मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी अनेक आरोप-प्रत्यारोप अद्यापही सुरूच आहेत. मुंबईत भीती वाटत असेल तर परत येऊ नये, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊतांनी दिल्याचा दावा कंगनाने केला आहे. मला मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्याचे वक्तव्य काही दिवसांपूर्वी कंगनाने केले होते.त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्याला उघड धमकी दिली असा गंभीर आरोप अभिनेत्री कंगना रनौतने केला आहे.
तर कंगनाच्या या आरोपाला प्रत्युत्तर देताना ट्विटरवर खेळण्यापेक्षा पोलीस आयुक्तांकडे जा आणि तुमच्याकडे असलेले पुरावे त्यांना द्या, असे संजय राऊत म्हणाले. बॉलिवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्याचे काही दिवसांपूर्वीच कंगनाने म्हंटले होते. 'मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्यास पुन्हा शहरात येऊ नकोस, असं म्हणत मला राऊत यांनी धमकी दिली. आधी झळकलेले आझादीचे फलक आणि आता मिळत असलेल्या उघड धमक्या यामुळे मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे?,' असा सवाल कंगनाने ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला.
कंगनाने याआधी मुंबई पोलिसांवर अविश्वास व्यक्त केला होता. 'कंगना राणौत ड्रग माफियांची पोलखोल करण्यास तयार आहे. तिला पोलीस सुरक्षेची गरज आहे. पण महाराष्ट्र सरकार ते पुरवत नाही,' असे ट्विट भाजप आमदार राम कदम यांनी केले होते.यावर कंगनानं मुव्ही माफियांपेक्षा मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटत आहे. मुंबईमध्ये मला हिमाचल प्रदेश सरकार किंवा केंद्र सरकारची सुरक्षा हवी, मुंबई पोलिसांची नको, असे उत्तर दिले. विशेष म्हणजे राम कदम यांनी कंगनाच्या मताचे समर्थनही केले.