फेसबुकचे राष्ट्रवादाला ‘डिसलाईक’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Sep-2020   
Total Views |
facebook_1  H x




फेसबुक भाजपच्या सांगण्यावरून ‘हेटस्पीच’ला प्रोत्साहन देते, या आरोपांविषयी संसदेच्या माहिती व तंत्रज्ञानविषयक स्थायी समितीची बैठक अपेक्षेप्रमाणे अगदीच वादळी ठरली. मात्र, या वादळाने छप्पर उडविले ते काँग्रेसचे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, समाजमाध्यमांमध्ये राष्ट्रवादी विचार ‘डिसलाईक’ करण्याचे षड्यंत्र कसे पार पाडले जात होते, ते समोर आले. त्यासाठी काँग्रेसचे आभारच मानायला हवेत.


घटना क्र. १ - काही दिवसांपूर्वी बंगळुरूमध्ये ‘शांतीप्रिय’ समुदायाच्या नागरिकांनी दंगल आणि जाळपोळ घडविली. त्यामध्ये सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, पोलिसांवर हल्ला करणे असे त्यांचे नेहमीचे प्रकार झाले. त्यासाठी कारण ठरली ती एक फेसबुक पोस्ट. काँग्रेस आमदाराच्या एका भावाने त्याच्या वैयक्तिक फेसबुक खात्यावरून मुस्लीम धमीर्र्यांविषयी काहीतरी आक्षेपार्ह पोस्ट केली, तसे करणे चुकीचेच होते. मात्र, त्यावरून ‘शांतीप्रिय’ समुदायाच्या लोकांनी थेट दंगलच सुरू करणेही योग्य नव्हते. अर्थात, त्यांच्याकडून समजुतदारपणाची अपेक्षा करणेही म्हणा चुकीचेच. मात्र, या सर्व प्रकाराविषयी एरवी समाजमाध्यमांवर हिंदू समुदायातील कोणी काही लिहिले, तर त्याविषयी जग डोक्यावर घेणारे पुरोगामी, काँग्रेस आणि डाव्या पक्षांचे नेते, कार्यकर्ते अगदी शांत होते. आक्षेपार्ह पोस्ट लिहिणार्‍याबद्दल ते काही बोलले नाही आणि दंगल करणार्‍यांबद्दलही ते काही बोलले नाही. त्यांनी याचे खापर फोडले ते फेसबुक आणि सत्ताधारी भाजपवर.


घटना क्र. २ - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकताच भाजपवर आणि फेसबुकवर एक आरोप केला. त्यासाठी त्यांनी अमेरिकेतील एका इंग्रजी वृत्तपत्रातल्या लेखाचा हवाला दिला. फेसबुकवर सध्या सत्ताधारी भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक उजव्या विचारसरणीचा प्रसार करणारा, धार्मिक तेढ वाढविणारा मजकूर प्रसारित केला जातो. त्यामुळे देशातील वातावरण भयावह वगैरे झाले आहे, असा आरोप राहुल गांधींनी केला. आता राहुल गांधींनीच हा आरोप केला म्हटल्यावर पुरोगामी टोळी जागी झाली आणि पुन्हा एकदा अभिव्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात आल्याचा आणि देशातील वातावरण असहिष्णु बनल्याच्या बोंबा मारायला सुरुवात झाली. त्यामध्ये यावेळी प्रथमच फेसबुकवर भाजपधार्जिणा असल्याचा आरोप करण्यात आले हे विशेष. कारण, ती एका मोठ्या षड्यंत्राची सुरूवात होती.


वरवर पाहता, या दोन्ही घटनांमध्ये परस्परसंबंध असल्याचे जाणवणार नाही. मात्र, त्यानंतर जी घटना घडली, त्यावरून समाजमाध्यमांमध्ये उजवा अथवा राष्ट्रवादी विचार ‘डिसलाईक’ करण्याचे षड्यंत्र कसे पार पाडले जात होते, ते समोर आले. त्यामुळे सत्ताधारी भाजपसाठी लावलेल्या सापळ्यात काँग्रेसच पुन्हा अलगद अडकली.


तर झाले असे की, यावेळी काँग्रेसने केवळ आरोपच केले नाहीत, तर भाजपला दोषी ठरविण्याची पूर्ण तयारीही केली. त्यासाठी काँग्रेसचे अभ्यासू खासदार शशी थरूर अध्यक्ष असलेल्या संसदेच्या माहिती व तंत्रज्ञानविषयक स्थायी समितीचा वापर करण्याचे ठरविण्यात आले. त्यासाठी थरूर यांनी आपल्या अधिकारांचा वापर करून फेसबुकचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक अजित मोहन यांना समितीपुढे हजर राहण्याचे समन्स बजावले. त्यावरून भाजपचे तेवढेच ‘अभ्यासू’ खासदार आणि समितीचे सदस्य निशिकांत दुबे यांनी त्यास आक्षेप घेतला. यावरून थरूर आणि दुबे यांच्यात शाब्दिक चकमकही झाली होती. मात्र, थरूर अजित मोहन यांना समितीपुढे बोलाविण्याच्या निर्णयावर ठाम होते. कारण, समितीपुढे फेसबुकच्या अधिकार्‍यांकडून त्यांचे भाजपशी असलेले संबंध वदवून घ्यायची पूर्ण तयारी थरूर यांनी केली होती. दरम्यानच्या काळात मग केंद्रीय कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांनी फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांना पत्र लिहून पक्षपात होत असल्याचे त्यात नमूद केले होते. त्याचप्रमाणे काँग्रेसचे संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल आणि तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन यांनीही फेसबुकला पत्र लिहून वातावरणनिर्मिती चालविली होतीच.


अखेर संसदीय समितीच्या बैठकीचा दिवस उजाडला. बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ही बैठक पार पडली. जवळपास तीन ते साडेतीन तास चाललेली ही बैठक अपेक्षेप्रमाणे अगदीच वादळी ठरली. मात्र, या वादळाने छप्पर उडविले ते काँग्रेसचे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आरोपांची पुरती धुळधाण या बैठकीत झाली आणि काँग्रेस पुरती उघडी पडली. बैठकीत नेमके काय घडले, याविषयी अतिशय विश्वसनीय सूत्रांशी संवाद साधला असता त्यांनी बैठकीतली वादळी परिस्थिती अगदी इत्यंभूत कथन केली.

बैठकीसाठी आरोपांचा भरपूर दारुगोळा घेऊन आलेल्या शशी थरूर यांनी आपल्या खास शैलीत बोलण्यास प्रारंभ केला. त्यांनी फेसबुक ‘हेटस्पीच’ला देत असलेल्या प्रसिद्धीचा आणि विरोधी पक्षाचा आवाज दाबला जात असल्याचा मुद्दा फेसबुकच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे मांडला. त्यास जोरदार आक्षेप घेतला तो भाजपच्या एका अत्यंत ‘अभ्यासू’ खासदाराने. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, त्या ‘अभ्यासू’ खासदारांनी फेसबुकचे भारतातील अधिकारी आणि काँग्रेस, डावे पक्ष यांचा संबंध अगदी पुराव्यानिशी मांडला. अधिकारी वर्गांमध्ये डाव्या विचारांशी आणि काँग्रेससोबत घनिष्ठ संबंध असल्याचे पुरावेच बैठकीत सादर करण्यात आले. काँग्रेस आणि डाव्या विचारांच्या या मंडळींकडून जाणीवपूर्वक राष्ट्रवादी विचारांची गळचेपी केली जाते. राष्ट्रवादी विचारांच्या लिखाणावर बंधने आणणे, तसे लिखाण करणार्‍यांच्या फेसबुक खात्यांवर बंदी आणणे, बंधने आणणे असे प्रकार केले जातात. त्यासाठी फेसबुकचे गतवर्षी राष्ट्रवादी विचारांच्या तब्बल ७०० ते ८०० फेसबुक पेजेस, अकाऊंट बंद केल्याचे पुरावे समोर मांडण्यात आले.


समितीचे अन्य सदस्यही मग आक्रमक झाले आणि त्यांनीही फेसबुकवर प्रश्नांचा भडिमार करायला सुरूवात केली. अर्थात, प्रश्न अतिशय नेमके आणि थेट असल्याने त्याचे उत्तर देणे फेसबुकला जमले नाही. एका सदस्याने ‘जय श्रीराम’ म्हणणे हे फेसबुकच्या धोरणानुसार जातीय तणाव वाढविणारे आहे का, असा थेट सवाल केला. कारण, अनेक वेळा ‘जय श्रीराम’ ही असे लिहिलेल्या कमेंट्स फेसबुकने हटविल्याच्या अथवा ते लिहिणार्‍या व्यक्तीच्या फेसबुक खात्यावर निर्बंध आणल्याच्या घटना घडल्या आहेत. माजी केंद्रीय मंत्री असलेल्या एका सदस्याने फेसबुकसाठी फॅक्ट चेक करणार्‍या आठ संस्था या काँग्रेस आणि डाव्या विचारांच्या असल्याचे सांगितले. त्यासाठी त्यांनी स्वत:च्याच एका तक्रारीचे उदाहरण दिले. त्या सदस्याने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या ‘आरपार की लढाई’ या भाषणाविरोधात अनेकदा तक्रार करूनही फेसबुकने ते भाषण हटविले नसल्याचे सप्रमाण दाखवून दिले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, समितीच्या सदस्यांनी फेसबुकचे अजित मोहन यांचा काँग्रेसशी निष्ठा दाखविणारा भूतकाळ आणि वर्तमानकाळ बैठकीत मांडला. त्यामुळे बैठकीपूर्वी आक्रमक असणार्‍या थरूर यांनी बैठकीमध्ये शांत बसणेच पसंत केले. कारण, ही बैठक त्यांनी बोलाविली होती ती भाजपवर खापर फोडण्यासाठी, पण झाले मात्र भलतेच!


उजवा राष्ट्रवादी विचार मांडणार्‍यांवर निर्बंध आणणे हे फेसबुकचे धोरण काही नवे नाही. उजव्या विचारांच्या प्रसारमाध्यमांच्या मजकुरावरही फेसबुक अनेकदा विनाकारण निर्बंध आणत असते. त्यामुळे या प्रसारमाध्यमांचा मजकूर लोकांपर्यंत पोहोचण्यावर बंधने येतात. त्यासाठी कारण दिले जाते ते फेसबुकच्या कथित ‘कंटेट मॉडरेटिंग’चे. मात्र, फेसबुकसाठी ‘कंटेट मॉडरेटिंग’ करणारी मंडळी ही स्वत: डाव्या अथवा काँग्रेस विचारसरणीची आहेत. त्यामुळे फेसबुकवर जरा चौकसपणे नजर टाकल्यास डाव्या विचारांची पेजेस, अकाऊंट्स, डाव्या विचारांचा, काँग्रेस विचारांचा प्रसार करणारा मजकूर कितीही द्वेषमूलक असला तरी त्यावर कारवाई होत नाही. हे धोरण ‘सुधारित नागरिकत्व कायद्या’वरून (सीएए) देशभरात वातावरण तापलेले असताना बघावयास मिळाले होते. त्या काळात ‘सीएए’विषयी सकारात्मक पोस्ट तातडीने उडविल्याचे प्रकार घडले होते. फेसबुकच्या या पक्षपाताविरोधात अनेक दिवसांपासून बोलले जात होते, मात्र त्याकडे लक्ष दिले जात नव्हते. मात्र, काँग्रेसने तशी संधी उपलब्ध करून दिली आणि राष्ट्रवादी विचारांचे फेसबुकला असलेले वावडे त्यानिमित्ताने पुढे आले. त्यामुळे खरे तर काँग्रसचे आभारच मानायला हवेत.



@@AUTHORINFO_V1@@