अंतर्मुख चित्रकार : सतीश पिंपळे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Sep-2020
Total Views |
Satish pimple_1 &nbs



चित्रकार पिंपळे सरांच्या कलाकृती म्हणूनच निरागस वाटतात. त्यातील रंग, रंगलेपनातील नैसर्गिकता आणि आकारांतील ईश्वरीय अभिव्यक्तीकरण हे स्वयंभू आहे. म्हणूनच त्यांची कलाकृती ही निर्माण केलेली नसते, तर ती निर्माण झालेली असते.

सुमारे चार तपांहून अधिक काळ कलासाधना करणारे तपस्वी-मनस्वी कलावंत सतीश पिंपळे यांचा नागपूरहून फोन आला. ज्येष्ठ चित्रकार माजगावकर यांच्या कलेची ओळख करवून देणारा आपला दै. ‘मुंबई तरुण भारत’मधील लेख वाचला. खूप आवडला. यासाठी की, अचूक वर्णनासह शब्दचित्र मांडलेत. आपल्या लेखासाठी अभिप्राय देणारे अनेक फोन संवाद होत असले तरी ज्येष्ठ चित्रकार ज्याची साहित्यातील शिदोरीही कला निर्मितीचा एक भाग असले, अशा व्यक्तीने फोन करून लेखासाठीचा अभिप्राय कळविला, तर आपल्याला स्वतःला तर आनंद मिळतोच. तथापि, आपल्या लेखनस्वातंत्र्यातील स्वैर शब्दसंचाराला मिळणारा जाणकार प्रतिसाद जरा सुखावून जातोच.


विदर्भातील वर्‍हाड-अकोल्याच्या सुगंधी मातीत जन्मलेल्या आणि निसर्गातील अनेक रंगीत घटकांशी संवाद साधणार्‍या ज्येष्ठ चित्रकार सतीश पिंपळे यांनी फोनवरून शब्दसंवाद साधला होता. बोलण्यातील शब्दरचना त्यांच्या साहित्यिक साधनेचा अंदाज देत होतीच. फार आनंद वाटला. कारण, ज्येष्ठ चित्रकार सतीश पिंपळे यांचे नाव आणि त्यांची कॅन्व्हासला रंगाकारांच्या साहाय्याने बोलायला लावणारी शैली मात्र ज्ञात होतीच. आम्ही काही मिनिटे बोललो. मात्र, फार जुनी ओळख असल्यासारखे जाणवत होते. मग काय... त्या ओळखीच्या सुसंवादाचे रुपांतर या लेखात झाले.


आपल्याला मिळालेला आनंद इतर वाचकांना-कलारसिकांनाही व्हावा, या एकमेव हेतूने चित्रकार पिंपळे यांच्याशी संवाद झाला. ओशोंनी एका व्याख्यानात सांगितले होते, चित्रकार हा इतर कलाकारांच्या तुलनेत फार लवकर मुग्ध होतो. मेडिटेट होतो, अंतर्मुख होतो. अशी स्थिती फक्त साधकाचीच होते. ज्याला एकात्म-एकरूप होता येते, त्याच्याकडूनच दिहीमान कलाकृती निर्माण होत असते. चित्रकार पिंपळे सर हे अकोल्याचे...! सार्‍या जगभर कलासाधनेद्वारा प्रवास करणारे उत्साही चित्रकार! ज्याच्याकडे उमेद असते, उत्साह असतो, तो शरीराने वृद्ध असेल. मात्र, मनाने तरुण असेल. अशा व्यक्तीस सुदृढ दीर्घायुष्यासह सृजनात्मक मनोवेगाची देणगी साक्षात निसर्गदेवता बहाल करीत असतो.


चित्रकार पिंपळे म्हणतात, “जीवनात घडणारे बदल, शरीरात घडणारे बदल, अनेक भावनांची सरमिसळ, अनेक शोध आणि त्या पाठोपाठ येणार्‍या आधुनिकीकरणाच्या गतीला तुम्ही थांबवू शकत नाही. जगभरातील प्रचंड गर्दी आणि गतीला सामोरं जाताना आपण त्यातील एक भाग तर असतोच, पण आपल्या आतील जगाशी संबंध आणि संपर्क धुसर होत गेल्याने आपल्याला विसर पडतो! अगदी स्वच्छ पाणी एखाद्या सरोवरात असणं आणि सूर्यकिरणांसह त्या पाण्याचा तळ तितकाच स्वच्छ दिसावा...”


इतकं पारदर्शक आणि आधुनिक जीवनातील हिंदोळ्याचं अचूक वर्णन चित्रकार पिंपळे यांनी केलेलं आहे. अर्धशतकांचा कलासाधनेचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या रुपाने व्यक्त होतो. हेच त्यांच्या वरील विधानावरून ध्यानात येते.


आज जग कितीही पुढे गेलं आहे, असे वाटत असले तरी सध्याच्या कोरोनाने या जगाच्या पुढे-पुढे जाणार्‍या प्रगतीचा पतंग कसा ढील देऊन काटला आहे, याचं फार समर्पक विश्लेषण चित्रकार पिंपळे यांनी त्यांच्या युट्यूबवरील व्याख्यानांमधून सांगितले आहे. तरुण आणि उदयोन्मुख तीन, तसेच प्रतिथयश चित्रकारांशी संवाद साधताना ते म्हणतात, ‘‘अजून मी विद्यार्थीच आहे.’’ याद्वारे त्यांची नवीन शिकण्याची उमेद तरुणांनाही लाजवते. कुठलीही नक्कल वा कॉपी न करता, जे मनःचक्षूंना दिसते, तेच कागदावर वा कॅन्व्हासवर व्यक्त व्हायला हवे. हे आग्रही मत त्यांच्या व्याख्यानांतून मांडतात. हे सांगताना ते म्हणतात, ‘मन म्हणजे काय? त्यात विचारतरंग कसे निर्माण होतात? वगैरे प्रश्न आता फार महत्त्वाचे नव्हते. आतून वाटतंय ना? तर ते तिथूनच आलं असणार... मनापासून...!’ आणि मनापासून केलेली कुठलीही कृती ही स्मृतिप्रवण असते.


अलीकडे ‘इन्स्टंट फूड’च्या जमान्यात ‘इन्स्टंट सेलिब्रेशन’देखील एक जीवनाचा भाग बनलेला आहे. हा लाक्षणिक आहे, तात्पुरता आहे, हे सांगायला ज्योतिष्याची आवश्यकता नाही. जे आतून येतं, जे मनातील भाव व्यक्त करताना मुहूर्ताची वाट पाहायची वेळ येत नाही आणि जे स्वयंभू असते, ते चिरकाल टिकतं. कारण, ते चिरंजीव असतं.


चित्रकार पिंपळे सरांच्या कलाकृती म्हणूनच निरागस वाटतात. त्यातील रंग, रंगलेपनातील नैसर्गिकता आणि आकारांतील ईश्वरीय अभिव्यक्तीकरण हे स्वयंभू आहे. म्हणूनच त्यांची कलाकृती ही निर्माण केलेली नसते, तर ती निर्माण झालेली असते.


एका ठिकाणी ते रंगकारांविषयी विचार व्यक्त करताना लिहितात. ते लिखाणही त्यांच्यातील आरसा वृत्तीचं निरामय स्वरुपाचं एक शब्दचित्रच वाटतं. ते म्हणतात, “स्केच करायला घेतल्यावर अनेक विषय तर होतेच. पण, काय आणि कुठून सुरुवात करावी, असाही विचार आला. गेल्या ५० वर्षांपासून जरी मी चित्रनिर्मिती करत असलो, तरी कधी कधी हा नवागतासारखा प्रश्न मला पडतो. कितीही केलं तरी ती चित्रकला आहे. आधी नतमस्तक व्हावं लागतं... अर्थात एकदा सुरुवात झाली की, भान राहत नाही...” खरं आहे, जेव्हा भान राहत नाही, तेव्हाच ईश्वर भेटतो. मग कबीराला दोह्यांच्या रुपाने, तर तुक्याला अभंग-ओवीने, गायकाला त्यांच्या आर्त हाकेसाठी निघालेल्या कोमल स्वराने, तर नृत्यकाराला त्याच्या पदन्यासाच्या गिरकीच्या नंतर येणार्‍या नमस्काराने... ईश्वर हा भेटतोच. शिल्पकाराच्या छनी-हातोड्याची जादुई करामत, दगडातून ईश्वर निर्माण करतेच की, अगदी तसंच भान हरखून समोरच्या कॅन्व्हासवर ईश्वरालाच पाहत असतो.


कलाकार कोणताही असो, कोणत्याही वयोगटाचा असो, त्याचा कलाप्रकार कुठल्याही शैली-तंत्र आणि माध्यमांचा सहयोग असो, त्याच्या मनातील भाव शुद्ध, स्वतःचे आणि पारदर्शी असतील, तर निर्माण होणारी कलाकृती ही ईश्वरीय प्रसादच असते...!!


सतीश पिंपळे यांच्या कलाकृती म्हणजे त्यांनी केलेले लहानपणापासूनचे निसर्ग निरीक्षणच होय. मग झाडे, दगड-धोंडे, पक्षी, गुहा, नद्या-नाले, प्राणी अगदी प्रत्येक निसर्गघटक त्यांनी निरक्षिला. प्रत्येक घटकाच्या अंतरंगात त्यांनी डोकवायचा प्रयत्न यशस्वी केला. त्यामुळे त्यांच्या कलाकृतीमधील आकार नैसर्गिकता घेऊनच जन्माला आलेले भासतात. त्यांच्या कलाकृतीमधील रंगयोजना ही ताजीतवानी भासते. त्यांच्या कलाकृतीतील कॅन्व्हासच्या आकाराच्या कित्येक पट व्याप्तीपूर्ण त्यांचे मनातील भावविश्व त्या कॅन्व्हासवर व्यक्त झालेले दिसते. म्हणून त्यांची कलाकृती ही विशालहृदयी वाटते.


दि. ८ जानेवारी, १९५३ला अकोल्याला जन्म झालेले चित्रकार पिंपळे सर यांनी पुण्याला १९७२ साली ‘जीडी आर्ट’ ही पदविका ‘पेंटिंग’मध्ये पूर्ण केली. पुढे लगेचच १९७६ पर्यंत त्यांनी औरंगाबादच्या यशवंत कला महाविद्यालयात कला अध्यापन केले. १० पुरस्कार, १९ प्रदर्शने आणि १९९५ पासून कला प्रात्यक्षिके करण्याचा त्यांचा कलाप्रवास अव्याहतपणे सुरू ठेवताना त्यांनी देश-विदेशात कलापर्यटन केले. अनेक कला संग्राहकांनी त्यांच्या कलाकृती सन्मानपूर्वक संग्रही ठेवलेल्या आहेत.


अकोल्यातील संत भास्कर महाराज आणि संत गजानन महाराज यांच्या मंदिरांचे संकल्पन चित्रकार पिंपळे सरांनी केलेले आहे. तेथील श्रीराम मंदिराची संकल्पनाही त्यांनीच साकारली आहे. ‘अवघा रंग एक झाला’ हे पुस्तक म्हणजे संत वासुदेव महाराज, अकोट यांची माहिती देणारा ग्रंथच होय.


‘अकोला आर्ट अकादमी’च्या स्थापनेतील त्यांचा पुढाकार म्हणजे महाराष्ट्राच्या कला परंपरेचा एक ‘मैलाचा दगड’ ठरेल. अनेक कलाविषयक उपक्रम ते राबवित असतात. नवीन कलाकारांच्या मनामध्ये स्वतंत्र स्वयंभू कलाविश्वास निर्माण करण्यासाठी ते आग्रही प्रयत्न करीत असतात. ज्यांना कलेच्या बद्दलची स्वप्न अधुरी राहिलेली वाटतात, त्यांच्यासाठी त्यांनी ’Relaxation & Expression through Art’ या शीर्षकाने वर्ग सुरू केलेले आहेत.


अशा या सन्यासाची अंतर्मुख होऊन कलासाधना करणार्‍या कलाकारांस दीर्घायुष्यासह सुयश चिंतितो...!

- प्रा. गजानन शेपाळ
@@AUTHORINFO_V1@@