शर्यत बेतालपणाची...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Sep-2020
Total Views |
agralekh_1  H x




दुसरीकडे चित्रपटात काम करणार्‍या एका अभिनेत्रीच्या विधानांवर आज महाराष्ट्राचे गृहमंत्री, शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार, महिला कार्यकर्त्या वगैरे तुटून पडताना दिसतात. पण, सत्ताधार्‍यांना काय सध्या एवढे एकच काम उरले आहे? महाराष्ट्र सरकारसमोर फक्त कंगना राणावतशी सामना कसा करायचा हाच प्रश्न शिल्लक आहे?



अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणात सीबीआय चौकशी करत असून एनसीबीदेखील अमली पदार्थांच्या अनुषंगाने तपास करत आहे. मात्र, सुशांत सिंहच्या मृत्यूपासून अभिनेत्री कंगना राणावत नेपोटिझ्म आणि ड्रग्ज माफियांविरोधात सातत्याने आवाज उठवत असून कदाचित यामुळेच मुंबईच्या रस्त्यांवर तिच्या बदनामीची मोहीमही चालवण्यात आली. 'The Walk of Shame' म्हणत मुंबईच्या रस्त्यांवर कंगना राणावत, भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांची नावे टाकत ग्राफिटी किंवा भित्तीचित्रे रंगवण्यात आली. त्यात कसल्यातरी ‘आझादी’चाही उल्लेख होता. दरम्यान, कंगना राणावतने मुंबईचा एक भाग असलेल्या बॉलीवूडमधील ड्रग्ज माफियांचा भांडाफोड करण्यास तयार असल्याचे सांगितले होते. त्यावर भाजप आमदार राम कदम यांनी कंगना राणावतला सुरक्षा पुरवण्याची मागणी महाराष्ट्र सरकारकडे केली होती. मात्र, त्यावर प्रतिक्रिया देताना कंगनाने, “मला माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांचीच भीती वाटते,” असे म्हणत त्यांची सुरक्षा नाकारली. इथूनच वादाला तोंड फुटले आणि नंतर दोन्ही बाजूकडून बेतालपणाची शर्यत लागल्यासारखी एकामागोमाग वक्तव्ये सुरु झाली. कंगना राणावतने मुंबई पोलिसांचा अपमान केल्याची आरोळी ठोकत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तिला मुंबईत येऊ नको, अशी धमकी दिली. संजय राऊत यांच्यानंतर ‘मुख्यमंत्री आमचाच’मुळे डोक्यात हवा गेलेले शिवसेनेचे नेते-कार्यकर्तेही कंगना राणावतविरोधात बडबडू लागले. संजय राऊत यांनी दिलेली धमकी, त्याआधी मुंबईच्या रस्त्यांवरील ग्राफिटीमुळे संजय राऊतांवर कडी करण्यासाठी कंगना राणावतनेही मुंबईची अवस्था पाकव्याप्त काश्मीरसारखी झाल्याचे म्हटले. तिथून पुढे मात्र, वाचाळतेसाठी टपून बसलेल्या संजय राऊत यांनी नाही नाही ते बरळायला सुरुवात केली. त्यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही चांगलीच साथ दिली आणि कंगना राणावतला मुंबईसह महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नसल्याचे ते म्हणाले. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी कंगना राणावत मुंबईत आल्यास शिवसेनेच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही, अशी धमकी दिली. त्याबरोबरच समाज माध्यमांमध्ये शिवसैनिकांकडून धमक्यांचे सत्र सुरु झाले, तर काही ठिकाणी कंगना राणावतच्या पोस्टरला चपला-बुटांनी तुडवले गेले.


दरम्यान, कंगना राणावतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. मात्र, तिच्यावर ही वेळ कोणी आणली? आज मराठी अस्मिता जागी झालेल्यांना व मुंबई पोलिसांच्या शौर्याच्या गाथा सांगणार्‍यांना मानखुर्दमधली करिश्मा भोसले आठवते का? तीही मराठीच मुलगी होती आणि तिनेही सत्ताधारी शिवसेनेच्या ताब्यातील मुंबई महानगरपालिका व मुंबई पोलिसांकडेच मशिदींवरील भोंगे हटवण्याची मागणी केली होती. तेव्हा कोण तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते? की कंगना राणावतसारख्यांनी शब्द काढला तरच मुंबई व मराठीची काळजी शिवसेनेला वाटते? तसेच स्कॉटलंड यार्डशी बरोबरी करणार्‍या मुंबई पोलिसांनी आतापर्यंत सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी साधा एफआयआर का दाखल केला नव्हता? आज सीबीआय जो तपास करत आहे आणि सुशांत सिंहच्या मृत्यूप्रकरणाचे धागोदोरे ड्रग्ज माफियांपर्यंत जात आहेत, तर ते करण्यापासून मुंबई पोलिसांना कोणी रोखले होते? इतकेच नव्हे तर बॉलीवूडमध्ये कोणती गँग सक्रिय आहे आणि तिथे काय चालते, याच्या अनेक कथा सांगितल्या जातात. अगदी अंडरवर्ल्डपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील अंमली पदार्थांचे तस्कर बॉलीवूडमध्ये वावरतात, हे उघड गुपित आहे. पण, मुंबई पोलिसांनी कधी त्याला आळा घालण्याचे काम केले का? तेव्हा मुंबईची किंवा महाराष्ट्राची अस्मिता दुखावली जात नव्हती का? की सगळे धंदे चालू द्या, पण त्याविरोधात कोणी बोलले तरच आमच्या अभिमानाला वगैरे ठेच लागते, असे शिवसेनेला म्हणायचे आहे? तसेच कंगना राणावतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणे चूक आहेच, पण तिला त्याच पद्धतीच्या धमक्या देणे कसे बरोबर असू शकेल?


‘मुंबईत येऊ नको’च्या धमक्यांनंतर कंगनाने ‘मी कोणाच्या बापाला घाबरत नाही,’ असे म्हणत मुंबईत पाऊल ठेवणार असल्याचे सांगितले. त्यावरही शिवसेना खासदार संजय राऊत यांनी “मुंबई मराठी माणसाच्या बापाचीच, ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी आपला बाप दाखवावा. शिवसेना अशा महाराष्ट्रशत्रूंचे श्राद्ध घातल्याशिवाय राहणार नाही,” असे ट्विट केले. इथेच शिवसेना आता या प्रकरणात एक-दुसर्‍याचा बाप काढत आणि मराठीचे नाव घेत भावनिक राजकारण करत असल्याचे दिसते. कारण, कंगना राणावतने तिला जे कोणी मुंबईत येऊ नको किंवा इथे आल्यावर हाणामारीच्या धमक्या देत होते, त्यांना मला रोखायचे तर रोखून दाखवा, असे आव्हान दिले होते. त्याचा मराठी माणसाशी कसलाही संबंध नाही. इतकेच नव्हे तर कंगना राणावतने शिवसेनेवर टीका केली, तरी ती टीका महाराष्ट्रावर केल्यासारखे होत नाही. कारण, लोकशाही प्रणालीतील अन्य राजकीय पक्षांप्रमाणेच शिवसेनाही एक राजकीय पक्ष असून त्याच्यावर टीका करण्याचा अधिकार सर्वांना आहे. तसेच गेली पाच-सहा महिने राज्यात कोरोना नियंत्रणासाठीची यंत्रणा पुरती ढासळली, अनेक रुग्णांना उपचार मिळाले नाहीत, रुग्णवाहिका मिळाल्या नाही, त्यामुळे कित्येकांचे प्राणही गेले. विदर्भात पूर आला, होतं नव्हतं सारंच वाहून गेलं, तेव्हा शिवसेनेला मराठी माणूस आणि मराठी अस्मिता आठवली नाही का? गेल्याच आठवड्यात गरीब जनतेसाठी रेशनवर देण्यासाठीच्या ८० कोटींच्या तांदळाच्या काळा बाजाराची माहिती उघड झाली, तेव्हा सत्ताधार्‍यांना हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान वगैरे वाटले नाही का? महाराष्ट्रातील जनतेच्या तोंडातला घास काढून कोणीतरी भ्रष्टाचार करतो, तेव्हा त्यांची अस्मिता दुखावली नाही का? की फक्त कंगना राणावतने तोंड उघडले तरच मानभंग होतो? दुसरीकडे चित्रपटात काम करणार्‍या एका अभिनेत्रीच्या विधानांवर आज महाराष्ट्राचे गृहमंत्री, शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार, महिला कार्यकर्त्या वगैरे तुटून पडताना दिसतात. पण, सत्ताधार्‍यांना काय सध्या एवढे एकच काम उरले आहे? महाराष्ट्र सरकारसमोर फक्त कंगना राणावतशी सामना कसा करायचा हाच प्रश्न शिल्लक आहे? राज्य सरकारमधील व सरकारशी संबंधितांच्या प्रतिक्रिया पाहून तर तसेच वाटते. लोकशाहीत सरकार जनतेला उत्तरदायी असते आणि जनतेच्या समस्यांची सोडवणूक करणे, हे त्यांचे कर्तव्य असते. पण, ते करायचे सोडून इथे गृहमंत्र्यांपासून सारेच कंगना राणावत प्रकरणावर बोलताना दिसतात. आता राज्य सरकारने कारभार सुधारला तर ठीक नाहीतर जनताच एक ना एक दिवस हा बेताल तमाशा उलथवेल.






@@AUTHORINFO_V1@@