संसदेत दांडी, रस्त्यावर मांडी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Sep-2020   
Total Views |


Farmers Bill_1  

 




कृषी विधेयकांवरून अपेक्षेप्रमाणे काँग्रेसने शेतकर्‍यांना सरकारविरोधी भडकविण्याचा अयशस्वी प्रयत्न करून पाहिला. काँग्रेसला वाटले, काहीशा कार्यकर्त्यांसह आपण रस्त्यावर उतरलो, मोदी सरकारविरोधी चार घोषणा दिल्या, जाळपोळ केली की, शेतकरी बांधवही इरेने पेटून उठतील. हातात काँग्रेसचा झेंडा घेऊन दिल्लीवर चाल करतील. पण, यापैकी काहीएक झाले नाही. पंजाब असो वा हरियाणा, शेतकर्‍यांच्या नावाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनीच आंदोलनाचा दिखावा केला अन् इंडिया गेटवर ट्रॅक्टर भस्मसात करण्याच्या उपद्रवातून स्वत:चेच ‘हात’ पोळून घेतले. कारण, जो ट्रॅक्टर पंजाबच्या आंदोलनात जाळण्याचा प्रयत्न केला, तोच ट्रॅक्टर पुन्हा दिल्लीला आणून जाळण्याचा खटाटोप काँग्रेसींनी केला आणि त्यांचाच डाव त्यांच्यावर उलटला. खरं तर आपल्या कष्टातून, घामातून, पै अन् पै जोडून, शक्य नसल्यास कर्ज काढून शेतकरी बांधव ट्रॅक्टर खरेदी करतात. पण, काँग्रेसने केवळ आंदोलनापूर्वी काही दिवस हा ट्रॅक्टर पंजाबच्या एका शेतकर्‍याकडून खरेदी केला. पंजाब युथ काँग्रेसचे चिटणीस संदीप भुल्लर यांच्या नावाने हा ट्रॅक्टर खरेदी करण्यात आला. आधी अंबाला-पटियाळा सीमेवर हा ट्रॅक्टर जाळल्यानंतर काही दिवसांनी तोच ट्रॅक्टर काँग्रेसचे कार्यकर्ते दिल्लीत घेऊन आले आणि त्यांनी हा तमाशा केला. पण, काँग्रेसचा हा आगीशी खेळ त्यांनाच चटके देऊन गेला. कृषी विधेयकांवर संसदेत चर्चा होत असताना, अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच सोनिया गांधींच्या उपचाराचे कारण देत मायलेक परदेशी रवाना झाले. त्यामुळे संसदेत चर्चेला दांडी मारायची अन् नंतर रस्त्यावर मांडी ठोकून सरकारच्या नावाने बोटे मोडत विरोध करायचा, हीच काँग्रेसची जुनी खोड. पण, देशात आधीच महामारीचे वातावरण असताना, ते अधिकाधिक सरकारच्या हाताबाहेर कसे जाईल, यासाठीच काँग्रेसचा ‘हात’ सारखा शिवशिवतो. मग तो सीमेवर लढणार्‍या जवानांचा मुद्दा असो, वा अन्नदात्या किसानांचा, पंतप्रधानांनीही म्हटल्याप्रमाणे ‘जे जे देशहिताचे, ते ते काँग्रेसच्या विरोधाचे’ हे वारंवार सिद्ध झाले आहे. परंतु, नेतृत्वहीन, दिशाहीन झालेल्या काँग्रेस पक्षात जेव्हा कधी गांधी घराण्याव्यतिरिक्त अध्यक्षपदाची चर्चा होते, तेव्हा तेव्हा ‘हात’ आपसूकच आखडता घेऊन मूठ घट्ट झाकली जाते आणि ‘हात’ असूनही तो निरुपयोगीच ठरतो.
 
‘प. बंगाल’ नव्हे, ‘पो. बंगाल’
 
‘पश्चिम बंगाल’ नव्हे, तर या राज्याला ‘पोलीसनियंत्रित बंगाल’ म्हणण्याची वेळ आली आहे. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल जगदीप धनखड यांच्यातून विस्तवही जात नाही. बॅनर्जींना वाटते राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या अधिकारकक्षेत अतिक्रमण करत असून त्यांनी गपचूप राजभवनात नामधारी ‘रबर स्टॅम्प’ म्हणून पडून राहावे. पण, धनखड यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती सुधारली नाही, तर राज्यात ‘कलम १५४’ लागू करून, “राज्याची सूत्रे राज्यपालांना हाती घ्यावी लागतील,” असा इशारा देत दीदींनाच सुनावले आहे. जुलै २०१९ पासून जगदीप धनखड यांनी प. बंगालचे राज्यपाल म्हणून कार्यभार स्वीकारला. पण, आता एक वर्षांहून अधिक काळ लोटला तरी राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीत ‘तृण’मात्रही फरक पडलेला नाही. राज्याची पोलीस यंत्रणा ही तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांप्रमाणेच राज्यात कार्यरत आहे. याविषयी राज्याचे पोलीस महासंचालक वीरेंद्र यांना राज्यपालांनी तब्बल तीन वेळा याविषयी स्पष्टीकरण देण्याबाबत राजभवनात बोलावले. पण, महासंचालकांनी राज्यपालांची एकदाही भेट घेतली नाही. एवढेच नाही, तर यासंबंधी राज्यपालांनी महासंचालकांना पाठवलेल्या पत्रावरही आम्ही कायद्यानुसार राज्याची परिस्थिती हाताळण्यासाठी कटिबद्ध आहोत,’ असे एक वाक्याचे त्रोटक उत्तर देऊन राज्यपालांचा अप्रत्यक्ष अपमान करण्यात आला. राज्यपालांनी पोलीस महासंचालकांना पत्र पाठवल्याच्या रागातून ममतादीदींनी राज्यपालांना संविधानाच्या चौकटीत राहून जबाबदारी निवर्हनाचा सल्ला दिला आणि दीदींच्या या पत्रावर राज्यपालांनीही नाराजी व्यक्त केली. पोलीस महासंचालकांचा बचाव अशाप्रकारे मुख्यमंत्र्यांनी करणे, हे आश्चर्यजनक असल्याचे ते म्हणाले. एवढेच नाही तर राज्यपालांनी राजभवनासाठी मागणी केलेल्या अतिरिक्त ५३.०५ लाख रुपयांचा निधी देण्यासही राज्य सरकारने कोरोनाचे कारण सांगून नकार दिला. राज्यातील वाढत्या माओवादी, दहशतवादी कारवायांविरोधात आवाज उठविणार्‍या राज्यपालांनाच अशाप्रकारे ममतादीदींनी संविधानाचे धडे देणे हेच मुळात अशोभनीय. इतकेच नव्हे, तर चक्क एका राज्याच्या राज्यपालांवर ‘इलेक्ट्रॉनिक पाळतठेवल्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप व्हिडिओ कॉलवर संपर्क साधण्याची वेळ यावी, यावरून सामान्यांच्या ‘प. बंगाल’चे ‘पो. बंगाल’ झालेल्या राज्यातील विदारक स्थितीची कल्पना येते.

 

 
@@AUTHORINFO_V1@@