका रुग्णाचा मुलगा पीपीई किट विकत घेऊन आला व त्याने आपल्या आईला फक्त पाच मिनिटे भेटायची परवानगी मागितली. मी व माझ्याबरोबरची सिस्टर, आम्ही त्याला ‘नाही’ म्हणू शकलो नाही. कदाचित ती त्या मायलेकांची शेवटची भेटही ठरू शकते. या अशा नकारात्मक वातावरणात, मला पुन्हा एकदा खात्रीपूर्वक कळले की, माझी ‘सपोर्ट सिस्टिम’ किती भक्कम आहे. घरच्यांनी, नातेवाईकांनी, मित्रमैत्रिणी अशी सगळ्यांनीच काळजी व्यक्त केली. पण, ‘कशाला करतेस ही ड्युटी, सरळ काहीतरी कारण सांगून नाही म्हण,’ असा कोणीच सल्ला दिला नाही. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, मला ड्युटी करायची सक्ती करण्यात आली नव्हती.या काळात सर्व तो सपोर्ट माझ्या पतींनी दिला. अगदी मध्येच आमचा लग्नाचा वाढदिवससुद्धा झाला, तो सुद्धा यावर्षी अविस्मरणीय क्वारंटाईनमधला वाढदिवस म्हणून साजरा (?) केला.आई-बाबांनी पण एवढ्या दिवसांत तब्येतीची एकही तक्रार सांगितली नाही. सगळ्यात जास्त आभार तर माझ्या कामवालीचे मानायला हवे. ती मला चहा, पाणी, जेवण, सगळं अगदी वेळच्यावेळी खोलीबाहेर आणून देत होती.मुलगी आणि होणारा जावई, दोघेही डॉक्टर. कोविड ड्युटीचा पण अनुभव होता. त्यांचाही आधार मिळाला. मुलगा खरे तर विज्ञानाच्या क्षेत्रात आहे, पण विचारले तर तो म्हणाला, “माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे.”



तरीही मी बेचैन होते. असं वाटत होतं की, आपण कमी पडतो आहोत, कुठेतरी चुकतो आहोत. काहीतरी करायला हवे. ड्युटीच्या शेवटच्या दिवशी सरळ घरूनच सगळे ट्रिटमेंट प्रोटोकॉल्स, ऑक्सिजन थेरपीच्या गाईडलाईन्स, ‘प्रोन पोझिशन’चा फोटो, सगळे प्रिंट करून घेतले व आयसीयुच्या भिंतीवर चिकटवले. तुमच्या माहितीसाठी सांगते, कोविड रुग्णांना ’Prone' म्हणजे पालथं (पोटावर) झोपण्याने फायदा होतो. तसेच, या पेशंटना ऑक्सिजन द्यायची जेव्हा गरज असते, तेव्हा व्हेंटिलेटर्सपेक्षा ’HFNC' म्हणजे ’हाय फ्लो नेझल कॅन्यु’लाचा वापर करावा लागतो. हे सगळं कळायच्या आधीच आपल्या SDH मध्ये अद्ययावत व्हेंटिलेटर्स खरेदी केले गेले होते. त्यामुळे आयसीयुत येणार्‍या पेशंटना ’HFNC' ऐवजी आम्हाला व्हेंटिलेटर्सचा वापर करावा लागत होता. खरं तर ’HFNC' मशीनची किंमत व्हेंटिलेटर्सच्या एक चतुर्थांश. का नाही आपण घेऊ शकत? तसेच कोविडच्या एखाद-दुसर्‍या रुग्णामध्ये एक ’Cytokine storm' असा गुंतागुंतीचा प्रकार होऊ शकतो. तो वेळेवर ओळखून ताबडतोब रुग्णाला एक 40-50 हजार रुपये किमतीचे (Tocilizumab) इंजेक्शन द्यावे लागते. ते सरकार का उपलब्ध करुन देत नाही? हे सर्व प्रश्न, मी न राहवून SDHच्या इन्चार्जना व्हॉट्सअपवर पाठवले आणि काय आश्चर्य, थोड्याच वेळात त्यांचा निरोप आला - दोन दिवसांत आपल्याकडे दहा HFNC मशीन्स येत आहेत. पुन्हा थोड्या वेळात समजले की, दोन दिवसांत Tocilizumab इंजेक्शनसुद्धा उपलब्ध होत आहेत. हे तर असं झालं की, आंधळा मागतो एक डोळा अन् देव देतो दोन!



चला, आमची ड्युटी तर संपली, पण शेवट चांगल्या बातमीने झाला. आता एकच कमतरता राहिली आहे- Portable X-Ray. ते झाले की SDHचे आयसीयु बर्‍यापैकी परिपूर्ण होतील. या महामारीमुळे एक मात्र झाले, आपल्या देशाची सरकारी आरोग्ययंत्रणा खडबडून जागी झाली; अन्यथा इतक्या कमी दिवसांत आपल्या येथे सरकारी रूग्णालयात असे अद्ययावत आयसीयु सुरुच झाले नसते.सर्व खासगी डॉक्टर्स सेवा देत आहेत, पण पूर्णवेळ काम करणार्‍या तज्ज्ञ डॉक्टरांची या आयसीयुसाठी नेमणूक झाली, तर आपल्या संपूर्ण रायगड जिल्ह्यातील गोरगरीब जनतेची सोय होईल.माझी ड्युटी तर संपली, पण आता कोरोना संपायची वाट बघते आहे.मोदीजी, अयोध्येत त्या रामरायाला साकडे घाला हो, तोच काय तो आपला तारणहार! ही निरुत्तर, कोविड कहाणी लवकरात लवकर साठा उत्तरा सुफळ संपूर्ण होवो, हीच सदिच्छा!


- डॉ. कीर्ती समुद्र
@@AUTHORINFO_V1@@