सावधानता हवीच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Sep-2020
Total Views |
Corona_1  H x W






जागतिक महामारी ठरलेल्या कोरोनाने सर्वत्र उच्छाद मांडला आहे. कधी तो खो-खो खेळतो, कधी अजगरासारखा सुस्त पडून राहतो, पण शिकार आवाक्यात येताच त्याच ताकदीने विळखाही घालतो. मागील तीन दिवसांच्या रुग्णसंख्येच्या आकडेवारीवर नजर टाकली तर मुंबईसह राज्यभरात चिंताजनक परिस्थिती असल्याचे निदर्शनास येत आहे. हा लोकांचा बेफिकीरपणा म्हणावा की राज्य शासनाच्या गलथान कारभाराचा नमुना म्हणावा, असा प्रश्न निर्माण होणे साहजिकच आहे. पुण्यात पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या निधनाने राज्य शासनाच्या गलथान कारभाराचे पितळ उघडे केले आहे. पत्रकार हा कोरोना योद्धाच आहे, पण त्या योद्ध्याला कोरोनाने विळखा घालताच त्याच्या सुटकेसाठी अक्षम्य दुर्लक्ष झाले. राज्य शासनाच्या गलथापणामुळेच त्याचा मृत्यू झाला. पुण्यात रुग्णसंख्या मुंबईच्या बरोबरीने होत असताना कोरोनाला आळा घालण्यासाठी ‘जम्बो कोविड उपचार सेंटर’ उभारण्यात आले. उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मोठा गाजावाजा करत त्याचे उद्घाटनही करण्यात आले. पण, तीन-चार दिवसांतच त्याचे पितळ उघडे पडले. त्या रुग्णालयात व्हेंटिलेटर, आयसीयु बेड यांची कमतरता, तर रुग्णवाहिकेचा पत्ताच नव्हता. त्यामुळे रायकरसारख्या कोरोना योद्ध्याचा मृत्यू झाला. अनागोंदी कारभाराचे असे किती बळी जातील, याची चिंता आहे. पावसाचा हंगाम संपला असे वाटत असतानाच पुन्हा मुसळधार पाऊस पडावा, नद्या-नाल्यांना पूर यावा आणि नागरिकांची मने चिंतेने ग्रासून जावीत, तसे कोरोनाच्या बाबतीत झाले आहे. मे-जून महिन्यात राज्यभरात हैदोस घालणारा कोरोना आता माघार घेणार असे वाटावे इतकी रुग्णसंख्या कमी कमी होत असताना गेल्या दोन-तीन दिवसांत पुन्हा कोरोनाने उसळी घेतली आहे. कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता एकप्रकारे हा रुग्णांचा पूर वाटावा, अशी सध्याची चिंताजनक परिस्थिती आहे. मुंबईत गुरुवारी दिवसभरात १,५२६ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर राज्यात १८,१०५ रुग्ण आढळले. त्यामुळे रुग्णसंख्येपेक्षा बरे होणार्‍या रुग्णांची संख्या जास्त असल्याचा बडेजाव मिरवणार्‍यांचा आवाज सध्या दबला गेला आहे. प्रश्नकर्त्या जनतेला आश्वासन हेच शासनाचे उत्तर असेल, त्यामुळेच कोरोना आपल्यासोबत आहे, हे पक्के लक्षात ठेवून लोकांनीच आता सावधानता बाळगायला हवी.


चाचण्या वाढवा!


मुंबईसह राज्यात रुग्णवाढ होत असताना चाचण्यांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. आजघडीला राज्यात ४२ टक्के चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत, तर मुंबईत १४ टक्के चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. कोरोना आटोक्यात येत असल्याचे राज्य शासन आणि पालिका प्रशासन म्हणत असले तरी तो वाढत आहे, हे कोरोना रुग्णसंख्येवरून लक्षात येईल. त्यामुळे चाचण्यांचे प्रमाण कमी न ठेवता ते वाढविणे आवश्यक आहे. मुंबईत जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये केवळ १४ टक्के अधिक चाचण्या करण्यात आल्या. हीच संख्या राज्याच्या बाबतीत ४२ टक्के आहे. त्यामुळे मुंबईत तातडीने चाचण्यांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. मुंबईत जुलै महिन्यात प्रतिदिन चाचण्यांची संख्या ६,५७४ होती, ती ७,७०९ पर्यंत वाढविण्यात आली आहे. ही वाढ फक्त १४ टक्के आहे. जुलैमध्ये राज्यात प्रतिदिन चाचण्या ३७,५२८ इतक्या झाल्या, ती संख्या वाढून ऑगस्टमध्ये दररोज ६४,८०१ इतकी झाली. ही वाढ ४२ टक्के आहे. राज्यात सध्या २८५ शासकीय, तर ८४ हजार, ३६९ खासगी ‘कोविड-१९’ तपासणी प्रयोगशाळा कार्यरत आहेत. सध्या महाराष्ट्रात उपचार घेत असलेल्यांमध्ये ८० टक्के हे लक्षणे नसलेले आहेत. १५ टक्के मध्यम स्वरूपाचा प्रादुर्भाव असलेले आणि पाच टक्के गंभीर स्वरूपाचे रुग्ण आहेत. ज्यांच्यात लक्षणे नाहीत, त्यांच्या शरीरातील ‘न्यूट्रिलायझिंग अ‍ॅण्टिबॉडीज’नी त्याच्यावर मात करून त्या विषाणूला मारलेही असेल. परंतु, कोरोना चाचणीच्या माध्यमातून त्याचे अचूक पद्धतीने निदान करू शकतो. अ‍ॅण्टिबॉडीज सर्वेक्षणाच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे. आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी या सर्वांना अ‍ॅण्टिबॉडीज चाचणी महत्त्वाची आहे. अ‍ॅण्टिबॉडी चाचणीच्या माध्यमातून संसर्ग केव्हा झाला, होऊन गेला का, की आता लगतच्या काळात झाला याबाबी कळतात. एखादा रुग्ण ‘पॉझिटिव्ह’ आहे की ‘निगेटिव्ह’ हे अ‍ॅण्टिबॉडी चाचणीतून समजत नाही. साधारणतः ‘अ‍ॅन्टिजेन’ व ‘आरटीपीसीआर’ या कोरोना निदान चाचण्या आहेत. ‘आरटीपीसीआर’ चाचणीला ‘गोल्ड स्टॅण्डर्ड टेस्ट’ही म्हटले जाते. तेव्हा, या चाचणीची संख्या वाढविणे आवश्यक आहे.


- अरविंद सुर्वे




@@AUTHORINFO_V1@@