ब्रह्मवस्तू अवलोकन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Sep-2020
Total Views |


bramhadnyan_1  



ब्रह्मज्ञान अथवा आत्मज्ञान ही काही चर्मचक्षूंनी गुणांद्वारा जाणायची वस्तू नव्हे. अन्य शब्दांमध्ये सांगायचे म्हणजे दृश्य पदार्थांचे ज्ञान मिळवण्यासाठी मनाला इंद्रियांद्वारे ज्ञान मिळण्यासाठी जी सवय लागलेली असते. ती ब्रह्मज्ञान म्हणजेच आत्मज्ञान मिळण्यासाठी उपयोगी पडत नाही, हे उघड आहे. ब्रह्मवस्तू ही अतींद्रिय असल्याने दृश्य जगाचे ज्ञान मिळवण्याच्या पद्धतीने ती आणता येत नाही.


रोजच्या व्यवहारात माणसे ‘ब्रह्मज्ञान’या शब्दाचा प्रयोग स्वैरपणे करतात. तसेच, ‘ब्रह्मज्ञान’ हा शब्द ‘शहाणपणा’ किंवा ‘आगाऊपणा’ अशा अर्थानेही लोक दैनंदिन व्यवहारात वापरतात, असे आपण पाहतो. ‘लोकांसागे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण’ अशी एक म्हणही मराठीत आहे. त्याचा अर्थ लोकांना शहाणपण शिकवायचे, पण, स्वत: मात्र त्याप्रमाणे वागायचे नाही, असा आहे. ‘ब्रह्मज्ञान’या शब्दाचा लौकिक वापर बाजूला ठेवला, तरी ‘ब्रह्मज्ञान’ किंवा ‘आत्मज्ञान’ हे शब्द आध्यात्मिक विवेचनात वारंवार ऐकायला मिळतात. तेव्हा त्याचा अर्थ कळायला हवा. त्या शब्दाचा योग्य अर्थ म्हणजेच ‘ब्रह्मज्ञानाची अनुभूती’ हे खर्‍या अर्थाने अध्यात्मक्षेत्रातील अधिकारी व्यक्ती जाणू शकतात. ज्यांनी यावर फारसा विचार केलेला नाही, त्या आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या दृष्टीने अध्यात्मातील ‘ब्रह्मज्ञान’ हे अनाकलनीय आहे, अशी आमची प्रतिक्रिया असते. त्याचे कारणही तसेच आहे, या दृश्य जगतातील वस्तूंचे ज्ञान मिळवण्याची पद्धत आणि ‘ब्रह्मज्ञान’ अवलोकनाची पद्धत या पद्धती मुळात वेगवेगळ्या आहेत. सर्वसाधारणपणे या जगतातील दृश्य वस्तूंचे ज्ञान आपल्याला इंद्रियांद्वारे मिळत असते. त्यामुळे दृश्य जगतातील वस्तूंचे ज्ञान मिळवण्याच्या पद्धतीची आपल्या मनाला सवय झालेली असते. ती सवय आपल्या मनात घट्ट बसलेली असते. दृश्य जगतातील वस्तूंना आकार, रंग, वास, स्वाद, ध्वनी इत्यादी गुण असतात. त्या गुणांवरुन इंद्रियांद्वारा आपण त्या वस्तू जाणतो, म्हणजे त्यांचे ज्ञान आपण मिळवतो. उदाहरणार्थ - आंबा हे फळ सर्वांच्या परिचयाचे आहे. आकार, रंग, वास यावरून ते फळ ‘आंबा आहे’ असे आपण ओळखतो. त्याची चव घेतल्यावर तो मधुर किंवा कसे याचे ज्ञान आपल्याला होते. या ज्ञानप्रक्रियेत दृष्टी, स्पर्श, रसना ही इंद्रिये काम करतात. अशा रितीने इंद्रिये आपल्याला दृश्य पदार्थाचे ज्ञान मिळवून देतात. काही वेळा कल्पनेच्या साहाय्याने अथवा तर्काचा उपयोग करुन व्यावहारिक ज्ञान मिळवता येते. दूरवर धुराचे लोट आकाशात जाताना दिसले, तर तेथे आग लागली आहे असे ज्ञान आपल्याला होते. आग आपल्याला दिसत नसते. पण, धूर आहे तेथे अग्नी असला पाहिजे, असे अनुमान आपण तर्काने काढतो. प्रत्यक्ष दिसले नाही तरी तर्काने त्या ठिकाणी लागलेल्या आगीचे ज्ञान होते. कल्पना करुन मन अप्रत्यक्षपणे घटना, प्रसंग अनुभवू शकते. थोडक्यात, दृश्य पदार्थाचे ज्ञान मिळवायचे म्हणजे रंग, रुप, आकार, गंध, ध्वनी, स्पर्श इत्यादी गुणांद्वारा इंद्रियाने ती वस्तू जाणून घ्यायची. मनाला ज्ञान मिळवण्यासाठी ही अशी सवय लागलेली असते.
 


त्यामुळे ब्रह्मवस्तूने ज्ञान किंवा आत्मज्ञानसुद्धा आपल्याला या प्रकाराने मिळू शकेल, असे मनाला वाटते. परंतु, ब्रह्म हे स्वभावत: निर्विकल्प असल्याने दृश्य पदार्थाप्रमाणे मन त्याची कल्पना करु शकत नाही, तसेच ब्रह्म हे आतार्किक किंवा तर्काच्या पलीकडे असल्याने ते तर्काने जाणता येत नाही. ते कल्पनेच्या पार आहे. म्हणून केवळ कल्पना करुन ब्रह्मज्ञान मिळवता येत नाही. ब्रह्मज्ञान अथवा आत्मज्ञान ही काही चर्मचक्षूंनी गुणांद्वारा जाणायची वस्तू नव्हे. अन्य शब्दांमध्ये सांगायचे म्हणजे दृश्य पदार्थांचे ज्ञान मिळवण्साठी मनाला इंद्रियांद्वारे ज्ञान मिळण्यासाठी जी सवय लागलेली असते. ती ब्रह्मज्ञान म्हणजेच आत्मज्ञान मिळण्यासाठी उपयोगी पडत नाही, हे उघड आहे. ब्रह्मवस्तू ही अतींद्रिय असल्याने दृश्य जगाचे ज्ञान मिळवण्याच्या पद्धतीने ती आणता येत नाही. असे असले तरी, इंद्रियांद्वारा व्यावहारिक ज्ञान मिळवण्यासाठी जी सवय लागलेली असते, तिचाचं आग्रह आपण पारमार्थिक ज्ञानप्राप्तीसाठी धरतो. तिथेच आपली गफलत होते. परमेश्वर आहे ना? मग, तो मला दाखवा, असे म्हणणे यातून उद्भवते. येथूनच ब्रह्मज्ञानाच्या संदर्भात मनाच्या गोंधळाला सुरुवात होते. या गोंधळातून विपरीत ज्ञान तयार होते. विपरीत ज्ञान झालेल्या व्यक्ती ‘ब्रह्मज्ञान’, ‘आत्मज्ञान’, ‘देव’ या सार्‍या निव्वळ कल्पना आहेत, ते काही खरे नाही, असे सांगत सुटतात. अशी ही विपरीत ज्ञानाने विचार करणारी माणसे स्वत:ला ज्ञानी समजतात आणि विचारात की, ब्रह्मवस्तू आहे ना मग ती दाखवा, नाहीतर सारे थोतांड आहे, हे कबूल करा. अर्थात, विचार विपरीत ज्ञानातून आले असल्याने या मुक्तिवादाला काही अर्थ नसतो. तो सोडून देणे उत्तम.


ब्रह्म म्हणजे काय, यासाठी डोळे बंद करुन चिंतन करु लागलो, तर बंद डोळ्यांसमोर अंधकाराशिवाय काही जाणवत नाही. यावेळी सवयीप्रमाणे मन कल्पना करते, मी यालाच ब्रह्म म्हणायचे का? म्हणजे हे ब्रह्म काळ्या रंगाचे आहे. तसे नसेल तर मग ते आणखी कोणत्या रंगाचे आहे. परंतु, रंग हा गुण आहे. ब्रह्म गुणातित असल्याने त्याला रंग संभवत नाही. स्वामी म्हणतात-


कल्पू जाता वाटे काळें। ब्रह्म काळे ना पिवळे।
आरक्त निळे ना धवळे। वर्णरहित॥


अशावेळी रंग, गंध, आकार, स्पर्श इत्यादी गुणांच्या पलीकडे असलेले हे ब्रह्म ओळखायचे किंवा अनुभवायचे कसे, असा प्रश्न पडतो, स्वामींनीही दासबोधात ही शंका उपस्थित केली आहे.


काही दृष्टीसचि न दिसे। मनास तेंहि न भासे।
न भासे न दिसे कैसे। वोळखावे॥
जे दृष्टीसचि व पडे। जें मनासहि तातुडे।
तथा कैसे पाहणे घडें। निर्गुणासि॥


त्या निर्गुण निराकार ज्याला पाहायचे जाणायचे कसे, हा प्रश्न पडतो. ब्रह्म साक्षात्कार हा अद्वैत साक्षात्कार असल्याने त्याला ध्यानात पाहायचे किंवा अनुभवायचे ठरवले, तर मोठी पंचाईत होते. ध्यानातील विचारात मी ब्रह्मवस्तू पाहायला किंवा जाणायला बसले आहे, या कल्पनेने ‘मी हा जाणणारा’ आणि ‘जाणायचे ते ब्रह्म’ असे द्वैत निर्माण होते. बरं, द्वैत टाळावे म्हणून ध्यान करणे सोडून दिले, चिंतन करणे सोडून दिले तर मन ब्रह्मविषयी संशय निर्माण करते. मन विचार करते की, आपण ज्या ब्रह्मज्ञानाच्या मागे धावतोय ते खरचं आहे किंवा नाही. त्यामुळे मनाची संभ्रमावस्था होते, स्वामींच्या मते, ब्रह्माचा अनुभव न येण्याचे मुख्य कारण असे आहे की, आपण आपल्या मनाला फक्त दृश्य जगताचे ज्ञान इंद्रियांयनी कसे मिळवायचे, हे शिकवले, त्याची सवय लावली. या सवयीचा परिणाम म्हणून मनाला ब्रह्मचा अनुभव घेता येत नाही. वस्तुुत: मनाचे सामर्थ्य अफाट आहे. भगवंतानी गीतेत, ‘इंद्रियाणां मनश्चास्मि।’ म्हणजे सर्व इंद्रियामध्ये मन ही माझी विभुती आहे, असे म्हटले आहे. यासाठी मनाला दृश्य वस्तूंच्या ज्ञानाच्या सवयीपासून मोकळे करुन त्याला ब्रह्मज्ञान प्राप्तीची सवय लागली, तर आज ना उद्या ब्रह्मवस्तू हाती येईल. त्याचबरोबर नित्य काय व अनित्य काय, हे ठरवून नित्याचा स्वीकार आणि अनित्याचा त्याग असे जर मन करीत राहिले तर कालांतराने ब्रह्मज्ञान सापडून समाधान होईल. मनाची विशेषता अशी की, मनाला जशी सवय लावावी तशी लावता येते. दृश्य पदार्थ चिंतनाकडून मनाला ब्रह्मचिंतनाकडे वळवले तर ब्रह्मवस्तू अनुभवता येते, असे समर्थांचे मत आहे. स्वामी सांगतात-


सवे लाविता सवे पडे। सवे पडता वस्तू आतुडे।
नित्यानित्य विचारे घडे। समाधान॥ (दा.७.७.१५)


मुळातील सवय बदलून मनाला दुसर्‍या सवयीकडे वळवणे कठीण तर आहेच, पण तसे करताना येणार्‍या अडचणींचा साकल्याने विचार केला तर ते सुकर होईल.
 

- सुरेश जाखडी

 
@@AUTHORINFO_V1@@