डॉक्टरांना सहा महिने उलटूनही मिळत नाहीत चांगल्या दर्जाची PPE किट्स
मुंबई : महाराष्ट्रातील कोरोना योद्धे म्हणून काम करणाऱ्या डॉक्टर, आरोग्य सेविका, परिचिका आणि इतर कर्मचाऱ्यांची काळजी घेण्यास प्रशासन कमी पडत असून एकूण कामगारांपैकी १६ टक्के आरोग्य कर्मचारी कोरोनाशी झुंज देत आहे. आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कोरोना लागण होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावरील राज्य बनले आहे. या बाबतीत तेलंगणाचा पहिला क्रमांक येतो. (Corona infection affects 16% of health workers)
गुरुवारी केंद्र सरकारने राज्यांकडे आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याविषयक आकडेवारी मागितली आहे. महाराष्ट्र व तेलंगणा वगळता अन्य राज्य व केंद्रशासित प्रदेशांचीही आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे. त्यात दिल्ली १४ टक्के, कर्नाटका १३ टक्के, पुद्दुचेरी १२ टक्के आणि पंजाब ११ टक्के, अशी नोंद आहे. या संदर्भात राज्यांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे, तसेच ही टक्केवारी तातडीने कमी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
"रुग्णालयांमध्ये डॉक्टर आणि आरोग्य क्षेत्रातील इतर कर्मचाऱ्यांना होणारी कोरोनाची लागण ही चिंताजनक आहे. आरोग्य मंत्रालयाने याबद्दल राज्यांना प्रश्न विचारला आहे. कोरोना रुग्णांची सेवा केल्याने आणि रुग्णालयात कोरोना रोखण्यासाठी योग्य प्रतिबंधात्मक यंत्रणा नसल्याने ही वेळ आली आहे का ?, कोरोना रुग्णाची सुश्रूशा करत असताना मार्गदर्शक तत्व प्रणालीनुसार नियम पाळण्यात येतात का ?", असा प्रश्न राज्यांना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी विचारला आहे.
दोन आरोग्य सेवकांमध्ये बडी सिस्टमचा (buddy system) वापर केला जावा, संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी उपाययोजना करणे, तसेच कुणीही कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यास संपर्कात आलेल्यांनी इतरांनाही सावध करणे गरजेचे आहे, असा सल्लाही देण्यात आला आहे.
सहा महिने उलटूनही मिळत नाहीत चांगल्या दर्जाची PPE किट्स
आयएमए महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी आरोग्य सेवकांना मिळणाऱ्या सुविधांबद्दल केंद्राकडे तक्रार केली आहे. राज्यातील आरोग्य सेवकांना अद्याप कोरोना संसर्ग रोखण्यासाठी चांगल्या दर्जाची संसाधने उपलब्ध नसल्याची व्यथा त्यांनी मांडली आहे. फिजिशिअन्सना अद्याप चांगले पीपीई किट्सही उपलब्ध नसल्याचे आणि पीपीई किट्सच्या दरांच्या किंमती नियंत्रणात नसल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्रातील आकडेवारी धक्कादायक !
महाराष्ट्रात २९ ऑगस्टच्या आकडेवारीनुसार एकूण ४२७४ डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ४०८ आरोग्य सेवक कोरोना योद्ध्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक आयएमएने दिली आहे. आरोग्य सेवकांमध्ये कोरोना संसर्गानंतर मृत्यूदर हा सर्वाधिक ९,५ टक्के इतका आहे. दरम्यान, अद्याप सरकारकडे किती आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे याची अधिकृत आकडेवारीही नोंद नसल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना योध्यांच्या जीवाला असेलेला धोका टाळण्यासाठी ही नोंद आवश्यक असल्याचेही या बैठकीत सांगण्यात आले.
महाराष्ट्रात भयाण चित्र
राज्यातील आरोग्य सेवकांची स्थिती भयाण असल्याचे यावरून दिसून येत आहे. एकूण देशातील कोरोना रुग्णांपैकी २४.७ टक्के रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश आदी राज्यांत एकूण ६० टक्के रुग्ण आहेत. (Corona infection affects 16% of health workers)